सुख (भाग २)

अनुक्रमणिका

३. प्राणी आणि मानव यांना मिळणारे सुख

४. सप्तलोक आणि सुख

४ अ. स्वर्गातील सुख

४ आ. स्वर्ग आणि पृथ्वी येथील सुखांची वैशिष्ट्ये

४ इ. चिरंतन सुखाच्या प्राप्तीसाठी स्वर्ग नव्हे, तर भूलोक आवश्यक

४ ई. महा, जन, तप आणि सत्य या लोकांत प्रत, प्रमाण अन् काल यांत वाढत जाणारा आनंद अनुभवता येतो.

५. थोडेफार खरे सुख कसे मिळवायचे ?

५ अ. भोगांचा त्याग

५ आ. सकाम भक्ती

५ इ. संतसहवास


 

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी ‘सुख (भाग १)’ यावर क्लिक करा !

 

३. प्राणी आणि मानव यांना मिळणारे सुख

प्राण्यांच्या संदर्भात ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची तृप्ती होणे, म्हणजे सुख असते. मानवामध्ये प्रत्येक इंद्रियजन्य सुखात भावना आणि बुद्धी आपापले अंगीकृत कार्य करत असतात, उदा. रुचकर पदार्थ सुखकारक असेल; परंतु ज्या व्यक्तीच्या अगदी जवळचा नातलग मरण पावला असेल, त्या व्यक्तीस जर तो रुचकर पदार्थ दिला गेला, तर तिला त्यात गोडी वाटणार नाही. बौदि्धकदृष्ट्या पाहिले, तर एखाद्याला आवडीचा गोड पदार्थ खायला दिला, तर त्यात त्याला सुख वाटेल; पण मधुमेह असलेल्या व्यक्तीस गोड पदार्थ खायला आवडत असूनही तो गोड पदार्थ खातांना त्याला त्यात सुख वाटणार नाही. ‘इंद्र इंद्राणीशी संभोग करून स्वर्गात जो आनंद (सुख) अनुभवतो, तोच आनंद कुत्रा कुत्रीशी संभोग करून इहलोकी मिळवतो. हे सुख उच्च, नीच सर्व प्राण्यांस समान मिळते.’

 

४. सप्तलोक आणि सुख

भू, भुव, स्वर्ग, मह, जन, तप आणि सत्य हे सात लोक आहेत. मनुष्य जेथे रहातो तो भूलोक. मानवी सुखाची मर्यादा जास्तीतजास्त एक एकक आहे. सुखोपभोगाची आत्यंतिक इच्छा असलेला आणि सर्व प्रकारची भौतिक साधने प्राप्त असलेला निरोगी, बळकट आणि सज्जन तरुण हे सुख उपभोगतो.

४ अ. स्वर्गातील सुख

१. व्याख्या

दुःखाचा जराही लवलेश नसलेली नितांत सुखाची अवस्था म्हणजे स्वर्गीय सुख, अशी सुखाची व्याख्या जैमिनी ऋषी करतात. देवता कोट्यवधी एकक (१०१२) इतक्या प्रमाणात सुख उपभोगतात. स्वर्गाला ‘सुखाचा महासागर’, तर नरकाला ‘दुःखाचा महासागर’ असे म्हणतात. स्वर्गात भरपूर सुख मिळते; म्हणून भरपूर मोठ्या सुखाला ‘स्वर्गसुख’ असे म्हणतात.

४ आ. स्वर्ग आणि पृथ्वी येथील सुखांची वैशिष्ट्ये

१. मनात विचार येताच त्याची पूर्तता झाल्याने स्वर्गामध्ये तात्काळ सुख मिळते. पृथ्वीवर मात्र सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

२. स्वर्गामध्ये केवळ सुखच असते़ त्यात दुःखाचा अंशही नसतो. पृथ्वीवर मिळवलेल्या प्रत्येक सुखात थोडातरी दुःखाचा भाग असतोच. ते कसे हे आपण वर ‘२ अ. प्रत्येक सुखात दुःख असणे’ या सूत्रात समजून घेतले.

३. स्वर्गात अखंड सुख मिळते. याउलट पृथ्वीवर सुखकारक आणि दुःखकारक अशा दोन्ही गोष्टी आळीपाळीने घडत असतात.

४. पृथ्वीवर बर्‍याचदा दुःखनिवारण झाल्याने सुख मिळते, उदा. भुकेल्याला पोटभर अन्न मिळून त्याची भूक भागल्याने त्याला सुख मिळणे. स्वर्गामध्ये हालअपेष्टा, दुःख, भीती किंवा भूक यांचा अभाव असल्याने केवळ शुद्ध सुख मिळते.

५. मर्यादा : स्वर्गातील सुखाला स्वतःची मर्यादा आणि काळाचे बंधन असते. पुण्याचे प्रमाण आणि प्रकार यांनुसार स्वर्गातील व्यक्तीच्या सुखाचा वाटा निशि्चत केला जातो. स्वर्गात प्रत्येकाला जरी सुख मिळत असले, तरी दुसर्‍याला आपल्यापेक्षा जास्त आणि चांगले सुख मिळत असलेले पाहून एखाद्या व्यक्तीला ईर्षाही होऊ शकते.

४ इ. चिरंतन सुखाच्या प्राप्तीसाठी स्वर्ग नव्हे, तर भूलोक आवश्यक

चिरंतन सुख किंवा ब्रह्मानंद हा देवता उपभोगत असलेल्या सुखाच्या शेकडो कोटी पट (१०१२) असतो. शब्दांनी त्याचे वर्णन करणे शक्य नाही आणि मानवी मन त्या सुखाची कल्पनाही करू शकत नाही. असे असले, तरी मनुष्य सातत्याने साधना करून वर्तमान जन्मात हा ब्रह्मानंद अनुभवू शकतो. स्वर्गात आनंदाची अनुभूती येत नाही; म्हणून स्वर्गापेक्षा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करावा. मनुष्यजन्माने मोक्षास जाता येते, ही गोष्ट स्वर्गातील देवांना कळली; म्हणून देव मनुष्यदेहाची इच्छा करतात.

४ ई. महा, जन, तप आणि सत्य या लोकांत प्रत, प्रमाण अन् काल यांत वाढत जाणारा आनंद अनुभवता येतो.

 

५. थोडेफार खरे सुख कसे मिळवायचे ?

सुखासाठी सतत प्रयत्नशील असतांनासुद्धा मानव दिवसेंदिवस अधिकाधिक दुःखी होत आहे. जगभर मनोरुग्णांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आताच्या विज्ञानावर आधारित सुधारणा आणि संशोधन यांचा उद्देश सुखी होणे, हा आहे; पण सुधारणा आणि संशोधन यांनी मानव सुखी होत नाही; म्हणून त्या सुधारणा आणि संशोधन यांना महत्त्व नाही. असे कधीच होऊ शकत नाही की, जीव सुखापासून सुखी व्हावा; परंतु दुःखापासून दुःखी होऊ नये. थोडेफार खरे सुख साध्य करण्यासाठी पुढील मार्ग आहेत.

५ अ. भोगांचा त्याग

‘प्रापणात् सर्वभोगानां परित्यागो विशिष्यते ।’ म्हणजे ‘भोगांच्या उपभोगापेक्षा त्यांच्या त्यागातच खरेखुरे सुख आहे.’

५ आ. सकाम भक्ती

विश्व देवतांच्या अधीन आहे. देवता प्रसन्न झाल्यास सुख अन् दुःखी झाल्यास दुःख देतात. भक्तीने त्यांना प्रसन्न करून सुख मिळवता येते.

५ इ. संतसहवास

१. ‘स्त्रीसंगात सामान्य मनुष्याला जो आनंद होतो, तो आनंद जीवन्मुक्ताला नेहमीच होत असतो; म्हणून त्याला कामवासना नाही.’ – संत एकनाथ महाराज

‘माणसामध्ये वासना जेवढी अल्प तेवढा त्याचा सहवास आनंदाचा. वासना बीजरूपाने असूनही लहान मूल आपल्याला हवेहवेसे वाटते. हे जर खरे, तर ‘भगवंताच्या कृपेने ज्याचा समूळ वासनाक्षय होतो, त्याचा सहवास आनंददायी होतो’, असे म्हटले, तर ते अशक्य का वाटावे ?’

संतांकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे सूक्ष्मातील कळायला लागले की, त्या आनंदलहरींची अनुभूती प्रत्येक साधकाला येतेच.

२. वाईट व्यक्तींच्या सहवासात व्यक्ती दुःखाला सुख मानते, उदा. चोरी करणे, मद्य पिणे यांना सुख मानते. संतसहवासात सुख हे दुःख वाटायला लागते. ते खरे वैराग्य होय. संत सुखाची इच्छाच नष्ट करतात. तसेच संतसहवासात दुःख हेही सुख वाटायला लागते; कारण दुःख भोगण्याची क्षमता प्राप्त होते; म्हणून दुःख होत नाही आणि सहवासातील आनंद तर मिळतोच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ‘सद्गुरुविणे सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।’ यातील पहिला ‘आधी’ म्हणजे अगोदर आणि दुसरा ‘आधी’ म्हणजे मानसिक दुःख. म्हणजे दुःख मनावर जाण्यापूर्वी तुम्ही संतांना शरण जा.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

३. काही किरणांनी जशा कर्करोगाच्या पेशी नाश पावतात, तसे संतसहवासात अधिक काळ राहिल्यास त्यांच्याकडून येणार्‍या लहरींनी मनोलय आणि बुद्धीलय होतो, म्हणजेच सूक्ष्मदेह अन् कारणदेह नाश पावतात, अविद्येचा नाश होतो आणि ती व्यक्ती आत्मानंद अनुभवते.

या लेखातून आपल्याला हे लक्षात आले असेल की, सुख असो वा दु:ख, ते क्षणभंगुर आहे ! तसेच स्वर्गसुखापेक्षाही श्रेष्ठ प्रतीचे सुख अर्थात ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी मनुष्यजन्माचीच आवश्यकता असते. त्यामुळे देवांनाही मनुष्याची ईर्ष्या वाटते.

येथे वाचकांना आर्वजून सांगावीशी वाटते की, ईश्वरकृपेने हा मानवजन्म मिळाला आहे, तर तो वाया कशाला घालवा ! काळानुसार योग्य साधनेस उद्या नव्हे आज, आज नव्हे आता आरंभ करा आणि मानवजन्माचे सार्थक करून घ्या !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment