भावपूर्ण गुणवर्णनातून शब्दबद्ध केलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !


१. श्री. अतुल पवार (पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे यजमान)

१ अ. सौ. अश्विनी संत होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो !

माझ्याकडे आज बोलायला शब्दच नाहीत. मी आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो. आज तो आनंदाचा क्षण आला आहे.

१ आ. संतपत्नीचीही सेवा करण्याची संधी मिळाली !

श्री. अतुल पवार पुढे म्हणाले, ‘‘मी पुष्कळ भाग्यवान आहे. गेल्या जन्मीची पुण्याई आणि या जन्मी लाभलेला गुरूंचा आशीर्वाद यांमुळे मला आयुष्यात बरेच काही मिळाले, त्यातीलच एक म्हणजे सौ. अश्विनी ! मला आजपर्यंत अनेकदा संतांची सेवा करण्याची संधी मिळाली. या संदर्भात मागे एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘तू भाग्यवान आहेस. तुला ३ परात्पर गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली.’ आता सौ. अश्विनी संत झाली, म्हणजे तिची सेवा हीही आता माझ्यासाठी संतसेवाच आहे.

१ इ. गुरुवाणीच्या सत्यतेची प्रचीती !

सौ. अश्विनीची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित झाल्यावर दैनिक सनातन प्रभातमध्ये तिच्या संदर्भात पुष्कळ लेख प्रसिद्ध झाले होते. ते मी अजूनही संग्रही ठेवले आहेत. त्यातच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘सौ. अश्विनी ही लहान वयातील पहिली संत असेल.’ प्रत्यक्षातही ही गुरुवाणी आज सत्य ठरली. सौ. अश्विनीच्या बाल्यावस्थेच्या संदर्भात देवद आश्रमातच चित्रीकरण केलेले होते आणि आज तिचा संत म्हणून झालेला सन्मानही येथेच झाला, हे सर्व दैवीच आहे.

१ ई. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचाही संतपदासाठी आशीर्वाद लाभला !

‘ती आता संतपदाला पोहोचेल’, असे मला वाटतच होते. मार्च २०१७ मध्ये आम्ही दोघे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी ती संत होण्याविषयी मी योगतज्ञ दादाजींकडे आशीर्वाद मागितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तो आशीर्वाद तर दिलेलाच आहे. अजून जे आवश्यक आहे, तेही दिलेले आहे.’’ सौ. अश्विनी गुरुकृपेने आणि संतांच्या आशीर्वादाने संत झाली, हे सांगतांना श्री. अतुल पवार यांचा भाव दाटून येत होता. श्री. अतुल पवार सौ. अश्विनी यांची सूत्रे सांगतांना भावावस्थेतच होते.

१ उ. सासरी गेल्यावरही असलेली नियोजनबद्धता !

श्री. अतुल पवार म्हणाले, ‘‘आम्ही वर्षातून एक-दोनदाच गावाला जातो. तेथेही ती चांगले नियोजन करते. आश्रमातून घरी गेल्यावर ‘वेळ वाचवून सेवा कशी करता येईल’, यासाठी तिचा प्रयत्न असतो. ती घरातील सर्व कामे आणि सेवा व्यवस्थित हाताळते. घरी असली, तरी तिचे सर्व लक्ष आश्रमसेवांकडेच असते.

१ ऊ. सर्वांना न दुखावता साहाय्याच्या भावाने चुका सांगणे

तिला कोणतीही चूक समजली आहे आणि तिने ती सोडून दिली, असे कधीच झाले नाही. साधकांच्या किंवा कुटुंबियांच्या कोणाच्याही चुका असोत, ती चुका स्पष्टपणे आणि न दुखावता प्रेमाने सांगते.

१ ए. सासरच्यांशीही जवळीक निर्माण केली !

आमच्या काही नातेवाइकांना साधनेविषयी तितकेसे ठाऊक नाही. असे असतांनाही ती त्यांना सातत्याने साधनेविषयी सांगते. त्यामुळे तेही आता साधक होण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही वर्षातून १-२ वेळाच घरी जातो; मात्र त्यातही तिने काही नातेवाइकांशी पुष्कळ जवळीक निर्माण केली आहे. त्यामुळे तिला भेटण्याची त्यांना पुष्कळ ओढ असते.’’

 

२. श्री. केशव पवार आणि सौ. मंदाकिनी पवार (पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे सासू-सासरे)

२ अ. सौ. अश्विनी म्हणजे गुणांची खाण ! (भ्रमणभाषवरून व्यक्त केलेले मनोगत)

‘सौ. अश्विनी म्हणजे गुणांची खाण आहे. आम्हीच तिचा लाभ करून घेण्यात अल्प पडतो. अशी सून आम्हाला मिळाली, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. ती सासरी आल्यावर घरकामांमध्येही साहाय्य करते, आश्रमातील सेवाही करते आणि नातेवाइकांचीही काळजी घेते. आज ती संतपदाला पोहोचली, यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.’

 

३. पू. (सौ.) अश्विनी यांच्या माहेरचे कुटुंबीय

३ अ. श्री. सदाशिव साळुंखे (पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे वडील) –
सौ. अश्विनीच्या माध्यमातून सद्गुरुकृपेने भक्त प्रल्हादच जन्माला आला !

‘सद्गुरूंची लीला अगाध आहे. मी प्रतिवर्षी सांगली किंवा मिरज येथे गुरुपौर्णिमेसाठी जातो; मात्र आज येथे कसा आलो, हे मलाच ठाऊक नाही. आज माझे हृदय भरून आले. ‘माझ्यासारख्या हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला’, असे मला वाटते. (या वेळी श्री. साळुंखे यांचा भाव जागृत झाला होता. प्रारंभी त्यांचा सौ. अश्विनी यांना आश्रमात सेवेला जाण्यासाठी, पूर्णवेळ साधिका होण्यासाठी विरोध होता. आपण अल्प पडतो, या भावामुळे त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘हिरण्यकश्यपू’ म्हणून केला.) सौ. अश्विनीची बुद्धी लहानपणापासून तीक्ष्ण होती. विद्यार्थीदशेत असतांना आर्थिक अडचणी येऊनही तिने चांगले शिक्षण घेतले. तिच्या विवाहाच्या प्रसंगी नातेवाईक विरोधात होते. सौ. अश्विनीची सद्गुरूंवर निष्ठा होती. त्यामुळे विवाह पार पडला. अश्विनीच्या संदर्भात सर्व सद्गुरूंनीच केले. मन भरून आल्यामुळे मी अजून काही व्यक्त करू शकत नाही.’ (मनोगत सांगतांना आरंभीपासूनच श्री. साळुंखे यांचा भाव दाटून येत होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये ‘सद्गुरूंची कृपा’ हा शब्द होता.)

३ आ. सौ. पुष्पा साळुंखे (पू. (सौ.) अश्वि्नी पवार
यांची आई) – संतकन्येची आई होण्याचे भाग्य लाभले !

‘यंदा गुरुपौर्णिमेच्या अगोदर दैनिक सनातन प्रभातमध्ये साधकांच्या आध्यात्मिक पातळीची सूची प्रसिद्ध झाली होती. त्यात सौ. अश्वि्नीची पातळी मागील वर्षीइतकीच म्हणजे ६९ टक्के होती. याविषयी मी तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘लवकरच प्रयत्न करून मी संत होईन.’’ तिला समोरील व्यक्तीच्या मनातील सर्व कळते. ‘ती अंतर्यामीच आहे’, हे अनेक प्रसंगांतून मला अनुभवायला आले आहे. ती आजारी असतांना मी तिच्या खोलीत जायचे, तेव्हा तेथे माझ्यावर आध्यात्मिक उपाय व्हायचे. गेल्या ६ मासांपासून मला तिच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याचे जाणवायचे. अशा संतकन्येची आई होण्याचे मला भाग्य लाभले, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ या वेळी सौ. साळुंखे यांचा भाव दाटून आल्याने पुढे काही बोलू शकल्या नाहीत.

३ इ. श्री. सचिन साळुंखे (पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा लहान भाऊ)
– माझ्यावर संस्कार केल्याने अश्विनी ‘ताई’ माझी ‘आई’ ही आहे !

‘मी आज जो काही आहे, तो केवळ ताईमुळेच आहे. माझे हस्ताक्षर चांगले आहे, तेही केवळ ताईमुळेच ! त्यामुळे मला प्रसारात फलक लेखनाची सेवा मिळते. ताईनेच मला ‘प्रत्येक प्रसंगात निर्णय कोणता घ्यावा, आई-बाबांच्या संदर्भात काही प्रसंग घडल्यास माझी भूमिका कशी असायला हवी’, यांविषयी वेळोवेळी सांगितले. आम्ही लहान असतांना आई प्रसाराला गेल्यावर ताईनेच मला सांभाळले. तिनेच माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे ती जशी माझी ‘ताई’ आहे, तशी ‘आई’ही आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम झाल्यापासून ताईने जे काही सांगितले, ते माझ्याकडून सहजतेने स्वीकारले जाऊन प्रयत्न होत होते. मला आज पुष्कळ आनंद झाला आहे. ‘तिच्याविषयी काय सांगू आणि काय नको’, असे झाले आहे.’

 

अखंडपणे सेवारत असणाऱ्यां पू. (सौ.) अश्विनी पवार ! – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे

‘पू. (सौ.) अश्विनीताई सतत सेवेत व्यस्त असतात. अखंड सेवारत असूनही प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यातून ‘मी (साधनेत) अल्प पडते’, हाच भाव जाणवतो. ‘साधकांमध्ये पालट व्हावा’, हीच त्यांची नेहमी तळमळ असते. अनेक साधक त्यांना त्यांच्या अडचणी सांगतात. त्यातही त्या सर्वांना अखंडपणे न थकता साहाय्य करतात. एखाद्या समस्येविषयी त्यांना ठाऊक नसेल, तर ‘मला याविषयी माहीत नाही, मी विचारून सांगते’, असे त्या प्रांजळपणे संबंधित साधकाला सांगतात. साधकांना त्या कधीही मानसिक स्तरावर हाताळत नाहीत. स्वतःच्या चुका सांगतांनाही प्रतिमा न ठेवता त्या प्रामाणिकपणे सांगतात. काही वेळा आध्यात्मिक त्रासामुळे त्यांची प्राणशक्ती अल्प होते. त्यांना झोपून रहावे लागते; परंतु प्रकृती थोडीशी जरी ठीक झाली, तरी त्या लगेचच सेवेला आरंभ करतात.’

 

सत्कारमूर्ती अश्विनी !

८ जुलै या दिवशी आश्रमात भावसोहळ्याची सिद्धता चालू होती. त्या वेळी देवाने पुढील काव्य सुचवले.

‘कोण आहे सत्कारमूर्ती ।
भगवंता गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी ॥ १ ॥
वाट पहातो आम्ही आतुरतेने ।
भगवंत म्हणे ती तर आहे अश्विनी ॥ २ ॥
निर्मळता, निरागसता अन् प्रीतीने ।
भगवंत म्हणे मज जिंकले तिने ॥ ३ ॥
आदर्श म्हणूनी काय असतो ।
भगवंत म्हणे कृतीतूनी सर्वांसमोर ठेवला तिने ॥ ४ ॥’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे

 

सातत्याने मनन-चिंतन करून देवाच्या
अनुसंधानात रहाणाऱ्यां पू. (सौ.) अश्विनीताई ! – कु. स्नेहा झरकर

‘पू. (सौ.) अश्विनीताईंची वार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला आहे. त्यांच्याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे; परंतु कोठून प्रारंभ करू हेच लक्षात येत नाही. त्या तळमळीने सेवा करतात. प्रत्येक वेळी ‘मी आणखी काय करायला हवे’, या दृष्टीनेच त्यांचे मनन आणि चिंतन चालू असते. त्यांना साधकांच्या प्रगतीची तळमळ आहे. त्यांचे सातत्याने देवाशी अनुसंधान असते. काही वेळा साधकांना त्या आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्याविषयी नंतर विचारल्यावर त्यांना आठवत नाही; कारण दिलेले दृष्टीकोन त्यांना देवाने सुचवलेले असतात. दृष्टीकोनही साधकांना अंतर्मुख करतात. त्यांच्या सहवासात आनंद द्विगुणित होतो. नामजप चांगला होऊन चैतन्य मिळते. प्रसाद-महाप्रसाद यांच्या वेळी त्या साधकांची विचारपूस करतात. यातून त्यांच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढत असल्याचे जाणवते. कुणी त्यांना त्यांची चूक सांगितल्यास त्या सखोल चिंतन करतात. चूक सांगणाऱ्यांविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. चुका सांगून त्यांतून शिकून बाहेर कसे पडायचे, हेही सांगतात. त्या आम्हा सर्वांना आईप्रमाणे सांभाळतात.’

 

वेळोवेळी आधार देणाऱ्यां पू. (सौ.) अश्विनीताई ! – कु. सोनाली गायकवाड

‘सेवा करण्यासाठी पू. (सौ.) अश्विनीताई आम्हाला वेळोवेळी आधार देतात. आश्रमातील स्थूल वस्तूंप्रमाणे त्यांचे सूक्ष्म स्तरावरील गोष्टींकडेही लक्ष असते. त्या कोणतेही सूत्र अर्धवट सोडत नाहीत. प्रत्येक साधकाच्या वयानुसार त्या आधार देतात. त्यांनी सांगितलेल्या चुका आमच्या अंतर्मनापर्यंत जातात. काही दिवसांपासून ‘ताई नसून संतच आपल्याशी बोलत आहेत’, असे जाणवत होते.’

 

पू. (सौ.) अश्विनीताई आम्हाला आईप्रमाणे आहे ! – कु. पूजा जठार

‘पू. (सौ.) अश्विनीताई सतत अंतर्मुख असतात. त्या आम्हा सर्वांना तत्त्वनिष्ठपणे चुका सांगतात. आम्ही त्यांचा लाभ करून घेण्यात अल्प पडतो. त्यांच्यामुळे आम्हाला सेवेतील बारकावे लक्षात येतात. त्यांचा आम्हाला आधार वाटतो. त्या आम्हाला आईप्रमाणेच आहेत. साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी आणि त्यांची वेगाने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्या त्यांच्या चुका सांगून साहाय्य करतात.’

 

‘दुसरी बिंदा हवी’, या परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्या वाक्याची पूर्तता झाली ! – श्री. शंकर नरुटे

‘रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात सेवेसाठी येण्यास सौ. अश्विनीताई निघाल्या होत्या. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘आपल्याला दुसरी ‘बिंदा’ हवी. (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणे उत्तम नेतृत्व करणारी दुसरी बिंदा हवी.)’’ आज त्यांच्या वाक्याची पूर्तता झाली. पू. (सौ.) अश्विनीताई या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणेच निर्णय घेतात. आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी निरोप आला. त्यांना स्वतःचा कार्यक्रम असल्याचे ठाऊक असूनही कार्यक्रमाचे त्रयस्थपणे नियोजन करून आम्हा सर्वांना आनंद दिला. साधक आजारी असतील, तर त्यांना पू. अश्विनीताईंना भेटल्यावर चांगले वाटते. ‘काही आजारी साधकांना वैद्यांच्या उपचारांपेक्षा पू. ताईंशी बोलल्यावर बरे वाटते’, असे काही जणांनी सांगितले.

 

‘सर्वच दृष्ट्या आदर्श असणाऱ्यां पू. (सौ.) अश्विनी पवार !’ – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

वरील सर्वांच्या मनोगतातून लक्षात येते की, पू. (सौ.) अश्विनी पवार या आदर्श कन्या, आदर्श बहीण, आदर्श पत्नी, आदर्श सून असूनही सर्वच नाती त्या आदर्शवत उत्तम प्रकारे सांभाळत आहेत.’’

 

कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘गुरुमाऊलीने पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला संतरत्न उपलब्ध करून दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आम्हा देवद आश्रमातील सर्व साधकांसाठी मिळालेली ही अमूल्य भेट आहे. अध्यात्माच्या वाटेवरून जातांना ‘आध्यात्मिक आई’चे बोट धरण्याची संधी आम्हाला लाभली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा आम्हा सर्वांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा सर्वच स्तरांवर लाभ करून घेता येऊ दे. त्यांनी वेळोवेळी दिलेले अमूल्य दृष्टीकोन आमच्या अंतर्मनात रुजून आमच्याकडून प्रयत्न होऊ देत, तसेच आम्हा सर्व साधकांमध्ये अंतर्बाह्य पालट होऊ दे’, हीच शरणागतभावाने प्रार्थना !’ – देवद आश्रमातील सर्व साधक