व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !

माघ शुक्ल पक्ष दशमी (१८.२.२००५) या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. प.पू. पांडे महाराज ‘हा दिवस वाढदिवस आहे’, असे समजतात. प.पू. पांडे महाराज यांच्या ६.२.२०१७ ला असलेल्या या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र श्री. अमोल पांडे यांनी त्यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहोत.

१. ‘श्री गणेश अध्यात्मदर्शन’ या ग्रंथाची निर्मिती

१ अ. ज्ञानेश्‍वरीचे मनन आणि चिंतन यांतून श्री गणेशाचे दर्शन होणे अन् त्यावर ग्रंथ लिहिणे

‘बाबांनी ज्ञानेश्‍वरीतील पहिली ओवी वाचल्यानंतर त्यावर चिंतन-मनन केले. त्यातून ‘ज्ञानेश्‍वर माऊलींना आपल्याला काय सांगायचे असेल ?’, अशी त्यांना तळमळ लागली. या तळमळीमुळे बाबांना श्री गणेशाचे दर्शन घडले. त्यांनी ते चित्राद्वारे मांडले. यांत भाषेतील सर्व वर्ण आणि अक्षरे आहेत. बाबांच्या संपर्कात जी व्यक्ती येत असे, तिला ते त्याचा अर्थ समजावून सांगत असत.

१ आ. ग्रंथ लवकर छापून व्हावा, या तळमळीमुळे डीटीपी आणि मुद्रितशोधन शिकणे

बाबा ग्रंथ लिहित असतांना ‘ग्रंथाचा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक लोकांना कसा होईल ?’, या दृष्टीने ते विचार करत असत. त्यांना ‘ग्रंथ लवकरात लवकर छापून व्हावा’, ही तळमळ होती. त्यासाठी त्यांनी डीटीपी आणि मुद्रितशोधन करणार्‍या योग्य व्यक्ती शोधल्या. बाबा त्यांच्याकडून डीटीपी आणि मुद्रितशोधन करण्यास शिकले आणि ग्रंथ पूर्णत्वास नेला.

२. वसाहतीत स्वच्छता अभियान चालू करणे

अ. वर्ष १९८७ ते १९९१ मध्ये माझे शिक्षण चालू असतांना ज्या वसाहतीत आम्ही रहात होतो, तेथील मैदानात आणि घरांच्या दुतर्फा पुष्कळ गवत अन् झाडे-झुडपे वाढली होती. बाबांनी तेथील रहिवाशांना एकत्र आणले आणि स्वच्छता अभियान चालू केले. प्रथम हे करण्यास कुणी आले नाही. तेव्हा बाबा एकटेच गवत काढू लागले. लोकांनी हे पाहिल्यावर हळूहळू लोक एकत्र आले आणि सर्व परिसर स्वच्छ झाला. मुलांना खेळायला मैदान मिळाले.

आ. आम्ही अकोला येथे रहात असतांना एकदा वसाहतीतील मागच्या बाजूची गटारे तुंबली होती. बाबा ती स्वतः स्वच्छ करत असत.

३. वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे

बाबांनी वसाहतीत श्री शारदादेवी स्थापना, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम चालू केले. बाबा त्या कार्यक्रमांत लोकांना साधनेचे आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगत. बाबांनी स्वाध्याय चालू केला. ते दिवाळीत आणि इतरांच्या वाढदिवसाला शुभेच्छापत्र देण्याऐवजी पत्राद्वारे आध्यात्मिक विचार देत असत.

४. ज्येष्ठ नागरिकांना साधना सांगणे

आम्ही खारेगाव येथे वास्तव्यास असतांना बाबा एका तळ्याच्या ठिकाणी प्रतिदिन फिरायला जात असत. तेथे ज्येष्ठ नागरिक येत असत. बाबा त्यांच्यासमवेत बसायचे. ते ज्येष्ठ नागरिक घरगुती अडचणींविषयी बोलत असत; पण बाबांना त्यात रस नव्हता. बाबांनी त्यांना साधना करण्याचे महत्त्व सांगितले. नंतर ते एकत्रित प्रार्थना करू लागले. बाबा प्रतिदिन त्यांना आध्यात्मिक विचार सांगत. ते बाबांना पुष्कळ मान देत असत. ते बाबांना प्रेमाने ‘गुरुजी’ असे संबोधत.’

– श्री. अमोल पांडे (प.पू. पांडे महाराज यांचे पुत्र), ऐरोली, नवी मुंबई. (२१.१.२०१७)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती प.पू. पांडे महाराजांचा भाव

१७.१.२०१७ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये शालीवरील रक्ताच्या डागांच्या माध्यमातून प.पू. पांडे महाराज यांच्यावर झालेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणाच्या संदर्भात भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांनी सांगितलेले उपाय प्रसिद्ध झाले आहेत. १८.१.२०१७ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘महर्षि भृगु यांनी प.पू. पांडे महाराज यांच्याविषयी ‘प.पू. पांडे महाराज यांच्या सनातनवर असलेल्या प्रीतीमुळे ते आश्रमासाठी निरपेक्षपणे सेवा करतात’, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हे वाचून प.पू. पांडे महाराज यांनी अतिशय विनम्रतेने महर्षि भृगु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे पुढे देत आहोत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले हेच संकर्षण तत्त्व,
नारायण तत्त्व, महर्षि भृगु आणि सप्तर्षि, असे सर्वकाही आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यावर कृपा करून प्रथम भेटीतच मला सांगितले, ‘‘मी तुमच्यासमवेत सतत आहे.’’ मी देवद आश्रमात आल्यापासून त्यांनी मला आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांचा त्रास कमी होण्यासाठी नामजप करायला सांगितले होते. ‘प्रत्यक्षात तेच सर्वकाही करत आहेत’, असे मला दिसून येत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘मी तेथे नाही का ?’’

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून
भृगु महर्षि, सप्तर्षि आणि सर्व साधू-संत माझ्यावर प्रीती करत आहेत !

महर्षि भृगु, सप्तर्षि, सर्व साधू-संत यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून माझ्यावर प्रीती आहे. त्याचद्वारे हे सर्व कार्य चालू आहे. यात माझे काही नाही. जे आहे, ते सर्व भगवंताचे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आहे. मी महर्षि भृगु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment