परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !

धर्माच्या अभ्यासकांना विनंती

सनातनच्या साधकांना मिळणारे नाविन्यपूर्णज्ञान योग्य कि अयोग्य यासंदर्भात साहाय्य करा !

आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले असे नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते नवीन ज्ञान असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य यासंदर्भात धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. – सनातन संस्था

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील काही सर्वसाधारण गुण, दोष आणि छंद

१ अ. गुण : निस्वार्थ वृत्ती, समाजात मिळूनमिसळून रहाणे, प्रेमळपणा, अन्यायाविरूद्ध चीड असणे आणि लोकसंग्रह करण्याची वृत्ती.

१ आ. दोष : भावनाप्रधानता, इतरांचे दुःख सहन न होणे, जगातील सर्व जिवांचे कल्याण व्हावे, अशी अनाठायी अपेक्षा.

१ इ. छंद : शिवणकाम करणे, गाणे आणि वादन यांची आवड, धातूकाम करणे (धातूवर नक्षीकाम करणे)

१ ई. अन्य सूत्रे : कुठल्याही क्षेत्रात, उदा. संगीत, कला, युद्ध यांविषयी जाणून घेणे आणि त्यात यथाशक्ती सहभागी होण्याची अभिरूची.

मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्‍लेषण पुढे दिले आहे. पुढील लिखाणात पहिला जन्म, दुसरा जन्म, असा उल्लेख विषय कळण्याच्या दृष्टीने केला आहे. पुढे दिलेले परात्पर गुरु डॉक्टरांच्या गतजन्मांतील सर्व उल्लेख कलियुगातील आहेत.

२. पहिला जन्म – आचार्य (शिक्षक)

२ अ. जयंताच्या प्रेमळ स्वभावाने प्रभावित होऊन विद्यार्थ्यांच्या मनात,
असे शिक्षक नेहमी मिळावे, असा विचार येणे आणि चालू जन्मात ते साधक रूपाने जोडले जाणे

श्री. राम होनप

या जन्मात जयंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) एक शिक्षक होता. तो अत्यंत प्रगल्भ आणि शोधक वृत्तीचा होता. तेव्हा त्याचा शिकवण्याचा विषय अध्यात्म नसून व्यावहारिक होता. तो स्वभावाने अत्यंत प्रेमळ होता. अनेक मुलांना जयंताचा स्वभाव आवडायचा. तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात यायचे, असे शिक्षक यापुढेही आपल्याला मिळत रहावेत.  त्या जन्मात जयंताची कर्ममार्गानुसार थोडी साधना झाली.

चालू जन्मात जयंत सनातनची स्थापना झाल्यानंतर प्रारंभी अध्यात्माच्या संदर्भातील अभ्यासवर्ग घ्यायचा. त्यांपैकी काही साधक हे पूर्वजन्मांतील त्याचे विद्यार्थी होत.

२ आ. काही प्रसंगांमुळे जयंताच्या मनात अन्यायाविरूद्ध चीड निर्माण होणे आणि त्यामुळे पुढील जन्मी न्यायाधीश होणे

त्याच्या जीवनात स्वतः आणि इतरांच्या समवेत काही अन्यायकारक प्रसंग घडले. त्याविषयी जयंताच्या मनात चीड निर्माण झाली होती आणि ही अन्यायकारक स्थिती पालटायला पाहिजे, असा तीव्रतेने मनात विचार आला. त्यानंतर त्याच्या जीवनाचा शेवट झाला. या विचाराचा परिणाम म्हणून काही काळाने जयंत न्यायाधीश बनला.

३. दुसरा जन्म – न्यायाधीश

३ अ. जयंताने दिलेल्या न्यायाने त्या काळी सुखी झालेले लोक, म्हणजे आता सनातनशी जोडलेले काही साधक होत !

जयंत नेहमी तत्त्वाला धरून न्यायदान करायचा. त्यामुळे त्याने अनेकांची मने जिंकली होती; कारण योग्य निर्णय दिल्याने अनेक लोकांचे कल्याण झालेले होते. त्यामुळे अशा लोकांच्या मनात विचार यायचा, असा देवमाणूस आपल्याला नेहमी भेटावा. त्यानंतर चालू जन्मात जयंताशी जोडलेले काही साधक हे त्या काळी जयंताने दिलेल्या न्यायामुळे सुखी झालेले लोक होत.

३ आ. सनातन संस्थेशी काही विदेशी साधक जोडले जाण्याचे कारण

त्या काळात फिरते न्यायालय होते. मग जयंत न्यायदानासाठी दूर देशांत जायचा. जयंताच्या सत्य आणि तत्त्व यांना धरून न्यायदान करण्याच्या पद्धतीचा प्रभाव पडल्याने तेथील काही जीव आणि जयंत यांत आपलेपणा निर्माण झाला. ते दूरवरचे लोक, म्हणजे आताचे काही विदेशी साधक होय.

३ इ. जयंताचे जन्मजात काही विरोधक असण्यामागील कारण

जयंताने न्यायाधीश असतांना सत्याला धरून निर्णय दिले होते. त्यात काही अपराध्यांची घरे किंवा संपत्ती जप्त झाली होती आणि काहींना आयुष्यभर कारागृहात शिक्षा भोगावी लागली. अशा अपराध्यांच्या मनात जयंताविषयी प्रचंड चीड आणि द्वेष निर्माण झाला होता. तेव्हा त्यांच्या मनात विचार यायचा, तू आमचे जीवन उद्ध्वस्त केलेस. त्याप्रमाणे आम्ही तुझेही जीवन पुढे उद्ध्वस्त करू. त्याचा परिणाम म्हणून चालू जन्मात जयंताला जन्मजात शत्रू मिळाले. त्यांपैकी आता धर्मकार्यात अडथळे आणणारे आणि जयंताला प्राणपणाने विरोध करणारे, हे पूर्वजन्मी जयंताने न्यायदान करतांना शिक्षा झालेले अपराधी जीव होय. या जन्मातही जयंताची काही प्रमाणात कर्मयोगानुसार साधना झाली. विविध जन्मांच्या प्रवासात जयंताशी साधना करणारे जीव आणि विरोध करणारे जीव जोडले जात होते.

३ ई. जयंताला न्यायदान करतांना लागलेला कर्मदोष आणि त्याचा चालू जन्मावरील परिणाम

न्यायनिवाडा करतांना जयंताने २-३ निर्णय चुकीचे दिले. त्यामुळे काही लोकांना आर्थिक हानी सोसावी लागली. त्याचा परिणाम म्हणून चालू जन्मात जयंताला २ – ३ वेळा व्यावहारिक फटका बसला. तो त्याच्या पूर्वजन्मांतील कर्मदोष होता. (प्रत्यक्षातही वर्ष १९८२ मध्ये मी मुंबईत ४ सदनिकांसाठी दिलेले पैसे बांधकाम व्यावसायिकाने त्या ४ सदनिका इतरांनाही विकल्यामुळे माझे सर्व पैसे बुडाले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

४. तिसरा जन्म – एका नगरीचा राजा

४ अ. राज्यावर मोठे संकट आल्याने जयंताचे राजपद जाणे आणि प्रजेचीही मोठी हानी होणे

काही जन्मांनंतर जयंत एका नगरीचा राजा होता. त्याने एक सुंदर नगर वसवले होते. जयंताने या नगराचे उत्तम व्यवस्थापन सिद्ध केले होते. हे व्यवस्थापन पाहून अन्य नगरातील अधिकारी जयंताकडे शिकण्यासाठी येत. जयंताच्या व्यवस्थापन कार्याने प्रभावित झालेले त्या वेळचे काही जीव आता अल्प कालावधीत व्यवस्थापन सांभाळून सनातन संस्थेत सेवा करीत आहेत.

काही काळ राजा, म्हणजे जयंत आणि प्रजा सुखी होती. त्या वेळी जयंताचे फारसे आध्यात्मिक अधिष्ठान नव्हते. काही काळाने राज्यावर मोठे संकट आले. तेव्हा जयंताचे राजपद गेले आणि प्रजेचीही मोठी हानी झाली होती. अशा वेळी जयंताच्या मनात स्वतःचे राज्यपद गेल्याचे दुःख नव्हते; पण आपण प्रजेसाठी काही करू शकलो नाही, याचे दुःख पुष्कळ होते.

५. चौथा जन्म

५ अ. वादळात आपली मुले मृत्यूमुखी पडल्याचे दुःख होऊन जयंत काही काळ नास्तिक बनणे

त्या जन्मात जयंताला एक मुलगा आणि एक मुलगी, अशी दोन अपत्ये होती. जयंताचे मुलांवर अपार प्रेम होते. एकदा अकस्मात् आलेल्या वादळात जयंताची दोन्ही मुले मृत्यूमुखी पडली. त्याचे जयंताला पुष्कळ दुःख झाले आणि त्याचा देव अन् धर्म यांवरील विश्‍वास उडाला. त्यामुळे तो काही काळ नास्तिक बनला. नास्तिक विचारांमुळे तो स्वतः धर्मविरोधी विचारांचा बनला आणि तो इतरांना यासंबंधी सांगू लागला. (वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत मी नास्तिक होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

५ आ. जयंताची कालांतराने एका महात्म्याशी भेट होणे
आणि त्यांनी त्याला नास्तिक बनण्याच्या चुकीची जाणीव करून देणे

कालांतराने जयंताची एका महात्म्याशी भेट झाली. त्या महात्म्याने सूक्ष्म ज्ञानाद्वारे, जयंताची मुले मृत्यूमुखी का पडली ?, यामागील कारण सांगितले. तेव्हा जयंताला स्वतःकडून झालेल्या चुकीचा पश्‍चात्ताप झाला.

५ इ. नास्तिक बनण्याच्या चुकीमुळे जयंताला लागलेला कर्मदोष

तेव्हा महात्म्याने जयंताला पुढील सूत्रे सांगितली, मुले मृत्यूमुखी का पडली, याचे कारण तू आधी जाणून घ्यायला हवे होते. ते जाणून न घेता तू नास्तिक बनला. हा मोठा कर्मदोष तुला लागला आहे. या दोषाचा पुढील परिणाम होणार आहे.

१. पुढील जन्मांत तू निपुत्रीकच रहाशील. (मला मुले नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

२. पुढे धर्माच्या मोठ्या कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेशील; पण अध्यात्माचा अनुभव तुला उशिरा येईल. (वयाच्या ४४ व्या वर्षी मी साधनेत आल्यामुळे मला अध्यात्मातील अनुभूती उशिरा आल्या. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

५ इ १. महात्म्याने केलेल्या मार्गदर्शनाने जयंत अंतर्मुख होणे

वरील प्रसंग घडल्यावर स्वतःकडून झालेल्या चुकीची जयंताला खंत वाटली आणि अध्यात्म बुद्धीपलीकडील असून ते सूक्ष्म आहे, याची त्याला प्रथमच जाणीव झाली, तसेच जीवनात नेहमी अध्यात्मात प्रगती केलेल्यांना विचारून जीवन जगायला हवे, हे त्याला शिकायला मिळाले. हा संस्कार जयंताच्या चित्तावर दृढ झाला. (प्रत्यक्षातही मी असे करतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

त्याचा परिणाम चालू जन्मात झाल्याने जयंताने व्यक्तीगत साधना आणि समष्टी कार्यासाठी अध्यात्मातील अधिकार्‍यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले.

५ इ २. वादळात ठार झालेल्या मुलांची जयंताशी चालू जन्मात भेट होणे

वादळात मृत्यूमुखी पडलेल्या दोन मुलांच्या भेटीची इच्छा त्या वेळी जयंतच्या मनात अपूर्ण राहिलेली होती. ती चालू जन्मात पूर्ण झाली. त्याच्या मागील जन्मातील एक मुलगा आता गोवा येथे आणि मुलगी महाराष्ट्रात रहाते. मुलगी तिच्या संसारात रममाण आहे, तर मुलगा ज्ञानी आहे. त्याला ठाऊक आहे की, हे माझ्या गत एका जन्मातील वडील आहेत; परंतु आता मायेत परत कशाला अडकायचे ?, या विचाराने तो त्याची वाच्यता जयंताकडे किंवा अन्य कुणाकडे करत नाही. चालू जन्मात जयंताची या दोन्ही मुलांची भेट झालेली आहे; परंतु मायेच्या पडद्याने जयंताला त्या वेळी त्याचे ज्ञान झाले नाही.

५ इ ३. जयंताचा गतजन्मातील मुलगा भविष्यात वडिलांचे नाव एका जाहीर सभेत सांगणार असणे

जयंताचा गतजन्मातील मुलगा वर्ष २०३० नंतर एका जाहीर सभेत आपल्या ओघवत्या ज्ञानात माझे वडील मागील जन्मात परात्पर गुरु डॉ. आठवले होते, असे सांगणार आहे; परंतु तेव्हा जयंत पृथ्वीवर नसेल. या सभेला सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असेल.

६. पाचवा जन्म – एक स्वामी

६ अ. जयंताच्या मागील जन्मातील काही शिष्य, म्हणजे
चालू जन्मात अल्प कालावधीत संतपदाला पोहोचलेले सनातनचे साधक असणे

काही काळानंतर जयंत एक स्वामी असतो. त्याचे काही शिष्य असतात. हे शिष्य एका मर्यादेपर्यंत साधनेत प्रगती करतात. तेव्हा जयंताच्या मनात विचार यायचा, हे शिष्य फारशी प्रगती करू शकले नाही.  त्या जन्मातील शिष्य, म्हणजे चालू जन्मात अल्प कालावधीत साधना करून संतपदाला पोहोचलेले साधक होय.

७. सहावा जन्म

७ अ. एका योग्याने जयंताला त्याच्या गतजन्मांचे ज्ञान करवून देणे आणि साधनेचा पुढील मार्ग दाखवणे

या जन्मात जयंताची एका योग्याशी भेट होती. हे योगी जयंताला त्याच्या पूर्वीच्या सर्व जन्मांचे ज्ञान देतात आणि त्याला पुढील मार्गदर्शन करतात, प्रत्येक जन्मात तुझ्या मनात इतरांचे कल्याण व्हावे, अशी अपेक्षा होती. ही तुझी शुद्ध अपेक्षाच तुझ्या प्रगतीतील अडथळा आहे. हे जग माया असून प्रत्येक गोष्ट ईश्‍वरेच्छेने घडत असते. त्यामुळे प्रथम तुझी स्वेच्छा नष्ट व्हायला हवी. त्यासाठी तुला साधना करायला हवी. अपेक्षा नष्ट झाल्या की, तुला ईश्‍वरेच्छा कळू लागेल. त्यानंतर मायेतील कार्य करूनही या मायेत अडकायला होणार नाही आणि इतरांना खर्‍या अर्थाने साहाय्य करता येईल. आता यापुढे प्रत्येक जन्मात तुला श्रीविष्णूची उपासना करायची आहे.

७ अ १. वरील मार्गदर्शनानंतर जयंताने त्या आणि त्याच्या पुढील जन्मांत केलेली साधना

७ अ १ अ. श्रीविष्णूचे नामस्मरण : पहिले ४० जन्म श्रीविष्णूचे नामस्मरण केले. यातून जयंताची भक्तीमार्गाने साधना झाली.

७ अ १ आ. श्रीविष्णूचे ध्यान : त्यानंतर ७० जन्म श्रीविष्णूचे सगुण ध्यान केले. ध्यान ही निर्गुण साधना आहे. जेव्हा जयंत ध्यान करायचा, तेव्हा प्रथम विष्णूचे स्मरण करायचा आणि त्यानंतर ध्यान करायचा. या ध्यानाच्या प्रकाराला सगुण ध्यान, असे म्हणतात. त्यातून जयंताची काही काळ ध्यानमार्गाने साधना झाली.

७ अ १ इ. काही काळ अध्यात्म ज्ञानाद्वारे समजून घेणे : काही जन्म जयंताने अध्यात्माचा सखोल अभ्यास केला. त्यातून जयंताची काही काळ ज्ञानमार्गाद्वारे साधना झाली.

८. सातवा जन्म

८ अ. एक योग्याने जयंताला त्याच्या अवतारकार्याविषयीचे
ज्ञान देऊन पुढील काही काळ उपलोकात साधना करण्यास सांगणे

त्यानंतर जयंताच्या जीवनात पुढील प्रसंग घडला. एक महान योगी एका वृक्षाखाली बसले होते. त्यांचे नाव अनंत योगी, असे होते. त्यांच्या तोंडावळ्यावरील तेजाने आकर्षित होऊन जयंत त्यांच्याकडे गेला. त्या परिसरात आजूबाजूला कुणीच नव्हते. ते योगी जयंताला म्हणाले, तु पुढे एका जन्मात ज्ञान, धर्म आणि मोक्षप्रतापी होशील. (म्हणजे एका जन्मात तुझ्या हातून ज्ञान, धर्मसंस्थापना करणे आणि अन्य जिवांना मोक्षप्राप्ती करून देण्यासंबंधीचे मोठे कार्य घडेल.) तू यापुढे मी सांगत नाही तोपर्यंत उपलोकांत (उच्च लोकांत) थांबायचे.

८ आ. जयंताने उपलोकात थांबवण्याविषयीचे कारण विचारल्यावर योग्याने उत्तर न देणे

जयंताला चालू जन्मात प्रत्येक गोष्टीत जिज्ञासा असते, तशी त्या जन्मातही होती. त्याने त्या योग्याला विचारले, मी उपलोकांत का थांबायचे ?, तेव्हा ते योगी म्हणाले, मी सांगतो तेवढे कर. तेव्हा जयंताने त्यांच्या म्हणण्याचा स्वीकार केला. या दोघांमधील संवाद केवळ २ मिनिटांचा होता. हे महान योगी दुसरे तिसरे कुणी नसून आताचे प.पू. अनंतानंद साईश होते. हा प्रसंग ९०० वर्षांपूर्वी घडला होता.

८ इ. अनंत योगी किंवा प.पू. अनंतानंद साईश यांच्या कार्याचे महत्त्व

असे अवतारी महात्मे केवळ एखाद्या कारणासाठी पृथ्वीवर येतात. ते झाले की, लगेच निघून जातात. त्यांच्या या कार्याचा परिणाम पृथ्वीवर दीर्घकाळ टिकून असतो.

८ ई. अनंत योगी जयंतासाठी प्रगटण्यामागील कारण

जयंताने केलेल्या श्रीविष्णूच्या उपासनेने श्रीविष्णु जयंतावर प्रसन्न झाला होता. त्याने जयंताची त्याच्या पुढील धर्मकार्यासाठी निवड केली होती. यांचे सांकेतिक ज्ञान देण्यासाठी श्रीविष्णूने अनंत योगींना जयंताकडे पाठवले होते.

८ उ. श्रीविष्णूने जयंताची अवतारी कार्यासाठी निवड करण्यामागील कारणे

८ उ १. उपजत गुण : निःस्वार्थ वृत्ती, इतरांचा विचार करणे आणि क्षात्रतेज

८ उ २. श्रीविष्णूची उत्तम आणि निष्काम साधना केलेली असणे

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१७.११.२०१७)

 

९. अनंत योगींनी जयंताला पुढील साधना पृथ्वीवर
करण्याऐवजी काही काळ उपलोकात करण्यास सांगण्यामागील कारणे

९ अ. अवतार कार्यासाठी काही काळ निर्गुण तत्त्वाची साधना शेष असणे

यापूर्वी जयंताची सगुण आणि सगुण-निर्गुण तत्त्वाची उपासना पूर्ण झाली होती. यापुढे केवळ निर्गुण तत्त्वाची साधना करणे आवश्यक होते. ही साधना उपलोकांत, म्हणजे महर्लोक आणि जनलोक येथे पूर्ण होणार होती.

९ आ. ‘वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे आणि जयंताची साधना पूर्ण व्हावी’,
यांसाठी अनंत योगींनी जयंताला काही काळ सुरक्षित अशा उपलोकांत साधना करण्यास सांगणे

जयंताने उपलोकांत साधना करण्याऐवजी पृथ्वीवर साधना केली असती, तर वाईट शक्तींना त्याच्या हातून भविष्यात घडणार्‍या धर्मकार्याची चाहूल लागली असती. त्यानंतर वाईट शक्तींनी त्याच्या साधनेत पुष्कळ अडथळे आणले असते; कारण चालू जन्मात त्याच्या माध्यमातून पाताळांतील वाईट शक्तींशी मोठा लढा होणार होता. त्यामुळे ‘वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे आणि जयंताची साधना पूर्ण व्हावी’, यांसाठी अनंत योगींनी जयंताला काही काळ सुरक्षित उपलोकांत साधना करण्यास सांगितले. वाईट शक्तींचे महर्लोक आणि त्यापासूनच्या पुढच्या लोकांत काही चालत नाही.

९ इ. जयंताचा उपलोकांतील साधनेचा कालावधी

९ इ १. महर्लोक : ५०० वर्षे

९ इ २. जनलोक : ४०० वर्षे

९ इ २ अ. उपलोकांत अवतारत्वाची चाहूल !

९ इ २ अ १. जयंताच्या भोवती असलेल्या सोनेरी दैवी आभेमुळे तो अवतार असल्याचे महर्लोकातील जिवांनी ओळखणे

तेथे वास करणार्‍या लिंगदेहांना लाल, पिवळा किंवा निळा असा रंग असतो. जयंताला या रंगासमेवत त्याच्याभोवती सोनेरी आभा होती. ही आभा पाहिल्याने तेथील जिवांना जयंताच्या अवतारत्वाची जाणीव झाली. त्या वेळी तेथील काही जिवांनी ‘जेव्हा जयंत पृथ्वीवर धर्मकार्यासाठी जन्म घेईल, त्या वेळी आपणही पृथ्वीवर जन्म घेऊ’, असे ठरवले. त्यांपैकी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले काही जीव जयंताशी चालू जन्मात जोडले गेलेले आहेत आणि आणखीन काही जीव पृथ्वीवर येणे शेष आहे. येथे जयंताने ५०० वर्षे साधना केली. (वर्ष २०१७ पर्यंत महर्लोक आणि जनलोक येथून पृथ्वीवर ९०० हून अधिक दैवी बालकांनी जन्म घेतला आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

९ इ २ अ २. जनलोकांतील काही ज्ञानी जिवांना ज्ञानामुळे जयंताच्या अवतारत्वाची जाणीव होणे

महर्लोकातील साधना पूर्ण झाल्यावर जयंत जनलोकात गेला. तेथे गेल्यावर काही ज्ञानी लिंगदेहांना जयंतातील अवतारत्वाची जाणीव झाली. ज्याप्रमाणे भूमीवर असलेले फुगे वार्‍याने एकमेकांजवळ येतात आणि परत पुढील क्षणात दूर जातात, त्याप्रमाणे काही ज्ञानी जीव जयंताला भेटण्यासाठी काही क्षण त्याच्या जवळ आले आणि परत आपापल्या स्थानी गेले. हे दृश्य तेथील अन्य जिवांनी पाहिले. काही जिवांना जयंताच्या अवतारी कार्याविषयी ज्ञान झाले. त्यांनी ठरवले की, ‘आपण जयंताच्या धर्मकार्यात सहभागी व्हायचे. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती लवकर होईल.’ त्यामुळे तेथील काही जिवांनी जयंत पृथ्वीवर असतांना जन्म घेण्याचे ठरवले. त्यांपैकी जनलोकातील काही जीव पृथ्वीवर जन्माला आलेले आहेत आणि काही येणे शेष आहे. जयंताने जनलोकात ४०० वर्षे साधना केली. जयंताने एकूण ९०० वर्षांनी पृथ्वीवर जन्म घेतला.

१०. मागील एका जन्मात काही विद्यापिठे
पाहून जयंताला त्याच्या ज्ञानविषयक कार्याची प्रेरणा मिळणे

जयंताने एकदा नालंदा, तक्षशिला आणि अन्य काही विद्यापिठांना भेटी दिल्या होत्या. तेथील ज्ञानकार्य पाहून तो प्रभावित झाला आणि त्या वेळी त्याला आतून पुष्कळ आनंद होत होता. त्या वेळी, ‘इतका आनंद का होत आहे ?’, हे त्यालाही समजत नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्याच्याकडून आगामी ज्ञान कार्याच्या संदर्भातील प्रेरणा जागृत झाली होती. त्याचे ते लक्षण होते. (‘नालंदा आणि तक्षशिला यांच्याप्रमाणे एक विश्‍वविद्यालय असावे; म्हणून मी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

११. जयंताचा चालू जन्म

जयंताचा प्रारंभीचा काही काळ मागील जन्मांतील प्रारब्ध आणि कर्मदोष फेडण्यात गेला. त्यानंतर त्याची अध्यात्माची ओळख झाली. प्रथम त्याने मनाचा अभ्यास केला. (परात्पर गुरु डॉ. आठवले हे संमोहन उपचार तज्ञ आहेत.) त्याचा इतरांच्या मनाचा अभ्यास झाला. जयंताचे कार्य सूक्ष्मातून अधिक असल्याने आध्यात्मिक जीवनाचा प्रवासही मनाच्या सूक्ष्म अभ्यासातून चालू झाला. मनाचा अभ्यास करतांना तो अध्यात्माशी जोडला गेला.

११ अ. गतजन्मांत घडलेल्या विविध प्रसंगांमुळे जयंताला चालू जन्मात झालेले लाभ

१. जयंताने मागील जन्मांत ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांद्वारे साधना केली. त्या विषयांचा अभ्यास झाला असल्याने चालू जन्मात त्याला ४ योगमार्गांचा समन्वय साधणार्‍या ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाची निर्मिती करता आली.

२. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘गुरुकृपायोग’, हा साधनामार्ग निर्माण करता येण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण

३. मागील जीवनात घडलेले प्रसंग आणि संत अन् महात्मे यांचे मिळालेले मार्गदर्शन यांमुळे स्वेच्छा नष्ट करणे, ईश्‍वरेच्छेने वागणे, सूक्ष्म जगाचे महत्त्व इत्यादी सूत्रांचे जयंताला अनुभवजन्य ज्ञान प्राप्त झाले. त्याचा उपयोग जयंताला चालू जन्मात स्वतःच्या साधनेसाठी आणि इतरांसाठी करता आला.

४. ईश्‍वरेच्छा कळल्याने काळानुरूप हिंदु राष्ट्राची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे ज्ञान त्याला होऊन त्यानुरूप तो कार्य करत आहे. (‘प्रत्यक्षातही असे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

१२. जयंताला अवतार कार्यापर्यंत घडवण्यात
चालू आणि मागील जन्मांतील अनेक संतांचे योगदान असणे

चालू जन्मात ज्या संतांच्या भेटीने जयंताच्या जीवनाला कलाटणी मिळाली, त्यांपैकी काही संतांनी जयंताला मागील जन्मांत मार्गदर्शन केले होते.

१३. अध्यात्माविषयी स्वतःचे म्हणणे ठामपणे  मांडणे

परात्पर गुरु डॉक्टरांना गतजन्मांतील अध्यात्माचा अनुभव, अवतारी कार्य यांमुळे चालू जन्मात अध्यात्माविषयी स्वतःचे म्हणणे ठामपणे मांडता येते.

१४.साधनाप्रवीण अवतार

उत्तम साधना करत अवतारत्व प्राप्त केल्याने त्याला ‘साधनाप्रवीण अवतार’, म्हटले आहे.

१५. वरील ज्ञानाच्या संदर्भातील वैशिष्ट्य

वरील ज्ञानाच्या मजकुराचे संकलन अंतिम टप्प्यात असतांना एका साधिकेने मला बुंदीचा प्रसाद आणून दिला आणि ती मला म्हणाली, ‘‘हा प्रसाद कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमातून आला आहे.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘वरील धारिकेत प.पू. अनंतानंद साईश आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कार्याचा उल्लेख आहे. त्यावर प्रसन्न होऊन बाबांनीच (प.पू. भक्तराज महाराज यांनीच) हा आशीर्वादरूपी प्रसाद मला पाठवला आहे.’

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !’ या मथळ्याअंतर्गत दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचे केलेले संख्याशास्त्रीय विवरण !

सौ. प्राजक्ता जोशी

‘२६.११.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमधील पृष्ठ क्र. ६ वरील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !’ या मथळ्याअंतर्गत लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात प्रथमच ‘धर्माच्या अभ्यासकांना विनंती’ अशी चौकट प्रसिद्ध झाली. या चौकटीत ‘सनातनच्या साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य की अयोग्य ?’, या संदर्भात साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अंकशास्त्रानुसार हे ज्ञान योग्य असल्याचे सांगण्याचा मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे.

ज्योतिषशास्त्रात एखादी घटना घडली की, ती त्या दिवशी ज्या वेळेत घडते, त्यानुसार तिचा अभ्यास केला जातो. श्री. राम होनप यांना मिळालेल्या ज्ञानाचा दिनांक १७.११.२०१७ हा आहे. या संपूर्ण दिनांकात केवळ ‘१’ आणि ‘७’ हे दोनच अंक आहेत. ‘१’ हा अंक रविसारख्या तेजस्वी ग्रहाच्या अंमलाखाली येतो आणि ‘७’ हा अंक नेपच्यूनसारख्या कल्पक अन् गूढ अतींद्रिय शक्तीच्या अंमलाखाली येतो. अतींद्रिय शक्ती आणि तेजतत्त्व यांच्या माध्यमातून सनातनच्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान त्यांनी बुद्धीने मिळवलेले नसते. पूर्वीच्या ऋषिमुनींना अशा प्रकारे ज्ञान प्राप्त व्हायचे.

संख्याशास्त्रानुसार कुंडली मांडतांना तिच्यात ९ स्थाने, त्यातील अंक आणि ग्रहांचे कारकत्व हे नेहमी कायम असते. ती कुंडली पुढीलप्रमाणे आहे.

कुंडलीतील पहिल्या आडव्या ओळीतील घरे अध्यात्मक्षेत्राशी (सत्त्वगुणाशी), दुसर्‍या आडव्या ओळीतील घरे बुद्धीक्षेत्राशी (रजोगुणाशी) आणि तिसर्‍या आडव्या ओळीतील घरे ऐहिक क्षेत्राशी (तमोगुणाशी) संबंधित असतात.

वरीलप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या दिनांकाची कुंडली मांडल्यास ती पुढीलप्रमाणे येईल.

१. संख्याशास्त्रात कुंडलीत शतकाचा अंक विचारात न घेता केवळ वर्षाचा अंक विचारात घेतात, म्हणजेच १७.११.१७.

२. संख्या कुंडली मांडतांना एकच अंक दोन वेळा आल्यास तो दोन वेळा न मांडता एकदाच मांडला जातो.

३. १७.११.१७ या दिनांकात ‘७’ हा अंक दोन वेळा आणि ‘१’ हा अंक चार वेळा आला आहे.

टीप : वरील कुंडलीत ‘१’ हा अंक चार वेळा आला आहे. त्यामुळे ‘१’ या अंकाच्या वर *** असे चिन्ह केले आहे. त्याप्रमाणेच ‘७’ या अंकाचे आहे.

४. ‘१’ हा अंक अध्यात्मक्षेत्र, म्हणजे सत्त्वगुण दर्शवणार्‍या पारमार्थिक चौकोनात चार वेळा आल्याने तेजोमय रवि ग्रहासारखे हे ज्ञान असून ते रज-तमरूपी तिमिर नष्ट करणार्‍या तेजस्वी महान परात्पर गुरूंविषयीचे आहे.

५. ‘७’ हा अंक बौद्धिक चौकोनात दोन वेळा असून गूढ शक्तीचा कारक आहे. साधक प्रार्थनारत होऊन गुरूंचा विचार करत असतांना त्याला हे ज्ञान तेजाच्या (प्रकाशाच्या) माध्यमातून मिळाले आणि त्याने ते बुद्धीने संग्रहित केले (लिहिले.) साधक केवळ भावस्थितीत असता, तर तो बुद्धीने हे लिहू शकला नसता.

६. साधकाला ज्ञान प्राप्त होत असतांना त्याचे वास्तव्य हे सात्त्विक स्थानात असल्याने आणि दिनांकात ऐहिक चौकोनातील अंक नसल्याने त्याला मिळालेले हे ज्ञान अर्थार्जनासाठी नाही.’ (‘हे योग्य आहे.’ – श्री. राम होनप)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद आणि अंक ज्योतिष प्रवीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०१७)