प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत गुंफले आणखी एक संतरत्न !

पू. (श्रीमती) दर्भेआजी यांचा सन्मान करतांना पू. (श्रीमती) सुमन नाईक (डावीकडे)

रामनाथी (फोंडा)  – ‘मनी ध्यानी कृष्णच नयनी । नित्य पर्वणी कृष्णसख्यांची ॥’ या उक्तीप्रमाणे अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली. या सोहळ्यात पू. आजींच्या संतपदाचे गुपित उघड करणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी वाचून दाखवला आणि पू. आजींच्या कुटुंबियांसह उपस्थित सर्वांचा भाव जागृत झाला. फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी पू. दर्भेआजी यांचा सन्मान केला.

या सोहळ्याला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची कन्या श्रीमती अंजली कुलकर्णी, त्यांची नात अश्‍विनी कुलकर्णी आणि नातू श्री. अभिजीत कुलकर्णी यांच्यासह अन्यही साधक उपस्थित होते. मूळ सातारा येथील पू. दर्भेआजी नुकत्याच फोंडा, गोवा येथे त्यांच्या मुलीकडे रहाण्यासाठी आल्या आहेत. सोहळ्यानंतर कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. दर्भेआजींची मुलाखत घेतली. यातून साधकांना पू. आजींच्या जीवनप्रवासातील वात्सल्य, निरपेक्षता, साक्षीभाव, प्रीती, व्यापकता, इतरांचा विचार करणे इत्यादी पैलूंचे दर्शन घडले. ‘संसार आणि साधना वेगळे नसून एकच आहेत’, हे साधकांना त्यांच्या अनुभवांतून शिकायला मिळाले. ‘एकत्र कुटुंबात रहातांना त्यांच्यातील विविध गुणांमुळे त्यांची साधना कशी घडली’, या संदर्भात पू. दर्भेआजी आणि कुलकर्णी कुटुंबीय यांनी उपस्थितांना अवगत केले.

 

१. सर्व काही प.पू. डॉक्टरच करवून घेतात ! – पू. दर्भेआजी यांचे मनोगत

‘असे होईल, याची कधी कल्पनाही केली नव्हती. मला अत्यानंद झाला. त्यांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा झाली, त्यामुळे हे झाले. आता मला अधिक काही नको. जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मी देवाला माझा भाऊ मानले आहे. आता मी प.पू. डॉक्टर सांगतील, ती सेवा करायला सिद्ध आहे; कारण आपण काही करू शकत नाही. सर्व काही प.पू. डॉक्टरच करवून घेतात. केवळ त्यांचा आशीर्वाद असावा’, अशा शब्दांत पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती शरणागती व्यक्त केली.

‘‘आयुष्यातील कठीण प्रसंगाच्या वेळी इतरांना काही त्रास होऊ द्यायचा नाही. आपण सहनशील रहायचे. त्या वेळी देवच आपल्याला सहन करण्याची शक्ती देतो’’, असे पू. दर्भेआजींनी सांगितले.

 

२. पू. (श्रीमती) दर्भेआजी यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

२ अ. आईमधील ‘आध्यात्मिक स्तरावरील प्रेमभाव आणि साक्षीभाव’ हे गुण प्रकर्षाने जाणवले !

काही दिवसांपूर्वी आई आश्रमात आल्यावर सर्व साधक तिला नमस्कार करत होते. तिच्याशी बोलत होते. त्या वेळी आईमधील ‘आध्यात्मिक स्तरावरील प्रेमभाव आणि साक्षीभाव’ आणि माझ्यातील ‘मायेतील प्रेम अन् अपेक्षा’ हा भेद लक्षात आला. तिच्यात आतून पालट झाला आहे. ती माझी पूर्वीची आई नसून ‘ती वेगळीच कोणीतरी आहे’, असे मला वाटले. ‘आता तिच्याकडे साक्षीभावातून पहाता येऊ दे’, अशी प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे. – श्रीमती अंजली कुलकर्णी (पू. दर्भेआजी यांची मुलगी), फोंडा, गोवा.

२ आ. आजीला भेटल्यावर भगवंत भेटल्याचा आनंद झाला !

रत्नपारख्यालाच जशी हिर्‍याची जाण असते, तसे प.पू. डॉक्टरच आजीला ओळखू शकले. लहानपणापासून मला अन्य गोष्टी न आवडता आजीचा सहवास आवडत असे. या वेळी मी आजीला १० मासांनी भेटले, तेव्हा मला भगवंत भेटल्याचा आनंद मिळाला. ‘आजीतील निरपेक्षपणे प्रेम करणे, वैरभाव नसणे, इतरांशी वात्सल्यभावाने वागणे हे गुण आमच्यात काही अंशी तरी यावेत’, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! – अश्‍विनी कुलकर्णी (पू. दर्भेआजी यांची नात)

२ इ. देवाने आजीला समष्टीची ‘पू. आजी’ बनवले !

देवाने आतापर्यंत पुष्कळ दिले. आज हा सोहळाही दिला. ‘देवाने आजीला आमच्या मायेतून मुक्त केले. तिला समष्टीची आजी बनवले’, असे वाटले. – श्री. अभिजीत कुलकर्णी (पू. दर्भेआजी यांचा नातू)

 

३. पू. आजींच्या संतपदाविषयी साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. ‘मी काही दिवसांपूर्वी पू. आजींना आश्रमातील ध्यानमंदिरात जातांना प्रथम पाहिले. माझी त्यांच्याशी ओळख नव्हती, तरी ‘त्या पुष्कळ सुंदर आहेत. त्यांच्या शरिरातील रंध्रारंध्रामध्ये प्रेमभाव ओतप्रोत भरलेला आहे. त्यांच्यात अत्यंत वात्सल्य आणि भोळा भाव आहे’, असे मला वाटले. ‘आताही सन्मान सोहळ्याकडे त्या साक्षीभावाने पहात आहेत’, असे वाटते.’– श्री. आशिष सावंत, गोवा.

२. ‘पू. आजींना प्रथम पाहिल्यावर ‘त्या संत आहेत’, असे वाटले. उत्सुकतेपोटी मी एका साधिकेला त्याविषयी विचारलेही. ‘पूज्य आजींचा नामजप आतून चालू आहे’, असे मला वाटले. त्या वेळी माझी भावजागृती झाली.’ – कु. मानसी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

४. अंतरीच्या भगवंताला आर्त साद घालणारा पू. दर्भेआजी यांनी केलेला नामजप !

‘पू. दर्भेआजी यांनी म्हटलेला नामजप ऐकतांना काय जाणवते’, याविषयी प्रयोग घेण्यात आला. कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. दर्भेआजींच्या नामजपाचे वैशिष्ट्य उलडतांना सांगितले, ‘‘पू. दर्भेआजी नामजप एका लयीत करतात. भावपूर्ण नामजपामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य आहे. त्या श्रीकृष्णालाच सर्व ठिकाणी पहातात. त्या इथे असल्या, तरी त्यांचे डोळे श्रीकृष्णालाच शोधत आहेत.’’

 

५. पू. दर्भेआजींनी म्हटलेला नामजप ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

अ. पू. आजी करत असलेला नामजप ऐकतांना अंगावर शहारे येऊन भावजागृती झाली. ‘नामजपातून त्या श्रीकृष्णाला आळवत आहेत आणि आतून नामजप करत आहेत’, असे वाटले. – श्री. अमोल हंबर्डे

आ. ‘भक्त प्रल्हाद आणि ध्रुवबाळ यांनी जशी साधना केली, तशी साधना त्या करत आहेत’, असे वाटले. नामजप ऐकतांना मन एकाग्र झाले. – अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी

इ. काही वेळापूर्वी जाणवत असलेला दाब न्यून झाल्याचे जाणवले आणि ‘माझ्यावर उपाय झाले’, असे वाटले. – सौ. वैशाली धवस

 

‘सनातनच्या ७१ व्या संत आणि ८८ वर्षांच्या अद्वितीय पू. श्रीमती
आशा  भास्कर दर्भे यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (श्रीमती) दर्भेआजी यांना नमस्कार करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

‘श्रीमती आशा भास्कर दर्भेआजी यांनी संतपद साध्य केल्यावर त्यांचा रामनाथी आश्रमात सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरील चैतन्य आणि निर्विचार भाव, तसेच शून्यात पहाणारे डोळे यांमुळे मी त्यांच्या चरणांना हातांनी स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर काही प्रतिक्रिया नव्हती. त्यांच्या कुटुंबियांना मी केलेल्या नमस्कारामुळे आश्‍चर्य वाटले. भेट संपल्यावर तेथून परततांना मी त्यांचे नमस्कारासाठी जोडलेेले हात माझ्या डोक्यावर ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला.

आतापर्यंत मी अनेक संतांचे दर्शन घेतले आहे; पण मी त्यांच्याबरोबर अशा तर्‍हेने कधीच वागलो नव्हतो. सनातनच्या एकाही संतांच्या चरणांना स्पर्श करून मी त्यांचा आशीर्वाद घेतलेला नाही. दर्भेआजींच्या भेटीनंतर खोलीतून बाहेर येतांना माझ्या मनात माझ्या वागण्याबद्दल पुढील विचार आले.

१. आपण ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध यांना नमस्कार करतो. आजी माझ्यापेक्षा वयोवृद्ध आणि तपोवृद्ध निश्‍चितच आहेत. ज्या तर्‍हेने त्यांनी आयुष्यातील प्रसंगांना तोंड देत घरी राहून कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय साधना केली, ती अद्वितीय आहे.

२. आयुष्यभर आजींच्या मनात कुठलीही स्वेच्छा नव्हती आणि आताही नाही. त्या दिवशी आजींशी बोलतांनाही मी म्हटले, ‘‘आजी, आता कोल्हापूरला घरी न रहाता आश्रमात रहायला या आणि आश्रमात साधकांसाठी नामजप करा.’’ यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही म्हणाल तसे !’’ त्यांना ‘कुटुंबाची कोणतीच आसक्तीही नाही’, हे यावरून सिद्ध झाले. आजींची अशी अनेक वैशिष्ट्ये मी त्या १ तासाच्या भेटीत अनुभवली. अशा वैशिष्ट्यपूर्ण आजींच्या चरणी पुन्हा एकदा शिरसाष्टांग नमस्कार !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

 

सात्त्विक, समाधानी वृत्ती आणि देवावर दृढ श्रद्धा या गुणांद्वारे
संसारात राहून साधना करणार्‍या श्रीमती आशा भास्कर दर्भेआजी

मूलतः सात्त्विक वृत्ती असलेल्या श्रीमती आशा भास्कर दर्भे यांनी हलाखीच्या परिस्थितीतही आनंदाने संसार केला. निर्मळ मन आणि निरपेक्ष प्रीती या गुणांद्वारे आणि धर्माचरणामुळे त्यांची संसारातही साधना होत राहिली. आजींच्या उदाहरणावरून लक्षात येते की, पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संसार करता करता कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाविना स्त्रियांची साधना होऊन त्यांचा मनोलय आणि अहंलय होऊन त्यांची साधनेत प्रगती होत असे.

गेल्या ६ – ७ दिवसांपासून आजी रामनाथी आश्रमात आहेत. ‘लपविलास जरी हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का ?’, अशी एका गाण्यातील प्रसिद्ध ओळ आहे. दर्भेआजींना पहिल्यांदा पाहिल्यावर मला या ओळीची आठवण झाली. याचे कारण हे की, ‘त्या संत आहेत’, याची मलाच नाही, तर सत्संगात असलेल्या १ – २ जणांनाही त्यांचा चेहरा पाहून लगेचच जाणीव झाली. त्यांच्या चेहर्‍यावर चैतन्य, आनंद आणि प्रीती लगेचच दिसतात. त्यांनी मोठ्याने नामजप केल्यावर भेटीला आलेल्या काही साधकांना अनुभूतीही आल्या. साधकांना या अनुभूती आजींच्या वाणीतील चैतन्यामुळे आल्या. आजींची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत असल्यामुळे त्यांच्या देहातही आता पालट झाले आहेत. या सर्व गोष्टी आजींना संतत्व प्राप्त झाल्याच्याच दर्शक आहेत.

देवावर दृढ श्रद्धा आणि अल्प अहं यांमुळे जलद आध्यात्मिक प्रगती करणार्‍या आजींनी सर्व साधकांसमोर मोठा आदर्श ठेवला असून आज ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून त्या सनातनच्या ७१ व्या संत झाल्या आहेत.

‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

समष्टीसाठी नामजप करत असतांना पू. दर्भेआजी ठेवत असलेला भाव

‘समष्टीसाठी नामजप करत असतांना कसा भाव ठेवता’, असे विचारल्यावर पू. दर्भेआजी म्हणाल्या, ‘‘मला काही मिळावे’, असे वाटत नाही. केवळ परमेश्‍वराचे नाम घेत रहायचे, एवढेच लक्षात असते. स्वत:साठी काही नको. ‘देवा, मला काही नको, सर्वांना चांगली बुद्धी दे, प्रेम दे’, अशी प्रार्थना करते. आता नामजप करतांना डोळ्यांतून पाणी येते.’’

Leave a Comment