पाश्‍चात्त्य आणि भारतीयसंगीत ऐकण्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम

पाश्‍चात्त्य संगीत ऐकणे आणि भारतीय संगीत ऐकणे
यांचा व्यक्तीवर होणार्‍या परिणामांचा 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग' या
वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात तथाकथित 'पुरोगामी', तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी 'सनातन संस्था' आहे खरी पुरोगामी !

सध्या भारतीय पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आहारी गेले आहेत. ते हिंदु संस्कृतीत सांगितल्यानुसार दिनचर्या, अन्नग्रहण, वस्त्रधारण, अलंकार इत्यादींतील आचारधर्माचे पालन न करता पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करत आहेत, असे दिसून येते. खरेतर हिंदु धर्म ईश्‍वरनिर्मित असून हिंदु संस्कृती मनुष्यजन्माच्या 'ईश्‍वरप्राप्ती' या परमोच्च ध्येयाचा, म्हणजेच मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवते. तरीही भारतीय अज्ञानाने पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. संगीत ऐकणे, ही साधी गोष्टही याला अपवाद नाही.

हिंदु धर्माने साधना करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला या कलाही ईश्‍वरप्राप्तीचे मार्ग आहेत; म्हणून भारतीय संगीतही सात्त्विक आहे. त्यामध्ये ईश्‍वराची आराधना आहे. असे असूनही पाश्‍चात्त्यांच्या आहारी गेलेले, भारतीय संगीत ऐकायचे सोडून 'पॉप' संगीत ऐकतात.

येथे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने 'पाश्‍चात्त्य संगीत ऐकणे' आणि 'भारतीय संगीत ऐकणे' यांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. साधकांनी पाश्‍चात्त्य संगीतामध्ये 'पॉप' संगीत ऐकले आणि भारतीय संगीतामध्ये संत प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकली. हा अभ्यास १.१.२००९ ते २३.२.२००९ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग' (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे करण्यात आला. यामध्ये केलेल्या प्रयोगांची माहिती येथे देत आहोत.

१. 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग (Electrosomatographic Scanning)' या वैज्ञानिक पद्धतीची ओळख

या स्कॅनिंग पद्धतीत संपूर्ण शरिरातील सर्व अवयव आणि संस्था यांच्या कार्याचा आलेख – इलेक्ट्रोसोमॅटोग्राम (Electrosomatogram – ESG) काढण्यात येतो. हा इलेक्ट्रोसोमॅटोग्राम काढण्यासाठी सर्वज्ञात असलेले हृदयालेख (ECG) आणि मेंदूआलेख (EEG) काढण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान वापरले जाते. या पद्धतीद्वारे व्यक्तीतील कुंडलिनीचक्रांच्या स्थितीचा अभ्यास करता येतो.

२. प्रयोग

हे प्रयोग १० साधकांवर करण्यात आले. प्रथम त्यांच्या कुंडलिनीचक्रांच्या स्थितीच्या मूळ नोंदी घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी प्रथम 'पॉप संगीत ऐकणे' हा प्रयोग केला आणि नंतर 'प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकणे' हा प्रयोग केला. या प्रयोगांत त्यांच्या सप्तचक्रांवर होणार्‍या परिणामांच्या नोंदी इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग उपकरणाद्वारे ठराविक कालावधीने घेण्यात आल्या. त्यांची सप्तचक्रे मूळ स्थितीत येईपर्यंत या नोंदी घेण्यात आल्या. या नोंदी स्तंभीय आलेखांच्या आणि संख्यांच्या स्वरूपात प्राप्त होतात.

या नोंदी कशा असतात, हे कळण्यासाठी येथे आपण प्रातिनिधिक स्वरूपात एका साधकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या नोंदी बघूया. पॉप संगीत ऐकणे या प्रयोगात एका साधकाच्या सप्तचक्रांच्या मूळ नोंदींमध्ये कसा फरक पडला, हे यावरून लक्षात येईल.

प्रयोगामध्ये एखाद्या चक्राच्या नोंदीची संख्या त्या चक्राच्या मूळ स्थितीतील नोंदीपेक्षा न्यून होणे, म्हणजे ते चक्र निष्क्रीय होणे आणि याउलट ती संख्या वाढणे, म्हणजे ते चक्र सक्रीय किंवा कार्यरत होणे. वरील सारणीवरून 'पॉप संगीत ऐकणे' या प्रयोगामध्ये सातही चक्रे निष्क्रीय झाली आहेत, असे लक्षात येते. 'पॉप' संगीत ऐकल्यावर केलेल्या चक्रांच्या नोंदींचा आलेख वरती दिला आहे.

३. प्रयोगातील निरीक्षणे

अ. 'पॉप' संगीत ऐकल्यावर १० पैकी ४ साधकांच्या कुंडलिनीच्या 'मणिपुर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार' या खालच्या ३ चक्रांची निष्क्रीयता वाढली, तर ३ साधकांच्या कुंडलिनीच्या 'सहस्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत' या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली.

आ. एका साधकाने दुपारी १.३० वाजता 'पॉप' संगीत ऐकले आणि त्यानंतर २० मिनिटांनी घेतलेल्या पहिल्या नोंदीत त्यांच्या कुंडलिनीच्या वरच्या चारही चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली. विशेषतः अनाहतचक्राची निष्क्रीयता लक्षणीयरित्या न्यून झाली. (मूळ स्थिती – ३८ होती ती – ७ झाली.)

इ. एका साधकने 'पॉप' संगीत ऐकल्यानंतर २३ घंटे ४५ मिनिटांनी, म्हणजे दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी त्याच्या कुंडलिनीच्या सर्व चक्रांची निष्क्रीयता लक्षणीयरित्या वाढली.

ई. साधकांनी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकल्यावर १० पैकी ३ साधकांच्या कुंडलिनीच्या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली, ४ साधकांच्या कुंडलिनीच्या वरच्या ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली, तर २ साधकांच्या कुंडलिनीच्या खालच्या ३ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली.

उ. साधकांनी 'पॉप' संगीत ऐकल्यावर त्याचा परिणाम टिकण्याचा किमान (४ घंटे ३८ मिनिटे) आणि कमाल (४८ घंटे ४५ मिनिटे) कालावधी हा प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकल्यावर त्याचा परिणाम टिकण्याच्या किमान (३ घंटे १६ मिनिटे) आणि कमाल (१२ घंटे २५ मिनिटे) कालावधीपेक्षा अधिक होता.

ऊ. एका साधकाने प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकल्यानंतर त्यांच्या पहिल्या नोंदीत वरच्या चार चक्रांची निष्क्रीयता वाढली होती; परंतु ३ घंटे २० मिनिटांनी घेतलेल्या दुसर्‍या नोंदीत त्यांच्या कुंडलिनीच्या वरच्या चार चक्रांची निष्क्रीयता लक्षणीयरित्या न्यून झाली.

४. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांचे निष्कर्ष आणि व्यक्तीवर होणारे परिणाम यांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. यामध्ये पुढील गोष्टीही अभ्यासणे चालू आहे.

अ. प्रत्येक वस्तूमध्ये सत्त्व-रज-तम या गुणांचे ठराविक प्रमाण असते आणि त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. तसा पॉप संगीत आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने यांतील त्रिगुणांचा सप्तचक्रांवर काय परिणाम झाला ?

आ. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीचा काय परिणाम होतो ?

इ. व्यक्तीच्या सप्तचक्रांवर सात्त्विकता किंवा असात्त्विकता यांचा वेगवेगळा परिणाम होतो का ?

या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'