७ मे या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त करायच्या विविध यज्ञविधींसाठी त्यांनी केलेल्या संकल्पविधीचा त्यांच्यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘थर्मल इमेजिंग
(Thermal Imaging)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ४ मे या दिवशी ‘नवग्रह शांती’ आणि ५ मे या दिवशी ‘अघोरास्त्र याग’ हे यज्ञविधी करण्यात आले. या यज्ञविधींचा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ४.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केला. त्यांनी केलेल्या या संकल्पाचा त्यांच्या आज्ञा आणि विशुद्ध या कुंडलिनीचक्रांवर, तसेच दोन्ही तळहातांवर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संकल्प करण्यापूर्वी (सकाळी ९.१५ वाजता) आणि संकल्प केल्यानंतर (सकाळी ९.४५ वाजता) ‘थर्मल कॅमेर्‍या’द्वारे डोके ते खांदे इथपर्यंतचे छायाचित्र घेतले, तसेच दोन्ही तळहातांची छायाचित्रे घेतली. ‘थर्मल कॅमेर्‍या’द्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून ‘थर्मल कॅमेर्‍या’ला जोडलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे त्या ठिकाणच्या शरिरावरील तापमानांची माहिती मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञा आणि विशुद्ध ही कुंडलिनीचक्रे असलेल्या ठिकाणी असलेल्या त्वचेवरील अन् दोन्ही तळहातांच्या त्वचेवरील तापमानांवरून त्यांनी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यात आला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी

२ अ. चाचणीतील मोजणीच्या नोंदींच्या वेळी असणारे कक्षातील तापमान आणि आर्द्रता

चाचणीच्या कक्षामध्ये वातानुकूलन यंत्र लावले होते. वातानुकूलन यंत्रामध्ये कक्षाचे तापमान ठराविक ठेवण्याची सुविधा असते. या सारणीवरून उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या कालावधीत चाचणीच्या कक्षातील तापमान आणि आर्द्रता एकसारखीच होती, हे लक्षात येते. त्यामुळे त्यांद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तापमानांमध्ये कोणताही पालट होणे अपेक्षित नाही.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र, तसेच दोन्ही तळहात यांच्या ठिकाणच्या त्वचेवरील तापमान

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. वातानुकूलन यंत्रामुळे चाचणी कक्षातील तापमान अल्प असणे आणि तरीही संकल्पविधीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चक्रे, तसेच तळहात यांच्या ठिकाणच्या त्वचेचे तापमान वाढणे वैशिष्ट्यपूर्ण असणे

वातानुकूलन यंत्रामुळे चाचणीच्या कक्षातील तापमान संपूर्ण चाचणीच्या कालावधीत सातत्याने २० अंश सेल्सिअस होतेे, तसेच कक्षातील आर्द्रताही सातत्याने ५० टक्के होती. संकल्पविधीच्या वेळी या तापमानात सलग ३० मिनिटे विशेष काही शारीरिक कृती न करता बसून असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र या ठिकाणच्या शरिरावरील त्वचेचे, तसेच दोन्ही तळहातांवरील त्वचेचे तापमान बर्‍यापैकी वाढले, हे वरील सारणीतून लक्षात येते.

वातावरण आणि व्यक्तीचे शरीर यांत ऊर्जेची देवाण-घेवाण होत असते. सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की, वातावरणाचे तापमान व्यक्तीच्या शारीरिक तापमानापेक्षा अल्प असते, तेव्हा शरिराचे तापमानही घटते; पण या चाचणीत कक्षातील तापमान अल्प असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरिराचे तापमान त्यांनी यज्ञासाठीचा संकल्प केल्यानंतर वाढले होतेे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा संकल्पविधीचा त्यांच्या शरिरातील ऊर्जेवर झालेला परिणाम आहे.

३ आ. संकल्पविधीमुळे विशुद्धचक्रापेक्षा आज्ञाचक्राच्या ठिकाणच्या त्वचेचे तापमान अधिक वाढण्याचे कारण

मनुष्याचे आज्ञाचक्र हे त्याच्या बुद्धीकेंद्राचे स्थान असते, तर विशुद्धचक्र हे त्याचे बोधकेंद्र असते. बुद्धीचे कार्य होण्यासाठी आधी बोध व्हावा लागतो. मनुष्याच्या चक्रांकडून आध्यात्मिक स्तरावर कार्य होण्यासाठी ती जागृत असावी लागतात. उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांची कुंडलिनीचक्रे जागृत असतात, म्हणजे त्यांच्यात कुठलाही अडथळा नसतो. समाजाच्या उन्नतीसाठी समष्टी कार्य करणार्‍या संतांचे आज्ञाचक्र आवश्यकतेनुसार विशेष जागृत होते. संकल्पविधीच्या पूर्वी आज्ञाचक्राच्या ठिकाणचे तापमान विशुद्धचक्राच्या ठिकाणच्या तापमानापेक्षा थोडे न्यून होते. संकल्पविधीनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणच्या त्वचेवरील तापमानामध्ये विशुद्धचक्राच्या ठिकाणच्या त्वचेवरील तापमानापेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली, हे वरील सारणीतून लक्षात येते. यावरून ‘त्यांचे आज्ञाचक्र विशेषत्वाने जागृत झाले’, असे म्हणता येईल.

३ इ. संकल्पविधीमुळे उजव्या तळहातापेक्षा डाव्या तळहाताचे तापमान अधिक वाढण्याचे कारण

हात हे मनुष्याचे कर्मेंद्रिय आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्प करतांना उजव्या तळहातावर अक्षता घेऊन डाव्या हाताने पळीने त्यांवर जल सोडून संकल्प केला. शरिराच्या डावीकडे चंद्रनाडी असते आणि उजवीकडे सूर्यनाडी असते. त्यामुळे डाव्या तळहाताचे तापमान उजव्या तळहातापेक्षा अल्प असायला हवे. संकल्प आरंभ करण्यापूर्वी डाव्या तळहाताचे तापमान (३५.३ अंश सेल्सिअस) उजव्या तळहाताच्या तापमानापेक्षा (३५.७ अंश सेल्सिअस) थोडे अल्प होते; पण संकल्प झाल्यानंतर उलट झालेले सारणीमध्ये दिसून आले, तसेच तेव्हा दोन्ही तळहातांच्या तापमानांतील भेद पुष्कळ होता. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

संकल्प करतांना उजव्या हाताला कार्य करायला डाव्या हाताची, म्हणजे निर्गुणाची जोड मिळाली. आध्यात्मिक कार्य होण्यासाठी सगुण स्तराला निर्गुणाची जोड मिळणे आवश्यक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे उच्च आध्यात्मिक पातळीमुळे अधिक प्रमाणात निर्गुण स्तरावर असल्याने त्यांनी केलेल्या संकल्पविधीला निर्गुणाची जोड अधिक प्रमाणात मिळाली. त्यामुळे संकल्प झाल्यानंतर त्यांच्या डाव्या तळहाताचे तापमान उजव्या तळहाताच्या तापमानापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.

४. निष्कर्ष – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
शारीरिक तापमानात झालेला पालट संकल्पविधीमुळे झालेला असणे

येथे दिलेली चाचणी नियंत्रित वातावरणात घेण्यात आली होती. त्यामुळे ‘चाचणीत दिसून आलेला शारीरिक तापमानात झालेला पालट हा कोणत्याही बाह्य, शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे झालेला नाही, तर संकल्पविधीमुळे, म्हणजे आध्यात्मिक कारणामुळे झालेला आहे’, हे स्पष्ट होते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.५.२०१८)                 

ई-मेल : [email protected]