चुकीची खंत वाटून ती सुधारण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आजी !

१. चूक झाल्यावर पुष्कळ खंत वाटणे
आणि ती लगेच सर्वांना सांगून चुकीसाठी स्वयंसूचना देणे

        ७.७.२०१६ या दिवशी पू. (सौ.) मेनराय आजींकडून प्रसाधनगृहातील गिझरची कळ (बटन) चालू राहिली होती. या चुकीची त्यांना पुष्कळ खंत वाटली. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच खोलीतील सर्वांना सांगितले, माझ्याकडून एक गंभीर चूक झाली आहे. माझ्याकडून गिझरची कळ (बटन) चालू राहिली होती. माझ्यातील विसरणे या दोषामुळे ही चूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी दुपारी विश्रांतीच्या वेळेत कोणाशीही न बोलता सतत मनाला स्वयंसूचना दिल्या.

 

२. चुकीचे प्रायश्‍चित म्हणून दिवसभर खोलीत दिवा न लावता
रहाण्याचे ठरवणे  आणि पुन्हा ती चूक होऊ नये, यासाठी उपाययोजनाही करणे

        चुकीचे प्रायश्‍चित्त म्हणून त्यांनी त्या दिवशी खोलीत असतांना विजेचा दिवा न लावता रहाण्याचे ठरवले. त्या दिवशी त्या अंधारातच जेवत होत्या. खोलीतील अन्य साधकांनी सांगितल्यावर त्यांनी दिवा लावून महाप्रसाद ग्रहण केला. साधिकांनी सांगितले नसते, तर त्यांनी खोलीबाहेरून येणार्‍या थोड्याशा प्रकाशात महाप्रसाद ग्रहण केला असता. त्यानंतर पुन्हा ती चूक होऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली. त्यांनी कळ बंद केली आहे कि नाही, याची निश्‍चिती करण्यासाठी इतरांचे साहाय्य घेतले.

 

३. पू. (सौ.) मेनराय आजींनी पू. गाडगीळकाकांना चुकीविषयी
सांगून मार्गदर्शन करण्यास सांगणे, हे सांगतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी
येणे अन् पू. गाडगीळकाकांनी सांगितलेले प्रयत्न त्वरित करण्यास आरंभ करणे

        रात्री झोपण्यापूर्वी त्या म्हणाल्या, मला आता पू. गाडगीळकाकांना भेटायचे आहे. साधना चांगली होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मी त्यांना पू. गाडगीळकाकांकडे घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी लगेच स्वतःकडून झालेली चूक पू. गाडगीळकाकांना सांगितली. चूक सांगतांना पू. आजींच्या डोळ्यांत पाणी आले होते. पू. आजी पू. गाडगीळकाकांना म्हणाल्या, माझ्याकडून गंभीर चूक झाली आहे. मला मार्गदर्शन करा. आशीर्वाद द्या. मी काय प्रयत्न करू, ते तुम्ही सांगा. मी त्यानुसार करते. त्यावर पू. गाडगीळकाकांनी पू. आजींना सांगितले, स्वयंसूचना द्यायची आणि देवाला प्रार्थना करायची, जे मला आवश्यक आहे, ते माझ्या लक्षात राहू दे आणि तसे ते लक्षात राहून माझ्याकडून प्रयत्न होऊ देत.

 

४. पू. गाडगीळकाकांशी बोलल्यानंतर पू. (सौ.) मेनराय आजींना आनंद होणे
आणि चुकांमधून शिकून वर्तमानात राहिल्यास आनंदी रहाता येत असल्याचे त्यांनी सांगणे

        पू. गाडगीळकाकांशी बोलल्यानंतर पू. (सौ.) मेनराय आजींना पुष्कळ हलके आणि चांगले वाटू लागले. पू. गाडगीळकाकांच्या खोलीतून बाहेर आल्यानंतर त्या आनंदी होत्या. सकाळी मी त्यांना चहा देण्यासाठी खोलीत गेले. तेव्हा मी पू. आजींना विचारले, रात्री झोप लागली का ? त्या वेळी पू. आजी म्हणाल्या, हो, मला शांत झोप लागली. चुकांतून शिकलो, प्रयत्न केले आणि वर्तमानात आलो की, झाले. मग निराशा, जडत्व येत नाही. अती विचारही करायचा नाही आणि सोडूनही द्यायचे नाही. मग आनंदी राहता येते.

 

५. पू. मेनराय आजोबा आणि पू. (सौ.) मेनराय आजी यांचे वैशिष्ट्य

दोघांनी प्रत्येक गोष्ट एकमेकांना आणि दायित्व
असलेल्या साधकांना विचारून करणे अन् त्यातून त्यांच्या विविध गुणांचे दर्शन घडणे

पू. मेनरायआजोबा आणि पू. (सौ.) आजी नेहमी एकमेकांना विचारून प्रत्येक गोष्ट करतात. पू. आजीही दायित्व असलेल्या साधकांना विचारून प्रत्येक गोष्ट करतात. वरील प्रसंगात पू. आजी पू. गाडगीळकाकांशी बोलतांना गुरुधनाची हानी झाल्याविषयीची खंत, गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती, विचारून घेण्याची वृत्ती, तत्परता, इतरांचे साहाय्य घेणे, वर्तमानात रहाणे, हे गुण देवाच्या कृपेने मला अनुभवता आले आणि शिकता आले. त्याविषयी देवाच्या आणि संतांच्या चरणी कृतज्ञ आहे. देवा, असेच प्रयत्न माझ्याकडूनही करून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

– कु. माधवी पोतदार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०१६)

Leave a Comment