अंतर्मुखता, साधकांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या, तसेच लहान वयात संतपद गाठून ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या देवद येथील सनातन आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

सनातनच्या संतमालेत ६९ वे पुष्प गुंफियले ।
सर्वांना आणखी एक समष्टी संत लाभले ॥

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

सनातन आश्रम, देवद (पनवेल) : गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण दिवस असतो; कारण या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. साधक गुरुकृपेच्या वर्षावात न्हाऊन निघतो अन् कृतकृत्यही होतो. हा कृपारूपी वर्षाव अनुभवण्याची संधी मिळाली, ती देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना ! साधकांना साधनामार्गात मार्गदर्शन करणार्‍या, प्रत्येकाचे अंतर्मन जाणून त्याला साहाय्य करणार्‍या, आबालवृद्धांशी समरस होऊन वागणार्‍या, प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्‍या आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आंतरिक तळमळ असणार्‍या आणि म्हणूनच सर्वांची आध्यात्मिक आई झालेल्या सौ. अश्‍विनी पवार यांनी ७१ टक्के पातळी गाठून वयाच्या केवळ २७ व्या वर्षी संतपद प्राप्त केले आणि सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ६९ वे स्थान मिळवले !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सौ. अश्‍विनी पवार यांचा सन्मान केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याविषयी काढलेल्या गौरवोद्गाराचे वाचन करण्यात आले. या भावसोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. अनघा जोशी यांनीही अत्यंत भावपूर्णरित्या केले. उपस्थित साधकांकडून त्यांनी भावप्रयोगही करवून घेतला. या वेळी सर्वांचीच भावजागृती झाली.

भावसोहळ्याच्या क्षणांपर्यंत साधकांनी अनुभवलेली आनंदावस्था !

गेल्या काही दिवसांपासून सौ. अश्‍विनी पवार यंदाच्या गुरुपौर्णिमेला संतपद गाठतील, हा सर्वच साधकांच्या मनातील विचार ईश्‍वराने जाणला आणि तो पूर्णत्वाला नेऊन ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असे वातावरण अनुभवण्यास दिले. देवद आश्रमातील साधकांसाठी ही गुरुपौर्णिमा खर्‍या अर्थाने सुवर्णाक्षराने कोरून ठेवण्यासारखीच झाली !

भावसोहळ्याच्या आदल्या दिवसापासूनच ‘आश्रमातील सर्व साधक, आश्रम, तसेच प्रत्येक वस्तूही जणू आनंदाने भावसोहळ्याचीच वाट पहात आहेत’, असे जाणवत होते. या भावोत्कटतेने आश्रमातील वातावरणच पालटून गेले होते. भावसोहळ्याला आरंभ होण्याआधीच अनेक साधकांची आपापसांत कुजबूज चालू होती. सर्वांच्या तोंडवळ्यावरील भावही तेच सांगत होते. अनेक साधकांचे डोळेही जणू बोलके होऊन सांगत होते ‘आज अश्‍विनीताई संतपद गाठणार !’ सोहळ्याला आरंभ होताच सर्वच साधक आनंदवार्ता ऐकण्यासाठी आतुर झाले होते. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी आनंदवार्ता घोषित करताच सर्वांचे हात नकळत जोडले गेले अन् त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली, त्या गुरुमाऊलींप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती), जिने सौ. अश्‍विनी पवार यांना घडवले आणि लहान वयातील संतांचा सहवास साधकांना उपलब्ध करून दिला ! …त्यामुळे अनेकांचे नेत्रही पाणावले !

अशी झाली सौ. अश्‍विनी पवार यांनी संतपद प्राप्त केल्याची घोषणा !

या सोहळ्यात सौ. रेखा जाखोटिया यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर साधकांना घडवणार्‍या गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सौ. अश्‍विनी पवार म्हणाल्या, ‘‘तळमळीच्या जोरावरच सौ. जाखोटिया यांनी शारीरिक त्रासांतही आध्यात्मिक प्रगती केली. आपणही प्रतिकूल परिस्थितीत साधना करत आहोत; मात्र केवळ गुरुमाऊलींमुळेच आपल्याला त्या प्रतिकूलतेची झळ पोहोचत नाही. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठीच परात्पर गुरु डॉ. आठवले आलेले आहेत. असे गुरु आपल्याला लाभले ही भाग्याची गोष्ट आहे. (या वेळी सौ. अश्‍विनी यांचा भाव जागृत झाला होता.) त्यांना अपेक्षित असे करणे, हे सर्व साधकांचे एकमात्र कर्तव्य आहे. आपण शेकडो जन्मांपासून केलेल्या साधनेमुळेच आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरुरूप लाभले.’’ (पुढे भावाश्रू येऊ लागल्याने सौ. अश्‍विनी यानंतर बोलू शकल्या नाहीत.)

सौ. अश्‍विनी यांच्या भावोद्गारानंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर म्हणाल्या, ‘‘सौ. अश्‍विनी यांच्यात समष्टीला घडवण्याची पुष्कळ तळमळ आहे. अचूक निरीक्षणक्षमता, निर्णयक्षमता, अंतर्मुखता, प्रेमभाव, नेतृत्व गुण अशा अनेक आध्यात्मिक गुणांमुळेच त्या सगळ्यांची आध्यात्मिक आई झाल्या आहेत. त्यांचा सर्वांना आधार वाटतो. ‘आज त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे आणि त्या सनातनच्या ६९ व्या संत झाल्या आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्या सर्वांना मोठी भेट दिली आहे. याविषयी आपण त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’’ संतपदाची घोषणा होताच सौ. अश्‍विनीताई यांंना भावाश्रू अनावर झाले.

‘विविध गुणांच्या बळावर अवघ्या २७ व्या वर्षी ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून
सनातनच्या इतिहासात अनोखे पर्व निर्माण करणार्‍या सौ. अश्‍विनी अतुल पवार !’

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या सौ. अश्‍विनीने युवावस्थेत प्रथम देवद येथील आश्रमात आणि नंतर रामनाथी येथील आश्रमातील गुरुकुलात राहून साधनेचा पाया पक्का केला. त्या वेळी तिने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन केले. नियोजनकौशल्य, आज्ञापालन, उत्तम नेतृत्व, प्रेमभाव, तसेच विचारून करण्याची वृत्ती आदी गुणांमुळे अश्‍विनीने वर्ष २०१३ पासून, म्हणजे वयाच्या २३ व्या वर्षापासून देवद आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले अन् ‘देवद आश्रमातील साधकांच्या साधनेची घडी कधी व्यवस्थित बसेल का ?’, ही माझी चिंता दूर केली.

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी तिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्‍विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले.

अश्‍विनीचा विवाह वर्ष २०१० मध्ये झाला. अश्‍विनीच्या संतपदाच्या वाटचालीत तिच्या आई-वडिलांबरोबरच तिचे पती अतुल आणि सासरचे यांचा मोठा सहभाग आहे. तिच्या आई-वडिलांनी तिला साधनेसाठी देवद आश्रमात येण्यापासून कधी रोखले नाही. लग्न झाल्यावरही ती कधी पत्नी किंवा सून अशी वागली नाही. ती नेहमीच साधिका म्हणून वागायची, तरी पती अतुल आणि सासरचे यांनी तिच्या साधनेत कधी बाधा आणली नाही. अतुल हा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याकडे त्यांच्या सेवेत वर्ष २०१३ पासून, म्हणजे सव्वातीन वर्षे पूर्णवेळ आहे, तरी तिने त्याविषयी कधी अप्रसन्नता व्यक्त केली नाही. उलट त्याला प्रोत्साहनच दिले. त्यामुळे अतुलचीही प्रगती जलद होत आहे.

अशा ‘पू. (सौ.) अश्‍विनी पवार हिची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती जलद गतीने व्हावी’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वैशिष्ट्यपूर्ण

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या साधनाप्रवासातील दोन्ही
आनंदवार्ता देणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर असणे, हे तर दैवी नियोजनच !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा सन्मान सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केला. विशेष म्हणजे सौ. अश्‍विनी यांनी वर्ष २००९ मध्ये ज्या वेळी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, त्या वेळीसुद्धा ती शुभवार्ता तेव्हाच्या कु. अनुराधा वाडेकर यांनीच त्यांना प्रथम दिली होती. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्यावरही सौ. अश्‍विनी यांना आलिंगन दिले होते आणि आता संतपदी विराजमान झाल्याच्या क्षणीही सद्गदित झालेल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी आलिंगन दिले, ते सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनाच !

पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांनी त्यांच्या साधनाप्रवासात साहाय्य केलेले साधक कुटुंबीय,
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

‘मी संत झाल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आई-वडिलांनी माझ्यावर लहानपणापासून केलेले चांगले संस्कार, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृपाशीर्वाद, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन, पती श्री. अतुल पवार यांनी साधनेत वेळोवेळी केलेले साहाय्य, विवाहानंतर सासू-सासरे यांनी मला नात्याच्या कोणत्याच बंधनात न अडकवता पूर्णवेळ साधना करू देणे, यांमुळेच मला आजचा दिवस पहायला मिळाला आहे. माझे कौटुंबिक जीवन साधनेच्या दृष्टीने नेहमी मला पोषकच होते.

१. कुटुंबियांनी केलेले साहाय्य

१ अ. नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती
यांचा विरोध पत्करून साधना करू देणारे आई-वडील !

आई-वडिलांनी नातेवाइक आणि समाजातील व्यक्ती यांचा विरोध पत्करून मला साधना करू दिली. त्यांनी मला कुणाच्याही विरोधाची झळ लागू दिली नाही.

१ आ. घरातील आणि बाहेरील व्यवहार स्वतः सांभाळून सेवा
अन् साधना यांना प्राधान्य देण्यास सांगणारे पती श्री. अतुल पवार !

माझे पती श्री. अतुल पवार हे विविध सेवा करत असल्याने आणि आता ते योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सेवेत असल्याने आम्ही विवाह झाल्यानंतर २ मासांपासून (महिन्यांपासून), म्हणजे गेली ३ वर्षे ४ मास वेगळे रहात होतो, तरीही त्यांनी त्याविषयी कधीच गार्‍हाणे केले नाही. त्यांनी कधीही माझ्या साधनेत अडथळा किंवा अडचण येईल, अशी कोणतीच गोष्ट होऊ दिली नाही. त्यांनी घरातील आणि बाहेरील सर्व व्यवहार सांभाळले. त्यांनी मला नेहमी सेवा आणि साधना यांना प्राधान्य देण्यास सांगितले.

१ ई. सून म्हणून न वागवता ‘साधिका’ या नात्याने वागवणारे
आणि ‘कशाचीही उणीव भासू नये’, याची काळजी घेणारे सासू-सासरे !

सासू-सासर्‍यांनी मला कधी सून म्हणून वागवले नाही. मी वर्षातून एकदा किंवा कधीतरी दोनदा सासरी जाऊन ८ ते १० दिवस रहात असे. सासू-सासर्‍यांनी कधीही माझ्याकडून ‘मी घरी यावे, घरच्या कामांमध्ये लक्ष द्यावे, सुनेप्रमाणे घरची कामे करावीत, सुनेप्रमाणे व्यवहार करावा’, अशी कोणतीच अपेक्षा केली नाही. त्यांनी माझ्याकडे नेहमीच ‘साधिका’ या भावाने पाहिले. ते मी घरी आल्यावर ‘मला कशाचीही उणीव भासू नये’, याची काळजी घ्यायचे.

१ इ. मला कुणीच मायेतील नात्यात अडकू दिले नाही. त्यामुळे मला साधिकेचे जीवन जगता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कौतुकास पात्र
ठरलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेले दायित्व

२ अ. सेवेत व्यस्त असूनही सतत काळजी घेणे

विशेष म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी माझी सतत काळजी घेतली. सद्गुरु (सौ.) बिंदाताई सतत सेवेत व्यस्त असतात. त्या माझ्यापासून स्थुलातून दूर असलेल्या रामनाथी आश्रमात रहात असूनही ‘त्या माझ्यापासून दूर आहेत’, असे मला कधी वाटलेच नाही. त्यांच्या इतक्या व्यस्ततेतही तिथूनही त्यांचे माझ्याकडे सतत लक्ष असायचे.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर पडतांना सद्गुरु बिंदाताईंनी
हात धरणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्यांचा हात कधीही सोडू नकोस’, असे सांगणे

मला वर्ष २०११ मधील एक प्रसंग आठवतो. एकदा सद्गुरु बिंदाताई आणि मी सेवेनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी सद्गुरु बिंदाताई यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के होती. परात्पर गुरु डॉक्टर यांची भेट घेऊन आम्ही मार्गिकेतून चालत असतांना सद्गुरु बिंदाताईंनी माझा हात हातात घेतला. परात्पर गुरु डॉक्टर आमच्या मागून खोलीच्या बाहेर आले होते. ते मला म्हणाले, ‘‘आता बिंदाचा हात धरला आहेस. तो कधी सोडू नकोस.’’ हे ऐकून सद्गुरु बिंदाताईंनी माझा हात आणखी घट्ट धरला. तेव्हापासून आतापर्यंत सद्गुरु बिंदाताई मला सतत साथ देत आहेत आणि पुढेही देणार आहेत. श्री गुरुंनीच माझे दायित्व सद्गुरु बिंदाताईंकडे सोपवले आहे.’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.७.२०१७)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि वैशंपायन कुटुंबीय यांनी केलेला प्रेमाचा वर्षाव !

१. दर्शन आणि पवित्र चरणस्पर्श देऊन जीवनाचा उद्धार करणे

श्री. अतुल योगतज्ञ दादाजी यांच्या सेवेत असल्यामुळे योगतज्ञ दादाजींची मला भेटण्याची इच्छा होती. त्यांचे दर्शन आणि पवित्र चरणस्पर्श देऊन माझ्या जीवनाचा उद्धार करण्याची त्यांचीच तळमळ होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये मला त्यांच्या दर्शनाचा योग आला.

२. आठवण आल्यावर भ्रमणभाष करणे आणि प्रसाद पाठवणे

योगतज्ञ दादाजींना कधी माझी आठवण आली की, ते मला भ्रमणभाष करतात. ‘आठवण आली; म्हणून भ्रमणभाष केला’, असे म्हणून ते एखादे मिनिट बोलतात. श्री. अतुल यांच्यासमवेत ते नेहमी माझ्यासाठी प्रसाद पाठवतात. श्री. अतुल यांच्याकडे ते अनेकदा माझी आठवण काढून विचारपूस करत असतात.

३. वैशंपायन कुटुंबियांनीही प्रेमाचा पुष्कळ वर्षाव करणे

योगतज्ञ दादाजींचा कृपाशीर्वाद पाठीशी आहेच; पण त्यासमवेत वैशंपायन कुटुंबियांनीही माझ्यावर प्रेमाचा पुष्कळ वर्षाव केला आहे.

अ. योगतज्ञ दादाजींच्या पत्नीला मी कधी पाहिलेही नाही, तरीही त्यांचे माझ्यावर पुष्कळ प्रेम आहे. त्यासुद्धा भ्रमणभाष करून माझी विचारपूस करतात. त्या माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करतात. त्यांनीही माझ्यासाठी प्रसाद पाठवला होता.

आ. योगतज्ञ दादाजींचे सुपुत्र पू. शरदकाका आणि स्नुषा सौ. ललिताकाकू यांचेही माझ्यावर पुष्कळ प्रेम आहे. एकदा मी आजारी होते. तेव्हा मला ‘सलाईन’ लावले होते. त्या वेळी पू. शरदकाका श्री. अतुल यांच्याकडे दिवसातून २ – ३ वेळा माझी विचारपूस करत. नाशिकला योगतज्ञ दादाजींच्या घरी गेल्यावर पू. शरदकाका आणि ललिताकाकू यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. त्यांच्याकडे गेल्यावर ‘जणू मी माहेरीच आले आहे’, असे मला वाटत होते. ललिताकाकू श्री. अतुल यांना सांगत होत्या, ‘‘अश्‍विनी आली आहे, तर तिला नाशिक दाखवून आण आणि तिला चांगले खाऊ घाल.’’ वैशंपायन कुटुंबियांनी आम्हाला त्यांच्या घरातील सदस्य केले आहे.

इ. योगतज्ञ दादाजींचे ज्येष्ठ पुत्र अण्णा आणि त्यांची पत्नी सौ. सुनंदाकाकू यांनीही मला त्यांच्या घरी बोलावले आहे.

ई. योगतज्ञ दादाजींचे साधकही श्री. अतुल यांच्याकडे माझी विचारपूस करत असतात.

सनातन परिवाराकडून मला जे प्रेम मिळाले आणि मिळत आहे, ते तर अतुलनीय आहेच; पण त्या वेळी वैशंपायन कुटुंबियांकडूनही मला त्याच तोडीचे प्रेम मिळत आहे.’

– (पू.) सौ. अश्‍विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.७.२०१७)

चराचरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार !

१. ‘संत झाल्यावर काही वेगळे वाटत नाही’, असे परात्पर गुरु डॉ.
आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी ‘हे प्रगतीचे लक्षण आहे’, असे सांगणे

‘मी संतपदी विराजमान झाल्याचा भावसोहळा झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी माझे दूरभाषवरून बोलणे झाले. मी त्यांना सांगितले, ‘‘मला वेगळे आणि विशेष, असे काही वाटत नाही. माझी स्थिती आधीसारखीच आहे.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे प्रगतीचे लक्षण आहे. एखादा वाईट प्रसंग घडला, तर त्याचे दु:ख होते. ते दु:ख वाटण्याची तीव्रता वेगवेगळी असते, तसेच चांगला प्रसंग घडल्यावर आनंद होणे आणि त्याची तीव्रताही वेगवेगळी असते. तुला असे काही वाटत नाही. तू सतत आनंदी असतेस.’’

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘देवद आश्रमातून निघतांना वाईट वाटणार नाही ना ?’, असे विचारल्यावर ‘जगाच्या प्रत्येक काना-कोपर्‍यात तुम्ही असणारच आहात’, असे सांगणे

नंतर त्यांनी मला सेवेच्या संदर्भात सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘आता तुला सेवा करण्यासाठी बाहेरही जायचे आहे. देवद आश्रमातून निघतांना तुला वाईट वाटणार नाही ना ? तुला रामनाथी आश्रमातून निघतांना वाईट वाटले नाही, तर देवद आश्रमातून निघतांना कसे वाईट वाटणार ?’’ त्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘परम पूज्य, सनातन हे तुमचे नित्य रूप आहे. त्यामुळे रामनाथी आश्रम, देवद आश्रम आणि जगाच्या प्रत्येक काना-कोपर्‍यात तुम्ही असणारच आहात. त्यामुळे मला त्याचे काही वाटत नाही.’’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.७.२०१७)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. ‘मार्च २०१७ मध्ये योगतज्ञ दादाजींच्या दर्शनासाठी अश्‍विनी नाशिकला आली होती. दादाजींपुढे अश्‍विनी हात जोडून बसली होती. त्या वेळी संपूर्ण भेटीमध्ये दादाजी २ – ३ वेळा म्हणाले, ‘‘ही लीनाहूनही लीन आहे.’’

२. अश्‍विनीचे बोलणे दादाजींना आवडते. ते मला म्हणतात, ‘‘अश्‍विनीचे बोलणे गोड (स्वीट टॉक) आहे.’’

३. अश्‍विनी सतत सेवारत असते. मी दादाजींकडे सेवेला गेल्यावर १ ते दीड वर्षात दादाजी म्हणाले, ‘‘तुझ्या पत्नीला सेवेचे व्यसन आहे.’’ खरे पहाता त्या वेळी त्यांना अश्‍विनीविषयी एवढे ठाऊक नव्हते, तरीही दादाजींनी असे सांगितले. हा दादाजींचा द्रष्टेपणाच आहे.

४. वर्ष २०१४ मध्ये योगतज्ञ दादाजींनी अश्‍विनीला तिच्या जन्मदिनानिमित्त शुभाशीर्वाद देणारे त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अश्‍विनीचा उल्लेख ‘विद्यावंत, सेवाभावी अश्‍विनी’ असा केला आहे. त्या पत्रात ‘अतुलची प्रगती जलद होत आहे’, असे आश्‍वस्त केले होते. (परात्पर गुरु डॉ. आठवले हेसुद्धा अनेकदा असेच म्हणत असतात. तुझी आणि अश्‍विनीची प्रगती होत आहे. त्या वेळी ‘दोन गुरूंचे बोलणे समानच असते.’ याची प्रचीती येते.)

५. नाशिक येथे आल्यावर अश्‍विनी दादाजींना तिला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासाविषयी सांगत होती. तेव्हा दादाजी तिला म्हणाले, ‘‘तू पुष्कळ कामे करतेस. त्यामुळे सगळे तुझ्यामागे लागतात. (तू समष्टी सेवा करतेस. त्यामुळे अनिष्ट शक्तींची आक्रमणे तुझ्यावर अधिक होतात.)’’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.७.२०१७)

परात्पर गुरु डॉ. आठवले, योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि प.पू. पांडे महाराज
यांची कृपादृष्टी अन् भरभरून प्रीती लाभल्याने पृथ्वीवर जन्माला आल्याचे सार्थक झाले !

‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातन संस्थेमध्ये आलो. येथे मला साधनेची योग्य दिशा मिळाली. रामनाथी आश्रमात सेवा करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचा पुष्कळ सहवास मिळाला. त्यांना जवळून अनुभवता आले. मला त्यांची सेवा करण्याचीही संधी मिळाली. त्यानंतर देवदला आल्यावर तेथे प.पू. पांडे महाराजांची सेवा केली. त्यांनीही माझ्यावर भरभरून प्रेम केले. आता मागील ३ वर्ष ४ मासांपासून (महिन्यांपासून) परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने मी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याकडे पूर्णवेळ सेवा करत आहे. योगतज्ञ दादाजींनीही मला परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. पांडे महाराज यांच्यासारखेच प्रेम दिले. योगतज्ञ दादाजींनी माझी योग्यता नसतांना मला त्यांच्या अत्यंत जवळचे स्थान दिले. ते माझ्यासाठी प्रत्यक्ष दत्तगुरुच आहेत. त्यांनी माझ्यासमवेत माझी पत्नी सौ. अश्‍विनी हिलाही पुष्कळ प्रेम दिले. माझ्याप्रमाणे अश्‍विनीला रामनाथी येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर, देवदला प.पू. पांडे महाराज यांचे प्रेम तर आधीपासून मिळत होते; पण त्यांच्या जोडीला योगतज्ञ दादाजींनीही तिच्यावर तेवढेच प्रेम केले. आम्हा दोघांच्या जीवनात ३ परात्पर गुरूंची कृपा होऊन आमचे जीवन धन्य झाले आहे.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.७.२०१७)

सौ. अश्‍विनी पवार यांना संतपद मिळवून
देण्यात पूर्ण साहाय्य करणारे त्यांचे पती श्री. अतुल पवार !

सौ. अश्‍विनी पवार यांना संतपद मिळण्यात त्यांचा पती श्री. अतुल पवार याचा फार मोठा वाटा आहे. विवाह झाल्यावर वैवाहिक जीवन एकही दिवस न जगता त्याने परेच्छेने वागून सौ. अश्‍विनी हिला साधनेत पूर्ण साहाय्य केले. ‘असा पती असू शकतो’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तन-मन-धन यांचा त्याग करणे एकवेळ सोपे आहे; पण तरुण वयात वैवाहिक जीवनाचा पूर्ण त्याग करणे अशक्यप्राय आहे. तो त्याग करून अतुलने सर्वांसमोर एक फार मोठा आदर्श ठेवला आहे.

अतुल याने प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सेवेत सव्वातीन वर्षे राहून त्यांचेही मन जिंकले आहे. हेही कौतुकास्पद आहे. प.पू. दादाजींच्या कृपादृष्टीमुळे अतुलचीही प्रगती जलद होत आहे.

‘अतुलची प्रगती अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे द्रष्टेपण !

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी मला ७ जुलै या दिवशी सांगितले, ‘‘तू ३ दिवस देवद आश्रमात थांब. तुला ३ दिवसांची सक्तीची रजा !’’ यामागे काहीतरी कार्यकारणभाव असेल; म्हणून मी तशी कृती केली. ९ जुलै या दिवशी सौ. अश्‍विनीने संतपद गाठल्याचा भावसोहळा पहाण्यास मिळाल्याने पुष्कळ कृतज्ञता वाटली. योगतज्ञ दादाजींच्या बोलण्यामागील दैवी नियोजन लक्षात आले. भावसोहळा झाल्यानंतर त्यांनीच मला दूरभाष करून सांगितले, ‘‘तुम्हा दोघांना माझा आशीर्वाद ! अश्‍विनीला सांग, चांगले वाटले !’’ खरेतर त्यांना भावसोहळ्याविषयी स्थुलातून काहीच कल्पना नव्हती. ते प्रत्यक्ष सिद्ध समर्थ दत्तगुरुच असल्याने त्यांना सूक्ष्मातून एखादी घटना पहाणे नवीन नाही. त्यांना याविषयी आधीच सूक्ष्म ज्ञान झाले होते. मी भारावून गेलो. मी त्यांना भावसोहळ्याविषयी सांगितले.’

– श्री. अतुल पवार (पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचे यजमान)

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी उलगडले संतपदाच्या प्राप्तीचे गुपित !

१. संतपद गाठल्याचे लक्षात येऊनही साधकांना आनंद मिळावा,
यासाठी ते न दर्शवता सहजभावात वावरणार्‍या आणि संत होणार असल्याने सहसाधकांच्या
डोळ्यांतून व्यक्त होणारा आनंद त्यांना कळू न देता तो अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

‘मी संतपदाला पोहोचणार आहे, अशी पूर्वकल्पना मला आली होती. गुरुदेवांनी भाव निर्माण केल्यामुळेच हे आतून कळू शकले. भावसोहळ्याच्या नियोजनाविषयी मी आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आमच्यात संभाषण होत होते. ‘सोहळ्यात मला संत म्हणून घोषित करतील’, हे माझ्या लक्षात आले होते; पण मी ते माझ्या हालचाली किंवा तोंडवळा यांवरून दर्शवल्यास साधकांना त्या दिवशीचा आनंद अनुभवता येणार नाही. त्यामुळे मी ते दर्शवले नाही. माझ्या समवेत सेवा करणार्‍या साधकांच्या हालचाली किंवा डोळे या माध्यमांतून त्यांना ‘मी संत होणार असल्याचा आनंद झाला आहे’, हे मला जाणवत होते; पण मी स्थिर राहून तोही आनंद अनुभवला आणि भावसोहळ्याच्या नियोजनात सहभागी झाले.

२. संतपद गाठण्यापूर्वी अपेक्षा उणावल्या आणि स्थिरता आली !

संतपद गाठण्याच्या आधी काही मासांपासून स्वतःकडून, इतरांकडून किंवा परिस्थितीकडून होणार्‍या अपेक्षा अल्प झाल्याचे जाणवू लागले. पूर्वी चुका झाल्यावर ताण यायचा; परंतु आता तसे होत नाही. सर्व साधकांच्या अडचणी, सूत्रे ऐकतांना मन स्थिर असते.

३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या भेटीच्या
संदर्भातील प्रसंगाद्वारे गुरुतत्त्व एकच असल्याची आलेली प्रचीती !

७ – ८ मासांपूर्वी योगतज्ञ दादाजी वैशंपायन भेटण्यासाठी बोलावत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संत झाल्यावर भेट’, असे सांगितले. मार्च २०१७ मध्ये योगतज्ञ दादाजी यांनी पुन्हा भेटण्याविषयी विचारले. त्याविषयी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना विचारल्यावर त्यांनी जाऊन येण्यास सांगितले. मी तसे केले. याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ठाऊक नसल्याचे नंतर समजले. त्या वेळी मनात विचार आला, ‘‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले असेल’, असे मी गृहित धरले. माझी चूक झाली. त्यांचे आज्ञापालन करण्यात मी न्यून पडले. परात्पर गुरूंनी जे सांगितले होते, त्याविषयी मी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना सांगायला हवे होते.’’ नंतर वाटले, ‘‘हे सर्व गुरुतत्त्वाचेच कार्य आहे. त्यामुळे ते एकच असणार. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, म्हणजे ते गुरुतत्त्वाकडूनच आलेले आहे. त्यामुळे विकल्प यायला नको.’’ हा प्रसंग म्हणजे मी संतपद प्राप्त केल्याचे प्रमाणच होते.’

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या वाक्याला सृष्टीने दिलेला प्रतिसाद !

‘भावसोहळा चालू असतांना वातावरणात पुष्कळ उष्णता जाणवत होती. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सौ. अश्‍विनी पवार यांनी संतपद गाठल्याचे घोषित केले. त्यानंतर त्यांनी ‘सृष्टी प्रफुल्लित झाली’, असे वाक्य उच्चारताच वातावरणात अचानक पालट झाला. क्षणार्धात वार्‍याच्या गार झुळुकेचा देहाला स्पर्श झाला ! सर्वत्र गारवा जाणवू लागला. जणू त्या सृष्टीने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या वाक्याला सादच दिली !’

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा बाल्यावस्था ते समष्टी संत
हा साधनाप्रवास आणि तो करवून घेणारी परात्पर गुरुमाऊली !

साधनाप्रवासात गुरुमाऊलीने बोट धरिता ।
अनुभवली केवळ कृतार्थता अन् कृतज्ञता ॥

 

समष्टी संतांचे लाभले आम्हास अनमोल रत्न ।
दयाघना, करवून घे आमचेही अखंड प्रयत्न ॥

बाल्यावस्था
युवावस्था
भावपूर्ण व्यष्टी साधना
तळमळीने समष्टी साधना
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याच्या घोषणेचा क्षण
सनातन गुरुकुलात अध्ययन आणि अध्यापन
संतपद प्राप्त केल्याचा क्षण
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

पू. (सौ.) अश्‍विनीताई जनलोकमें स्थित हो गयी

‘महर्लोकसे पृथ्वीपर आयी अश्‍विनीताई ।

गुरुदेवजीके समष्टीकी लगनसे सेवा कर ।

सभी साधकजनोंको प्रिय हो गयी ॥ १ ॥

स्थूल, सूक्ष्म, मन, देह सभी बंधनोंको ।

तोडकर जनलोकमें स्थित हो गयी ॥ २ ॥

प.पू. गुरुदेवजीका विश्‍वास जितकर देवद आश्रमका शिवधनुष्य उठाकर हम सभी साधकोंको साधनामें

अमूल्य दिशादर्शन करनेवाली पू. (सौ.) अश्‍विनीताईके चरणोंमेें सभी साधकोंका नमस्कार !’

– कु. सोनाली गायकवाड

परिपूर्ण सेवा का मूर्तीमंत रूप पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

‘परिपूर्ण सेवा का मूर्तीमंत रूप है ।

भाव और लगन उसकी पहचान है ॥ १ ॥

गुरुसेवामें नही रहता देह का भान ।

गुरु का मन जितकर गुरुकृपा पाना यही है उसका प्रमाण ॥ २ ॥

मनमें सदा उसके साधकोंके प्रगतीका ध्यान ।

उसी कारण साधकों के साधना के दृष्टी से करती है प्रयास हर क्षण ॥ ३ ॥

प्राप्त दायित्व है उसके लियेे । ‘गुरुदेवजी के विश्‍वास’का एहसास हर क्षण ॥ ४ ॥’

– कु. स्नेहा झरकर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात