ज्ञानेश्‍वरमाऊलींचे पसायदान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महान कार्य यांतील साम्य दर्शवणारी सूत्रे !

sant_dnyaneshwarPpdr_hasatana_side_2012एके दिवशी मी ध्यानमंदिरात जप करत बसलो होतो. कानांवर विश्‍वदर्शन देवतेचा जप पडत होता. इतक्यात माझ्या मनःपटलावर आतां विश्‍वात्मकें देवें …। या पसायदानातील पहिल्या काही ओळी तरळून गेल्या. त्याच वेळी सप्तर्षींनी प.पू. डॉक्टरांविषयी सांगितलेल्या ओळी आठवल्या आणि प.पू. डॉक्टर हे विश्‍वात्मक देव असल्याचे अंतर्मनातून येऊ लागले. सर्व विचारांना एकत्रित करून ते लिहून काढले. तेव्हा लक्षात आले की, ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्‍वरांनी पसायदानात विश्‍वात्मक देवाकडे जे मागणे मागितले, ते आणि प.पू. डॉक्टर करत असलेले महान कार्य यांत पुष्कळ साम्य आहे. माझ्या अल्पमतीला जे आकलन झाले, जे श्रीकृष्ण मला सांगत आहेत, असे वाटले, ते आपल्या पुढे सादर करत आहे.

आतां विश्‍वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९४

अर्थ : आता विश्‍वरूप झालेल्या भगवंताने या वाणीरूपी यज्ञाने संतुष्ट होऊन मला हे प्रसादरूपी दान द्यावे.

प.पू. डॉक्टर हेच विश्‍वात्मक देव असणे

vilas_mahadik
श्री. विलास महाडिक

आम्हा साधकांच्या पूर्वसुकृतामुळे आम्हाला परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले गुरु म्हणून लाभले आहेत. तेच विश्‍वात्मक देव आहेत, हे त्यांनी चालू केलेल्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यावरून आमच्या लक्षात आले. तेच आम्हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाणार आहेत, हे प.पू. गुरुदेवांच्या अमृत महोत्सव वर्षारंभ वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशी नाडीवाचन करण्यात आले, त्या वेळी पुनःश्‍च निश्‍चित झाले. त्या वेळी महर्षींनीही सांगितले की, ते विश्‍वात्मक देव आहेत.

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९५

अर्थ : दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा व्हावा आणि त्यांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी अन् प्राण्यांचे एकमेकांशी जिवाभावाच्या मित्रत्वाचे संबंध जडावेत.

मायेत अडकलेल्या जिवांना योग्य मार्गावर
आणण्यासाठी गुरुकृपायोग हा विहंगम मार्ग दाखवणे

खळ म्हणजे मायेत अडकलेल्या जिवांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी गुरुकृपायोग हा विहंगम मार्ग दाखवला. रज-तम टाकून सत्कर्माकडे वळवले. समाजातील अनेकांना (खळांना) शाश्‍वत सुखाचा मार्ग सांगून त्यांची सत्कर्माकडे जाण्याची रती (आवड) वाढवली. वाल्याचा वाल्मीकि बनवण्याचे हे कार्य प.पू. डॉक्टरांसारखे समर्थच करू शकतात, हे आतापर्यंतच्या साधनेच्या प्रवासात प्रत्येकच साधकाने अनुभवले असेल.

प.पू. डॉक्टरांनी निरपेक्ष प्रेम करायला शिकवले असून
हे प्रेमाचे दान सनातनच्या प्रत्येक आश्रमात भरभरून दिले जात आहे !

प.पू. गुरुदेव म्हणजे करुणेचा सागर आहेत. त्यांनी आम्हाला निरपेक्ष प्रेम करायला शिकवले आहे. चराचरातील देव पहायला शिकवले आहे. भूतां परस्परे जडो । मैत्र जिवाचे ॥ हे प्रेमाचे दान सनातनच्या प्रत्येक आश्रमात भरभरून दिले जात आहे. आज आश्रमात अनेक जाती-धर्माचे, लहानापासून वयोवृद्धांपर्यंत, उच्चशिक्षित, तर काही न शिकलेले, श्रीमंत तर काही अत्यंत गरीब असे साधक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, हे पहाण्यासारखे आहे.

दुरितांचें तिमिर जावो । विश्‍व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९६

अर्थ : पापरूपी अंधकार नाहीसा व्हावा आणि जगात स्वधर्मरूप सूर्याचा उदय व्हावा अन् जो जो प्राणी जी जी इच्छा करील, ती ती त्याची परिपूर्ण व्हावी.

अ. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रभावी चळवळ चालू
असून प.पू. डॉक्टर राष्ट्राला अमूल्य मार्गदर्शन करत आहेत !

दुरित म्हणजे भरकटलेल्या आणि वाम मार्गाने चालणार्‍यांचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी प.पू. डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. अनेक ठिकाणी विविध सत्संग, धर्मजागृती सभा, अधिवेशने यांच्या माध्यमातून जागृती होत आहे. त्याचप्रमाणे साधकांचे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यासाठी त्यांनी पुष्कळ परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक कार्याचे कर्तेपण ते ईश्‍वराला देत आहेत आणि त्यामुळेच आज ईश्‍वर त्यांच्या पाठीशी आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रभावी चळवळ चालू झाली आहे.

आ. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।, अशा प्रकारे कार्य करून प.पू. डॉक्टरांचे साधक हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने सफल होत आहेत.

इ. विश्‍वात स्वधर्म, म्हणजे सनातन धर्माचा प्रसार होत असणे

विश्‍वात स्वधर्म म्हणजे हिंदु धर्म, म्हणजेच सनातन धर्माचा प्रसार होत आहे. ज्या धर्माचे ब्रीद वसुधैव कुटुंबकम् । हेच असणार आणि त्यामुळे केवळ हिंदूंनाच नाही, तर सर्वच्या सर्व जीव, प्राणीमात्र यांना त्याचा लाभ होईल, म्हणजेच जो जे वांछील, तो ते लाहो ।, याची प्रचीती येईल.

वर्षत सकळमंगळीं । ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेट तयां भूतां ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९७

अर्थ : ईश्‍वरनिष्ठ लोकांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर सदोदित सर्व प्राण्यांना भेटावा.

सनातनचे आणि देश-विदेशातील अनेक संत, म्हणजेच
ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी अवतरली आहे

प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे आज १०४  साधक संत झाले आहेत, तर ९२७ साधकांची संतत्वाकडे वाटचाल चालू आहे. याशिवाय देश-विदेशातील अन्य संतांना प.पू. गुरुदेवांनी सनातनशी जोडून घेतले आहे. ही संतमंडळी म्हणजेच ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी अवतरली आहेत. ते सनातन धर्माची स्थापना करतीलच, यात शंका नाही आणि त्यांच्या रूपानेच विश्‍वदेव भूतलावरील जिवांना भेटणार आहेत.

चलां कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गांव । बोलते जे अर्णव । पीयुषाचे ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९८

अर्थ : चालते बोलते कोट्यवधी कल्पतरूंचे वृक्षच, सजीव चिंतामणीचे गावच (सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या सजीव रत्नाचे उत्पत्तीस्थान), अमृताचे बोलणारे समुद्रच.

या संतांचा सर्व जिवांना आधार वाटून हे संत कुणाला
चालते-बोलते कल्पतरू, तर कुणाला अमृताचा सागर वाटतील

ही भूतलावर अवतरलेली संतमंडळी केवळ व्यष्टी संतपद भूषवणारी नाही, तर समष्टी संतत्वाकडे वाटचाल करणारी आहेत. त्यामुळे सर्व जिवांना त्यांचा आधार वाटेल. हे संत कुणाला चालते-बोलते कल्पतरू, तर कुणाला अमृताचा सागर वाटतील. कुणाला मोक्ष प्रदान करणारा करुणेचा सागर वाटतील.

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १७९९

अर्थ : जे कलंकरहित चंद्र, जे तापरहित सूर्य, असे जे संतसज्जन ते सर्वांचे सदासर्वकाळ आप्त होवोत.

प.पू. गुरुदेवांनी जमवलेली ही संतमंडळी स्वभावदोष आणि
अहं निर्मूलनाद्वारे कोणतेही दोष नसलेले सत्शील आणि शीतलता, शांती देणारे असे चंद्र असणे

प.पू. गुरुदेवांनी जमवलेली ही संतमंडळी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाद्वारे कोणतेही दोष नसलेले सत्शील आणि शीतलता, शांती देणारे असे चंद्र असतील. ते मार्तंड जे तापहीन, म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी, ज्ञानी; पण सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि भूतमात्रांचे सोयरे (साहाय्य करणारे) असतील.

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १८००

अर्थ : फार काय सांगायचे ! स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांत रहाणारे सर्व प्राणीमात्र सर्वसुखाने परिपूर्ण होऊन आदिपुरुषाच्या भजनी निरंतर रहावेत.

माऊलीने लिहिलेल्या या ओळी हुबेहूब
प.पू. डॉक्टरांसाठीच असून तेच मोक्षगुरु, ज्ञानगुरु, राष्ट्रगुरु आणि जगद्गुरु असणे

माऊलीने लिहिलेल्या या ओळी हुबेहूब प.पू. डॉक्टरांसाठीच आहेत, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्‍वरप्राप्ती करवून देणारे मोक्षगुरु, विपुल ग्रंथांद्वारे ज्ञान देणारे ज्ञानगुरु आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र पाहिजे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु, तर जगभरातील मानवाला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहेत. पूर्णत्वाला पोचलेले, कशाचेही यत्किंचित कर्तेपण स्वतःकडे न घेणारे आणि अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेले एकमेव गुरु आहेत.

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १८०१

अर्थ : या श्‍लोकात विशेषकरून हा ग्रंथ ज्यांचा जीवनसर्वस्व होऊन राहिला असेल, त्यांना या लोकांतील आणि परलोकांतील भोगावर विजय प्राप्त होवो.

अ. साधकांना केवळ भारवाहू न बनवता ग्रंथोपजीवी बनवणारी गुरुमाऊली !

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।, म्हणजे या पृथ्वीतलावर ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही. सनातनच्या साधकांना आणि अंधकारात चाचपडणार्‍या ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय उराशी बाळगणार्‍या अनेक जिवांना मार्गदर्शन करण्यासाठी धडपडणार्‍या गुरुमाऊलीने अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे. साधकांना केवळ भारवाहू न बनवता ग्रंथोपजीवी बनवले आहे. पांडित्य नको. कृती पाहिजे, असे शिकवले आहे. काही साधक गुरुदेवांच्या कृपेने ज्ञान ग्रहण करत असून त्यांचाही या ग्रंथनिर्मितीत सहभाग आहे.

आ. प.पू. गुरुदेवांनी निर्मिलेली अद्वितीय ग्रंथसंपदा !

प.पू. गुरुदेवांनी मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहे. ४ सहस्र ग्रंथ प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.

इ. संत आणि अनमोल साधकरत्ने यांच्या साहाय्याने
गुरुदेव सनातन धर्माची स्थापना करण्यात यशस्वी होणारच असणे

या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सतत समष्टीचा विचार करून देवाला अपेक्षित असे आश्रम आणि साधक घडवण्यासाठी धडपडणारे संत आहेत. कुटुंबियांचा प्रखर विरोध पत्करून मोक्षपथ अनुसरणारी आणि संघर्षरूपी अग्नीदिव्यातून पार पडल्याने झळाळून गेलेली अनमोल साधकरत्ने आहेत. या सर्वांच्या साहाय्याने गुरुदेव सनातन धर्माची स्थापना करण्यात यशस्वी होणारच आहेत. महर्षींनीही हेच सांगितलेे आहे. आतापर्यंत गुरुदेवांनी जे कार्य हातात घेतले आहे, त्यात त्यांना विजय मिळालाच आहे. गुरुदेवांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे.

येथ म्हणे श्रीविश्‍वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १८०२

अर्थ : विश्‍वाचे प्रभुराव श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, हा दानप्रसाद मिळेल या वराने ज्ञानदेव आनंदित झाले.

सप्तर्षींनीसुद्धा प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने निर्माण होणार्‍या हिंदु राष्ट्राविषयी ग्वाही दिली असणे

संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वदेवाला मागितलेले दान प्रत्यक्ष कृतीत आल्याचे त्यांना आधीच ज्ञात झाल्याने ते समाधानी झाले. सप्तर्षींनीसुद्धा प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने निर्माण होणार्‍या हिंदु राष्ट्राविषयी (सनातन धर्म राज्याविषयी) ग्वाही दिली आहे, म्हणजेच ते जे कार्य करत आहेत, त्यामुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे, याची निश्‍चिती होते. त्यामुळे सर्वांना आनंद मिळणार आहे, यात शंकाच नाही.

 

प्रार्थना आणि कृतज्ञता !

मी ज्ञानेश्‍वरमाऊली आणि प.पू. गुरुदेव यांची अपराधीभावाने क्षमा प्रार्थितो. माझी योग्यता नसतांनाही मी पसायदान आणि केवळ नेति नेति शब्द न ये अनुमाना.. । प्रमाणे शब्दांमध्येच ज्यांची थोरवी सांगता येणार नाही, अशा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कार्याचा आवाका माझ्यासारख्या अल्पमतीकडून लिहिला जाणे अशक्यच आहे.

ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा । नदी डोंगी परी, नीर नोहे डोंगे । चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा । अशा भावाने हे लिखाण झाले, तेही केवळ आपल्या कृपेमुळेच ! प.पू. डॉक्टर, आपण आमचे गुरुदेव आहात. येथे मला काहीच शब्द स्फुरत नाहीत. बालकाचे बोबडे बोल मातेसाठी जसे असतात, तशा या भावभावना आपल्या चरणी समर्पित करत आहे. कोटी कोटी कृतज्ञता !

– श्री. विलास महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात