देवतांच्या विडंबनाविरुद्ध सनातन चळवळी (मोहिमा) राबवत असतांना सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे का ?

सनातन संस्था व्यावसायिक उत्पादनांच्या, तसेच त्यांच्या विज्ञापनांच्या माध्यमातून देवतांचे विडंबन होऊ नये, यासाठी विविध चळवळी राबवते. विविध उत्पादनांवर देवतांची चित्रे छापल्यावर कालांतराने ती पायदळी तुडवली जाण्याची आणि इतस्ततः पडण्याची शक्यता असल्याने तसे न करण्याविषयी समाजप्रबोधनही करते. या पार्श्‍वभूमीवर सनातनची नियतकालिके, उत्पादने, ग्रंथ अन् प्रसारसाहित्य यांवर देवतांची चित्रे किंवा गुरुकृपायोगाचे (गुरु-शिष्याचे) बोधचिन्ह का ?, असा प्रश्‍न एखाद्याला पडू शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

१. अध्यात्मात कृतीपेक्षा तिच्यामागील उद्देशाला अधिक महत्त्व आहे. कुठलीही प्रकाशने आणि उत्पादने काढण्यामागे सनातनचा व्यावसायिक हेतू नसून अध्यात्मप्रसार करून समाजाची सात्त्विकता वाढवणे, हा आहे. सनातन-निर्मित देवतांची चित्रे बाजारात मिळणार्‍या देवतांच्या चित्रांपेक्षा अधिक सात्त्विक असल्याने हा हेतू साध्य होत आहे. अध्यात्मातील जाणकार आणि साधक यांना त्यासंबंधी अनुभूतीही आल्या आहेत.

२. सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे छापतांनाच त्यांची हाताळणी कशी करावी, उत्पादनांचा उपयोग झाल्यानंतर त्यांचा विनियोग कसा करावा आदी गोष्टींसंबधी सूचना त्या-त्या उत्पादनांवर शक्यतो प्रसिद्ध केली जाते. सनातनचे वाचक, हितचिंतक आणि साधक त्या सूचनांचे पालन करून इतरांना तसे करण्यास उद्युक्तही करतात.

संदर्भ :  दैनिक ‘सनातन प्रभात’