रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचा चरणस्पर्श

  • प.पू. आबा उपाध्ये यांचा सनातनच्या वतीने सन्मान
  • सनातनच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग या ग्रंथाचे प्रकाशन

IMG_3469_Clr

IMG_3805_Clr
प.पू. आबा उपाध्ये (बसलेले) यांचा सन्मान करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि बाजूला बसलेल्या सौ. मंगला उपाध्ये
IMG_3818_clr
डावीकडून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. आबा उपाध्ये, सौ. उपाध्ये यांचा सन्मान करतांना पू.(सौ.) बिंदा सिंगबाळ

      रामनाथी – रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना दोन महान विभूतींच्या भेटीचा आनंद घेण्याचा योग जुळून आला ! परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या भेटीसाठी पुणे येथील थोर संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ जूनला शुभागमन झाले. त्यांचे २ जून या दिवशी आश्रमदर्शन, तर ३ जून या दिवशी सन्मानसोहळा, ग्रंथप्रकाशन आणि गीतरामायणाचा सोहळा पार पडला.

      १ जूनला आगमनाच्या प्रसंगी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासह सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. आबा उपाध्ये यांचे स्वागत केले. सनातन साधक पुरोहित पाठशाळेतील ब्रह्मवृंदाने केलेल्या मंत्रघोषात सनातनचे साधक दांपत्य श्री. स्नेहल आणि सौ. समृद्धी राऊत यांनी प.पू. आबा आणि सौ. मंगला उपाध्ये यांचे पुष्पहार घालून औक्षण केले. प.पू. आबा उपाध्ये यांचे गुरु आनंद संप्रदायाचे आद्य प्रवर्तक परमगुरु सदानंद स्वामी यांनी त्यांना प्रदान केलेल्या पादुका, तसेच स्वयंभू शिवलिंग, हिमालयवासी परात्पर गुरु बाबाजी आणि परमगुरु सदानंद स्वामी यांच्या प्रतिमा यांचेही आगमन आश्रमात झाले आहे. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पादुका आणि शिवपिंडी आश्रमात आणल्या. सनातनच्या साधिका सौ. मनीषा पानसरे यांनी प.पू. आबा उपाध्ये यांना रामनाथी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी अवगत केले.

      ३ जून या दिवशी सनातनच्या वतीने प.पू. आबा उपाध्ये यांचा सन्मान करण्यात आला. युगानुयुगे स्नेहाचे नाते असल्यासारखे सहज वागणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि प.पू. आबा उपाध्ये या दोन महान विभूतींच्या प्रत्यक्ष संवादाचा आनंद सनातनच्या साधकांना या भावसोहळ्याच्या वेळी अनुभवता आला. या वेळी सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प.पू. आबा यांचा सन्मान केला. सनातनच्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. आबा यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांचा सन्मान केला. सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प.पू. आबा यांचे सुपुत्र श्री. उदयकुमार उपाध्ये यांचा, तर पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. आबा यांच्या कन्या सौ. संध्या कोठावळे, सौ. राजश्री फणसळकर, तसेच श्री. उदयकुमार उपाध्ये यांच्या शिष्या कु. स्नेहल करवटकर यांचा सत्कार केला. श्री. उदयकुमार उपाध्ये यांनी सनातन आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर केलेले काव्य त्यांना भेट देण्यात आले. या वेळी उदयकुमार उपाध्ये, सौ. संध्या कोठावळे, सौ. राजश्री फणसळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प.पू. आबा उपाध्ये यांचे सनातनच्या साधकांना मार्गदर्शन

ब्रह्मानंद अनुभवण्यासाठी समाधान आणि त्यायोगे
समाधी अवस्था प्रदान करणारे सत्यभाषण व्रत आचारा !

      सातत्याने सत्य बोला. सत्य बोलल्याने समाधान मिळेल. समाधानाने समाधी लागेल आणि समाधीने आनंद मिळतो. मनुष्य ब्रह्मानंदामध्ये जातो, असे अमूल्य, तसेच सरळ सोपे मार्गदर्शन पुणे येथील थोर संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये यांनी ३ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना केले. प.पू. आबा उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. हा मार्ग सरळ वाटला, तरी सातत्याने सत्य बोलणे कठीण असते, अशी सतर्कतेची सूचनाही प.पू. आबा उपाध्ये यांनी साधकांना केली.

दूरदृष्टी ठेवून प.पू. डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली आहे !

      दूरदृष्टी ठेवून प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली आहे. ज्याप्रमाणे गणिताचे उत्तर पालटत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी उभारलेल्या सनातन संस्थेचे कार्य योग्य दिशेने वाढत जाणार आहे. हे कार्य वाढत जावो, ही इच्छा आहे.

      तुम्ही श्रेष्ठ आहात, हे तुम्ही (प.पू. डॉक्टरांनी) प्रत्यक्ष उच्चारले नाही, तरी आम्ही ते म्हणू. परमपूज्य परमतत्त्वाच्या ठायी वसले आहेत. मी प.पू. डॉक्टरांची मोठी प्रतिमा माझ्या घराच्या भिंतीवर लावणार आहे, असे गौरवोद्गार प.पू. आबा उपाध्ये यांनी प.पू. डॉक्टरांविषयी काढले.

मुसंडी मारत सनातनचे कार्य वाढवा ! – प.पू. आबा यांचे शुभाशीर्वाद

      संस्कृत भाषेला जागतिक प्रतिष्ठा देण्याचे श्रेय सनातन संस्थेलाच मिळले पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शीघ्रातीशीघ्र पावले उचलायला हवीत. ढोंगी लोकांना या कार्याची संधी घेण्याचे श्रेय मिळता कामा नये. यासाठी मुसंडी मारत जायला हवे. हिंदु राष्ट्र येणारच आहे, यात शंका नाही.

साधकांना प.पू. आबा उपाध्ये यांच्या रूपाने लाभले पितृतुल्य आशीर्वाद !

      प.पू. आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे वडील वैकुंठलोकवासी पू. बाळाजी आठवले यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे सर्व साधकांना प.पू. आबा यांच्या माध्यमातून पू. बाळाजी आठवले यांचे पितृतुल्य आशीर्वाद लाभत असल्याचे वाटत होते. याविषयी सूत्रनिवेदिका कु. तेजल पात्रीकर यांनी सूत्रसंचालनात शेवटी उल्लेख केला.

परिचय

      प.पू. आबा उपाध्ये हे सर्वांच्या कल्याणार्थ सतत उपासनेत मग्न असतात. प.पू. आबा उपाध्ये त्यांचे ५००० वर्षांपूर्वी सत्यलोकवासी झालेले गुरु परमगुरु सदानंद स्वामी यांच्याशी सूक्ष्मातून बोलतात. त्यांचे गुरूंशी सतत अनुसंधान असते.

छान, सुंदर सर्वच छान… ! – सौ. मंगला उपाध्ये

      हे कार्य पाहून आश्‍चर्य वाटले आणि आनंदही झाला. मी काहीच बोलू शकत नाही. हे कार्य कल्पनेच्या पलीकडील आहे. असे संघटित कार्य अजून कुठे पहायला मिळत नाही. हे दैवी कृपेचे फळ आहे. आश्रमातील वातावरण छान आहे. छान, सुंदर, सर्वच छान…!, असे भावोद्गार सौ. मंगला उपाध्ये यांनी या वेळी काढले.

सौ. मंगला उपाध्ये यांनी प.पू. डॉक्टरांविषयी काढलेले गौरवोद्गार !

      तुमच्यामुळे हे सर्व आहे. ही स्वर्गभूमी आहे, असे गौरवोद्गार सौ. मंगला उपाध्ये यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढले.