लहानपणी भातुकलीच्या खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे आठवणे आणि आता गुरूंची तीच सेवा मिळाल्याने अपार कृतज्ञता वाटणे

प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी थोडासा स्वयंपाक
बनवणार्‍या गोपी दीपालीला ‘भातुकलीचा खेळ खेळल्यासारखे
वाटत असेल ना ?’, असे म्हटल्यावर तिला लहानपणी भातुकलीच्या
खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे
आठवणे आणि आता गुरूंची तीच सेवा मिळाल्याने अपार कृतज्ञता वाटणे

gopi_bhav_3-scr

१. भातुकलीचा खेळ खेळतांना ‘देवाला केलेला नैवेद्य त्याने
खरोखर खावा’, असे वाटणे आणि आजीने ‘तो अन्नाचा सुगंध
घेतो’, असे सांगितल्यावर ‘त्याने अन्न प्रत्यक्ष ग्रहण करायला हवे’, असे न वाटणे

७.७.२०१२ या दिवशी मी प.पू. डॉक्टरांसाठी अर्धी वाटी शिरा बनवून नेला. प.पू. डॉक्टर म्हणाले, “तुला हे बनवतांना भातुकलीचा खेळ खेळल्यासारखे वाटत असेल ना ?” मी म्हणाले, “होय, प.पू. डॉक्टर !” मी (मनात) म्हटले, लहान असतांना मी खोटी खोटी भांडी घ्यायचे. खोटा खोटा स्वयंपाक करायचे. दगडाचा देव करून त्याची पूजा करायचे आणि त्या देवालाच भरवायचे. तेव्हा कधी कधी मातीची चूल करायचे. ती दिवसभर सुकवायचे. दुसर्‍या दिवशी ती पेटवून तिच्यावर मातीचा गडू ठेवून डाळ-तांदूळ घालून शिजवायचे. नंतर त्यात मीठ घालायचे आणि ते दगडाच्या देवाला भरवायचे. तेव्हा वाटायचे, ‘देवाला केलेला तो नैवेद्य त्याने खरोखर खावा’. भक्ताच्या हाकेला देव धावून येतो. भक्ताने केलेला नैवेद्य तो ग्रहण करतो, असे ऐकले होते; पण देव तो खायचा नाही. तेव्हा वाटायचे, आपण लपून बसल्यावर देव येऊन खाईल; पण लगेच भक्त प्रल्हादाची गोष्ट लक्षात यायची, देव चराचरात आहे. आपण कुठेच लपू शकत नाही. तो आपल्याला बघतोय. एकदा आजीकडून बोलता बोलता ऐकले, ‘देव वासाचा धनी असतो’. मी विचारले, “म्हणजे काय गं आजी ?” तेव्हा ती म्हणाली, “तो केवळ अन्नाचा सुगंध घेतो.” हे कळल्यावर ‘देवाने अन्न ग्रहण करायला हवे’, असे वाटेनासे झाले.

२. खेळात भगवंतासमवेत संसार करणे आणि
प्रत्यक्षातही त्याचाच संसार करायला मिळणे,
तोच त्याचा खेळ खेळून घेणे अन् खेळातला आनंद देणे

हे श्रीकृष्णा, लहान असतांना छोटी-छोटी भांडी घेऊन तुझ्यासमवेतच बोलायचे. आधीपासूनच मला मायेतला संसार नकोसा वाटायचा. खेळातही तुझ्याशीच संसार केला आणि भगवंता, तू प्रत्यक्षातही तुझाच संसार करायला दिलास. तू सर्वव्यापी आहेस. तुझ्या चरणांनी धरणी, आकाश आणि ब्रह्मांड व्यापले आहे. अशा भगवंताची भांडी मात्र भातुकलीच्या खेळातल्यासारखी छोटी-छोटी आहेत. तू आमच्या समवेत हा खेळ खेळायला येतोस आणि तूच तुझा खेळ खेळून घेतोस. या खेळातला आनंद आम्हाला देतोस आणि सर्वकाही तूच करतोस की रे कृष्णा ! कृष्णा हा देह, मन आणि बुद्धी तुझीच आहे. कृष्णा, या देहाने तूच सेवा करतोस.

३. ‘गोपींच्या हातून कृष्ण लोणी खातो, त्यांना प्रत्यक्षात
देवासमवेत रहाण्यास मिळते’, असे वाटून स्वतःही अशी
साधना करण्याचा विचार मनात येणे आणि श्रीकृष्णाच्या
कृपेने त्याचा खरोखरचा संसार करायला मिळणे

श्रीकृष्णाची किती कृपा ! त्याच्याच कृपेने मला त्याचा खरोखरचा संसार करायला मिळतो. हा खरा खरा संसार असला, तरी सगळ्या सृष्टीचा पालनकर्ता, तिन्ही लोकांचा माझा स्वामी श्रीकृष्ण आम्हाला आनंद मिळावा; म्हणून नैवेद्य ग्रहण करतो. गोपींच्या हातून कृष्ण लोणी खायचा. तेव्हा मला वाटायचे, त्या गोपींवर श्रीकृष्णाची किती कृपा ! त्यांना प्रत्यक्षात देवासमवेत रहायला मिळते. त्याला लोणी भरवायला मिळते. तो खात असतांना पहायला मिळते. देवाच्या त्या आनंददायी लीलेचा आनंद लुटता येतो. आपण अशी साधना करूया, म्हणजे देव आपल्यालाही तसा आनंद देईल. श्रीकृष्ण इतका कृपाळू आहे आणि त्याचे आमच्यावर एवढे अनंत प्रेम आहे की, तो याच जन्मात हा आनंद मला देत आहे. कृष्ण त्याच्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. त्याने माझीही इच्छा पूर्ण केली.

– कु. दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.