नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये आणि उपस्थित युवती

कोल्हापूर – आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो. स्वयंसूचना दिल्याने आपले विचार आणि भावना यांमध्ये चांगला पालट घडून येतो. चांगल्या सवयी मनावर बिंबवणे आणि नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी येथील ‘एकलव्य महिला पोलीस ॲकडमी’ येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेल्या युवतींसाठी आयोजित मार्गदर्शनात ‘ताण-तणावमुक्त जीवन’ या विषयावर त्या बोलत होत्या. याचा लाभ २०० हून अधिक युवतींनी घेतला. ‘पोलीस प्रशिक्षणामध्ये स्वत:ची निवड झाली नाही, तरी खचून न जाता त्यावर मात करत स्वत:चे ध्येयनिश्चित होईपर्यंत प्रयत्न करावेत’, असेही सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनीही युवतींना मार्गदर्शन केले.

Leave a Comment