सुख आणि आनंद

अनुक्रमणिका

१. सुख आणि आनंद यांचे तात्त्विक विवेचन

२. विषयसुखाची तृप्ती देण्याची मर्यादा आणि आत्मसुखाची तृप्ती देण्याची अमर्यादा

३. औपाधिक सुख आनंदच असणे

४. विशाल गोष्ट सुख देते

५. वासनेचा अभाव म्हणजे सुख

६. मनाची एकाग्रता म्हणजे सुख

७. निर्विचार स्थिती म्हणजे आनंद

८. स्थिरता म्हणजे सुख

९. देहभावाचे विस्मरण म्हणजे सुख

१०. आपोआप होणारा कुंभक सुखदायक


 

आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यामगील मूळ कारण हे सुखप्राप्ती हेच असते. या वैशिष्ट्यपूर्ण लेखात सुख आणि आनंद यांविषयी तात्त्विक विवेचन करण्यात आले असून, सुख आणि आनंदातील नेमका फरक आणि आनंदाचे श्रेष्ठत्व; तसेच तो प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.

 

१. सुख आणि आनंद यांचे तात्त्विक विवेचन

माणसाला विषयसुखाची नाही, तर सुखाची, म्हणजे आनंदाची अपेक्षा असते. एखाद्याला सांगितले की, तुला परदेशात आमच्या पैशाने पाठवतो, तेथे सर्व भोग भोगता येतील एवढे पैसे देतो; पण तेथे तू दुःखी होशील, तर तो म्हणेल, ‘तेथील सुख नको आणि दुःखही नको.’

 

२. विषयसुखाची तृप्ती देण्याची मर्यादा आणि आत्मसुखाची तृप्ती देण्याची अमर्यादा

ज्या इंदि्रयावाटे आपण विषयसुख भोगतो, ते इंद्रीय तेवढ्या वेळापुरते सुखी होते; परंतु इतर इंदि्रये सुखाच्या नावाने रिकामीच रहातात, उदा. चांगले गाणे ऐकले, तर कान तृप्त होतात; परंतु इतर इंदि्रये उपाशीच रहातात. बासुंदी खाण्याचे सुख मिळाले, तर जीभ तृप्त होते; पण इतर इंदि्रये उपाशी रहातात.

अशा रीतीने विषयसुख हे एका वेळेला एकाच इंदि्रयाला सुख देऊ शकते आणि तेसुद्धा अल्पकाळ. ते सर्व इंदि्रयांना तृप्त करू शकत नाही. याउलट आत्मसुख हे आतून स्फुरते आणि त्या सुखाने सर्व इंदि्रये एकाच वेळी तृप्त होतात.

पावसाच्या पाण्याने साठलेले विहिरीतील पाणी सूर्याच्या उष्णतेने आटते; परंतु विहिरीतच पाण्याचा जिवंत झरा लागला, तर ती पाण्याने भरते आणि तिच्यातील पाणी आटत नाही. त्याचप्रमाणे विषयांच्या द्वारे देहात आणि जीवनात साठवलेले सुखाचे पाणी संसारतापाने आटण्यास वेळ लागत नाही; परंतु नामस्मरणाद्वारे भगवंतकृपा होऊन आनंदझरा देहाच्या विहिरीत एकदा का प्रकट झाला की, देहाची विहीर त्या आनंदाने आतून भरते. सर्व इंदि्रये त्या आनंदाने तुडुंब भरतात आणि तो आनंद अखंड असतो. तो आनंद सर्व इंदि्रयांना सर्वकाळ तृप्त करतो.

 

३. औपाधिक सुख आनंदच असणे

‘ऐहिक सुखाची परमावधी’, म्हणजे मैथून; म्हणूनच त्याला सुश्रुतसंहितेत ‘आनंदस्थान’ म्हटले आहे. मैथून याचा अर्थ येथे बिंदुपतनाचा क्षण घ्यावयाचा. तो क्षण पूर्ण कुंडलिनीजागृतीचा आहे. अज्ञानी माणसाला विषयानंदाचा अनुभव असतो. विषयानंदाचा कार्यकारणभाव असा आहे – ‘विषयात सुख आहे’, अशा निश्चयाच्या कल्पनेने क्षणभर का होईना प्राणापान समान होतात. व्यक्तीला आपल्या देहभावाचे पूर्ण विस्मरण होते आणि तिचा आत्मानंद व्यक्त होतो. हे तिला अज्ञानामुळे न कळल्याने ‘आपला आनंद विषयावर, उपाधीवर, म्हणजे येथे मैथुनावर अवलंबून आहे’, असे ती समजते आणि विषयामध्ये जास्त अडकत जाते. जन्म-मरणाच्या परंपरेत सापडून ती दुःखी होते.

जेवतांना पोट भरल्यावरही प्राणापान समान होतात. व्यक्तीला स्वतःच्या देहभावाचे पूर्ण विस्मरण होते आणि तिचा आत्मानंद व्यक्त होतो. ‘उपाधीमुळे, म्हणजेच जेवणामुळे आनंद झाला’, असे ती समजते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

‘पती, पत्नी आणि मुले ही स्वतःच्या आनंदासाठी आहेत. त्यांच्या अंगाने आपण आपला आनंद भोगतो. तो आनंद आत्मानंदच असतो; पण आपण त्याला औपाधिक सुख, म्हणजे पती, पत्नी आणि मुले यांमुळे मिळालेले सुख मानतो. थोडक्यात, खरे सुख अंतर्यामीच असते. (त्यालाच अंतरीचा सुखसागर म्हणतात.)’

 

४. विशाल गोष्ट सुख देते

अ. विशाल सागर पाहिला किंवा उघड्यावरून मोठे आकाश पाहिले की, सुख वाटते. सागर किंवा आकाश यांचा थोडासा भाग खिडकीतून दिसला, तर सुख होत नाही.

यो वै भूमा तत्सुखम् । नाल्पे सुखम् अस्ति । भूमा एव सुखम् । भूमा तु एव ।
विजिज्ञासितव्य इति । भूमानं भगवो विजिज्ञास इति । – छान्दोग्योपनिषद्, अध्याय ७, खण्ड २३, वाक्य १

अर्थ : जे अनंत असते, तेच खरे सुख होय. अल्पामध्ये (म्हणजे संकुचितपणात) सुख नाही. निरतिशयत्व हेच खरे सुख; म्हणून अनंतपणाचे ज्ञान करून घेतले पाहिजे असे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे़.

आ. आपण मनाने व्यापक झालो, तर आपला आनंदही असीम होईल.

इ. जो मनुष्य समाज, राष्ट्र, मानवजात किंवा प्राणीमात्र यांसाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतो, त्याला अधिकाधिक सुख मिळते आणि त्याला सांसारिक सुखदुःखे सारखीच असतात, उदा. तानाजी मालुसरे म्हणाले, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे (मुलाचे).’’ (आधी शत्रूशी लढाई करून कोंढाणा जिंकीन आणि मगच मुलाचे लग्न करीन.) तसेच आत्मदर्शनाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्याला संसारातील सुखदुःखाचेच काय, पण प्राणीमात्रांच्या सुखदुःखाचेही काही वाटत नाही. याउलट जो केवळ कुटुंबाचा किंवा स्वतःचाच विचार करतो, तो अधिकाधिक दुःखी होतो.

 

५. वासनेचा अभाव म्हणजे सुख

विषयभोगातसुद्धा जे सुख होते, ते विषय भोगल्यामुळे होत नाही, तर तृप्ती होऊन भोगाने जेव्हा विषयांचा वीट येतो, तेव्हा विषय नकोसा झाल्यामुळे होते. पहिला लाडू खातांना बरा वाटतो. नंंतर त्याची गोडी रहात नाही आणि पुढे तो नकोसा वाटतो. म्हणजे लाडूत विषयसुख नाही. सुख विषयात नाही, तर निर्विषय स्थितीत आहे.

‘वासना उत्पन्न झाली की, मनुष्य सुखाच्या अवस्थेतून च्युत होतो. वासनेचा अभाव तिची पूर्ती झाल्यामुळे असो, तिचा त्याग केल्यामुळे असो, ती उत्पन्न न झाल्यामुळे असो किंवा चित्ताच्या एकाग्रतेमुळे तिचा लोप झाल्यामुळे असो (पुढे दिलेली टीप पहा.), कोणत्याही स्थितीत ‘वासनाराहित्य म्हणजे सुख होय’, असे ठरते. म्हणजेच सुख विषयांच्या ठिकाणी नसून ते चित्तातच असते.’

टीप – वासनेचा अभाव मनुष्याला नेहमीच शक्य नसतो. तहानभुकेने व्याकुळ झाले असता किंवा पराकोटीच्या शारीरिक वेदना होत असलेल्या मनुष्याचे चित्त वासनारहित होणे अशक्य आहे. चित्तनिरोधाने काही शारीरिक दुःखांचे निरसन करणे शक्य असले, तरी सर्वच दुःखांच्या संबंधी हे होत नाही.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक १६

अर्थ : (पण) हे अर्जुना, अती खाणारा (अथवा) अगदीच न खाणारा (किंवा) अती झोप घेणारा (अथवा) मुळीच झोप न घेणारा असा (जो असेल), त्याला योग प्राप्त होणार नाही.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक १७

अर्थ : ज्याचे खाणे आणि हिंडणे परिमित आहे, जो सर्व कर्मे मापून करतो, ज्याची निद्रा आणि जागरण परिमित आहेत, त्याला हा योग (संसाररूपी) दुःखाचा नाश करणारा होतो.

 

६. मनाची एकाग्रता म्हणजे सुख

विषयात सुख आहे, या कल्पनेमुळे तो विषय मिळाल्यावर ते सुख पूर्णपणे उपभोगण्यासाठी मनाची एकाग्रता होऊन (प्राणापान समान होऊन) क्षणभर का होईना, कुंभक साधतो, म्हणजे श्वासोच्छ्वास बंद होतो आणि त्या क्षणात आत्मानंद व्यक्त होतो.

मन एकाग्र झाले, म्हणजे सुखप्राप्ती होते. विषयभोगातसुद्धा जे सुख होते, ते विषय भोगतांना होत नाही, तर तृप्ती होऊन मन एकाग्र झाल्यावर होते. वीर्यपतनकाली आणि भोजनांती मन एकाग्र होते; म्हणूनच सुख होते.

‘सुख हे आत्म्यातच आहे, अशी जी बुद्धी, तिला आत्मबुद्धी म्हणतात. या बुद्धीच्या बळावर कुठेही चित्त एकाग्र केले, तरी ते सुखालाच कारण होते. अशा सुखाला आत्मसुख, सात्त्विक सुख, नित्य सुख इत्यादी नावे देतात. विषयेंद्रीयसंयोगाने जेव्हा क्षणभर चित्त एकाग्र आणि अत्यंत अल्पाहंकार होते, तेव्हा अशा सुखाला राजस सुख, वैषयिक सुख इत्यादी नावे देतात. आत्मसुखात विषयेंद्रीयसंयोगच नसल्यामुळे केव्हाही चित्त वासनारहित केले की, सुख ठेवलेलेच असते; म्हणून विषयसुखापेक्षा आत्मसुख उच्चतर आहे.’

 

७. निर्विचार स्थिती म्हणजे आनंद

ध्यानात निर्विचार स्थिती झाल्यावर आनंदाची अनुभूती येते. मद्य घेतल्यावर विचार मंदावतात. तेव्हा दोन विचारांच्या मधल्या निर्विचार काळात आनंद उपभोगता येतो. मद्य पिणार्‍याला ‘आनंद मद्यामुळे मिळाला’, असे वाटते.

 

८. स्थिरता म्हणजे सुख

लहान मुलाची दृष्टी स्थिर नसते, सारखी हालते. ती किंचित स्थिर झाली की, आनंद होऊन ते हसते. बघणार्‍याला वाटते की, आपल्याकडे पाहून ते हसले.

 

९. देहभावाचे विस्मरण म्हणजे सुख

मनाची एकाग्रता झाली की, देहभावाचे विस्मरण होऊन आनंदाची अनुभूती येते; म्हणूनच साधनेने देहभावाचे विस्मरण झाले की, मनाची एकाग्रता होऊन आनंदाची अनुभूती येते.

 

१०. आपोआप होणारा कुंभक सुखदायक

ब्रह्म म्हणजेच आनंद. ब्रह्म हे स्थिर आहे; म्हणून जेव्हा आनंद होतो, तेव्हा आपोआप कुंभक होतो, म्हणजे श्वासोच्छ्वास स्थिर होतो, थांबतो. (म्हणजेच आपोआप कुंभक होणे, हे आनंदाचे एक लक्षण आहे.) याउलट जेव्हा आपोआप कुंभक होतो, तेव्हा आनंद होतो. वीर्यपतनाच्या, म्हणजे बिंदुपतनाच्या वेळी, पोट भरल्यावर तृप्तीने ढेकर देतांना आणि अष्टसात्त्विकभाव जागृत होतात तेव्हा श्वासोच्छ्वास आपोआप बंद झालेला असतो; म्हणून साधनेने श्वासोच्छ्वास हळूहळू अल्प होत जाऊन थांबणे, याने खरा आनंद मिळतो. प्रयत्नपूर्वक कुंभकात आनंद नाही.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment