दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात येऊन सनातनला साहाय्य करणारे मुंबई येथील प.पू. प्रमोद केणे महाराज !

PP_Pramod_kene
प.पू. प्रमोद केणे महाराज

मुंबई येथील संत प.पू. केणे महाराज हे विज्ञानाचे पदवीधर असून छोटे उद्योजकही आहेत. दत्तप्रेरणेने त्यांनी आजवर प्रतिमास पौर्णिमेला सलग १५० गिरनार यात्रा केल्या आहेत आणि आजही करत आहेत. गिरनार हे दत्तप्रभूंचे अक्षय निवास आणि जागृत स्थान आहे. प.पू. प्रमोद केणे महाराज हे ११ एप्रिल २०१६ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेला संवाद येथे देत आहोत.

 

 

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला सनातनच्या रामनाथी आश्रमात येण्याचा संकेत कशा प्रकारे मिळाला ? त्यामागे काय प्रक्रिया घडते ?

प.पू. प्रमोद केणे महाराज : विविध प्रकारचे संकेत मिळतात. कधी तेजतत्त्वाच्या माध्यमातून रूप दिसते, तर कधी गंधाच्या माध्यमातून संकेत मिळतात. एके दिवशी मी गिरनार येथे गेलो असतांना दत्तप्रभूंची आज्ञा झाली की, गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात डॉ. आठवले असतात. तेथे जाऊन त्यांच्यावर उपाय कर. महाराजांचा हा संकेत मिळाल्यावर मी येथे आलो. दत्तप्रभूंची आज्ञा होण्यामागील कारण असे की, दत्तगुरूंमध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांच्या शक्ती एकत्रित असतात. त्यामुळे ते अधिक लाभदायक असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : रामनाथी आश्रमाचा पत्ता कसा कळला अथवा येथे येण्याचा विचार कसा आला ?

प.पू. प्रमोद केणे महाराज : दृष्टांत मिळाल्यावर सर्व आपोआपच घडते; कारण एक संत दुसर्‍या संतांना देहापेक्षा आत्म्याच्या स्तरावर अधिक ओळखतात. त्यामुळे आपोआप आकर्षिले जातात. त्याप्रमाणे मी येथे आलो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पृथ्वीवर एवढे कोट्यवधी जीव असतांना दत्तगुरूंना आम्हाला साहाय्य करावेसे का वाटले ?

प.पू. प्रमोद केणे महाराज : जो जीव निरपेक्षतेने समष्टीसाठी चांगले कर्म करत असतो, त्या जिवावर काही आघात होत असतील, तर त्याला संरक्षण देणे, हे देवतांचे कार्य असते. त्या वेळी कोणाच्या न कोणाच्या रूपात देव येऊन त्याचे रक्षण करतो. पूर्वीच्या काळी राक्षस ऋषिमुनींच्या यज्ञामध्ये येऊन विघ्न घालत असे. त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीराम होता. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये चांगल्या विचारांच्या लोकांच्या रक्षणासाठीच देव येतो. त्याचप्रमाणे दत्तप्रभू माझ्याकडून हे कार्य करवून घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात