सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

संतपदी विराजमान झालेल्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

 

१. बालपण – आई-वडिलांनी साधेपणा आणि देवभक्ती यांचे संस्कार करणे

‘लहानपणी उमाक्कांचे जीवन अगदी सरळ आणि साधे होते. त्यांचे वडील कै. राधाकृष्णन् आणि आई श्रीमती जानकी यांनी त्यांच्यावर देवभक्तीचे संस्कार केले. अन्य मुलांना त्यांचे आई-वडील खेळ किंवा सहल यांसाठी पाठवायचे. तेव्हा उमाक्कांचे आई-वडील त्यांना रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी सांगायचे, तसेच भजन, संगीत किंवा वीणावादन शिकवायचे. भारतीय दलात उच्च पदावर असलेल्या त्यांच्या वडिलांनी साधेपणाने जीवन व्यतीत करून आपल्या मुलांसमोर साधेपणाचा आदर्श ठेवला. ‘प्रत्येक क्षणी आनंदी राहून दुसर्‍यांना आनंद द्यायचा’, हे उमाक्कांना त्यांच्या आई-वडिलांकडून शिकायला मिळाले.

 

२. आर्थिक सुबत्ता असूनही साधेपणाने रहाणे

उमाक्का कधीही महागड्या साड्या किंवा अलंकार घालत नाहीत. त्यांच्या घरी गेल्यावर ‘त्या कोट्याधीश आहेत’, असे कुणाला जाणवणार नाही. इतके त्यांचे राहणीमान साधे आहे. एक वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलींच्या लग्नाच्या वेळीही त्यांनी साधी वेशभूषा केली होती. ‘स्वत:साठी काहीतरी घ्यायचे, खरेदी करायचे’, हे त्यांना ठाऊकच नाही’, असे कोणालाही वाटेल; पण त्यांनी स्वतःहून साधेपणाने रहाणे पत्करले आहे. त्या घरी राहून पतीची सेवा करत, तसेच समष्टी साधना करत खर्‍या अर्थाने साध्वीसारखे जीवन जगत आहेत.

 

३. उमाक्कांनी देहभान विसरून तल्लीन होऊन
भजने म्हणणे आणि भजने ऐकणारी व्यक्ती मंत्रमुग्ध होणे

आनंदावस्थेतील पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

उमाक्कांना भजनी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भजने गायला पुष्कळ आवडायचे. त्यांच्या भजनी मंडळाच्या गुरु सौ. कांतीमतीमामी यांचे उमाक्कांवर विशेष प्रेम होतेे. उमाक्का भजने गातांना स्वतःला विसरून भजनांत आनंदाने तल्लीन व्हायच्या. त्यांचे भजन ऐकणारी व्यक्ती मंत्रमुग्ध होते आणि तिला ध्यान लागल्याची अनुभूती येते. त्या स्वयंपाक करतांना गात असलेले ‘राधारमण गोविंदा, गोपीवल्लभ गोविंदा’ हे कृष्णलीलेचे वर्णन करणारे भजन एकदातरी ऐकायलाच हवे.

 

४. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ !

४ अ. सत्संग आणि सेवा यांच्यासाठी अधिक वेळ देणे

वर्ष २००३ पासून उमाक्कांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. वर्ष २००३ ते २००५ या कालावधीत त्यांना कधी भजनी मंडळाच्या कार्यक्रमासाठी, तर कधी सत्संग घ्यायला जावे लागे. वर्ष २००६ पासून त्यांनी भजनी मंडळाच्या कार्यक्रमांना जाणे न्यून केले आणि त्या सत्संग अन् सेवा यांसाठी अधिक वेळ देऊ लागल्या.

४ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगामुळे भजनीमंडळात जाणे बंद होऊन सेवारत होणे

वर्ष २००९ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे चेन्नई येथे हिंदु धर्मजागृती सभेसाठी आले होते. त्यांच्या सत्संगामुळे उमाक्कांनी भजनीमंडळ कायमचे सोडले आणि स्वत:ला समष्टी साधनेत कार्यरत ठेवले.

४ इ. वर्ष २००४ मध्ये झालेली अवघे जीवन पालटून टाकणारी प.पू. गुरुदेवांची प्रथम भेट !

४ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज आश्रमात वास्तव्याला असतांना त्यांचा सत्संग लाभणे आणि गुरुदेवांच्या सांगण्यानुसार उमाक्कांनी बांधकाम चालू असलेल्या रामनाथी आश्रमास भेट देणे : चेन्नई येथे वर्ष २००२ पासून स्थायिक झालेले श्री. काशीनाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नी सौ. रूपा हे मूळचे बेळगाव येथील आहेत. वर्ष २००४ मध्ये श्री. काशीनाथ शेट्टी उमाक्का आणि त्यांच्या परिवाराला सुटीत बेळगाव येथे घेऊन आले होते. तेव्हा उमाक्कांना कळले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज आश्रमात वास्तव्याला आहेत.’ उमाक्का मिरज आश्रमात गेल्या. सर्वज्ञ अशा प.पू. गुरुदेवांनी उमाक्कांना पुष्कळ वेळ सत्संग दिला आणि त्यांना गोव्याला जाऊन बांधकाम चालू असलेल्या रामनाथी आश्रमाला भेट द्यायला सांगितले. त्या वेळी उमाक्का गुर्वाज्ञापालन म्हणून परिवारासह रामनाथी आश्रमाचे बांधकाम पहाण्यास गेल्या.

४ इ २. गुरुभेटीनंतर गुरुदेवांचा मनोहर आणि हसतमुख तोंडवळा डोळ्यांसमोर येऊन उमाक्कांना भावाश्रू येणे : गुरुभेटीनंतर त्यांचे जीवनच पालटले. त्यांना प्रतिदिन गुरुदेवांचा मनोहर आणि हसतमुख तोंडवळा डोळ्यांसमोर येऊन रडायला येई. त्यांना याचे कारण कळत नसे. ‘प.पू. गुरुदेव आपले सर्वस्व आहेत’, या भावाने उमाक्कांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आणि त्या साधनारत झाल्या.

 

५. दिनक्रम आणि साधनामय जीवन

५ अ. शिस्तबद्ध दिनक्रम

पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सतत भावावस्थेत राहून साधनारत असणे, हे उमाक्कांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या घराचे मुख्य द्वार सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वांसाठी उघडे असते. सर्वांना त्यांना भेटायला पुष्कळ आवडते. त्या सकाळी ५ ते ५.३० या वेळेत थोडे चालतात. रात्री उशिरा आलेल्या संगणकीय पत्रांना त्या सकाळी ६.३० वाजेपर्यंत उत्तर देतात. त्यानंतर त्या वैयक्तिक आवरून सकाळी ८ वाजेपर्यंत अल्पाहाराचे पदार्थ आणि दुपारचा स्वयंपाक करतात. पूजा आणि घरातील अन्य कामे करून सकाळी ९ वाजेपर्यंत त्या सेवेसाठी तयार असतात. असा त्यांचा दिनक्रम आहे.

५ आ. दिवसभर प्रापंचिक कर्मे करत असतांनाही अनेक सेवांचे दायित्व लीलया सांभाळणे

घरातील सर्व कामे करूनही दिवसभरात त्या १० घंटे सेवारत असतात. त्या अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना जिज्ञासूंना भेटणेे, ग्रंथांचे भाषांतर करणे, विज्ञापने मिळवणे, ग्रंथ-वितरण करणे, सत्संग आणि प्रवचने घेणे, आंदोलनांचे आयोजन करून त्यात सहभागी होणे, हिंदुत्वनिष्ठांना भेटणे, भ्रमणभाषच्या माध्यमातून स्थानिक साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे आदी विविध सेवा सहजतेने करतात. या सेवा करत असतांना त्या विदेशात असलेल्या त्यांच्या मुलींना साहाय्य करणे, प्रोत्साहन देणे आणि साधनेचे मर्म सांगणे, हे सर्वही लीलया करतात. यजमानांची प्रकृती ठीक नसल्यास त्यांना आधुनिक वैद्यांकडे घेऊन जाणे आणि त्यांची शुुश्रूषा करणे, हेही त्या करतात. त्या गृहिणी असूनही समष्टीत झोकून देऊन साधना करतात.

५ इ. साधनेला आरंभ केल्यानंतर स्वतःमध्ये झालेले पालट

मी साधनेत येण्यापूर्वी माझा स्वभाव भिडस्त अन् एकलकोंडा होता. माझ्यामध्ये नेतृत्वगुण आणि नियोजन यांचा अभाव होता. मी ‘सुखासीन जीवन सोडण्यास इच्छुक नसणारी आणि एका स्थितीत किंवा टप्प्यात अडकून रहाणारी’, अशी होते. ‘माझ्या स्वभावातील हे दोष कधी दूर झाले ?’, ते मला समजलेच नाही. त्यासाठी माझे प्रयत्न काहीच नव्हते. ही सर्व प.पू. गुरुदेवांची कृपा होती.

५ ई. जिज्ञासा आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने अध्यात्मातील अनेक गोष्टी शिकता येणे

प.पू. गुरुदेवांनी मला सर्वकाही शिकवले. वाईट शक्तींचे आक्रमण, सूक्ष्मातील ज्ञान, व्यक्तीच्या भोवती येणारे काळे आवरण इत्यादी सूत्रे मला पुष्कळ नवीन होती. माझ्यात नवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने अध्यात्मातील अनेक गोष्टी मला शिकता आल्या. सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांतील प्रत्येक शब्द आणि वाक्य यांनी मला काहीतरी नवीन शिकवले आणि एक नवीन दृष्टीकोन दिला.

 

६. विदेशात गेल्यावरही धर्मप्रसाराची संधी न सोडणे

६ अ. कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय तमिळ रेडियोवरून सण,
धार्मिक उत्सव आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांविषयी मार्गदर्शन करणे

काही वर्षांपूर्वी त्यांना कॅनडा या देशात जायचा योग आला. तेव्हा त्यांची भेट टोरांटो शहरातील आंंतरराष्ट्रीय तमिळ रेडिओचे श्री. सुरेश शिवा यांच्याशी झाली. तेव्हापासून प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा प्रत्येक १ – २ मासाने उमाक्का घरातून कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय तमिळ रेडियोवर सण, धार्मिक उत्सव आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांविषयी मार्गदर्शन करतात.

६ आ. साधकांसाठी सत्संग घेणे आणि तेथील कार्यक्रमांत सहभागी होणे

४ वर्षांपूर्वी त्यांची दुसरी मुलगी सौ. वर्षा वेणूगोपाल शिक्षणासाठी सिंगापूर येथे रहात होती. त्यामुळे उमाक्का तिकडे जायच्या आणि तेथील साधकांना भेटून साधकांसाठी सत्संग घ्यायच्या. त्यांची मोठी मुलगी सौ. सिंधुजा शिक्षणासाठी आणि आता लग्न झाल्यावर अमेरिकेत वास्तव्याला असते. त्यांची दुसरी मुलगी सौ. वर्षा आता कॅनडा येथे असते. उमाक्का मुलींकडे गेल्यावर तेथील साधकांना भेटतात आणि तेथील कार्यक्रमांत सहभागी होतात.

 

७. खर्‍या अर्थाने सहधर्मचारिणी असलेल्या सौ. उमाक्का !

अ. उमाक्का यांचे पती श्री. रविचंद्रन् यांचे यकृत
निष्क्रीय झाल्यावर उमाक्का पतीसाठी यकृत देण्यास सिद्ध होणे

उमाक्का यांचे पती श्री. रविचंद्रन् हे संगणकीय तंत्रज्ञानाच्या मोठ्या आस्थापनाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. प्रत्येक मासात ते ३ – ४ वेळा विदेशप्रवास करायचे. त्यांच्या हाताखाली सहस्रो लोक काम करायचे. श्री. रविचंद्रन् यांना आधीपासून मधुमेह आणि रक्तदाब या व्याधी होत्या. आठ वर्षांपूर्वी अकस्मात् त्यांंना यकृताचा विकार झाल्याचे निदान झाले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘त्यांचे यकृत निष्क्रीय झाले आहे. लवकरात लवकर यकृतदाता शोधावा लागेल. या १ वर्षाच्या कालावधीत पतीची काळजी घेणे, त्यांचे खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळणे, तसेच त्यांच्यात उत्साह निर्माण करणे हे सर्व उमाक्कांनी तपश्‍चर्येप्रमाणे केले. ‘आपल्या पतीसाठी प्रसंगी आपले प्राणही देईल’, अशी पत्नी असल्याचे सध्याच्या कलियुगात ऐकिवात नाही. उमाक्का पतीसाठी यकृत द्यायलाही सिद्ध झाल्या. आधुनिक वैद्यांनी त्यांना तपासले, सर्व चाचणी होऊन उमाक्का रुग्णालयात भरती झाल्या.

 

८. उमाक्कांच्या साधनेमुळेे प्रभावित झालेला त्यांचा साधनामय परिवार !

८ अ. यजमान आणि मुली यांनी साधना करणे

उमाक्कांच्या साधनेमुळेे प्रभावित झालेले त्यांचे कुटुंबीयही आता साधनारत झाले आहेत. त्यांच्या आईनेही त्यांच्यासमवेत साधनेला प्रारंभ केला. वर्ष २०१५ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे. त्यांचे पती श्री. रविचंद्रन् हे गेल्या काही वर्षांपासून साधना करत आहेत. ते नामजप आणि प्रासंगिक सेवा करतात. ते उमाक्कांना त्यांच्या सेवेत साहाय्य करतात. उमाक्कांच्या दोन्ही मुली सौ. सिंधूजा सुदर्शन आणि सौ. वर्षा वेणूगोपाल या नामजप करणे आणि नियमित अर्पण देणे, या माध्यमांतून साधना करतात. उमाक्कांचे दोघे जावई श्री. सुदर्शन आणि श्री. वेणूगोपाल हे ‘उमाक्कांच्या सहवासात सतत आनंद अनुभवतो’, असे सांगतात.

८ आ. उमाक्कांच्या लहान भावाच्या कुटुंबियांनीही नामजप आणि सेवा यांना आरंभ करणे

उमाक्कांचे लहान भाऊ श्री. गणेश राधाकृष्णन्, त्यांची पत्नी सौ. गीता गणेश, दोन्ही मुली कु. गुहप्रिया आणि कु. लास्यप्रिया हे सर्व जण नामजप करतात, तसेच त्यांचे घर उमाक्कांच्या घराजवळच असल्याने ते सेवाही करतात. उमाक्कांच्या कृष्णभक्तीने प्रेरित झालेले त्यांचे नातेवाईक आता साधनारत आहेत.

‘ज्यांच्या अंतरी असे कृष्णानंद, तो देई सर्वांना आनंद’, अशा उमाक्कांसारख्या साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्प आहे.

‘हे गुरुदेवा, सतत साधनेत प्रोत्साहन देणार्‍या, साधकांवर मातेसमान प्रेम करणार्‍या, साधकांमध्ये कृष्णभक्तीचे बीज रोवणार्‍या आणि सर्वांना आनंद देणार्‍या सौ. उमा रविचंद्रन् यांचा सहवास दिल्याविषयी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (१७.९.२०१७)

 

देवाच्या ओढीने आतुर होऊन व्यक्त केलेली कृतज्ञता आणि भावपूर्ण प्रार्थना !

हे भगवंता, मी भक्त प्रल्हादासारखी नाही, ध्रुवाप्रमाणे नाही, द्रौपदी आणि शबरी मातेप्रमाणेही नाही अन् रामसेतूसाठी साहाय्य करणार्‍या खारूताईप्रमाणेही नाही. मी इतक्या उच्च स्तराची भक्त नाही; परंतु या सर्व भक्तगणांना जे दुर्लभ दर्शन मिळाले, ते दर्शन मला सहजतेने मिळत आहे. तुमची अखंड कृपा आणि करुणा यांमुळे तुम्ही मला दर्शन देत आहात प्रभु; परंतु तुमचे दिव्य दर्शन घेण्याची योग्यता माझ्यात नाही. देवा, ‘मी वेडी झाले आहे’, असे तुम्हाला वाटत असेल ना ? खरोखरच मी वेडी झाले आहे. तुमच्या दिव्य रूपासाठी मी वेडी आहे. तुमची मधुर मधुर वाणी ऐकण्यासाठी मी वेडी झाले आहे. तुमच्या स्मरणात मी वेडी आहे, तरीपण इतर सामान्यजनांसमोर सामान्य असण्याचे नाटक करत आहे, स्वामी !’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई
 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात