चित्रकार-साधिकेने ‘कलेसाठी कला’ नव्हे, ‘साधना’ म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होते, त्याला ‘सूक्ष्म जगत’ असे संबोधतात. गुहा, पिरॅमिड, धार्मिक स्थळे, वाडे आदी विविध प्राचीन वास्तूंमधील चित्रे आणि शिल्पे यांचा अभ्यास केल्यास सूक्ष्म जगताविषयी जिज्ञासा जगातील जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये असल्याचे आढळून येते. ‘सूक्ष्म चित्रां’मुळे या जिज्ञासेची पूर्ती काही प्रमाणात होते. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र’ किंवा ‘सूक्ष्म चित्र’ म्हणतात. काही चित्रकार व्यावसायिक हेतूने, तर काही छंद म्हणून सूक्ष्म चित्रे काढतात. एका चित्रकार-साधिकेने गुरूंच्या मार्गदर्शनानुसार ‘साधना’ म्हणून सूक्ष्म चित्रे काढण्यास आरंभ केला. ‘चित्रकार-साधिका काढत असलेल्या सूक्ष्म चित्रातील स्पंदनांमध्ये तिच्या साधनेमुळे काय पालट झाले ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. ६.१०.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ही चाचणी करण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) कोरा कागद ठेवून वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर व्यावसायिक हेतूने सूक्ष्म चित्रे काढणार्‍या एका चित्रकाराने काढलेले सूक्ष्म चित्र, चित्रकार-साधिकेने साधना आरंभ करण्यापूर्वी स्वतःचा छंद जोपासण्यासाठी काढलेले सूक्ष्म चित्र आणि त्याच साधिकेने साधना करणे आरंभ केल्यानंतर १० वर्षांनी गुर्वाज्ञेने एका संतांचे काढलेले सूक्ष्म चित्र एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘तिन्ही सूक्ष्म चित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

 

२. चाचणीतील सूक्ष्म चित्रांंविषयी माहिती

२ अ. एका व्यावसायिक कलाकाराने व्यावसायिक हेतूने काढलेले सूक्ष्म चित्र

हे सूक्ष्म चित्र व्यावसायिक हेतूने चित्रे काढणार्‍या एका चित्रकाराने काढलेले सूक्ष्म जगतातील एका शक्तीचे आहे.

२ आ. चित्रकार-साधिकेने साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून काढलेले सूक्ष्म चित्र

हे सूक्ष्म चित्र चित्रकार-साधिका सौ. योया वाले (आताच्या पू. (सौ.) योया वाले) यांनी वर्ष १९९९ मध्ये साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून काढलेले आहे. ते सूक्ष्म जगतातील एका शक्तीचे आहे.

२ इ. चित्रकार-साधिकेने १० वर्षे साधना केल्यानंतर गुर्वाज्ञेने काढलेले सूक्ष्म चित्र

हे सूक्ष्म चित्र चित्रकार-साधिका सौ. योया वाले यांनी साधना आरंभ केल्यानंतर १० वर्षांनी, म्हणजे वर्ष २००९ मध्ये गुर्वाज्ञेने काढलेले आहे. ते एका संतांचे सूक्ष्म चित्र आहे.

 

३. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

३ अ. मूळ नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक
वातावरणामुळे तेथे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असणे

मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) एकूण ६८ टक्के सकारात्मक स्पंदने आणि ३२ टक्के नकारात्मक स्पंदने होती. कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा ‘सनातन आश्रमा’त केलेली असल्याने ‘मूळ नोंदी’च्या वेळी (चाचणीसाठी सूक्ष्म चित्र ठेवण्यापूर्वीच्या) वातावरणाच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक होते.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

३ आ. व्यावसायिक कलाकाराने व्यावसायिक हेतूने काढलेल्या
सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे, तसेच चैतन्याचे प्रमाण घटणे

या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने ६२ टक्के होती आणि नकारात्मक स्पंदने ३८ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील एकूण सकारात्मक स्पंदने ६ टक्क्यांनी घटली. ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदने दर्शवणारा चैतन्याचा पिवळा रंग २६ टक्के होता, तर या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीत तो १० टक्के होता. यावरून व्यावसायिक कलाकाराने काढलेल्या सूक्ष्म चित्रामधील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ घटल्याचे लक्षात येते. थोडक्यात सांगायचे, तर मूळ नोंदीच्या तुलनेत या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढून सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण घटले, तसेच चैतन्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाणही घटले.

३ इ. चित्रकार-साधिकेने साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून
काढलेल्या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे, तसेच चैतन्याचे प्रमाण घटणे

चित्रकार-साधिकेने साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने ६४ टक्के आणि नकारात्मक स्पंदने ३६ टक्के होती. या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग १३ टक्के होता. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२६ टक्क्यांच्या) तुलनेत तो घटला होता. यावरून असे म्हणता येईल की, या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे, तसेच चैतन्याचे प्रमाण घटले.

(याचे पिप छायाचित्र येथे दिले नाही कारण ते छायाचित्र क्र. २ प्रमाणेच आहे.)

३ ई. चित्रकार-साधिकेने १० वर्षे साधना केल्यावर गुर्वाज्ञेने काढलेल्या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच शुद्धता आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

चित्रकार-साधिकेने १० वर्षे साधना केल्यावर गुर्वाज्ञेने काढलेल्या या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने ७७ टक्के आणि नकारात्मक स्पंदने २३ टक्के होती. या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग ४४ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२६ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ वाढला होता. तसेच या सूक्ष्म चित्राच्या प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग (१० टक्के) दिसत होता. थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या सूक्ष्म चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच शुद्धता आणि चैतन्य यांचे प्रमाण पुष्कळ वाढले अन् नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

 

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. व्यावसायिक चित्रकाराने काढलेले सूक्ष्म चित्र आणि चित्रकार-साधिकेने साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून काढलेले सूक्ष्म चित्र यांतून सर्वसाधारणतः सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. या तत्त्वानुसार दोन्ही चित्रकारांनी काढलेल्या चित्रांसह (रूपांसह) त्यांतील स्पंदने (म्हणजे शक्ती) होती. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्रातील स्पंदने त्या चित्रकाराचा चित्र काढण्यामागील उद्देश, चित्राचा विषय, चित्रकार साधना करणारा असणे वा नसणे, चित्रकार साधना करणारा असल्यास त्याची स्वतःची साधना अन् गुरूंचे मार्गदर्शन इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. व्यावसायिक चित्रकाराचा सूक्ष्म चित्र काढण्याचा उद्देश धन अन् प्रसिद्धी मिळवणे हा होता, तर चित्रकार-साधिका सौ. योया वाले यांनी साधना आरंभ करण्यापूर्वी एक कला म्हणून सूक्ष्म चित्र काढले होते. दोघांच्या चित्रांचा विषय ‘सूक्ष्म जगतातील एक शक्ती’ हा होता. दोघेही चित्रकार साधना न करणारे होते. थोडक्यात सांगायचे, तर दोन्ही चित्रकारांचा चित्र काढण्याचा उद्देश मायेतील असल्याने अन् त्यांना साधनेचे पाठबळ नसल्याने त्या दोघांच्या चित्रांतून सर्वसाधारण सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

४ आ. चित्रकार-साधिकेने १० वर्षे साधना केल्यावर गुर्वाज्ञेने काढलेल्या सूक्ष्म चित्रातून उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, हे त्यांच्या साधनेचे फलित असणे

चित्रकार-साधिका सौ. योया वाले यांनी १९९९ मध्ये साधना करण्यास आरंभ केला. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता चांगली असल्याचे जाणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ याविषयी मार्गदर्शन केले. एखादे सूक्ष्म चित्र मायावी, भासमान, काल्पनिक किंवा सत्य कसे असते, याचेही त्यांनी ज्ञान दिले. थोडक्यात सांगायचे, तर गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे या साधिकेच्या साधनेला योग्य वेळी योग्य दिशा मिळाली. तिने तळमळीने साधना चालू ठेवली. सूक्ष्म चित्रे काढण्याची सेवा ‘साधना’ म्हणून करत असतांना तिची सात्त्विकता वाढून आध्यात्मिक उन्नती झाली. आध्यात्मिक उन्नतीमुळे ती काढत असलेल्या सूक्ष्म चित्रांतील सत्यताही वाढू लागली. अशा प्रकारे १० वर्षे साधना केल्यावर तिने गुर्वाज्ञेने एका संतांचे सूक्ष्म चित्र काढले. ते या चाचणीसाठी घेतले होते. त्यामुळे तिने १० वर्षांपूर्वी काढलेल्या सूक्ष्म चित्राच्या तुलनेत तिने आता ‘साधना’ म्हणून काढलेल्या या चित्रातून पुष्कळ प्रमाणात उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यामागे तिची साधना आणि गुरूंचे आशीर्वाद कारणीभूत आहेत. पुढे काही वर्षांतच या साधिकेने जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपदही गाठले.

ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना म्हणून, म्हणजे सात्त्विक हेतूने चित्रे काढणार्‍या साधक-चित्रकारांची आध्यात्मिक उन्नती होते. त्यांनी काढलेल्या चित्रांतून समाजाला वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान मिळते, तसेच प्रबोधनही होते. अशा चित्रांतून आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. याउलट केवळ छंद म्हणून अथवा व्यावसायिक हेतूने काढलेल्या चित्रांतून समाजाला आध्यात्मिक लाभ होत नाही. अध्यात्मातील जाणकारांनुसार साधनेचे पाठबळ नसल्यास सूक्ष्म चित्रे काढणार्‍यांना वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे चित्रकारांनी स्वतः साधना करणे आणि आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.२.२०१८)

ई-मेल : [email protected]

सूचना १   : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच चित्र यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २   : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment