कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !

मुलांना घडवण्यात पालकांनी दुर्लक्ष करू नये ! – योगेश ठाकूर, सनातन संस्था

मेळाव्यात सहभागी बालक-पालक

कळंबोली (नवी मुंबई) – आधुनिक तंत्रज्ञान आणि धावपळीचे युग यांमुळे मुलांचे संगोपन करणे हे पालकांसाठी मोठे आवाहन झाले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते. नोकरी करणारे आई-वडील, विभक्त कुटुंबपद्धत यांमुळे मुलांसाठी वेळ काढणे, त्यांच्या अडचणी जाणून त्यांना दिशा देणे याकडे दुर्लक्ष होते; मात्र मुलांची जडणघडण करण्यात पालकांनी दुर्लक्ष करू नये, असे उद्गार सनातन संस्थेचे श्री. योगेश ठाकूर यांनी काढले. सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व बालसंस्कार वर्गात येणारी मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी बालक-पालक मेळाव्याचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.‘पालकत्व’ निभावतांना येणार्‍या समस्यांविषयीही त्यांनी सांगितले. या मेळाव्याला बालक-पालक दोघांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकांनी मुलांमध्ये झालेले पालट संवाद सत्रात सांगितले.

पालकांचे अभिप्राय !

१. श्री. अनिल काळेन – सध्याच्या मुलांची दुःस्थिती झाली आहे. यावर पर्याय म्हणजे त्यांना सनातन संस्थेच्या बालसंस्कार वर्गात पाठवायला हवे. माझा मुलगा कु. आदित्य बालसंस्कार वर्गात जातो. ४ महिन्यांत त्याच्यातील आक्रमकता न्यून झाली.

२. सौ. विद्या विजय कोल्हापुरे – माझी मुलगी कु. साक्षी वर्गाला जाऊ लागल्यापासून सर्वांशी प्रेमाने बोलू लागली.

३. सौ. पूजा दादासाहेब कारंडे – माझी मुले कु. पार्थ कारंडे आणि कु. विहान कारंडे यांच्यात पालट झाला आहे. शाळेला सुटी असली, तरी ते लवकर उठतात. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात. बालसंस्कार वर्गामुळे आम्हाला सणांची माहिती मिळते.

बालसंस्कारवर्गाला येणार्‍या मुलांमध्ये झालेले पालट !

१. मुले सकाळी स्वतःहून उठतात आणि आवडीने देवपूजा करतात.

२. संस्कारवर्गात शिकवल्याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ श्लोकपठण करतात.

३. सण-उत्सवकाळात स्वतःहून रांगोळी काढतात.

४. शाळेत जाण्याची सिद्धता स्वतःहून करतात.

५. मुलांचा रागीटपणा न्यून झाला असून ते नम्रपणे वागतात. ज्येष्ठांना नमस्कार करतात.

Leave a Comment