नागपूर येथील स्वयंभू, २५० वर्षांहून अधिक प्राचीन आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक असलेला टेकडीचा गणपति !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती, तसेच ऋषिपंचमी इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

नागपूर येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेली प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरातील स्वयंभू श्री गणेशमूर्ती !

नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर ! मंदिरात झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्यापाशी असलेली गणेशमूर्ती म्हणजेच टेकडीचा गणपति होय ! हा गणपति नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. या श्री गणेशाची पूजा नागपूर येथील भोसले संस्थानिक करत असत. परकीय आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त झाले. त्यानंतर काही काळाने वर्ष १८६६ मध्ये ही मूर्ती पुन्हा सापडली आणि तेथे मंदिर बांधण्यात आले. माघ मासातील चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. लाखोंच्या संख्येने भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात. ही श्री गणेशमूर्ती विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक आहे.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात