परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि भोवती मोठे वलय असलेला दिसणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात. त्यांचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल’, या उद्देेशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्या संदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास केला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना किंवा वातावरणातील असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन चालू आहे.

१६.९.२०१७ या रात्री ८.३० ते ९.४० या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यासाठी काही छायाचित्रे काढण्यात आली. आपण रस्त्यावरील दिवे प्रतिदिन पहातो; परंतु दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या प्रकाशाकडे आपले लक्ष जात नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्‍यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैशिष्ट्यपूर्ण घटनेची पार्श्‍वभूमी आणि चाचणीचे स्वरूप – रात्रीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले अभ्यासिकेच्या आगाशीतून बाहेरील परिसराकडे पहात असतांना त्यांना औदुंबराच्या झाडाच्या पानांतून दिसणारा रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि सभोवती मोठे वलय असलेला दिसणे

१६.९.२०१७ च्या रात्री परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष त्यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून दिसणार्‍या आश्रमाच्या परिसरात प्रवेश करायच्या फाटकाजवळ असणार्‍या रस्त्यावरील दिव्याकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांना त्या दिव्याचा प्रकाश वैशिष्ट्यपूर्ण जाणवला. अंधारात आश्रम परिसरातील औदुंबराच्या झाडातून दिसणारा त्या दिव्याचा प्रकाश पुष्कळ तेजस्वी दिसत होता, तसेच त्या दिव्याभोवती मोठे वलयही होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातील काही साधकांना तेथे बोलावले आणि त्यांना ही वैशिष्ट्यपूर्ण घटना दाखवली.

 

२. चाचणीचे स्वरूप

या घटनेचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या अभ्यासिकेतील आगाशीतून जेथून ते रस्त्यावरील त्या दिव्याकडे पहात होते, त्या ठिकाणी छायाचित्रक ठेवून त्या दिव्याची काही छायाचित्रे काढली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

३. चाचणीतील घटक आणि चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

३ अ. रस्त्यावरील दिवा

हा २५० ‘वॅट’चा ‘मर्क्यूरीचा’ दिवा आहे.छायाचित्रक आणि रस्त्यावरील दिवा यांच्यातील अंतर साधारणपणे २८ मीटर होते.

३ आ. संपूर्ण चाचणीत छायाचित्रक आणि छायाचित्रकाची संयोजना (सेटिंग्ज्) एकसारखीच ठेवली असणे

या चाचणीत ‘कॅनन EOS७D’ हा छायाचित्रक वापरला. या छायाचित्रकाद्वारे घेण्यात आलेल्या विविध छायाचित्रांची तुलना करणे आणि त्या आधारे दिव्याचा तेजस्वीपणा आणि त्याच्या भोवतीचे वलय यांचा अभ्यास करणे यांत अचूकता यावी, यासाठी संपूर्ण चाचणीत छायाचित्रकाची संयोजना (सेटिंग्ज्) एकसारखीच ठेवण्यात आली होती. त्या संयोजनेतील घटक पुढे दिले आहेत.

३ इ. संपूर्ण चाचणीच्या वेळी छायाचित्रक एकाच स्थितीत आणि स्थिर ठेवणे

संपूर्ण चाचणीच्या वेळी छायाचित्रक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीत एका तिपाईवर (स्टँडवर) एकाच स्थितीत आणि स्थिर ठेवण्यात आला होता. त्याद्वारे ‘आश्रम परिसरातील औदुंबराचे झाड आणि त्याच्या मागे असलेला तो दिवा’, या दृश्याची विविध छायाचित्रे काढण्यात आली.

३ ई. स्पष्ट छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला जाणे

छायाचित्रे रात्रीच्या अंधूक प्रकाशातही स्पष्ट यावीत, यासाठी छायाचित्रकातील ‘एक्सपोजर’चा (टीप) कालावधी १ सेकंद ठेवण्यात आला होता.

टीप – ‘छायाचित्र स्पष्ट किंवा अस्पष्ट येणे छायाचित्रकातील ‘एक्सपोजर’वर अवलंबून असते. रात्रीच्या वेळी किंवा अंधूक प्रकाशात छायाचित्रे स्पष्ट यावीत, यासाठी ‘एक्सपोजर’चा कालावधी एक सेकंदापासून ते ३० सेकंदांपर्यंत ठेवला जातो. एरव्ही चांगल्या प्रकाशात छायाचित्र काढतांना हा कालावधी १ सेकंदापेक्षाही अल्प ठेवला जातो.’

(अधिक माहितीसाठी वाचा : http://www.cambridgeincolour.com/tutorials/camera-exposure.htm)

 

४. काढलेली छायाचित्रे आणि त्यांची निरीक्षणे

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेतील आगाशीतून रात्री काढलेल्या छायाचित्रात रस्त्यावरील दिवा तेजस्वी दिसतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेतील आगाशीतून रात्री तेजस्वी दिसणारा रस्त्यावरील दिवा

आ. छायाचित्रात औदुंबर वृक्षामधून दिसणार्‍या रस्त्यावरील दिव्यातून किरण बाहेर पडतांना दिसतात. (डोळ्यांनी सप्तरंगी किरण आणि त्यांमध्ये दूरपर्यंत जाणारे दैवी कण दिसत होते.)

औदुंबर वृक्षामधून दिसणार्‍या रस्त्यावरील दिव्यातून बाहेर पडणारे किरण

इ. रस्त्यावरील दिव्याच्या भोवती दिसणारे प्रकाशाचे मोठे वलय भिंतीच्याही पलीकडे दिसते, तसेच त्यातील विविध रंगांच्या छटा छायाचित्रात स्पष्टपणे दिसतात.

रस्त्यावरील दिव्याच्या भोवती दिसणारे प्रकाशाचे मोठे वलय आणि त्यातील विविध रंगांच्या छटा

 

५. प्रकाशाच्या संदर्भातील वैज्ञानिक माहिती

५ अ. प्रकाशाचे ‘कण’, ‘तरंग’ आणि ‘पुंज’ स्वरूप

‘प्रकाशाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे तो कधी कणांच्या स्वरूपात, तर कधी तरंगांच्या स्वरूपात आढळतो. १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत बहुसंख्य शास्त्रज्ञ प्रकाश हा तरंगरूप असल्याचे मानत होते. जेम्स मॅक्सवेलचा ‘विद्युत्चुंबकीय सिद्धांत’ सांगतो की, प्रकाश हा विद्युत्चुंबकीय तरंगांचा एक छोटासा भाग आहे. पुढे १९०५ साली आईन्स्टाईनने आपल्या ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’ या प्रयोगाद्वारे प्रकाशाचे पुंजस्वरूप सिद्ध केले. या प्रकाशपुंजालाच ‘फोटॉन्स’ असे म्हणतात.

५ आ. प्रकाशाचा विवर्तनाचा (डिफ्रॅक्शनचा) गुणधर्म

प्रकाश एकाच माध्यमातून जातांना सरळ रेषेत जातो; पण तो एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जातांना किंवा त्याच्या मार्गामध्ये अपारदर्शक पदार्थाची कड आली किंवा टोक आले, तर त्यावरून जातांना तो थोडा वळतो. प्रकाशाच्या या वळणाला ‘विवर्तन (डिफ्रॅक्शन)’ म्हणतात.’

(संदर्भ : ‘मनःशक्ती’ अंक)

 

६. छायाचित्रांतील दिव्याचा तेजस्वी प्रकाश, दिव्यातून बाहेर पडणारे
किरण आणि दिव्याभोवतीचे मोठे वलय दिसण्याच्या संदर्भातील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा

६ अ. कारणमीमांसा १

६ अ १. आश्रमातील चैतन्यामुळे दैवी कणांचे एकत्रीकरण होऊन त्यांना स्थिरता प्राप्त होणे आणि प्रकाश दैवी कणांत मिसळल्याने दैवी कण गतीमान होणे, म्हणजे त्यांचे रूपांतर किरणांत होणे

‘देवतेच्या मूर्तीत चैतन्याचे घनीकरण होते. ही चैतन्याची मूर्तीसापेक्ष क्रिया आहे. त्याप्रमाणे आश्रमात चैतन्याचे घनीकरण ही वास्तूसापेक्ष क्रिया आहे. आश्रमातील चैतन्यामुळे दैवी कणांचे एकत्रीकरण होते, म्हणजेच त्यांना स्थिरता प्राप्त होते. या दैवी कणांवर जेव्हा ज्योत किंवा दिव्याचा प्रकाश पडतो, त्या वेळी हे दैवी कण प्रगट होतात. दिव्यातून बाहेर पडणारा प्रकाश दिव्याभोवतीचे चैतन्य आणि दैवी कण यांमुळे विकेंद्रित होतो. थोडक्यात हेच सांगता येईल की, आश्रमातील चैतन्यामुळे आधी दैवी कणांना स्थिरता प्राप्त होते. त्यानंतर प्रकाशामुळे दैवी कणांना गती प्राप्त होते, म्हणजे त्यांचे रूपांतर किरणांत होते.

६ अ १ अ. प्रकाश आणि दैवी कण एकत्रित आल्याने सर्वसाधारण प्रकाशाच्या तुलनेत दैवी कण-मिश्रित प्रकाशाची क्षमता काही अंशी वाढणे

‘चैतन्य निर्गुण आहे. ते विशिष्ट कार्यासाठी सगुणात येते. त्या वेळी त्यातून दैवी कणांची निर्मिती होते. रामनाथी आश्रमात काही ठिकाणी दैवी कणांचे एकत्रीकरण झाले आहे, तर काही ठिकाणी दैवी कण वातावरणात स्वतंत्रपणे वावर करत असतात. जेव्हा दिव्याच्या ज्योतीतून किंवा विद्युत् दिव्यातून बाहेर पडणार्‍या प्रकाशाचा दैवी कणांशी संपर्क येतो, त्या वेळी दैवी कणांना गती प्राप्त होते. प्रकाश आणि दैवी कण एकत्रित आल्याने सर्वसाधारण प्रकाशाच्या तुलनेत दैवी कण-मिश्रित प्रकाशाची क्षमता काही अंशी वाढते.

६ अ २. रस्त्यावरील दिव्यातून किरण बाहेर पडणे

एकत्रित दैवी कणांतून प्रकाश बाहेर पडतांना प्रकाशाची विकेंद्रीकरणाची क्रिया घडल्याने त्यातून किरण बाहेर पडतांना दिसतात. तेव्हा प्रकाशामुळे दैवी कण गतीमान होतात. त्याचा परिणाम किरणांच्या रूपात दिसतो.

६ अ ३. ज्योत किंवा विद्युत् दिवा यांतून बाहेर पडणार्‍या प्रकाशाचे दैवी कणांद्वारे विकेंद्रीकरण झाल्याने वातावरणात विविध रंगांची वलये निर्माण होणे

जेव्हा ज्योत किंवा विद्युत् दिवा यांतून विशिष्ट कोनातून बाहेर पडणार्‍या प्रकाशाच्या वाटेत एकत्रित दैवी कण, म्हणजे रामनाथी आश्रमातील घनरूप चैतन्य येते, त्या वेळी प्रकाशाचे विकेंद्रीकरण होते. विकेंद्रीकरण झाल्याने विविध रंगांच्या वलयांची निर्मिती होते. प्रकाश दैवी कणांतून पुढे पुढे प्रवास करतो, तसे प्रकाशाचे पहिला रंग, दुसरा रंग, तिसरा रंग असे विकेंद्रीकरण होत जाते. ‘ज्योत किंवा दिवा याच्यापासून काही अंतरांवर दिसणारी रंगीत वलये’ ही प्रकाशसापेक्ष क्रिया आहे. ‘प्रकाशसापेक्ष’ म्हणजे प्रकाशामुळे वातावरणातील दैवी कण रंगीत वलयांच्या माध्यमातून प्रगट होतात. ज्योत किंवा दिवा यांच्यापासून किती अंतरावर दैवी कणांचे एकत्रीकरण झाले आहे, यावरून विविधरंगी वलयांच्या प्रकटीकरणाचे अंतर अवलंबून असते. काही दैवी कण दिव्याभोवती असतात, तेव्हा दिव्याभोवती विविधरंगी वलये दिसतात, तर कधी एकत्रित दैवी कण दिव्यापासून काही सें.मी. अंतरावर असतात, त्या वेळी दिव्यापासून काही सें.मी. अंतरावर विविधरंगी वलये दिसतात.

६ अ ४. ज्योत किंवा विजेचा दिवा यांतून प्रक्षेपित होत असलेल्या सप्तरंगांचे कार्य

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०१६)

६ आ. कारणमीमांसा २

६ आ १. उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या अस्तित्वाच्या वातावरणावर झालेल्या परिणामामुळे दिवा, चंद्र आदी प्रकाशाच्या स्त्रोतांभोवती प्रकाशाचे मोठे वलय दिसणे

उच्च आध्यात्मिक स्तर असणार्‍या व्यक्तीच्या देहातून सूक्ष्मतम प्रकाशकणांच्या रूपात ऊर्जा प्रक्षेपित होत असते. ऊर्जेचे हे सूक्ष्मतम प्रकाशकण स्वयंप्रकाशीत असतात. एवढेच नव्हे, तर ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मातील तत्त्वानुसार या सूक्ष्म प्रकाशकणांना सूक्ष्म गंध असतो आणि त्या प्रकाशकणांतून सूक्ष्म नादही (शब्द) निर्माण होत असतो. उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या देहातून वातावरणात प्रक्षेपित झालेल्या सूक्ष्म प्रकाशकणांवर दिवा, चंद्र आदी प्रकाशाच्या स्रोतांतून येणार्‍या प्रकाशाची प्रक्रिया होऊन दिवा, चंद्र आदींभोवती प्रकाशाचे मोठे वलय दिसते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातूनही अशा प्रकारचे ऊर्जेचे कण वातावरणात प्रक्षेपित होतात, उदा. वर्ष २०१२ मध्ये त्यांच्या देहाला पिवळसर छटा आली होती, तसेच त्यांच्या देहातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचे घनीकरण होऊन देहावर स्थुलातून सोनेरी दैवी कण दिसले होते.

६ आ २. परमेश्‍वराची दैवी कला विविधरंगी वलयांच्या माध्यमातून मनुष्याला अनुभवता येणे

घनस्वरूपातील चैतन्यामुळे ज्योत किंवा विजेचा दिवा लावल्यास त्यातून किरण आणि काही अंतरावर सप्तरंगी वलये येतांना दिसतात. हे चैतन्याचे प्रगटीकरण आणखी वाढल्याचे दर्शक आहे. पूर्वी चैतन्य डोळ्यांना दिसत नव्हते. ते आता प्रकाश आणि घनरूप चैतन्य यांमुळे विविधरंगी वलयांच्या माध्यमातून पहाता येते. तसेच इंद्रधनुष्यामुळे परमेश्‍वराची ‘दैवी कला’ विविधरंगी वलयांच्या माध्यमातून मनुष्याला काही प्रमाणात अनुभवता येते.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.११.२०१७)

ई-मेल : [email protected]

 

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक संशोधक यांना विनंती !

‘उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या अस्तित्वाचा दिव्याच्या प्रकाशाचे तेज आणि दिव्याभोवती दिसणारे वलय यांवर होणारा परिणाम’ याविषयी अधिक संशोधन करून त्यामागचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. ‘दिव्याभोवती दिसणार्‍या वलयाचा आकार आणि प्रकाश (तेजस्वीपणा) यांत पालट होण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?’ या संदर्भात तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक संशोधक यांनी साहाय्य करावे ही विनंती.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])

दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

Leave a Comment