एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ! ईश्‍वर त्याच्या भक्तांना संतांच्या माध्यमातून अनुभूती देतो. अनुभूतींमुळे भक्तांची ईश्‍वरावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थळे आदी सात्त्विक ठिकाणांची विभूती कपाळाला लावल्याने अथवा जवळ बाळगल्याने अनेकांना आध्यात्मिक अनुभूती येतात; कारण तेथील विभूती त्या पवित्र वातावरणामुळे चैतन्यमय झालेली असते आणि ते चैतन्य भक्तांसाठी कार्य करते. एका संतांकडे भस्म आपोआप प्रकट होते. हे संत हे भस्म त्यांच्या भक्तांना कपाळावर लावतात, तेव्हा त्या भक्तांना आध्यात्मिक अनुभूती येतात. दुसर्‍या संतांनी दिलेल्या विभूतीमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने ती जवळ बाळगली किंवा कपाळाला लावली की, त्यातून आध्यात्मिक उपाय होतात. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यात एक दिवस रवाळ कण आपोआप निर्माण झालेले आढळले. त्या रवाळ कणांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे त्यांतील सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले.

एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण, यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ७.१२.२०१७ या दिवशी एक चाचणी करण्यात आली. ही चाचणी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप आलेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण, यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या चाचणीमध्ये सर्वसाधारण राख तुलनेसाठी वापरण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यामुळे एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात आली.

जागेअभावी ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक’, प्रभावळ मोजणे’ इत्यादी सूत्रे संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत.

 

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षण

सर्वसाधारण राख, एका संतांकडे आपोआप निर्माण झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप निर्माण झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण या चारही घटकांमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षण

एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण या तिन्ही घटकांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. या चाचणीतील सर्वसाधारण राखेमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती; पण एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण या तिन्ही घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होती. या तिन्ही घटकांच्या संदर्भात ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली. एका संतांकडे आपोआप प्रकट झालेल्या भस्मातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३.२० मीटर होती. दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेल्या विभूतीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.३७ मीटर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेल्या रवाळ कणांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ६.४० मीटर होती.

२ इ. चाचणीतील घटकांच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडील विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण या तिन्ही घटकांची प्रभावळ सर्वसाधारण राखेच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक असणे : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. सर्वसाधारण राखेची प्रभावळ १.२२ मीटर होती. एका संतांकडे आपोआप प्रकट झालेल्या भस्माची प्रभावळ ४.३६ मीटर होती. दुसर्‍या संतांकडील विभूतीची प्रभावळ ६.२३ मीटर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेल्या रवाळ कणांची प्रभावळ ८.६० मीटर होती. एकूणच या तिन्ही घटकांची प्रभावळ सर्वसाधारण राखेच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती.

 

३. निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म हे ‘दैवी भस्म’ असणे

एका संतांचा आध्यात्मिक अधिकार पुष्कळ मोठा आहे. त्यांच्याकडे आपोआप प्रगट झालेले भस्म हे अद्भुत ईश्‍वरी साक्षात्कारांपैकी एक आहे. त्यांच्या निवासस्थानी आणि देवघरात असे अद्भुत ईश्‍वरी साक्षात्कार नेहमीच प्रत्ययास येतात.

३ आ. दुसर्‍या संतांच्या संकल्पशक्तीमुळे त्यांच्याकडील विभूतीमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

दुसरे संत हे उच्च कोटीचे संत आहेत. त्यांनी अनेक विधी केले आहेत. ते अन्य संतांवरील संकटे दूर होऊन त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी वेळोवेळी आध्यात्मिक उपायही (टीप) सांगतात. त्यांच्या संकल्पात पुष्कळ शक्ती असल्याने त्यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या वस्तूंमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असते. त्यांनी दिलेली विभूती जवळ बाळगल्याने किंवा कपाळाला लावल्याने आध्यात्मिक उपाय होतात. चाचणीतील विभूतीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे आणि तिची प्रभावळही पुष्कळ अधिक असणे, हे त्या विभूतीमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे द्योतक आहे.

टीप – आध्यात्मिक उपाय : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाहीत ?’, हे जाणवू शकते.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या बंद डब्यात रवाळ कण आपोआप निर्माण होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले विश्‍वकल्याणाकरता सत्त्वगुणी लोकांचे हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ते त्यांचे समष्टी कार्य चालू आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील (उच्च आध्यात्मिक स्तरावरील) संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम त्यांचा देह, त्यांच्या सभोवतालचे वातावरण, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती इत्यादींवर होतो. त्यांच्या देहात होणारे दैवी पालट (उदा. नखे पारदर्शक होणे, केस सोनेरी होणे, त्वचा पिवळसर होणे आदी), त्यांच्या दैनंदिन वापरातील निर्जीव वस्तूंमध्ये चैतन्य निर्माण होणे (उदा. त्यांच्या रबरी चपला पिवळसर होणे आदी), त्यांच्या अवयवांवर ‘ॐ’, कमळ, स्वस्तिक आदी सात्त्विक आकृत्या उमटणे, असे अनेक अद्भुत गोष्टी त्यांच्या संदर्भात गत काही वर्षांपासून प्रत्ययास येत आहेत. पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती संत असल्याचे कळण्यासाठी ईश्‍वर त्या संतांच्या संदर्भात समाजातील लोकांना अनुभूती देत असे. त्या काळी लोक साधना करणारे असल्यामुळे अनुभूतींच्या माध्यमातून लोकांना संतांचे महत्त्व लक्षात येत असे. सध्याच्या संगणकीय युगातही ईश्‍वर त्याची लीला दाखवत आहे. केवळ त्याकडे पहाण्याची दृष्टी मात्र लागते आणि ती साधनेमुळेच प्राप्त होते. या घोर कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण पालटांच्या माध्यमातून ईश्‍वर त्याची लीला अनुभवण्यास देत आहे. त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण ही ईश्‍वरी लीलाच आहे. चाचणीतील निरीक्षणांतूनही हेच दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]

टीप : एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण, यांच्या रासायनिक पृथ्थककरणाचा अहवाल अन् त्यांचे निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

Leave a Comment