गोपींमध्ये असलेले गुण

१. सेवावृत्ती

कु. मधुरा भोसले
कु. मधुरा भोसले

गोपींमध्ये श्रीकृष्णाप्रती पुष्कळ सेवाभाव होता. त्यामुळे त्या श्रीकृष्णाची केवळ शरिरानेच नव्हे, तर मन आणि बुद्धी यांद्वारेही सेवा करत होत्या. त्यांनी श्रीकृष्णाच्या सेवेत स्वतःचा अहं पूर्णपणे अर्पण केला होता. त्यामुळे त्या २४ घंटे श्रीकृष्णाच्या सेवेत होत्या. त्या स्वप्नातही श्रीकृष्णाची सेवा करत होत्या. ७५ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत त्यांनी श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सेवा केली, तर ७५ टक्के पातळीनंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या निर्गुण तत्त्वाची सेवा केली.

गोपींकडून एखादी चूक झाल्यास होणारी प्रत्येक चूक म्हणजे आपण श्रीकृष्णाची सेवा करण्यास न्यून पडलो, अशी त्यांना खंत वाटत असे. त्यामुळे ती चूक पुन्हा होऊ नये, असे त्यांना वाटत असे. आपली चूकही श्रीकृष्णच सूक्ष्मातून दाखवतो, असा त्यांचा भाव होता. त्यामुळे स्वतःच्या लहान लहान चुकाही त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यांची तळमळ आणि भाव पाहून त्यांच्यावर श्रीकृष्णाची कृपा आणि साहाय्य यांचा ओघ वाढत गेला. त्यांची आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सर्वकाही श्रीकृष्णच करत आहे, अशा भावामुळे साक्षात श्रीकृष्णच त्यांच्या माध्यमातून कार्य करत होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येक कृती अचूक होत होती आणि त्यातून सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण होत होते.

 

२. तीव्र साधना

गोपींनी तीव्र साधना केली. त्यामुळे त्यांना अल्प अवधीत चैतन्य, आनंद आणि शांती हे टप्पे गाठता आले. गोपींना निर्गुणाची ओढ जास्त होती. त्यामुळे त्या लवकर माझ्याकडे पोहोचल्या.

 

३. सर्वोत्तम शिष्या

सर्व गोपींमध्ये उत्तम शिष्याचे गुण होते. त्यामुळे श्रीकृष्णाच्या स्मरणापासून ते त्याची सेवा करण्यापर्यंत त्यांची प्रत्येक कृती अपेक्षाविरहित आणि पुष्कळ भावपूर्ण, म्हणजेच आध्यात्मिक स्तरावर होत होती. गोपींना अध्यात्म जगण्याची निराळीच कला अवगत होती. त्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर सदैव प्रसन्न होता. गोपींची (शिष्यांची) तळमळ आणि भाव पाहून श्रीकृष्णाने त्यांची जलद उन्नती करवून घेतली. गोपी श्रीकृष्णाच्या भक्तही होत्या आणि शिष्याही होत्या. श्रीकृष्ण केवळ देवतेचे कार्य करत नसून तो गुरूंचेही कार्य करत होता. त्यामुळे श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हटले आहे.

 

४. अहं नसणे

गोपींचे सर्वांत आगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मुळीच अहं नव्हता. श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रेम करत असला, तरी आम्ही इतरांपेक्षा निराळ्या आहोत, असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या मनात स्वतःविषयीचे विचार येत नव्हते, तर केवळ श्रीकृष्णाचेच विचार होते. त्यामुळे त्यांच्यात अहं नव्हता.

 

५. गोपींची सहजसाधना

गोपी श्रीकृष्णाची सेवा करण्याच्या माध्यमातून त्याच्याशी एकरूप होत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती भावपूर्ण होऊन ती नकळत ईश्‍वरप्राप्तीसाठी केल्याप्रमाणे होत असे. त्यामुळे त्यांना प्रयत्नपूर्वक साधना करण्याची आवश्यकता भासत नव्हती. त्यांची साधना सहजसाधना होत असे. त्यामुळे ती उच्च प्रतीची साधना म्हणून संबोधली जाते. जेथे अपेक्षाविरहित साधना घडते, तेथे कोणतीच बंधने आणि नियम लागू नसतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुःखे नसतात. त्यामुळे ही साधना करणे अवघड असले, तरी त्यातून होणारी प्राप्ती चिरंतनकाल टिकून रहाणारी असते.

 

६. भाव नव्हे भक्ती

गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव वाढत जाऊन त्यांना भावावस्था प्राप्त झाली. भावावस्थेत त्यांना चैतन्य आणि आनंद मिळत होता. तरीही त्यांची कृष्णतत्त्वाशी एकरूप होण्याची ओढ वाढतच होती. त्यामुळे त्या अल्प काळात ८५ टक्क्यांपेक्षा उच्च पातळीला पोहोचू शकल्या. भावावस्थेकडून त्यांची वाटचाल भक्तीकडे झाली. भक्ती म्हणजे एकरूपता. गोपींमध्ये असलेल्या श्रीकृष्णाच्या भक्तीमुळे त्या भावावस्थेत न रहाता भक्तीच्या टप्प्याला लवकर गेल्या.

 

७. अद्वैताची ओढ

अनेक भक्तांना पुष्कळ अनुभूती येतात. देवच सर्वकाही करतो. देव सोडून उर्वरित सर्व माया आहे, हे ठाऊक असूनही त्यांना सगुण आवडते. त्यांची निर्गुणाकडे जाण्याची ओढ अल्प असते. अद्वैतातील आनंदापेक्षाही त्यांना मायेतील सुख अधिक आवडत असते. त्यामुळे त्यांची अद्वैताकडे जाण्याची ओढ न्यून असते. याउलट गोपींची अद्वैताकडे जाण्याची ओढ पुष्कळ जास्त होती. त्यामुळे त्यांना सर्व जग माया आहे, याचे ज्ञान होताच त्यांचे आदी आणि अनादी भ्रम एका क्षणात नष्ट झाले. त्यामुळेच मधुराभक्ती करतांना त्या शारीरिक स्तरावर न रहाता आध्यात्मिक स्तरावर गेल्या. त्यांना द्वैतातून अद्वैताकडे लवकर जाता आले.

 

८. १०० टक्के शरणागती

गोपींना श्रीकृष्णाचे रूप समजल्याक्षणी त्या त्याला पूर्णपणे शरण गेल्या. स्वतःचा अहं न जोपासता त्यांना श्रीकृष्णाला शरण जाता आले, ही पुष्कळ महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक ज्ञानी ईश्‍वराला समजून घेतात. त्याच्या अनुभूती घेतात; परंतु ईश्‍वराला शरण जाण्यात न्यून पडतात. त्यामुळे त्यांच्याकडे अफाट ज्ञान असूनही त्याचा त्यांना आणि इतरांना उपयोग होत नाही. याउलट गोपींना केवळ एकदाच श्रीकृष्ण म्हणजे साक्षात् ईश्‍वर आहे, याचे ज्ञान झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला सर्वस्व अर्पण केले. त्यांच्यातील १०० टक्के शरणागतीच्या भावामुळे त्यांची अल्प अवधीत पुष्कळ उन्नती झाली आणि सर्व कृष्णभक्तांमध्ये त्यांना लवकर मोक्ष मिळाला.

– कु. मधुरा भोसले

 

९. गोपींप्रमाणे भाव ठेवण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्णाला अनुभवूया !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

द्वापरयुगातील गोपींची श्रीकृष्णभक्ती किती उत्कट होती ! भक्ती ही ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी’, असे नारदमुनींनी म्हटले आहे. गोपींची प्रत्येक कृती कृष्णभावाने भरलेली असते. गोपींच्या कृतीच्या आरंभी कृष्ण असतो, कृतीमध्ये कृष्ण असतो आणि कृतीनंतरही कृष्ण असतो, तसेच त्यांची प्रत्येक कृती कृष्णासाठीच असते. ‘प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार सुचणे कृष्णकृपेनेच शक्य होत आहे’, हाच गोपींचा भाव असल्याने त्यांची प्रत्येक कृती अन् प्रत्येक विचार कृष्णाला समर्पित असतो. त्या स्वतःमध्येही कृष्णाला पहातात आणि दुसऱ्यांमध्येही कृष्णाला पहातात. कृष्णाविना त्यांना दुसरा विचारच सुचत नाही. एक क्षणही कृष्णाविना गेला, तरी त्यांना पुष्कळ हळहळ वाटते. या कलियुगात गोपींचे असे वर्णन वाचून कदाचित् एखाद्याला ती अतिशयोक्ती वाटेल; पण हे वर्णन सत्य आहे. आपणही गोपी जशा भाव ठेवतात, तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्णाला अनुभवूया अन् त्याचा कृपाशीर्वाद मिळवून जीवनाचे सार्थक करून घेऊया !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ, सनातन आश्रम, गोवा.