पंचतत्त्वाच्या सर्वप्रथम होणार्‍या कार्यकारी प्रकटीकरणाचा आरंभबिंदू म्हणजे प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली !

अनुक्रमणिका

प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली यांच्या माध्यमातूनच सर्वप्रथम पंचतत्त्वाच्या प्रत्यक्ष कार्यकारी प्रकटीकरणाला आरंभ झाला आहे, असे लक्षात आले आहे. त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे येथे देत आहे.

 

 

१. पृथ्वीतत्त्व

सुगंधाच्या प्रकटीकरणाला प.पू. डॉक्टरांच्या हातातूनच खर्‍या अर्थाने आरंभ होणे

२००२ पासून प.पू. डॉक्टरांच्या हाताच्या बोटांतून, तळव्यातून, तसेच मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग येथून पुष्कळ प्रमाणात वेगवेगळे सुगंध यायचे. हे सुगंध वेळोवेळी ते आम्हाला दाखवायचे आणि त्यांचा अभ्यास करायलाही शिकवायचे. कधी कधी तेवढ्याच प्रमाणात दुर्गंधही येत होते. काही वेळा एकाच हाताच्या पंजावर एका बोटातून सुगंध, तर त्याच्या जवळच्याच बोटातून दुर्गंध, असेही होत असे आणि आता तर आश्रमात अनेक ठिकाणी, तसेच सनातनचे प्रसारकार्य जेथे चालते, अशा अनेक ठिकाणीही हे सुगंध पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे सुगंधाची खरी निर्मिती ही प.पू. डॉक्टरांच्या देहातूनच झाली आहे, हे लक्षात येते.

 

२. आपतत्त्व

प.पू. डॉक्टरांच्या सहवासात आल्यावर आपतत्त्वरूपी गोड लाळेचे प्रकटीकरण होणे

२००२-२००३ या वर्षी आम्ही बर्‍याच वेळा प.पू. डॉक्टरांकडे सूक्ष्म-परीक्षण वाचून दाखवण्यासाठी जात होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टर प्रत्यक्ष परीक्षण काय आले आहे हे ऐकायचे आणि त्यावर आम्हाला मार्गदर्शन करायचे. ते बोलत असतांना बर्‍याच वेळा आमच्या तोंडात गोड लाळ येत होती. त्या वेळी ते म्हणायचे, ‘हे आपतत्त्वाचे प्रकटीकरण आहे.’ त्या वेळी सूक्ष्म-विभाग नुकताच चालू झाला होता. मी, कु. सुषमा पेडणेकर, कु. कविता राठीवडेकर, कु. अपर्णा बाणावलीकर, असे आम्ही सर्व त्यांच्याकडे एकदम जात असू, त्या वेळी अशा अनुभूती आम्हाला येत असत. आता सेवा करत असतांना किंवा कुणाशी सत्संगाविषयी बोलत असतांना किंवा आश्रमात फिरत असतांनाही साधकांना, तसेच आश्रमात नवीन आलेल्यांनाही अशा प्रकारच्या अनुभूती येत आहेत. म्हणजेच आधी प.पू. डॉक्टरांच्या सहवासातच या आपतत्त्वरूपी चैतन्याच्या प्रकटीकरणाची खरी प्रचीती आली आहे, ते आता सर्व स्मरत आहे. सध्याचे आपतत्त्वाचे प्रकटीकरण म्हणजे आश्रमातील लाद्यांवर, तसेच प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लाद्यांवर अनेक वस्तूंचे कमी-अधिक प्रमाणात प्रतिबिंब दिसत आहे. असाच पालट आता अनेक साधकांच्या घरीही दिसून येत आहे.

 

३. तेजतत्त्व

प.पू. डॉक्टरांनी उपयोगात आणलेला प्लॅस्टिकचा मग निर्गुणाकडे जाणे, म्हणजेच पांढरा होणे
किंवा त्यांच्या स्लिपर चैतन्याने पिवळ्या होणे, म्हणजे तेजतत्त्वाच्या प्रकटीकरणाचा खर्‍या अर्थाने आरंभ होणे

२००९ या वर्षी प.पू. डॉक्टरांच्या उपयोगातील निळा प्लॅस्टिकचा मग निर्गुणाकडे जाऊ लागला, म्हणजेच तो काही ठिकाणी पांढरा होत असल्याचे लक्षात आले. हा मग नंतर त्यांच्या वापरात नसूनही त्याची पांढरे होत जाण्याची ही प्रक्रिया चालूच आहे. प.पू. डॉक्टरांच्या स्लिपर चैतन्याने पिवळ्या होणे, त्यांची नखे, त्वचा, केस यांच्या रंगातही काळानुसार, तसेच कार्यानुसार पालट होत जाणे आणि प.पू. डॉक्टरांच्या त्वचेतून दैवी कणांची निर्मिती, तसेच त्यांचा सर्वत्र होणारा प्रसार, आश्रमातील लाद्यांवर ॐ उमटणे, या सर्व घटना दैवीच आहेत. यांविषयीच्या अनुभूतींचा ग्रंथातही समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच तेजाच्या विविधांगी पद्धतीने होणार्‍या प्रत्यक्ष प्रकटीकरणाची सुरुवातही प.पू. डॉक्टरांच्या देहापासूनच झालेली आढळून येते. या अनुभूती आता अनेक साधकांच्या बाबतीतही येत आहेत, म्हणजेच तेजाचे हे लोण वाढतच चालले असल्याचे निदर्शनास येत आहे.

 

४. वायूतत्त्व

प.पू. डॉक्टरांचा सदरा अगदी रेशमासारखा तलम होणे, तसेच
प.पू. डॉक्टरांच्या खोलीत विशिष्ट पद्धतीने होणारी प्रत्येक गोष्टीची हालचाल हे
वायूतत्त्वाच्या प्रकटीकरणाचे दर्शक असणे आणि याचा आरंभही प.पू. डॉक्टरांच्या खोलीपासूनच होणे

प.पू. डॉक्टरांचा एक पांढरा सदरा अगदी रेशमासारखा तलम झाला आहे, तसेच त्याचा रंगही अगदी फिकट असा गुलाबी झाला आहे. गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे. प.पू. डॉक्टरांची त्वचा पारदर्शक, तसेच मऊ झाली आहे. तसेच त्यांच्या उपयोगातील वस्तूंचा, कपड्यांचा स्पर्शही हाताला अगदी गुळगुळीत लागत आहे. त्यांच्या खोलीतील फरशाही गुळगुळीत झाल्या आहेत. खोलीत ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची हालचाल होतांना दिसून येत आहे. तसेच भिंतीही श्वसन करत असल्याप्रमाणे जाणवत आहे. हे सर्व वायूतत्त्वाच्या प्रकटीकरणाचे दर्शक आहे. आता आश्रमात, तसेच इतरत्रच्या आश्रमांतूनही अशा प्रकारच्या अनुभूतींचे लिखाण येत आहे. म्हणजे प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरांच्या खोलीतूनच या वायूतत्त्वाचे व्यापक रूपात सर्वत्र प्रक्षेपण होत आहे आणि तसे पालट सर्वत्र दिसून येत आहेत.

 

५. आकाशतत्त्व

पहिल्या सूक्ष्म-नादाच्या प्रकटीकरणाचे क्षेत्रही प.पू. डॉक्टरांची खोलीच असणे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत २०१२ या वर्षी सर्वांत प्रथम अश्व नादाचे प्रकटीकरण झाले. काही नाद प्रत्यक्ष ऐकायला येत होते. त्यांचे ध्वनीमुद्रण करता आले, तर काही नाद अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांचे ध्वनीमुद्रण करता आले नाही; परंतु आता या सर्वच नादांवर संशोधन सुरू आहे. आता तर आश्रमात अनेक ठिकाणी किंवा साधकांच्या घरीही आता विविध प्रकारचे नाद ऐकू येत आहेत, म्हणजेच आकाशतत्त्वाचे प्रथम प्रकटीकरण, तसेच त्याचे प्रसारणही प.पू. डॉक्टरांच्या खोलीतून होण्यास आता सुरुवात झाली आहे.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१.५.२०१४)

 

पंचतत्त्वाचे प्रकटीकरण करण्याची क्षमता असलेली आणि
खर्‍या अर्थाने सार्‍या जगाचा विश्वदीप बनलेली प.पू. डॉक्टरांची खोली !

प.पू. डॉक्टरांचे वास्तव्य लाभलेली चैतन्यमय खोली

यातूनच असे लक्षात येते की, समष्टी परात्पर गुरूंचे वास्तव्य ज्या ठिकाणी असते, तेथूनच खर्‍या अर्थाने समष्टी कल्याणाचे कार्य सुरू होते; कारण त्यांच्या कार्य करण्याच्या तळमळीतूनच पंचतत्त्वाच्या कार्याचा आरंभबिंदू निर्माण होतो आणि तोच खर्‍या अर्थाने तेथे एका पवित्र स्थानाच्या रूपात वास्तव्य करतो. पंचतत्त्वाचे प्रकटीकरण करण्याची क्षमता असलेले हे स्थानच शेवटी सार्‍या विश्वाला अध्यात्ममार्गाकडे नेणार्‍या विश्वदीपासारखे कार्य करू लागते आणि म्हणूनच प.पू. डॉक्टरांचे वास्तव्यस्थान असलेली खोली ही खर्या अर्थाने सार्या जगाचा विश्वपदीप आहे. त्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक जणच एका नेत्रदीपक अशा झळाळीने उजळून निघेल, यात शंका नाही. प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनीही त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी ९.२.१९९५ या दिवशी ‘गोव्याला मुख्य आश्रम करा. तो विश्वदीप होईल,’ असे सांगितले होते.

 

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment