सोपे आयुर्वेदीय उपचार

१. ताप

पुढील काढा ताप येणार्‍या साधकांनी ७ दिवस दिवसातून ३ वेळा (सकाळी ६ ते १०, दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) प्रत्येकी १०० मि.लि. (१ वाटी) प्रमाणात घ्यावा. २५ जणांसाठी दिवसभरात लागणार्‍या काढ्यातील औषधांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

१ किलो आले, पावणे दोन किलो कडूनिंबाची पाने आणि १५० ग्रॅम काळी मिरी हे सर्व ठेचून १५ लिटर पाण्यामध्ये घालावेत. हे मिश्रण अर्धे (७.५ लिटर) होईपर्यंत उकळावे. काढा गरम असतांनाच घ्यावा. काढा घेतांना यात प्रत्येकाने १ चमचा मध घालून घ्यावा.

(काढा बनवून चहाच्या किटलीत ओतावा. साधकांनी प्रत्येकी पाऊण चहाचा पेला काढा घ्यावा. साधकसंख्येनुसार काढ्यातील औषधांचे प्रमाण न्यून-अधिक करावे.)

२. बद्धकोष्ठता
(शौचाला न होणे किंवा मलाचे खडे होणे)

एका ताटलीत २ चमचे एरंडतेल घ्यावे. एका अख्ख्या सोललेल्या केळ्याला सर्व बाजूंनी हे तेल लावून ते केळे खावे. दिवसातून २ वेळा (सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) एरंडाच्या तेलात एकेक केळे बुडवून खावे आणि यावर कपभर गरम पाणी प्यावे. असे ३ दिवस करावे.
– सिद्धाचार्य पुण्यमूर्ति, तंजावूर, तमिळनाडू. (२४.६.२०१६)

 

३. उष्ण काळात उष्ण गुणधर्माची औषधे काळजीपूर्वक वापरावीत !

‘बहुतेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा कफाच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठी सांगितली जाणारी घरगुती औषधे उष्ण गुणधर्माची असतात, उदा. कोमट किंवा गरम पाणी, सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग, दालचिनी, लसूण, तुळस, गोमूत्र. सध्या वातावरणात उष्णता वाढलेली असल्याने सर्वांनी सरसकट अशी औषधे वापरणे योग्य ठरणार नाही. उष्ण काळात अशी औषधे घेतल्याने काहींना तोंड येणे, वारंवार तहान लागणे, लघवीच्या मार्गाची जळजळ होणे, अंगाची आग होणे, अंगावर पुरळ येणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण औषधे वापरायचीच झाली, तर ती सूर्याचा ताप नसतांना, म्हणजे सकाळी लवकर किंवा रात्रीच्या जेवणानंतर वापरावीत. उष्ण गुणधर्माच्या घरगुती औषधांचा वापर करतांना वर दिलेले दुष्परिणाम दिसू लागल्यास ती बंद करून अन्य पर्याय वापरावेत किंवा वैद्यांचा सल्ला घ्यावा.

 

४. औषधांच्या वापरापेक्षा मूलभूत पथ्ये पाळणे महत्त्वाचे !

‘रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, मल-मूत्रांचे वेग रोखून न धरणे, नियमित व्यायाम करणे, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेवणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि रुग्णाईत (आजारी) असतांना दूध आणि दुधाचे पदार्थ टाळणे’ ही आयुर्वेदातील मूलभूत पथ्ये आहेत. ही आचरणात आणल्याने रोगप्रतिकारक क्षमता आपोआप वाढते. ही पथ्ये सर्वांना समान आहेत. स्वतःच्या मनाने प्रकृती, प्रदेश, ऋतू आदींचा विचार न करता आयुर्वेदीय औषधे घेण्यापेक्षा अशी निर्धोक मूलभूत पथ्ये पाळणे कधीही चांगले. या मूलभूत पथ्यांविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात केले आहे.’

(काही दिवसांपूर्वी प.पू. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार प.पू. दास महाराज यांनी तुळस आणि गोमूत्र यांचा उपाय सांगितला होता. ही औषधे उष्ण असली, तरी हा उपाय सकाळी लवकर करता येऊ शकतो.)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात