व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधना मनापासून आणि परिपूर्ण करणारे अन् सर्वार्थांनी आदर्श असलेले पू. संदीप आळशी !

पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. संदीप आळशी (डावीकडे) यांना ग्रंथसेवेविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २०१७)

१. पू. संदीप यांचा मोठा भाऊ श्री. संतोष यांच्या साधनेचा आरंभ

‘१९९२ या वर्षी, म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये संमोहन उपचाराची चौकट वाचून श्री. संतोष आळशी मुंबई येथील सेवाकेंद्रात माझ्याकडे उपचारांसाठी आले. तेथपासून त्यांचे मी घेत असलेल्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाला येणे आणि सेवा करणे चालू झाले. तेव्हा ते नोकरी करतच होते. वर्ष १९९९ पासून ते पूर्णवेळ साधक झाले.

२. पू. संदीप यांचा आरंभीचा साधनाप्रवास

पू. संदीप १९९३ या वर्षी, म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी सेवाकेंद्रात सेवेसाठी रहायला आले. तेव्हा ते शिक्षण घेत होते. वर्ष १९९५ पासून त्यांची ग्रंथांच्या संदर्भातील सेवा चालू आहे. पू. संदीप यांनी १९९६ ते १९९८ या कालावधीत नोकरी केली आणि नंतर ते पूर्णवेळ साधक झाले. पुढे ते ग्रंथसेवेसह सनातन प्रभातच्या सेवाही करायचे. ते प्रामुख्याने दैनिकाचे मुद्रितशोधन करायचे. दैनिकाच्या सेवेसाठी साधक उपलब्ध झाल्यावर त्यांनी ती सेवा थांबवून ग्रंथांच्या सेवेला प्राधान्य दिले.

२ अ. प्राधान्याने ग्रंथनिर्मितीचे समष्टी कार्य करणारे पू. संदीप !

पू. संदीप यांच्यामुळे मलाही आधार मिळाला आहे. माझी मुख्य सेवा आहे ‘ग्रंथलिखाण’. प्रत्येक ग्रंथ छपाईसाठी पाठवण्याआधी त्याची अंतिम पडताळणी तेच करतात; म्हणून मला पुढील ग्रंथाकडे लक्ष देता येते. ते केवळ ग्रंथांचीच सेवा करतात, असे नाही, तर साधकांनाही साधनेच्या संदर्भात आणि वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायांच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला तिकडेही लक्ष द्यावे लागत नाही. पू. संदीप असल्यामुळे ‘संगणकात असलेला ८००० ग्रंथांचा मजकूर मी नसल्यावरही ३० – ४० वर्षांत मार्गाला लागेल’, याची मला खात्री आहे. ते नुसती ग्रंथांचीच सेवा करत नाहीत, तर राष्ट्र आणि धर्म या विषयांवरही लिखाण करतात. त्याचबरोबर ते चित्रकला इत्यादी विभागांतील साधकांनाही मार्गदर्शन करतात.

पू. संदीप यांच्या कार्यासंदर्भात महत्त्वाचे सूत्र म्हणजे त्यांची प्राणशक्ती अतिशय कमी असल्याने कधी त्यांना पलंगावर पडूनही सेवा करावी लागते. असे असूनही ते सर्व सेवा वेळेत पूर्ण करतात.

३. आदर्श संत पू. संदीप आणि त्यांचे आदर्श कुटुंब

वयाने मोठे असलेल्या आणि जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबीय नसलेल्या संतांचे ऐकणे सोपे असते; पण वयाने लहान असलेल्या आणि जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबीय असलेल्या संतांचे ऐकणे कठीण असते. असे असले, तरी वयाने लहान असलेल्या पू. संदीप यांच्याशी त्यांचे कुटुंबीय म्हणजे मोठा भाऊ, वहिनी, तसेच पत्नीची बहीण, तिचा पती इत्यादी कसे वागतात, याचा आदर्श येथे दिला आहे. पत्नी अवनी हिला तीव्र त्रास असूनही त्यांनी तिला प्रेमाने सांभाळले. त्यांनी सांगितलेली साधना आणि त्यांचा सत्संग यांमुळे तिचा त्रास बराच अल्प झाला आहे.

पू. संदीप साधनेत झपाट्याने प्रगती करत आहेत. ‘स्वतःच्या पुढील प्रगतीसह अनेक साधकांचीही प्रगती ते करून घेतील’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment