आद्य शंकराचार्यांनी केलेल्या धर्मजागृतीच्या कार्याप्रमाणे सनातनच्या चळवळीला प्रतिसाद लाभो ! – महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज, श्री काशी अन्नपूर्णा अन्नक्षेत्र ट्रस्ट, वाराणसी

संतांच्या चरणस्पर्शाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन झाले चैतन्यमय !

डावीकडून पू.डॉ. चारुदत्त पिंगळे, मध्यभागी सनातनच्या ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतांना महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज आणि त्यांना माहिती सांगतांना श्री. विनय पानवळकर

उज्जैन, ३० एप्रिल (वार्ता.) – आद्य शंकराचार्यांच्या वेळेस धर्माला ग्लानी आली होती. धर्माच्या रक्षणार्थ तन, मन आणि धन अर्पण करणार्‍यांची आवश्यकता होती. त्या वेळेस त्यांनी घराघरात जागृती करून नागा साधूंची सेना सिद्ध केली होती. त्याप्रकारेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती घराघरात जागृती करत आहे. आद्य शंकराचार्यांनी केलेल्या क्रांतीप्रमाणे सनातन संस्था चालवत असलेल्या चळवळीला प्रतिसाद लाभो, असे ओजस्वी प्रतिपादन काशी येथील श्री काशी अन्नपूर्णा ट्रस्टचे महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर केले. महाराजांना सन्मान करण्यासाठी विचारल्यावर त्यांनी मला सन्मानाची आवश्यकता नाही. सनातन ही माझीच संस्था आहे. मला वाटेल, त्या वेळेस मी येथे येईन, असे अत्यंत आपुलकीने सांगितले. या वेळेस त्यांच्यासह दैनिक जागरणचे पत्रकार श्री. रविकांत मिश्रा यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.
२१ एप्रिल २०१६ या दिवसापासून प्रतिदिन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ५० कार्यकर्ते सिंहस्थक्षेत्री असलेल्या श्री काशी अन्नपूर्णा ट्रस्टच्या अन्नछत्रामध्ये सकाळी नि:शुल्क अल्पाहार, दुपारी आणि रात्री भोजनास जात आहेत. या ठिकाणी महाराजांच्या कृपेमुळे साधकांना प्रतिदिन चांगले आणि सात्त्विक भोजन मिळत आहे.

क्षणचित्रे

१. प्रदर्शनात ठेवण्यात आलेले सोळा संस्कार आणि देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये आणि ते वाचवण्यासाठीचे उपाय हे ग्रंथ महाराजांना पुष्कळ आवडले. या ग्रंथांचे वाटप करणार, असे महाराजानी सांगितले.

२. महाराजांना पाक्षिक हिंदी सनातन प्रभातचा अंक दिल्यावर त्यांनी वर्गणीदार होणार असल्याचे सांगून त्यांच्या न्यासाचा पत्ता दिला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याने समाजात निश्‍चित परिवर्तन होणार !  – महांमडलेश्‍वर रामकृष्णाचार्यजी महाराज, भागवत धर्म प्रचारक

वैश्‍वविक संस्कृतींमध्ये फक्त भारतीय संस्कृतीच एकमात्र एकमेवाद्वितीय आणि सत्य सनातन संस्कृती आहे. अन्य केवळ विकृती आहेत. विश्‍वात फक्त एकच पुष्प असे आहे, जे रूपहीन होत नाही, त्याचा सुगंध जात नाही, ते म्हणजे चरित्रपुष्प. चारित्र्यवान व्यक्ती विदेशात गेल्यावरही त्याच्या चांगल्या चारित्र्यामुळे त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. धर्माचरण केल्यानेच चरित्र पुष्पाचा उदय होतो. आजच्या समाजाला त्याविषयीचे धर्मज्ञान देण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. या कार्यामुळे निश्‍चित समाजात परिवर्तन होणार आहे. या कार्यास आमचे आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन उज्जैन, मध्य प्रदेश येथील भागवत धर्मप्रचारक महांमडलेश्‍वर स्वामी रामकृष्णाचार्यजी महाराज यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देतांना केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सनातन खरे सत्य मांडण्याचे कार्य करत आहे !
– स्वामी चिदंबरानंदजी महाराज, विद् साधना साध्यम ट्रस्ट, ठाणे, महाराष्ट्र

डावीकडून सनातनच्या उत्पादनांविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या बाजूला स्वामी चिदंबरानंदजी महाराज

हिंदु धर्मातील आचार, विचार आणि त्यामागील शास्त्र हे सनातनला ज्ञात आहे आणि ते सर्व या प्रदर्शनाच्या माध्यमांतून मांडण्यात आले आहे, ते कौतुकास्पद आहे. अनेक ठिकाणी शास्त्र सांगताना संतांना अडचण येते; पण सनातन खरे सत्य मांडण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन विद् साधना साध्यम ट्रस्ट, ठाणेचे संस्थापक स्वामी चिदंबरानंदजी महाराज यांनी केले. उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

क्षणचित्रे

१. प्रदर्शनात ठेवण्यात आलेला मृत्यु व मृत्योत्तर क्रियाकर्म हा लघुग्रंथ महाराजांना आवडला. महाराजांसह आलेल्या त्यांच्या शिष्यांनी १०० प्रतींची मागणी नोंदवली.

२. सनातनची ग्रंथसंपदा बघून महाराज पुष्कळ प्रभावित झाले. त्यांनी हिंदी भाषेतील सर्व ग्रंथाची सूची पहायला मागितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात