सेवेची तळमळ, निर्मळता, प्रेमभाव, देवाप्रती भाव आदी गुण असलेल्या पुणे येथील सनातनच्या पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी (वय ८० वर्षे) !

पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी

१. सेवेची तळमळ

उतारवयातही पू. आजींमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. एखाद्या इमारतीच्या ४५ पायर्‍या चढूनही अध्यात्मप्रसार करण्याचा त्यांचा उत्साह असतो.

– सौ. अश्‍विनी ब्रह्मे आणि सौ. राधा सोनवणे, पुणे

२. निर्मळता

पू. आजींच्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नसतात. त्यांचे मन निर्मळ आहे. त्यांना नुसते पाहूनच आपले मन निर्मळ होते.

– कु. क्रांती पेटकर, पुणे

३. प्रेमभाव

अ. पू. आजींना पहिल्यांदा भेटल्यावरही त्यांच्यातील आपलेपणा आणि प्रेमभाव यांमुळे त्यांच्याशी पूर्वीपासून ओळख आहे, असे वाटले. – कु. वैभवी भोवर (वय २० वर्षे), पुणे (२४.४.२०१७)

आ. पू. आजी या माझ्या सनातन आई आहेत. त्यांनी मला साधनेत आल्यावर प्रसाद कसा बनवायचा ? हातात जपमाळ कशी धरायची ? भाव कसा ठेवायचा ? अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकवल्या.- सौ. अश्‍विनी ब्रह्मे, पुणे

इ. आम्हाला मराठेआजींचा पुष्कळ आधार वाटतो.

ई. पू. आजी बोलतांना त्यांच्या मुखातून शब्दरूपी फुले अथवा मोतीच बाहेर पडत आहेत, असे जाणवते. – श्री. महेश पाठक, पुणे

४. देवाप्रती भाव

अ. पू. आजी ४ वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी प.पू. गुरुदेवांच्या सत्संगातील सूत्रे लिहिलेली वही जपून ठेवली आहे. त्यांनी त्या वहीतील सूत्रे आम्हा सर्वांना वाचून दाखवली.

आ. पू. आजींनी त्यांच्या घरातील देवघरातील देवतांची मांडणी अतिशय भावपूर्ण केली आहे. ती पहातांना आपली भावजागृती होते आणि आपल्यावर आध्यात्मिक उपाय होतात.

५. सूक्ष्मातील कळणे

पू. आजींना भेटून निघतांना सहसाधिकेने त्यांना माझ्याविषयी या जिल्हासेविका आहेत, असे सांगितले. तेव्हा पू. आजी म्हणाल्या, तुम्ही आधी मला सांगितले नाही; पण हिला (मला) पाहून मला सारखे वाटत होते की, हिचे काहीतरी वेगळे आहे. यातून मला पू. आजींची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अनुभवता आली.

६. पू. आजींमध्ये आध्यात्मिक उन्नतीदर्शक झालेले पालट

अ. पू. आजींचा तोंडवळा (चेहरा) आनंदी आणि प्रसन्न असतो. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपला उत्साह वाढतो.

आ. त्यांची त्वचा एकदम मऊमऊ झाली आहे. तसेच त्यांच्या अंगाला स्पर्श केल्यावर चैतन्य जाणवते.

इ. त्या निरागस बाळाप्रमाणे बोलतात, असे वाटते आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ सहजता जाणवते.

– कु. वैभवी भोवर

७. अनुभूती

पू. आजींना प्रत्यक्षात सत्संगातील सूत्रे नीटपणे ऐकू न येणे; पण सत्संगानंतर त्याविषयी बोलतांना त्यांना सर्व सूत्रे साधनेमुळे अंतर्मनातूनच ज्ञात होत आहेत, असे जाणवणे : पू. आजींना अल्प ऐकू येते. एका सत्संगानंतर मी पू. आजींना विचारले, तुम्हाला सत्संगातील सूत्रे ऐकू आली का ? समजली का ? त्या प्रसंगी त्यांना सत्संगातील सूत्रे प्रत्यक्षात नीटपणे ऐकू आली नव्हती, तरीही त्यांनी मला त्या सत्संगातील सर्व सूत्रे नीटपणे सांगितली. त्या वेळी मला जाणवले, त्यांना साधनेमुळे अंतर्मनातूनच सर्व सूत्रे ज्ञात होत आहेत. – सौ. राधा सोनवणे

 ८. पू. आजींनी साधकांना दिलेला संदेश !

पू. आजी संतपदी विराजमान झाल्यावर सनातनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी साधकांना उद्देशून पू. आजी म्हणाल्या, आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्या समवेत असणार्‍या सर्वांवर पुष्कळ प्रेम करा ! प्रेमभावच वाढवला पाहिजे ! – कु. वैभवी भोवर (२४.४.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात