श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी म्हणजे गोपी आणि त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा !

radha_krushna-scr

रासक्रीडा, हिलाच राधाच कृष्ण आणि कृष्णच राधा असे म्हणतात. श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी याच गोपी होत; परंतु त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा होय. म्हणून अखंडसंयोगोप्य वियोग पालनं नाम भक्तिः, अशी शांडील्य ऋषींनी भक्तीची व्याख्या केली आहे. उत्कंठा म्हणजे विरह आणि प्राप्ती म्हणजे मीलन, म्हणजेच तृप्ती. प्रेमात या दोन्ही भावांचे एकसमयाविच्छेदेकरून अस्तित्व असते. म्हणजे तृप्ती उत्कंठेला वाढवते आणि उत्कंठा तृप्तीचा आनंद वाढवत असते. हेच राधा-कृष्णाचे स्वरूप होय. ही लीला अनादीकाळापासून अनवरत अखंड चालू आहे; परंतु कोणी कोणाला ओळखले नाही. अद्वैत असल्यामुळे हा साक्षात् अपरोक्ष रस आहे. अनुभूती परोक्षात येते. मग तिची स्मृती होते. त्याला प्राप्ती म्हणत नाहीत. परमभाग्यवंतांनाच रासलीला पहाण्याचे आणि खेळण्याचे सौभाग्य लाभले. गोपींचे माझ्यावरील प्रेम आणि माझे गोपींवरील प्रेम हेे आम्हा दोघांनाच माहिती आहे, इतरांना ते अतर्क्य आहे, असे भगवंताने उद्धवाला सांगितले. तेव्हा आपण गोपीसम झाल्यावरच आपल्याला रासलीला कळेल.

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

द्वापरयुगातील गोपी

आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी

गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय.
तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।

– नारदभक्तिसूत्र, अध्याय १, सूत्र १९

1341114543_P-Pu-Kane-Maharaj - bk150
प.पू. काणे महाराज

अर्थ : दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्‍वरार्पित बुद्धीने, म्हणजे त्याच्यासाठीच, त्याच्या प्राप्तीसाठीच करतो, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणार्‍या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था अशीच असते. भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती यथा व्रजगोपिकानाम् । (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी. व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती अव्यभिचारिणी होती. कृष्णाच्या स्मरणात त्या तल्लीन असत; किंबहुना देशकालच नव्हे, तर स्वतःचे देहभानही त्या विसरून जात असत. आदर्श भक्ती म्हणजे गोपींच्या भक्तीसारखी एवढीच उपमा दिली जाते. एवढेच म्हटले जाते; कारण भक्तीचे वर्णन होऊ शकत नाही. ती शब्दांकित होऊ शकत नाही; कारण ती अर्थांकित आहे; म्हणून भक्ती कशी असावी, तर गोपींसारखी, हे त्याचे उत्तर असते. प्रत्यक्ष गोपींना विचारले, तरी त्या एखाद्या भक्ताचे नाव सांगून त्याच्यासारखी एवढेच सांगणार; कारण भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाचे वर्णन होऊ शकत नाही; म्हणूनच तिला अनिर्वचनीय असे म्हणतात. भक्ती म्हणजेच आपला आत्मा !

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.