स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेने जीवन आनंदी बनेल – शिक्षकांचा अभिप्राय

महाविद्यालयातील कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर

जळगाव : खरोखर अतिशय सोप्या आणि सुलभ अशा या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेने जीवन आनंदी बनेल यात शंकाच नाही. हा विषय आम्हाला फार आवडला, असा अभिप्राय चोपडा येथील पंकज विद्यालयातील शिक्षकांनी दिला. येथील शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ?’ याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ४५ शिक्षकांनी सहभाग घेतला. हा विषय समजून घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी वही आणि लेखणी आणून सर्व सूत्रे लिहून घेतली.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या की, मानवी जीवनाचा उद्देश आनंदप्राप्ती आहे. धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव निर्माण होत असतात. स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रयत्न केल्यास जीवन आनंदी होते. दोष आणि अहं निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

या कार्यशाळेचे आयोजन पंकज विद्यालयाचे प्रधान अध्यापक डॉ. एम्.व्ही. पाटील यांनी केले होते. या वेळी डॉ. पाटील यांनी सनातनचे साधक श्री. यशवंत चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शाळेचे प्राचार्य श्री. संभाजी देसाई यांनी सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांचे स्वागत केले. तर कु. जयश्री पाटील यांचे स्वागत उपमुख्याध्यापक श्री. योगेश चौधरी यांनी केले. कार्यशाळेला सुरुवात श्री गणेशाच्या श्‍लोकाने आणि प्रार्थनेने झाली. सनातन संस्थेचा परिचय कु. जयश्री पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्री. योगेश चौधरी यांनी केले.

हे मार्गदर्शन ऐकल्यावर मुख्याध्यापक श्री. एम्.व्ही. पाटील म्हणाले, ‘‘गणेशचतुर्थीच्या पावन पर्वावर अमूल्य अशी माहिती मिळाली. या वेळी चांगले शिकायला मिळाले, याप्रमाणे कृती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार.’’ आम्हाला योग्य मार्गदर्शन केले याविषयी सनातन संस्थेचे आभार. आपले कार्य चांगले आहे, असा अभिप्रायही काही शिक्षकांनी या वेळी दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात