वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे.

गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती
वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने ‘श्री गणेशोत्सव’

‘दर्शन, शास्त्र अन् इतिहास’ या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती, तसेच ऋषिपंचमी इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.

वसिष्ठपुराण तसेच महाभारत यांमध्ये या मंदिराचे महत्त्व उल्लेखित आहे. दोन्ही धर्मग्रंथांमध्ये केेळझर गांवाचे नांव ‘एकचक्र नगर’ असल्याचा उल्लेख आढळतो. केळझर येथे वसिष्ठऋषींचे वास्तव्य होते. वसिष्ठांनी भक्ती आणि पूजा यांकरिता या गणेशमूर्तीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. त्याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो. वसिष्ठ पुराणाप्रमाणे या गणपतीचे नांव ‘वरद विनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ हे नांव आहे. हा काळ प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या पूर्वीचा असून त्यांच्या जन्मानंतर वसिष्ठऋषींनी येथील वास्तव्य सोडले.

केळझर स्थित ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती १.४० मीटर उंच असून तिचा व्यास ४.४० मीटर आहे. ही मूर्ती अत्यंत मनमोहक आणि जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. हे मंदिर विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे.

 

महागणपति

‘पार्वतीने बनवलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात गणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण आणि कूटस्थ स्वरूपात असल्यामुळे महत्तत्त्वास ‘महागणपति’ म्हणतात. महागणपति जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा निखळ मोक्षप्राप्तीस्तव आराधिला जातो, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपति घेण्याची प्रथा आहे; पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिव गणपति असतो. काही सोन्या-चांदीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती क्वचित् आढळतात.’

‘प्रत्येक पुरुषदेवतेची एकेक शक्ती मानली जाते, उदा. ब्रह्मा-भारती, श्रीविष्णु-श्री लक्ष्मी, शिव-पार्वती. गाणपत्यांनीही परब्रह्मरूप गणपतीची एक शक्ती मानली असल्यास नवल नाही. श्री गणपति आपल्या शक्तीस मांडीवर घेऊन आलिंगन देत असल्याचे शिल्प उपलब्ध आहे. आजही असे रंगवलेले चित्र पहावयास मिळते. त्याचप्रमाणे ‘सिद्धि’ आणि ‘बुद्धि’ या त्याच्या दोन पत्नी त्याच्या दुशीकडे बसलेल्या आहेत, असेही शिल्प उपलब्ध आहे. या शक्तीसह गणपतीला तंत्रशास्त्रात ‘महागणपति’ असे म्हटले आहे.’ (हे आहे बुद्धीने केलेले विश्‍लेषण. – संकलक)

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली अतिशय मनमोहक अशी (१) ‘वरद विनायक’ श्री गणपतीची मूर्ती ! बुद्धीदात्या वरद विनायकाला शरणागत भावाने नमन करूया ! (२) केळझर (जिल्हा वर्धा) येथील श्री वरद विनायकाचे मंदिर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment