काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यावर त्यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे
‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘ईश्‍वरनिर्मित सृष्टी अनेकविध रंगांनी नटली आहे. भूमी मातकट रंगाने, तर वृक्षवल्ली हिरव्या रंगाने नटलेल्या आहेत. ‘आपल्या जीवनात रंग नसते, तर….’, अशी एक क्षण कल्पना करून पहा. असे झाले असते, तर जीवन निरस झाले असते. पांढरा हा सप्तरंगांना सामावून घेणारा रंग आहे. सध्या समाजात काळ्या रंगाचे आकर्षण पुष्कळ प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. काळा आणि पांढरा हे रंग परस्परविरोधी गुणधर्म असणारे रंग आहेत. ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा वापर करण्यात आला. १० आणि १२ नोव्हेंबर २०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत १०.११.२०१७ या दिवशी तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेल्या साधकाची त्याच्या नेहमीच्या पोषाखात ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर त्याला २० मिनिटे काळा पोषाख परिधान करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची निरीक्षणे नोंद करण्यात आली. १२.११.२०१७ या दिवशी त्या साधकाची पुन्हा एकदा त्याच्या नेहमीच्या पोषाखात निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर त्याला २० मिनिटे पांढरा पोषाख परिधान करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर ‘काळ्या आणि पांढर्‍या रंगांचे पोषाख परिधान केल्यामुळे या साधकावर त्याचा काय परिणाम झाला ?’, हे येथे दिले आहे.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने काळ्या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे त्याच्यावर झालेला परिणाम

२ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – काळ्या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : काळ्या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या या साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती (स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला होता) आणि तिची प्रभावळ ३० सें.मी. आली. तेव्हा त्या साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. त्याने काळ्या रंगाचा पोषाख २० मिनिटे परिधान केल्यानंतर त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १४ सें.मी.ने वाढली, तसेच त्याच्यात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही निर्माण झाली. तेव्हा यू.टी.एस्. स्कॅनरने १७० अंशाचा कोन दर्शवला. या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.)

२ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – काळ्या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी आणि परिधान केल्यानंतरही तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

२ अ ३. साधकाच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने काळ्या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे त्याची प्रभावळ ८ सें.मी.ने घटणे : काळ्या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी साधकाची प्रभावळ ४२ सें.मी. होती. त्याने काळ्या रंगाचा पोषाख परिधान केल्यानंतर त्याची प्रभावळ ८ सें.मी.ने न्यून होऊन ती ३४ सें.मी. झाली.

वरील सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३ अ’ मध्ये दिले आहे.

२ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे त्याच्यावर झालेला परिणाम

२ आ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होणे आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून होणे : पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या या साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती (स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला होता) आणि तिची प्रभावळ ४० सें.मी. होती. तसेच त्याच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही पूर्णपणे होती आणि तिची प्रभावळ ४१ सें.मी. होती. त्याने पांढर्‍या रंगाचा पोषाख २० मिनिटे परिधान केल्यानंतर त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली. तसेच त्याच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही न्यून झाली. तेव्हा यू.टी.एस्. स्कॅनरने १६० अंशाचा कोन दर्शवला.

२ आ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकातील सकारात्मक ऊर्जेत पूर्णपणे वाढ होणे आणि तिची प्रभावळ ३९ सें.मी. असणे : पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या या साधकामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तेव्हा स्कॅनरने ११० अंशाचा कोन दर्शवला. त्याने पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत पूर्णपणे वाढ झाली आणि तिची प्रभावळ ३९ सें.मी. झाली.

२ आ ३. साधकाच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे त्याची स्वतःची प्रभावळ ३ सें.मी.ने घटणे : पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान करण्यापूर्वी साधकाची प्रभावळ ४४ सें.मी. होती. त्याने पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यानंतर त्याची प्रभावळ ३ सें.मी.ने घटून ती ४१ सें.मी. झाली.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३ आ’ मध्ये दिले आहे.

३. निरीक्षणांवरील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने काळ्या रंगाचा पोषाख घातल्यावर त्याच्यावर झालेल्या परिणामाचे विश्‍लेषण

३ अ १. काळ्या रंगाचे वैशिष्ट्य : काळ्या रंगामध्ये वातावरणातील तमोकण (नकारात्मक स्पंदने) ग्रहण करण्याची क्षमता सर्वांत अधिक असते. ईश्‍वराने निर्माण केलेले काळा रंग सोडून इतर सर्व रंग एकमेकांत मिसळतात. त्यांच्या एकमेकांतील मिश्रणातून तिसर्‍या रंगाची निर्मिती होते; मात्र काळ्या रंगाला असणार्‍या तमोगुणी जडत्वामुळे तो इतर रंगांत मिसळला जात नाही. तो काळाच रहातो. त्यामुळे काळ्या रंगाकडे पाहिल्यावर जडपणा जाणवतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’)

३ अ २. काळ्या रंगाचा पोषाख परिधान करण्याचा झालेला परिणाम

३ अ २ अ. काळ्या रंगाच्या पोषाखाकडे नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाल्याने तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकातील नकारात्मक ऊर्जा वाढणे आणि त्याच्यात वाईट शक्तीचे अस्तित्व निर्माण होणे : या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने काळ्या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे त्याच्याकडे आकृष्ट झालेल्या वातावरणातील नकारात्मक स्पंदनांमुळे त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा वाढली. काळ्या कपड्याचा झालेला आणखी एक परिणाम म्हणजे त्या साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही निर्माण झाली. ही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीचे प्रत्यक्ष अस्तित्व दर्शवते. याचा अर्थ काळ्या कपड्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकामध्ये वाईट शक्ती प्रत्यक्ष आली. यावरून लक्षात येते की, काळे कपडे परिधान केल्यामुळे कशी मोठी हानी होते आणि आपण सहजच वाईट शक्तींच्या ताब्यात कसे जाऊ शकतो.

३ अ २ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाची प्रभावळ आणखी घटणे : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. साधक नियमित साधना करत असल्याने त्याची प्रभावळ सामान्य व्यक्तीहून अधिक असते. अध्यात्मातील उन्नतांची प्रभावळ ४ – ५ मीटर येते. चाचणीमध्ये सहभागी झालेल्या साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने त्याची प्रभावळ पुष्कळ क्षीण होऊन ती सामान्य व्यक्तीहूनही अल्प (०.४२ मीटर) होती. काळे कपडे परिधान केल्यामुळे त्या साधकामधील नकारात्मक ऊर्जा आणखी वाढल्याने त्याची प्रभावळ आणखी घटून ती ०.३४ मीटर झाली.

३ आ. पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान करण्याचा झालेला परिणाम

३ आ १. पांढर्‍या रंगाचे वैशिष्ट्य : पांढरा रंग हा निर्गुणाचे प्रतीक आहे. त्या रंगाकडे दीर्घकाळ पाहिल्यावर मन निर्विचार होते. पांढर्‍या रंगाचे कपडे घातल्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांवरील नकारात्मक स्पंदनांचे आवरण दूर होते अन् तिच्या मनाला उत्साह जाणवतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’)

३ आ २. पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान केल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर निर्गुण तत्त्वाचे उपाय होऊन त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे आणि वाईट शक्तीचे अस्तित्वही न्यून होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने पांढर्‍या रंगाचा पोषाख परिधान करण्याअगोदर त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा पुष्कळ होती, तसेच त्याच्यात वाईट शक्तीचे अस्तित्वही होते, हे त्याच्यातील अनुक्रमे ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेच्या ०.४० मीटर प्रभावळीवरून अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेच्या ०.४१ मीटर प्रभावळीवरून लक्षात येते. त्या साधकाने पांढरे कपडे परिधान केल्यावर त्याच्यावर निर्गुण तत्त्वाचे उपाय होऊन त्याच्यातील नकारात्मक स्पंदनांचे विघटन झाले. त्यामुळे त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली, तसेच त्याच्यातील वाईट शक्तीचे अस्तित्वही न्यून झाले.

३ आ ३. पांढर्‍या पोषाखामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर आध्यात्मिक उपाय होऊन त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रभावळ मोजता येण्याइतपत निर्माण होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकामध्ये चाचणीच्या आरंभी पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असूनही थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही होती, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याला ‘पांढरे कपडे परिधान करण्याचा प्रयोग करायचा आहे’, हे माहीत होते. त्याच्या मनातील पांढर्‍या कपड्यांविषयीच्या विचारांमुळे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार झाले. पांढर्‍या कपड्यांमुळे त्या साधकावर आध्यात्मिक उपाय होऊन त्याच्यात सकारात्मक ऊर्जा प्रभावळ मोजता येण्याइतपत निर्माण झाली.

३ आ ४. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने पांढरा पोषाख परिधान केल्याने त्याची त्रासदायक शक्तीने भारित असलेली प्रभावळ न्यून झाल्याने त्याची प्रभावळ घटणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकामध्ये चाचणीच्या आरंभी पुष्कळ नकारात्मक ऊर्जा होती, तसेच त्याच्यामध्ये वाईट शक्तीचे अस्तित्वही होते. या दोघांचा परिणाम त्याच्या प्रभावळीवरही झाला होता आणि त्याची प्रभावळ त्रासदायक शक्तीने भारित झाली होती. त्या साधकाने पांढरा पोषाख परिधान केल्यावर त्याची प्रभावळ घटली, म्हणजेच त्याच्यावर आध्यात्मिक उपाय होऊन त्याची त्रासदायक शक्तीने भारित असलेली प्रभावळ न्यून झाली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात