आवाहन आखाड्याच्या पेशवाईचे उज्जैनवासियांकडून उत्स्फूर्त स्वागत !

सिंहस्थपर्व उज्जैन २०१६

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

उज्जैन – आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली.
     सकाळी १० वाजता नीलगंगा चौकापासून प्रारंभ झालेल्या या पेशवाईमध्ये आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज, कृष्णानंदपुरी महाराज, मेळा समितीचे पदाधिकारी यांच्यासह पिठाधिश्‍वर, महामंडलेश्‍वर, महंत तसेच नागा साधूंचे विविध समूह सहभागी झाले होते. हत्ती, घोडे, उंट तसेच विविध वाद्यपथकांनी सुशोभित पेशवाईचे उज्जैनवासियांनी विविध चौकांमध्ये स्वागत केले, तसेच त्यांनी साधू-संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांना वंदन केले. या पेशवाईची दुपारी रामघाट येथे सांगता झाली.
Ujjain_kumbh

क्षणचित्रे

१. या पेशवाईमध्ये रमता पंच जुना दशनाम आखाड्याचे पथक आणि नागा साधू अग्रभागी होते.
२. पेशवाईच्या मार्गात साधू-संतांसाठी ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था करण्यात आली होती.
३. प्रशासनाकडून पेशवाईचा मार्ग पाण्याने धुण्यात आला, तसेच पेशवाई संपल्यानंतर मार्गाची स्वच्छता करण्यात आली.
४. मिरवणुकीत नागा साधूंनी शस्त्रास्त्रे चालवण्याची प्रात्यक्षिके करून दाखवली.

पेशवाईमध्ये सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

     पेशवाईचा प्रारंभ झाला त्या निलगंगा येथे आणि भारती ज्ञानपीठ येथे सनातन संस्थेच्या साधकांनी स्वागताचे फलक धरून पेशवाईचे स्वागत केले. या वेळी संस्थेकडून पेशवाईतील साधू-संतांचे औक्षण करण्यात आले, तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर या पेशवाईमध्ये संस्थेचे एक पथक सहभागी झाले होते. यात हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती.