गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, सनातन संस्था

मंगळुरू (कर्नाटक) येथील द्वितीय राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र संघटक शिबीर

शिबिराला उपस्थित धर्माभिमानी हिंदू (समवेत .श्री. रमानंद गौडा)

मंगळुरू – सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. निर्मळ मनात भगवंताचा वास असतो. गुरुदेवांचे कार्य भू, आकाश आणि ब्रह्मांड, अशा सर्व मंडलात सूक्ष्मातून चालू असून त्यांना आपल्या मनातील सूक्ष्म विचारही समजतो. त्यासाठी प्रत्येकाने गुरुदेवांवरील श्रद्धा, भक्ती आणि भाव वाढवून साधना केली पाहिजे. आपण करत असलेली प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी करून त्यांच्या कृपेला पात्र होऊया, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारसेवक ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमानंद गौडा यांनी केले.

येथील सनातनच्या सेवाकेंद्रात हिंदु राष्ट्र संघटक शिबीर नुकतेच भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्या वेळी श्री. गौडा मार्गदर्शन करत होते. शिबिरामध्ये कर्नाटक प्रसारसेवक श्री. काशिनाथ प्रभु, शिवमोग्गा जिल्ह्याचे समिती समन्वयक श्री. विजय रेवणकर, दक्षिण कन्नड जिल्ह्याचे समिती समन्वयक श्री. चंद्र मोगेर, दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या सनातन संस्थेच्या समन्वयक सौ. मंजुळा गौडा यांनी शिबिरार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी गदग, बागलकोट, विजयपूर, धारवाड, उत्तर कन्नड, बळ्ळारी आणि बीदर या जिल्ह्यांतील शिबिरार्थी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. शिबिरामध्ये स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत सांगितलेली सूत्रे शिबिरार्थी लगेच कृतीत आणत होते.

२. एका धर्मप्रेमीने मंगळुरू येथील सेवाकेंद्रात येऊन सेवा करण्याची सिद्धता दर्शवली.

३. शिबिरातून प्रेरणा घेऊन अन्य एका धर्मप्रेमीने पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

४. सेवाकेंद्र पहातांना धर्माभिमानी हिंदूंना तेथील शिस्त आणि स्वच्छता भावली. येथे प्रत्येक विभागात वस्तू व्यवस्थित ठेवल्याचे दिसले. त्याप्रमाणे आम्हीही आमच्या घरी असलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत, याची आम्हाला जाणीव झाली. याचसमवेत येथे असलेले सर्वजण आपले आहेत, असे जाणवले, असे धर्माभिमानी हिंदूंनी सांगितले.

शिबिरार्थींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. एका धर्माभिमानी हिंदूला जिल्हास्तराची एक परीक्षा असल्याने शिबिराचे २ दिवस झाल्यानंतर जावे लागणार होते. शिबिराचा आणखी १ दिवस त्यांना मिळणार नव्हता. त्यांना तिसर्‍या दिवशीही थांबण्याची पुष्कळ इच्छा होती. त्या वेळी त्यांना अचानक परीक्षा रहित झाल्याचा निरोप मिळाला अन् त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर ते तिसर्‍या दिवशीही शिबिराचा लाभ घेऊ शकले.

२. एका धर्मप्रेमीला आपण एका वेगळ्याच लोकात आलो आहोत, अशी अनुभूती आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment