पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

गुरुपौर्णिमा मास २०१६

१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.

२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. सदाशिव (भाऊ) परबकाका

 

१ अ. नवीन जप करतांना आरंभी जप विसरायला होऊन सेवेत चुका होणे : दैनिक सनातन प्रभातमध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन जप करायला मी त्याच दिवशी आरंभ केला. मला प्रथम जप करायला नीट जमत नव्हते. मला कधी जपाची पहिली ओळ, तर कधी मधली ओळ आठवायची नाही. माझ्या सेवेत चुका होऊ लागल्या. तेव्हा पू. भाऊकाका माझे दोष सांगून मला प्रक्रियेकडे लक्ष द्यायला सांगायचे.

१ आ. पू. भाऊकाकांनी वैखरीतून जप करायला सांगितल्याने जप अखंड चालू राहून सेवाही चांगली झाल्याने कृतज्ञता वाटणे : पू. भाऊकाका म्हणाले, आज आपण वैखरीतून नवीन जप करूया. जणू काही मला जप जमावा; म्हणूनच पू. काकांनी संकल्प केला, याची प्रचीती आली. माझा जप अखंड चालू झाला. एकीकडे माझी सेवाही चालू होती. सेवा गतीने होत होती. बर्‍याच वेळाने पू. भाऊकाका म्हणाले, आपण जपाकडे लक्ष देत होतो. आता सेवेत काही चुका झाल्या आहेत का ?, ते पाहूया. मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. माझ्याकडून पुष्कळ पिशव्या भरून झाल्या होत्या आणि एकही चूक झाली नव्हती. माझा नामजपही आतून होऊ लागला. तेव्हा मला प.पू. गुरुदेव आणि पू. काकांप्रती कृतज्ञता वाटली.

– श्री. विलास महादेव महाडीक, मुंबई

 

२ अ. सेवेचे प्रत्येक सूत्र देवाला आवडेल असे परिपूर्ण आणि चुकांविरहित कसे होईल, यासाठी जातीने लक्ष देऊन त्याप्रमाणे इतरांकडून करवून घेत असल्यामुळे साधकांना दोषांवर मात करता येऊन सेवेतून आनंद मिळणे : पू. काका सेवा करण्यापूर्वी कृष्णाला शरणागत भावाने प्रार्थना करतात. ते सेवेचे प्रत्येक सूत्र देवाला आवडेल असे परिपूर्ण आणि चुकांविरहित कसे होईल, यासाठी जातीने लक्ष देऊन त्याप्रमाणे इतरांकडून करवून घेतात. त्यामुळे साधकांना सेवा करतांना आनंद मिळतो. ते सेवा समयमर्यादेत पूर्ण होण्यासह सेवा चुकांविरहित करण्याकडे लक्ष देतात. त्यामुळे उतावळेपणा, गडबड करणे, लक्षपूर्वक कृती न करणे या दोषांवर मात करून सेवा करता येत असे.

२ आ. वेळेचे पालन करण्याविषयी सहजतेने जाणीव करून देणे : पू. काका वेळेचे पालन करण्याला महत्त्व देतात. ते साधकांना वेळेचे पालन कसे करायचे ?, ते सांगतात. एकदा मी सेवेला येण्यासंदर्भात जी वेळ सांगितली होती, त्यापेक्षा विलंबाने सेवेला गेले. तेव्हा पू. काकांनी मला त्याची सहजतेने जाणीव करून दिली. मला त्यांनी वैयक्तिक कामे आणि सेवा यांसाठी वेळेचे योग्य नियोजन करून दिले.

२ इ. वेळेचे पालन करण्यात येणार्‍या अडचणींवर उपाय सांगणे : एकदा मला दुपारी सेवेला जायला १० मिनिटे विलंब झाला. माझ्यामुळे संतांना वाट पहावी लागली; म्हणून माझे मन अवस्थ झाले. मी सेवेला आरंभ केल्यावर पू. काकांनी मला कापूर आणि अत्तर लावणे अन् उदबत्तीने आवरण काढणे, हे उपाय किती वेळा करता ?, असे विचारून उपायांत सातत्य ठेवायला सांगितले. त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनाची अस्वस्थता दूर होऊन मला सेवेतून आनंद कधी मिळायला लागला ते समजलेच नाही.

२ ई. पू. भाऊकाकांच्या ठिकाणी मला २ वेळा गुरुदेवांचे दर्शन झाले. मला संतांचा सहवास मिळल्यामुळे मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

-सौ. संगीता संजय धोतमल, सातारा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात