श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्‍या गोपी !

gopi-krushna

देव कुणाच्या तरी माध्यमातून सांगत असल्याचा
भाव ठेवून कृती केल्यास त्याचे फळ मिळणे

एखादा साधक म्हणतो, मला कसे प्रयत्न करायचे, ते सांग; परंतु त्याच्या ऐकण्यात भाव नसल्यामुळे त्याला नीट प्रयत्न करता येत नाहीत. याउलट एखाद्या साधकाचा देव मला याच्या माध्यमातून साधनेत कोणते प्रयत्न करायचे, हे शिकवत आहे, असा भाव असतो आणि त्या साधकाने त्यानुसार प्रयत्न केले, तर त्याला त्याचे फळ मिळते.

– कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीकृष्णाप्रतीचा भाव वाढवून मन श्रीकृष्णाने व्यापायला हवे !

आपण श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा आनंद अनुभवण्यापेक्षा स्वतःच्याच विचारांत असतो. विचारांमध्येच मनाची शक्ती व्यय होऊन जाते. श्रीकृष्णाच्या गोपी अशा प्रकारे विचार करायच्या नाहीत. श्रीकृष्णच येतो आणि तोच करतो, हा भाव वाढायला हवा. तिथे मी नको. मी आहे, तिथे आनंद नाही. श्रीकृष्ण असेल, तरच आनंद आहे. त्यामुळे आपले मन श्रीकृष्णानेच व्यापायला हवे. मनात श्रीकृष्ण असेल, तर दुःख होत नाही. आपला मनाचा भाग न्यून व्हायला हवा.

– कु. वृषाली कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भगवंत सतत भक्ताचे स्मरण
करतो; म्हणूनच भक्त त्याचे स्मरण करू शकणे

राधा म्हणते, कृष्ण-कृष्ण, तर कृष्ण म्हणतो, राधा-राधा ! यातून तू हेच शिकवलेस, भगवंत सतत भक्ताचे स्मरण करत असतो.  भगवंत भक्ताचे स्मरण करतो; म्हणूनच भक्त भगवंताचे स्मरण करू शकतो. राधा-कृष्ण नावे निराळी; पण आहेत ती दोन्ही एकच. देह दोन; पण आहेत एकच, म्हणजे कृष्णच. हीही त्या श्रीकृष्णाची लीला आहे.

– कु. दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

एकदा श्रीकृष्णाने छातीत पुष्कळ दुखत असल्याचा बहाणा केला. कोणत्याच औषधाने गुण येईना. तेव्हा श्रीकृष्णानेच नारदमुनींना उपाय सुचवला, कोणी भक्ताने स्वतःच्या पायाखालची माती छातीला लेप म्हणून लावायला दिली, तर माझे दुखणे थांबेल; पण माती देणारा मात्र मृत्यू पावेल. नारदमुनींनी द्वारकेतील कोणी आपल्या पायाखालची माती देण्यास तयार आहे का, याचा शोध घेतला; पण कोणीही तशी माती द्यायला कोणी सिद्ध होईना. नारदमुनींच्या प्रयत्नाला यश येत नसल्याचे पाहून श्रीकृष्णाने त्यांना ‘गोकुळात जाऊन बघा जमले तर’, असा पर्याय सुचवला. गोकुळात शिरतांना नारदमुनींनी यमुनेवर पाणी भरायला आलेल्या पहिल्या गोपीला श्रीकृष्णाच्या रोगाविषयी सांगताच तिने लगेच आपल्या पायाखालची माती नारदमुनींना दिली. ‘मी मेले तरी चालेल; पण आमच्या भगवंतावर प्राणसंकट ओढवण्याच्या आत ही माती लवकर घेऊन जा’, असे सांगून तिने नारदमुनींना बोलूसुद्धा न देता त्वरित श्रीकृष्णाकडे जाण्यास विनवले. नंतर गोपीच्या पायांखालची माती श्रीकृष्णाच्या छातीला लावल्यानंतर त्याच्या छातीत दुखायचे थांबले. अर्थातच श्रीकृष्णाला माती देणारी गोपी काही मरण पावली नाही. नंतर श्रीकृष्णाने तुम्ही माती दिली असती, तरी चालले असते, असे नारदमुनींना सांगितले.

श्रीकृष्णाप्रती असलेली गोपींची भक्ती
आणि प्रीती यांमुळे त्यांनी लगेच त्यांच्या
चरणांखालची माती श्रीकृष्णाच्या छातीला लावायला देणे

प.पू. डॉक्टरांनी वरील गोष्ट सांगितल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘गोपींनी जशी श्रीकृष्णाची भक्ती केली आणि त्या जशा श्रीकृष्णाशी एकरूप होत्या, तशीच भक्ती करता यावी’, हे शिकवण्यासाठी भगवंताने ही गोष्ट मला सांगितली. गोपींना त्यांचे चरण त्यांचे वाटतच नव्हते, तर ते श्रीकृष्णाचेच आहेत, असे वाटायचे. तसेच हा देह आपला नसून श्रीकृष्णाचाच आहे, असेही वाटायचे. त्यामुळे त्यांना मृत्यूची भीती नव्हती. श्रीकृष्णाप्रती असलेली त्यांची भक्ती आणि प्रीती यांमुळे त्यांनी लगेच त्यांच्या चरणांखालची माती श्रीकृष्णाच्या छातीला लावायला दिली.

– कु. दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीकृष्ण प्रत्येकाला एकेक गुण देत असून त्याचे सर्व
गुण आपल्यात आल्यावर त्याच्याशी एकरूप होता येणे

श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण केली आहे. तो प्रत्येकाला त्याचा एकेक गुण देतो; कारण एकच गुण कितीतरी जणांना शिकवू शकतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुण इतरांना शिकवू शकतो. सर्व जण एकमेकांमधील गुण जाणून घेऊन प्रयत्न करतात. श्रीकृष्णाचे अस्तित्व चराचरात असते. त्याचे वेगवेगळे गुण आपल्यात आल्यावर आपल्याला श्रीकृष्णाशी एकरूप होता येते. आपल्यातील सर्व गुण वाढत जाऊन आपण श्रीकृष्णाशी एकरूप होतो.

– कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

द्वापरयुगातील गोपी

तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणेपरमव्याकुलतेति । – नारदभक्तिसूत्र, अध्याय १, सूत्र १९

अर्थ : दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्वरार्पित बुद्धीने, म्हणजे त्याच्या प्राप्तीसाठीच करतो, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे द्योतक आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्यां भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था अशीच असते. भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती यथा व्रजगोपिकानाम् । (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी. व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती अव्यभिचारिणी होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात