खडतर जीवन आनंदाने कंठून देवाशी अनुसंधान साधत संतपद गाठणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे ) !

देवीहसोळ (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्या साधनेला झालेला प्रारंभ, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

 

१. कौटुंबिक पार्श्‍वभूमी

१ अ. गरीब परिस्थितीत जीवन कंठणे

‘श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे) यांची जन्मापासून परिस्थिती गरिबीची होती आणि ८ ते १० माणसांचे मोठे कुटुंब होते. त्यामुळे ते उडदाची भाकरी करून खायचे. ‘घरात पैशाची आवक नव्हती’, असे म्हटले, तरी अतिशयोक्ती होणार नाही.’

१ आ. शिक्षण

वडिलांच्या आतेभावाने त्यांना इयत्ता ४ थीपर्यंत शिक्षण दिले. वडिलांच्या आतेभावाची परिस्थिती बेताची होती आणि त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांचे शिक्षण मोडी भाषेत झाले असून त्यांचे अक्षर फार सुरेख आहे.

१ इ. १४ व्या वर्षापासून शेती करणे

घरी वडिलांची शेती होती. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून शेती करणे चालू केले. ते आजतागायत वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत शेती करत आहेत.

१ ई. वैवाहिक जीवन

वयाच्या साधारण २५ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. तेव्हाही त्यांचे जीवनमान साधारणच होते. व्यवहार करतांना त्यांना १० रुपये मिळाले, तरी आनंद होत असे. त्यांना ५ अपत्ये होती; पण त्यांतील ३ अपत्यांचे अल्पवयात निधन झाले. आता एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि पतवंडे असा त्यांचा परिवार आहे.’

– श्री. विजय लोटलीकर (जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ ई १. वडिलांच्या संस्कारांमुळे एकत्र कुटुंब असूनही सर्व जणांनी गुण्या-गोविंदाने नांदणे

‘आमच्या घरी एकत्र कुटुंब असून सर्व आनंदाने रहात. कोणत्याही गोष्टीची अडचण नव्हती. मे मासाच्या (महिन्याच्या) सुटीत आमचे नातेवाइक आमच्याकडे १५ दिवस ते १ मास येऊन रहात असत आणि आनंदाने जात. आमच्या कुटुंबात कधीच भांडण झाले नाही. आम्ही २ भावंडे आणि माझी ३ चुलत भावंडे एकत्र होतो; पण आमचीसुद्धा कधीच भांडणे झाली नाहीत. हे संस्कार बाबांनीच आमच्यावर केले. त्यांचाच आदर्श आमच्यासमोर होता. माझी मुले श्री. अमेय आणि कु. प्रियांका यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. मुले लहान असतांना मामाकडे जाऊन रहायची. तेव्हा ते त्यांचे फार लाड करायचे.

१ ई २. तुटपुंज्या कमाईतही मुलांना शिक्षण देणे

पूर्वी वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. ते शेती करत आणि मोठे चुलते पोलीस खात्यात होते. त्यांचे वेतन अल्प होते, तरीही त्यांनी माझा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ यांना शिकवले.

१ ई ३. पत्नीच्या मृत्यूनंतर खंबीरपणे आणि स्थिर राहून कुटुंब सांभाळणे

माझी आई फार पूर्वी वारली. तिच्या मृत्यूनंतर ३० वर्षे तात्यांनी सर्व कुटुंब खंबीर आणि स्थिर राहून सांभाळले.

१ उ. गुरांची सेवा करून त्यांना शेवटपर्यंत सांभाळणे

वडिलांना घरात गाई, बैल आणि अन्य गुरे आवडायची. शेती करणे शक्य होते, तोपर्यंत गुरे राखणे, बैलांच्या सुरेख जोड्या घेणे, त्यांची सेवा करणे इत्यादी ते स्वतः करायचे. नंतर त्यांना वयोमानानुसार झेपेनासे झाले. तेव्हा भाऊ आणि भावजयी यांनी त्यांना तशी कामे करण्यापासून थांबवले. तेव्हा त्या गुरांना त्यांनी विकले नाही. ते म्हणायचे, ‘‘त्यांनी आपल्या कुटुंबाला दूध आणि दही देऊन सांभाळले आहे.’’ म्हणून त्यांनी गुरांना शेवटपर्यंत सांभाळले.’

– सौ. संगीता विजय लोटलीकर (मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

२. गावात देवीचे खोत म्हणून कार्य पहाणे

‘वर्ष १९८७ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर भजन, कीर्तनाची आवड असल्याने त्यांचे मन त्यात रमले. त्यांनी गावात देवीचे खोत म्हणून कार्य पाहिले.’ – श्री. विजय लोटलीकर

 

३. नामसाधनेला आरंभ

‘वर्ष १९९७ किंवा १९९८ मध्ये माझे चुलते वारले. तेव्हा त्यांच्या १३ व्या दिवशी माझे यजमान श्री. विजय लोटलीकर यांनी माझ्या माहेरी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रवचन घेतले. ते प्रवचन ऐकल्यानंतर वडील (तात्या) नामजप करायला लागले. आजपर्यंत त्यामध्ये खंड पडला नाही. त्यांना कर्मकांडानुसार साधना करायला आवडत नाही; पण नामजप मात्र ते आवडीने आणि भावपूर्ण करतात.’ – सौ. संगीता विजय लोटलीकर

 

४. नियमित करत असलेली साधना

‘उठतांना बर्‍याच वेळा तात्यांच्या मुखातून नामजप ऐकू येतो. तात्या आंघोळ केल्यानंतर प्रतिदिन नियमित वाचन आणि १ घंटा नामजप करतात, तसेच येता-जाता नामजप करतात. तो बर्‍याच वेळा ऐकायला येतो. तात्या संध्याकाळी दिवे लावल्यावर न चुकता १ घंटा नामजप करतात. अत्तर-कापराचे उपाय ते न विसरता करतात.’ – सौ. स्नेहलता भास्कर वागळे (श्री. जनार्दन वागळे यांची सून), रत्नागिरी

 

५. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

५ अ. स्वावलंबी

‘त्यांनी ९४ व्या वर्षात पर्दापण केले आहे, तरी ते स्वतः स्वावलंबी रहाण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःचे अंथरूण घालून घेतात, पांघरुणांच्या घड्या घालून ठेवतात. आंघोळीचे पाणी स्वतः गरम करून घेतात आणि ‘स्वतःचे कपडे स्वतःला मिळतील’, अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवतात. ते स्वतःची औषधे स्वतःच घेतात, तसेच औषधे घेण्याच्या वेळा चुकवत नाहीत.’ – श्री. विजय लोटलीकर

५ आ. अनावश्यक न बोलणे आणि सतत कार्यरत रहाणे

ते अनावश्यक बोलत नाहीत. ते सकाळी चहा घेतल्यावर २ – ३ कि.मी. फिरून येतात. फिरून आल्यावर अल्पाहार करून वेळ मिळाला, तर माडाच्या झावळीचे झाडू बनवणे किंवा घरात भाजी निवडून देणे, यांसाठी साहाय्य करतात. – श्री. विजय आणि सौ. संगीता विजय लोटलीकर

५ इ. दैवी कृपेने उत्तम आरोग्य लाभणे

‘त्यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म झाले, तरी त्यांना उपनेत्र न लावतासुद्धा चांगले दिसते. त्यांच्या काही दाढा पडल्या; पण दात अजूनही घट्ट आहेत. त्यामुळे ते सर्व चावून खाऊ शकतात. त्यांना ऐकायलाही चांगले येते. ही सर्व दैवी कृपाच आहे. ‘त्यांची सर्व काळजी परात्पर गुरु डॉ. आठवले हेच घेतात’, याची त्यांना सतत जाणीव असते.’ – सौ. संगीता विजय लोटलीकर

५ ई. प्रेमभाव

१. ‘घरातील सर्वांशीच ते प्रेमाने वागतात. घरी कुणीही पाहुणे आल्यावर ते त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागतात.

२. मी दुपारी झोपलेली असेन, तर मला न उठवता स्वतः चहा करून घेतात.

३. माझी मुले (त्यांची नातवंडे) लहान असतांना तात्या त्यांना सांभाळण्यासाठी मला बरेच साहाय्य करायचे.’

– सौ. स्नेहलता भास्कर वागळे

४. ‘त्यांच्यात प्रेमभाव असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी त्यांची जवळीक आहे. घर रस्त्यालगत असल्यामुळे त्यांना ‘लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कुणी ओळखत नाही’, असे नाही. त्यांना जाता-येता ‘तात्या’ या नावाने हाक मारल्याविना कुणीही पुढे जात नाही आणि तेही येणार्‍या-जाणार्‍यांची विचारपूस करतात.

५ उ. लहान मुलांसमवेत खेळणे

ते मोठ्यांशी जसे प्रेमाने वागतात, तसेच लहान मुलांसमवेत लहान होऊन खेळतात. त्यांना लहान मुले आवडतात आणि ती त्यांच्याजवळ खेळायलाही बसतात.’

– श्री. विजय लोटलीकर

५ ऊ. समाजकार्याची आवड असणे

‘पूर्वी त्यांना समाजकार्य करायला आवडायचे. त्यामुळे गावात शाळा बांधतांना आणि मार्ग बनवतांना त्यांनी दगड-माती इत्यादी स्वतः उचलणे इत्यादी प्रकारचे श्रमदान केले, तसेच ते इतरांनाही साहाय्य करायचे.

५ ए. भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करणे

त्यांना भारतीय संस्कृतीनुसार कपडे वापरायला आवडतात. त्यामुळे ते आजही धोतरच नेसतात.’
– सौ. संगीता विजय लोटलीकर

५ ऐ. ‘त्यांनी जीवनातील चढ-उतार पाहिले आहेत. जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी शांतपणे स्वीकारले.

५ ओ. त्यागी वृत्ती

त्यांना आपल्याकडे आहे, ते सर्वांना द्यायला आवडते.’– श्री. विजय लोटलीकर

५ औ. सांगितलेले ऐकणे आणि त्यानुसार कृती करणे

‘आज वयाच्या ९४ व्या वर्षीही त्यांची ऐकण्याची वृत्ती आहे. ‘तात्या, आता अमुक अमुक हा जप श्री गुरूंनी करायला सांगितला आहे’, असे आम्ही त्यांना सांगितले, तर ते लगेच ‘हो’ म्हणतात.

५ अं. निरपेक्षता

त्यांना कुणाकडूनही कसल्याच अपेक्षा नाहीत. त्यांना जे दिले ते खातात.

५ क. ‘कुटुंबातील सर्व जण पूर्णवेळ साधना करतात’, याविषयी आदर असणे

आम्ही कुटुंबातील सर्व जण पूर्णवेळ साधना करतो. याविषयी त्यांना आदर आहे. ‘आम्ही त्यांची सेवा करावी, त्यांना भेटावे’, असा त्यांचा विचार नसतो. उलट ते म्हणतात, ‘‘तुम्ही तुमची सेवा करा.’’ माझीही ते आदराने विचारपूस करतात.’– सौ. संगीता विजय लोटलीकर

५ ख. ‘साधना करतो; म्हणून मी निराळा आहे’, असे त्यांच्या वागण्यातून कधी जाणवत नाहीत.’ – श्री. विजय लोटलीकर

५ ग. कर्तेपणा स्वतःकडे न घेणे

‘श्री. विजय किंवा सौ. संगीता लोटलीकर यांनी ‘तुमचा नामजप होतो का ?’, असे विचारले, तर ते म्हणत, ‘‘गुरूंना ठाऊक असेल किंवा देवाला ठाऊक असेल.’’ ‘कर्तेपणा आपल्याकडे नको’, असे त्यांना वाटते.’ – सौ. स्नेहलता भास्कर वागळे

५ घ. सतत अनुसंधानात असणे

१. ‘ते संसारात असूनही ‘देवाशी एकरूप आहेत’, असे वाटते.’ – श्री. विजय लोटलीकर

२. ‘त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. ते त्यांच्या नामात आणि विचारात रममाण असतात. ते बर्‍याच वेळा मनात त्यांच्याशी एकटेच बोलत असतात.

५ च. भाव

१. ‘गावात दैनिक सनातन प्रभात जात नाही; पण साप्ताहिक सनातन प्रभात जाते. त्यामुळे ते त्यातील प्रत्येक अक्षर वाचतात.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने त्यांचा भाव जागृत होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची त्यांना ओढ नेहमी असते.– सौ. संगीता विजय लोटलीकर

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र नामजपाच्या वेळी समोर ठेवतात. त्यामुळे ‘ते सूक्ष्म रूपात आपल्यासमवेत आहेत’, असे त्यांना वाटते.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना खाऊ पाठवला, तर ते प्रथम डोक्याला लावून नमस्कार करतात आणि ‘तो जास्त काळ टिकावा’, यासाठी थोडा-थोडा ग्रहण करतात.’

५. ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धोतर दिले होते. तात्या ते धोतर जपून वापरतात आणि सर्वांना सांगतात, ‘‘मला हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिले आहे.’’

६. ते कधी गोव्याला आल्यावर स्थूल ईश्‍वरासमोर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर) नतमस्तक होऊन नमस्कार करतात. त्या नमस्काराने त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो. ते आता काही दिवसांपूर्वी कुलदेव मंगेशाच्या दर्शनासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी आश्रमात आल्यावर सांगितले, ‘‘आता कशाला देवळांमध्ये फिरत रहायचे ? देव तर इथेच आहे. देवाला पहाणे, म्हणजे ते रूप डोळ्यांत साठवून ठेवणे.’’

७. साधनेच्या संदर्भात बोलायला लागल्यावर त्याचे वर्णन एवढे करतात की, प्रत्यक्ष ईश्‍वराचे चित्रच डोळ्यांसमोर येते.’ – श्री. विजय लोटलीकर

 

६. श्री. जनार्दन वागळेआजोबा
यांच्याविषयी त्यांच्या पुतण्याला जाणवलेली सूत्रे

१. ‘तात्यांनी साधना केल्यामुळे त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले; म्हणून पुष्कळ आनंद होत आहे. तात्या आम्हाला सांगतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवा.’’

२. त्यांचा प्रेमभाव आणि शांतपणा वाढला आहे.

३. ते नेहमी आनंदी असतात.

४. कोणत्याही परिस्थितीत ते साधना करतात.’

– श्री. बबन वागळे (पुतण्या), रत्नागिरी (१४.२.२०१७)

 

७. साधनेमुळे झालेला पालट

७ अ. राग उणावणे : ‘पूर्वी त्यांचा स्वभाव रागीट होता; पण गेल्या १० वर्षांत ते अगदी शांत झाले आहेत.’ – श्री. विजय आणि सौ. संगीता विजय लोटलीकर अन् सौ. स्नेहलता भास्कर वागळे

७ आ. ‘आता केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटणे, एवढीच त्यांची इच्छा असते.

७ इ. ते निर्विचार स्थितीमध्ये असल्याचे जाणवते.’

– कु. प्रियांका लोटलीकर (नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

७ ई. ‘त्यांचा शांत आणि निर्विचार स्थितीत साधनेचा प्रवास चालू आहे’, असे वाटते.’ – श्री. विजय लोटलीकर

७ उ. तोंडवळा लहान बालकासारखा निरागस दिसणे आणि त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटणे : ‘त्यांचा तोंडवळा लहान बालकासारखा निरागस आहे आणि कांती चैतन्यमय दिसते. त्यामुळे ‘त्यांच्याकडे पहात राहावे’, असे वाटते.

७ ऊ. बर्‍याच वेळा त्यांचे ध्यान लागते. नामही एकाग्रतेने होते.

 

८. आजोबांना आलेली अनुभूती – परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्याशी पहिली भेट झाल्यावर खाली बसता येऊ लागणे

त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना खाली वाकून नमस्कार केला होता; पण त्यानंतर त्यांना उठता येईना. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना उठवले आणि मिठी मारली. त्या वेळचा अनुभव ते आजही जसाच्या तसा सांगतात. त्या आधी त्यांना खाली बसता येत नव्हते. त्यांना जाणवले, ‘त्यांच्या शरीरातून काहीतरी निघून गेले आणि स्थूल देह हलका झाला.’ त्या दिवसापासून त्यांना थोडे-थोडे खाली बसता येऊ लागले.

 

९. आजोबांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

९ अ. त्यांच्याशी बोलल्यावर ‘उपाय होतात’, असे जाणवते.’ – सौ. संगीता विजय लोटलीकर

९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
भेटीच्या वेळची आजोबांची भावावस्था पाहून भावजागृती होणे

११.२.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचे नियोजन नसतांनाही अकस्मात् त्यांची भेट झाली. त्या वेळी आजोबा भावावस्थेत होते.

न उरे आता जीवनात माझ्या। पाहिले लोचन गुरूंचे माझ्या ॥

अशा प्रकारे त्यांची स्थिती होती. त्यांची ही भावावस्था पाहून माझी भावजागृती होत होती.

१०. ‘आजोबा संत झाले आहेत’, असे जाणवते.’ – कु. प्रियांका लोटलीकर (१३.२.२०१७)

‘देवाला पहाणे, म्हणजे ते रूप डोळ्यांत साठवून ठेवणे.’ – श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (१४.२.२०१७)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचा आनंद घेणारे आणि तो स्वतःच्या हृदयात साठवून ठेवून भावावस्थेत रहाणारे जनार्दन वागळेआजोबा !

‘श्री. जनार्दन वागळे हे जेव्हा ईश्‍वराच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भेटीला येतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘त्यांना भेटावे आणि तो आनंद घेऊन पुढच्या भेटीपर्यंत हृदयात टिकवून ठेवावा’, असा भाव असतो. भेट होतांना ‘मी आणि ईश्‍वर निराळा आहे’, हे विसरून ते त्यांच्या चरणांवर डोके ठेवतात आणि त्यांना मिठी मारतात. ईश्‍वराचा चरणस्पर्श, म्हणजे उच्च प्रतीचा आनंद असतो आणि तो झाला की, ते त्याचे वर्णन करून सांगतात. तो स्पर्श ते हृदयात साठवून ठेवतात आणि त्या आनंदावर ते आपले उर्वरित आयुष्य जगतात.

चरणांवर डोके ठेवतांना त्यांना आपल्या वयाचे कसलेच भान रहात नाही. देव भेटला की, ते सर्व विसरतात. त्यांना सांगितले, ‘‘तात्या, असे पायावर डोके ठेवायला नको.’’ तर ते म्हणतात, ‘‘तेथे आल्यावर ते कधी दिसतात आणि मी ती कृती कधी करतो, याचे भान हरपून जाते.’’

– श्री. विजय लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०१७)

 

पू. वागळेआजोबांनी मन अर्पण करून देवाला जिंकून घेतले ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पू. वागळेआजोबा यांचा सन्मान केल्यांनतर सद्गुरु पू. स्वातीताई म्हणाल्या, ‘‘आजकाल समाजात अल्प वयातच अनेकांना विविध व्याधी जडतात; परंतु पू. वागळेआजोबा ९४ वर्षांचे असूनही त्यांचे आरोग्य उत्तम आहे. साधना, शिकण्याची स्थिती आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी नाही. व्यक्तीत स्वभावदोष आणि अहंचे प्रमाण अधिक असले की, तिला केवळ आध्यात्मिकच नाही, तर शारीरिक त्रासही होतात. आपले दोष आणि अहं यांचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो. पू. वागळेआजोबांनी मन अर्पण करून देवाला जिंकून घेतले आहे.’’

 

पू. जनार्दन वागळेआजोबा यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी उपस्थित कुटुंबीय

१५ फेब्रुवारी या दिवशी पू. वागळेआजोबा संतपदी विराजमान झाल्यावर त्यांचा सन्मान सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते झाला. रत्नागिरी येथे पार पडलेल्या या सोहळ्याला साधकांसह पू. वागळेआजोबा यांचा मुलगा श्री. पुरुषोत्तम, स्नुषा सौ. पुष्पलता, कन्या सौ. संगीता लोटलीकर, जावई श्री. विजय लोटलीकर, नात कु. प्रियांका लोटलीकर, नातू श्री. अमेय लोटलीकर, त्यांची मुलगी कु. पूर्ती अमेय लोटलीकर आदी उपस्थित होते.

सन्मानानंतर पू. वागळेआजोबा म्हणाले, ‘‘जी साधना संतांनी सांगितली, त्या व्यतिरिक्त काही सांगायचे नाही. ती केली की, प्रगती होते.’’

 

पू. जनार्दन वागळेआजोबा यांचे आध्यात्मिक कुटुंब

कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. पू. आजोबा यांनी जीवनाचे सार्थक केले ! – सौ. संगीता लोटलीकर

वागळे घराण्यात पूर्वजांचे त्रास खूप आहेत. पू. आजोबा संत झाल्याने त्यांनी ७ पिढ्या मुक्त केल्या. पू. आजोबांना कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते. त्यांनी स्वतःसह कुटुंबातील काही पिढ्यांचे सार्थक केले.

२. पू. आजोबा प्रत्येक प्रसंगात स्थिर असतात ! – श्री. विजय लोटलीकर

पू. वागळेआजोबांनी ७१ व्या वर्षी साधनेला आरंभ केला. ते ठरलेल्या वेळी न चुकता नामजप करतात. प्रत्येक प्रसंगात पू. आजोबा स्थिर असतात. पू. आजोबांच्या पत्नी वारल्यानंतरही ते स्थिर होते. एकदा त्यांनी प.पू. डॉक्टरांना विचारले होते की, माझे आयुष्य संपत आले, आता कसे होणार ? त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘संत तुुकाराम महाराज ज्याप्रमाणे वैकुंठात गेले, तसे देव तुम्हाला नेणार आहे.’’

३. पू. तात्यांच्या रूपाने घरात भक्तीमार्गाला प्रारंभ झाला !– श्री. पुरुषोत्तम वागळे (पू. आजोबा यांचा पुतण्या)

पू. आजोबा प्रारंभीपासून शेती करत. साधना कळल्यापासून लगेचच त्यांनी साधनेला आरंभ केला. त्यांच्या मनाची स्थिती कायम निर्विचार असते. त्यांनी ३ वर्षांत संतपद प्राप्त केले. पू. तात्यांच्या रूपाने घरात भक्तीमार्गाला प्रारंभ झाला.

४. पू. आजोबा प्रत्येक कृती नियोजनपूर्वक करतात ! – सौ. पुष्पलता पुरुषोत्तम वागळे (पू. वागळेआजोबा यांच्या सून)

प्रतिदिन दुपारी आणि संध्याकाळी आमच्या घरातील सर्वजण नामजपाला बसतात. त्या वेळी आमची हालचाल होत असे; पण पू. वागळेआजोबा स्थिर बसलेले असायचे. पू. आजोबा त्यांच्या नियोजनानुसार प्रत्येक कृती करतात.

५. पू. आजोबा विचारून कृती करतात ! – सौ. स्नेहलता वागळे

सेवा करतांना अन्य साधक त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही ते प्रत्येक वेळी विचारून विचारूनच कृती करतात. मी दैनिक वितरणाला जायचे, तेव्हाही त्यांनी कधीच ‘नको’ म्हटले नाही. माझ्या घरात देव असूनही मी त्याची सेवा करू शकले नाही, यासाठी त्यांनी मला क्षमा करावी.

६. श्री. अमेय लोटलीकर (पू. वागळेआजोबा यांचा नातू)

‘पू. आजोबा निरपेक्ष आहेत. प्रत्येकाला ते प्रेमळच वाटतात.’

७. कु. पूर्ती लोटलीकर (पू. वागळेआजोबांची पणती, वय ६ वर्षे)

‘मी पू. आजोबांच्या गावाला गेले की, ते मला नेहमी जवळ घेतात आणि मांडीवर बसवतात. आज ते संत झाल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली.’