श्राद्धकर्मात वर्ज्य असणार्‍या वस्तू आणि त्याची अध्यात्मशास्त्रीय कारणे

श्राद्धाचे जेवण बनवतांना काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत. त्या कोणत्या, हे कारणांसह, तसेच श्राद्धविधीत लाल रंगाची फुले का वापरू नये यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

१. वावडिंग, मिरी, महाळुंग, पडवळ आणि राजगिरा

१ अ. मिरी, पडवळ इत्यादी तमोगुणवर्धक असल्याने श्राद्धाच्या जेवणामध्ये त्यांचा समावेश न करणे

‘वावडिंग, मिरी, महाळुंग, पडवळ आणि राजगिरा हे पदार्थ तमोगुणवर्धक असल्याने यांच्यातून उत्पन्न झालेल्या तमोगुणी सूक्ष्म-वायूच्या प्रभावामुळे इच्छाशक्तीशी संबंधित लहरींची घनीभूत होण्याची, म्हणजेच जडत्वधारणेची क्षमता वाढल्याने असे अन्न ग्रहण करणार्‍या पितरांमध्ये जडत्व निर्माण होऊन त्यांची पुढे जाण्याची गती खुंटण्याची शक्यता असते. म्हणून श्राद्धातील जेवणामध्ये वरील प्रकारांचा समावेश केला असता पितरांना अधोयोनी प्राप्त होते, असे म्हटले आहे; कारण जडत्वदर्शक लहरींचा स्थायीभाव हा अधोदिशेने गमन करणे, हा आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ३.३२)

२. लोखंड आणि स्टील या धातूंची भांडी

२ अ. लोखंड आणि स्टील या धातूंमध्ये त्रासदायक नाद निर्माण करण्याची
क्षमता असल्याने श्राद्धाच्या भोजनासाठी या धातूंच्या भांड्यांचा वापर न करणे

‘लोखंड आणि स्टील या धातूंतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमध्ये वायूमंडलात त्रासदायक नाद निर्माण करण्याची क्षमता असते. या धातूंच्या भांड्यांत अन्नादी घटक ठेवले असता ते त्रासदायक लहरींनी युक्त बनते. पितरांच्या अन्नग्रहण प्रक्रियेत या त्रासदायक नादाकडे आकृष्ट होणार्‍या वाईट शक्तींचा हस्तक्षेप होण्याची शक्यता जास्त असल्याने श्राद्धाच्या भोजनासाठी लोखंड, स्टील अशा धातूंची भांडी वापरत नाहीत. तसेच या नादाच्या कंपनांमुळे श्राद्धस्थळी आकृष्ट झालेल्या वायूमंडलातील पितरांच्या लहरींची गती अनियमित होऊन त्यांच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.०५)

(या कारणामुळेच देवळातील घंटा, तसेच देवपूजेतील उपकरणे ही लोखंड आणि स्टील या धातूंची नसतात. – संकलक)

३. लाल रंगाची फुले

३ अ. लाल रंगाच्या फुलांमधून मारक लहरी प्रक्षेपित होत असल्यामुळे ती श्राद्धामध्ये न वापरली जाणे

‘लाल रंग हा मारक तत्त्वाशी संबंधित असल्याने लाल रंगातून प्रक्षेपित होणार्‍या वेगवान मारक लहरींच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने पितरांशी संबंधित कनिष्ठ स्तरावरील, म्हणजेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित इच्छालहरींचे विघटन होण्याची शक्यता असते. यामुळे पितरांना पृथ्वीतलावर येऊन अन्न ग्रहण करणे अशक्य होते; म्हणून श्राद्धामध्ये लाल रंगाची फुले वापरू नयेत.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.३९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment