साधकांना सेवा आणि साधना यांमध्ये साहाय्य करणारे प्रेममूर्ती सद्गुरु सत्यवान कदम !

सद्गुरु सत्यवान कदम

१. स्वतःच्या सेवा स्वतः करणे

‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.

२. विश्रांती न घेता नामजप करणे

सद्गुरु दादांना दिवसभरात पुष्कळ वेळ सेवेसाठी बसावे लागते. तरीही ते दुपारी विश्रांती म्हणून न झोपता बसूनच नामजप करतात, तसेच मधे मधे अधिकाधिक वेळ उपाय करण्यास प्राधान्य देतात.

३. सांगितलेला प्रत्येक उपाय स्वतः पूर्ण करणे
आणि सर्व साधकांना ते पूर्ण करण्याची जाणीव करून देणे

सद्गुरु दादा सांगितलेले उपाय न चुकता करतात. त्यांचे पाय कितीही दुखत असले, तरी ते न चुकता सूर्यनमस्कार घालतात. एकदा अंघोळीचे पाणी लवकर तापल्यामुळे त्यांना अंघोळीला लवकर जावे लागले. त्यामुळे त्यांचे सूर्यनमस्कार घालायचे राहिले; पण सद्गुरु दादांनी अंघोळ होताच सूर्यनमस्कार पूर्ण केले. अशा रितीने ते कुठेही असले आणि कितीही गडबड असली, तरी प्रत्येक उपाय पूर्ण करतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक साधकाला सर्व उपाय करण्याची जाणीव करून देतात.

हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर ‘उपाय पूर्ण कसे करायचे ?’, हे गुरुदेवांनी सद्गुरूंच्या माध्यमातून शिकवून ‘आम्ही कुठे न्यून पडतो ?’, याची जाणीव करून दिल्याचे लक्षात आले.

४. कन्नड शिकण्यासाठी प्रयत्न करणे

सद्गुरु दादा दिवसातील थोडा वेळ तरी कन्नड शिकवणार्‍या पुस्तकाचा अभ्यास करतात. आपल्यासह असलेल्या साधकांशी ते कन्नडमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकातील बर्‍याच साधकांना सद्गुरु दादांशी बोलतांना अडचण येत नाही. याचे कारण म्हणजे सद्गुरु दादांना कन्नड भाषा पूर्णपणे समजते. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ‘कुणीतरी भाषांतर केले पाहिजे’, अशी अडचण येत नाही. उत्तर मात्र ते हिंदीतून देतात.

५. सद्गुरु असूनही विचारून विचारून करणे

सद्गुरु असूनही आपल्यासह असलेल्या साधकांना ते ‘हे बरोबर आहे ना ?’, ‘असे करू शकतो का ?’, ‘आपल्याला काही सांगायचे आहे का ?’, असे विचारून विचारून सेवा करतात. यातून आम्हाला सद्गुरु दादा ‘सेवेचे साधनेत रूपांतर कसे करायचे ?’, हे प्रत्यक्ष शिकवतात.

६. सद्गुरु सत्यवानदादांचा आधार वाटणे
आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे कृतीच्या स्तरावर प्रयत्न होणे

आम्ही सद्गुरु दादांशी थेट बोलत नसलो, तरी त्यांच्या अस्तित्वानेच आम्हाला आधार वाटतो. सद्गुरु दादांना काही विचारल्यावर त्यांचे उत्तर अंतर्मनात जाऊन आमच्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न होतात. सद्गुरु दादांशी बोलतांना सर्व समस्या आणि अडचणी यांवर उपाय मिळतो.

७. साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करणे

सद्गुरु दादा स्वतः सद्गुरु असूनही सर्व साधकांना साहाय्य करतात. याची काही उदाहरणे येथे देत आहे.

अ. एकदा सत्संगाची सिद्धता करायची होती. तेव्हा सद्गुरु दादांनी आसंद्या आणून ठेवणे, सतरंजी घालणे इत्यादी केले.

आ. एकदा केंद्रांना ‘सनातन प्रभात’ वितरण करण्याची सेवा चालू होती. त्या वेळी सद्गुरु दादांनी तत्परतेने केंद्रातील साधकांसह बसून त्यांना हिशोब करून देऊन साहाय्य केले.

यातून ‘कोणतीही कृती सद्गुरु दादा कशी करतात आणि आम्ही कुठे न्यून पडतो ?’, ते लक्षात आले.

८. साधकांना साधनेत साहाय्य करणे

सद्गुरु दादा एखाद्या केंद्रात गेल्यावर ‘तिथे साधक कुठे न्यून पडतात ? त्यांच्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत ?’ इत्यादी सर्व लिहून ठेवून जिल्ह्याच्या आढावा सत्संगात सांगतात. काही वेळा साधकांनी लक्षात न घेतलेली आणि लिहून न घेतलेली सूत्रे आठवणीने त्यांना सांगतात. उत्तरदायी साधक जेथे न्यून पडतात, तेथे त्यांना तत्परतेने, वात्सल्याने आणि प्रेमाने जाणीव करून देतात. त्यामुळे साधकांना चुकांची खंत वाटते आणि ‘नेहमी योग्यच केले पाहिजे’, असा उत्साह त्यांच्यात निर्माण होतो.

९. अनुभूती

अ. सद्गुरु सत्यवानदादा आपल्यासमवेत अथवा सेवाकेंद्रात असतांना आपल्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण होते, तसेच आपल्याकडून भावाच्या स्तरावर वेगवेगळ्या प्रार्थना होतात.

आ. सद्गुरु दादांना पहाताक्षणी प्रत्यक्ष ‘परात्पर गुरु डॉक्टरांनाच पहात आहोत’, असे जाणवते. तेव्हा वेगळ्याच भावविश्‍वाचा अनुभव होतो.

इ. गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर गुरुदेवांचे दर्शन होताच आपोआप आनंदाची अनुभूती येते, तशीच अनुभूती सद्गुरु दादा समोर येताच येते.

ई. काही वेळा सत्संग चालू असतांना मी मनात परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्या स्थितीविषयी प्रार्थना करत असे. त्या वेळी अनेक वेळा समोरून सद्गुरु दादा उत्तर द्यायचे. त्या क्षणी परात्पर गुरु डॉक्टरच उत्तर देत असल्याचे मला अनुभवायला मिळत असे.

उ. सद्गुरु सत्यवानदादांच्या समवेत असतांना आपल्या त्रासाचे प्रमाण घटून जडत्व न्यून होत असल्याचे जाणवते.

या सर्व अनुभूतींमधून परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाची कशी काळजी घेतात, हेच प्रत्यक्ष अनुभवता आले.’

– कु. नागमणी आचार, हुब्बळ्ळी, कर्नाटक.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात