कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना दैवी बालक, असे संबोधतात. दैवी बालकांची मागील जन्मीची साधना असते. त्यांना ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळही असते, तसेच त्यांच्यामध्ये ईश्‍वराप्रती भाव असतो. त्यामुळे ही मुले लहान वयातच साधनेला लागतात. दैवी बालकांपैकी एक असणार्‍या कु. प्रिशा सभरवाल (वय ११ वर्षे) हिने केलेल्या नृत्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २२.९.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि निरीक्षणांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एकूण २ प्रयोग घेण्यात आले.

कु. प्रिशा हिची भरतनाट्यम् नृत्य करतांनाची एक मुद्रा

१ अ. पहिला प्रयोग

पहिल्या प्रयोगात कु. प्रिशाने नृत्य आरंभ करण्यापूर्वी तिची आणि तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेली एक साधिका अन् तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला एक साधक यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. कु. प्रिशाने दुपारी १.१० ते १.४० या वेळेत (अर्धा घंटा) नृत्य केले आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांनी तिचे नृत्य पाहिले. त्यानंतर (म्हणजे नृत्य झाल्यानंतर) पुन्हा एकदा कु. प्रिशा आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले दोन्ही साधक यांची निरीक्षणे नोंदवण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यातून कु. प्रिशा या दैवी बालिकेने केलेल्या नृत्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर काय परिणाम झाला ?, हे जाणता आले.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

१ आ. दुसरा प्रयोग

दुसर्‍या प्रयोगात कु. प्रिशाने नृत्य आरंभ करण्यापूर्वी तिची आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले दोन्ही साधक यांची निरीक्षणे नोंद करण्यात आली. कु. प्रिशाने दुपारी ३.३० ते ३.४५ या वेळेत (१५ मिनिटे) नृत्य केले. त्या वेळी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींचे प्रकटीकरण (टीप) झाले आणि त्यांनी कु. प्रिशासह नृत्य केले. नृत्य झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांची निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यानंतर किती वेळाने तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे दोन्ही साधक त्यांच्या मूळ स्थितीला येतात ?, हे पहाण्यासाठी प्रत्येक अर्ध्या घंट्याने त्यांची निरीक्षणे घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ३५ मिनिटांनी पुन्हा एकदा सर्वांची निरीक्षणे नोंद करण्यात आली. तेव्हा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले दोन्ही साधक त्यांच्या मूळ स्थितीला आले होते, तसेच कु. प्रिशाही तिच्या मूळ स्थितीला आली होती. त्यामुळे पुढे निरीक्षणे घेण्यात आली नाहीत. सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या प्रयोगातून वाईट शक्तीच्या प्रकटीकरणामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांनी कु. प्रिशा या दैवी बालिकेसह नृत्य केल्यामुळे ते दोन्ही साधक आणि कु. प्रिशा यांवर काय परिणाम झाला आणि तो पुढे किती वेळ टिकला ?, हे जाणता आले.

टीप – वाईट शक्तीचे प्रकटीकरण : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींना सात्त्विक वातावरणामुळे त्रास होतो. वाईट शक्तींना सात्त्विकता सहन न झाल्यास त्यांचे साधकांमध्ये असलेले अस्तित्व स्थुलातून प्रकट होते. याला वाईट शक्तीचे प्रकटीकरण होणे, असे म्हणतात.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. दैवी बालिका

कु. प्रिशा सभरवाल (वय ११ वर्षे) या दैवी बालिकेने महर्लोकातून (टीप) पृथ्वीवर जन्म घेतला आहे. ती भरतनाट्यम् नृत्य शिकली आहे. २०.१०.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका कार्यक्रमात तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रयोगात तिने भरतनाट्यम् नृत्य सादर केले.

टीप – भू, भुवर्, स्वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्य असे सप्तलोक आहेत. यांपैकी स्वर्ग आणि त्यापुढील लोकांना उच्च लोक असे म्हणतात. कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने साधनेसाठी महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतला आहे.

२ आ. प्रयोगात सहभागी झालेले साधक

या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली एक साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला एक साधक सहभागी झाले होते.

 

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू, यू.टी.एस् उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण, यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे, यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील goo.gl/Kq3ocC या मार्गिकेवर (लिंकवर) दिली आहेत. या मार्गिकेतील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

३. २२.९.२०१७ या दिवशी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

सारणीतील प्रभावळींच्या संदर्भात सूचना

स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो. हे लक्षात घेऊन सूत्र ३ अ आणि ३ आ या सूत्रांतील सारण्या वाचाव्यात.

या चाचणीतील व्यक्तींची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा नमुना म्हणून वापर केला आहे.

३ अ. पहिला प्रयोग

कु. प्रिशाने केलेल्या नृत्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि ती स्वतः यांवर झालेला परिणाम

३ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि कु. प्रिशा यांच्या संदर्भात केलेली निरीक्षणे

३ अ २. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

३ अ २ अ. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा अल्प होणे, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकात ती तेवढीच रहाणे आणि स्वतः कु. प्रिशामध्ये ती दिसून न येणे

प्रथम आपण इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणे पाहू. कु. प्रिशाचे नृत्य पहाण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे १२० अंशाच्या आणि ९० अंशाच्या कोनांत उघडल्या, म्हणजे या दोन्ही साधकांमध्ये ही नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात होती. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि साधक यांनी कु. प्रिशाचे नृत्य पाहिल्यानंतर त्यांच्या केलेल्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे ४५ अंशाच्या आणि ९० अंशाच्या कोनांत उघडल्या. याचा अर्थ तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकात ती तेवढीच राहिली. कु. प्रिशाच्या केलेल्या निरीक्षणात तिने नृत्य करण्यापूर्वी आणि नृत्य केल्यानंतरही तिच्यात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याचा अर्थ तिच्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांमधील नकारात्मक ऊर्जेचा कोणताही परिणाम झाला नाही.

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले दोन्ही साधक आणि कु. प्रिशा यांमध्ये चाचणीपूर्वी अन् चाचणीनंतरही अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आढळली नाही.

३ अ २ आ. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे अन् स्वतः कु. प्रिशामध्ये सकारात्मक ऊर्जा तेवढीच रहाणे

चाचणीपूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. कु. प्रिशामध्ये नृत्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात होती. नृत्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली.

३ अ २ इ. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका अन् तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांची प्रभावळ थोडी वाढणे, तसेच कु. प्रिशाची प्रभावळही थोडी वाढणे

नृत्य पहाण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांची स्वतःची प्रभावळ अनुक्रमे १.८३ मीटर अन् १.६७ मीटर होती. नृत्य पाहिल्यानंतर त्यांची प्रभावळ अनुक्रमे २ मीटर आणि १.७९ मीटर झाली, म्हणजे त्यांत थोडी वाढ झाली. कु. प्रिशाची स्वतःची प्रभावळ नृत्यापूर्वी २.१५ मीटर होती. नृत्यानंतर ती २.४ मीटर झाली, म्हणजे तिच्या प्रभावळीतही थोडी वाढ झाली.

या सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ५ मध्ये दिले आहे.

३ आ. दुसरा प्रयोग

कु. प्रिशा नृत्य करतांना तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी कु. प्रिशा हिच्यासह नृत्य करण्याचा झालेला परिणाम

३ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि कु. प्रिशा यांच्या संदर्भात केलेली निरीक्षणे

३ आ २. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

३ आ २ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी कु. प्रिशा हिच्यासह नृत्य केल्यानंतर त्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा अल्प होणे अन् वाईट शक्तींच्या नकारात्मक ऊर्जेचा कोणताही परिणाम कु. प्रिशा हिच्यावर न होणे

प्रथम आपण इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणे पाहू. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्या चाचणीपूर्वी केलेल्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे १२० अंशाच्या आणि ९० अंशाच्या कोनांत उघडल्या. याचा अर्थ त्यांच्यात थोड्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा होती. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांनी कु. प्रिशासमवेत नृत्य केल्यानंतर त्यांच्या केलेल्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे ४५ अंशाच्या आणि ३० अंशाच्या कोनांत उघडल्या, याचा अर्थ नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. कु. प्रिशामध्ये नृत्य करण्यापूर्वी आणि नृत्य केल्यानंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याचा अर्थ तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्यासमवेत त नृत्य केल्यामुळे तिच्यावर नकारात्मक ऊर्जेचा कोणताही परिणाम झाला नाही, उलट तिच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे त्या दोन्ही तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांमधील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले दोन्ही साधक आणि कु. प्रिशा यांच्यामध्ये नृत्य करण्यापूर्वी आणि नृत्य केल्यानंतरही अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आढळली नाही.

३ आ २ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांनी कु. प्रिशा हिच्यासह नृत्य केल्यानंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे, तसेच कु. प्रिशामधील सकारात्मक ऊर्जेवर कोणताही परिणाम न होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्यामध्ये नृत्य करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा नव्हती. कु. प्रिशासह नृत्य केल्यानंतरही त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. कु. प्रिशामध्ये नृत्य करण्यापूर्वी थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तिने नृत्य केल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली.

३ आ २ इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांनी कु. प्रिशासह नृत्य केल्यानंतर त्यांची, तसेच कु. प्रिशाचीही प्रभावळ थोडी वाढणे 

नृत्य करण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांची प्रभावळ अनुक्रमे १.७९ मीटर आणि १.६४ मीटर होती. नृत्य केल्यानंतर ती अनुक्रमे १.८७ मीटर आणि १.८ मीटर झाली, म्हणजे त्यात थोडी वाढ झाली. कु. प्रिशाची स्वतःची प्रभावळ नृत्य करण्यापूर्वी २.१४ मीटर होती. नृत्यानंतर ती २.४ मीटर झाली, म्हणजे तिच्या प्रभावळीतही थोडी वाढ झाली.

३ आ २ ई. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांनी कु. प्रिशासह नृत्य केल्याचा परिणाम त्यांच्यावर अन् कु. प्रिशा हिच्यावरही साधारण ३५ मिनिटे टिकून रहाणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांनी कु. प्रिशासह नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली होती अन् त्यांची प्रभावळ वाढली होती. नृत्य करणे थांबवल्यावर ३५ मिनिटांनी त्या सर्वांची पुन्हा एकदा निरीक्षणे नोंद करण्यात आली. तेव्हा असे लक्षात आले की, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या त्या साधकांची नृत्य करण्यापूर्वी जेवढी नकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळ होती, साधारण तेवढीच नकारात्मक ऊर्जा अन् प्रभावळ ३५ मिनिटांनी आली. याचा अर्थ कु. प्रिशासह नृत्य केल्याचा परिणाम त्या साधकांवर साधारण ३५ मिनिटे टिकून राहिला, असे म्हणता येईल.

नृत्य केल्यानंतर ३५ मिनिटांनी कु. प्रिशाचेही निरीक्षण नोंद करण्यात आले. कु. प्रिशाने नृत्य केल्यामुळे तिची वाढलेली प्रभावळ नृत्य करणे थांबवल्यावर ३५ मिनिटांनी न्यून होऊन पुन्हा नृत्य करण्यापूर्वी जेवढी होती, तेवढीच आली. याचा अर्थ कु. प्रिशा हिच्यावरही नृत्याचा परिणाम साधारण ३५ मिनिटे टिकून राहिला, असे म्हणता येईल.

या सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ५ मध्ये दिले आहे.

 

४. निष्कर्ष

पहिला आणि दुसरा प्रयोग यांचे निष्कर्ष याप्रमाणे आहेत.

४ अ. पहिला प्रयोग

पहिल्या प्रयोगात कु. प्रिशा या दैवी बालिकेचे नृत्य पाहिल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली. त्या दोघांमध्ये नृत्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. कु. प्रिशामध्ये नृत्य करण्यापूर्वी जेवढी सकारात्मक ऊर्जा होती, तेवढीच नृत्यानंतरही होती. सर्वांच्या स्वत:च्या प्रभावळीत नृत्यानंतर थोडी वाढ झाली.

४ आ. दुसरा प्रयोग

दुसर्‍या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांनी कु. प्रिशासह नृत्य केल्यावर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. त्या दोघांमध्ये नृत्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. कु. प्रिशामध्ये नृत्यापूर्वी जेवढी सकारात्मक ऊर्जा होती, तेवढीच नृत्यानंतरही होती. सर्वांच्या स्वतःच्या प्रभावळीत नृत्यानंतर थोडी वाढ झाली. नृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम सर्वांवर पुढे ३५ मिनिटे टिकून राहिला.

 

५. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन

५ अ. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे वातावरणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होणे

कु. प्रिशाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याने तिच्यात सत्त्वगुणाचे प्रमाण अधिक आहे. तिने ईश्‍वरी अनुसंधानात राहून आणि ईश्‍वराची सेवा करत आहे, असा भाव ठेवून नृत्य केले. यांमुळे तिच्या नृत्यातून वातावरणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित झाली.

५ आ. कु. प्रिशाचे नृत्य पाहिल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा अल्प होणे; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा तेवढीच रहाणे, तसेच दोघांच्या प्रभावळीत थोडी वाढ होणे यांमागील कारण

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात पारंगत आहे. त्यामुळे कु. प्रिशाने केलेल्या नृत्यातील पदन्यास आणि मुद्रा यांचे तिला ज्ञान होते. तसेच नृत्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती हा तिचा साधनामार्ग आहे. यांमुळे कु. प्रिशाच्या नृत्यातून निर्माण झालेली सात्त्विक स्पंदने तिला अधिक प्रमाणात ग्रहण करता आली. त्यामुळे तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली आणि तिची स्वतःची प्रभावळही वाढली. याउलट तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला नृत्याविषयी काहीच ज्ञान नाही. तसेच त्याचा साधनामार्गही निराळा आहे. यांमुळे त्याला तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेप्रमाणे कु. प्रिशाच्या नृत्यातून लाभ करून घेता आला नाही. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली नाही; पण नृत्यातून निर्माण झालेल्या सात्त्विकतेच्या स्पंदनांमुळे त्याची स्वतःची प्रभावळ मात्र थोडी वाढली.

५ इ. कु. प्रिशाच्या नृत्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही; कारण त्यांना असलेल्या वाईट शक्तींच्या तीव्र त्रासाशी लढण्यात कु. प्रिशाच्या नृत्यातून प्रक्षेपित झालेली सकारात्मक ऊर्जा व्यय (खर्च) झाली.

५ ई. कु. प्रिशाने नृत्य केल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जा नृत्यापूर्वी जेवढी होती, तेवढीच नृत्यानंतरही रहाणे, यामागील कारण 

प्रिशाने नृत्य केल्यावर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे अपेक्षित होते; परंतु प्रयोगातील साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी कु. प्रिशा या दैवी बालिकेचे नृत्य पहाणे किंवा प्रकट होऊन तिच्यासह नृत्य करणे म्हणजे तिच्या नृत्यातून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने नष्ट करण्यासाठी तिच्याशी केलेले एक प्रकारे सूक्ष्मातील (टीप) युद्धच होते. या सूक्ष्मातील युद्धाचा परिणाम म्हणून कु. प्रिशामधील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली नाही. असे असले तरी कु. प्रिशा ही आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम असल्याने वाईट शक्तींना तिच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिच्यातील सकारात्मक ऊर्जा नृत्यापूर्वी जेवढी होती, तेवढीच नृत्यानंतरही राहिली. थोडक्यात या सूक्ष्मातील युद्धात तिचा एक प्रकारे जय आणि वाईट शक्तींचा पराजय झाला, असे म्हणता येईल. यातून साधनेमुळे निर्माण झालेल्या आध्यात्मिक बळाचे महत्त्व लक्षात येते.

टीप – सूक्ष्म : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे सूक्ष्म. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.१०.२०१७)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment