मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी सनातनचा दृष्टीकोन

sanatan-drushtikon (1)

१. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाज एकत्रित येऊन भव्य मोर्चे काढत आहे. मराठा समाज हिंदु समाजाचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे या माध्यमातून हिंदु समाजाचेच एक प्रकारे संघटन होत आहे, अशी सनातनची एकप्रकारे धारणा आहे.

२. या भव्य मोर्च्यामध्ये जी पहिली मागणी केली जात आहे, ती म्हणजे अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रहित व्हावा. या मागणीचे सनातन पूर्णतः समर्थन करते; कारण अन्याय किंवा अत्याचार कधी जात किंवा समूह पाहून केला जात नाही, तर तो कुठल्याही समुदायावर कधीही होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा केवळ एका समाजासाठी नको, तर सर्व समाजासाठी असावा; कारण ते घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला धरून आहे. एखाद्या समाजासाठी अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा करणे, ही असमानता असून त्यामुळे त्याचा अनुचित लाभ घेतला जाऊ शकतो, असे सनातनचे मत आहे.

३. या भव्य मोर्च्यामध्ये केली जाणारी दुसरी मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आहे. सनातनने आरक्षण धोरणाला नेहमीच विरोध केला आहे; कारण गुणवत्ता डावलून लिंग आणि जात यांच्या आधारे दिले जाणारे आरक्षण देशाला कधीही प्रगतीपथावर नेऊ शकत नाही. ज्या मराठ्यांनी कर्तृत्वाच्या बळावर अटकेपार झेंडे फडकवले आणि देहलीच्या सत्ताधीश बादशहांना हातचे बाहुले बनवले, त्या मराठ्यांनी आरक्षणाच्या कुबड्या घेणे योग्य नव्हे, हीच सनातनची भूमिका आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात