‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘वन्दे मातरम्’ संदर्भात भव्य प्रदर्शन

देहली, १० डिसेंबर (वार्ता.) – ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रजागृतीच्या पवित्र गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासह राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा सुवर्णसंगम साधत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भारत मंडपम् येथे १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भव्य ‘वन्दे मातरम्’ प्रदर्शन आणि विशेष सत्र यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात मातृभूमीवरील प्रेम, राष्ट्रासाठीचा त्याग आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी दिलेले अमूल्य योगदान लोकांना अनुभवता येणार आहे.

श्री. अभय वर्तक

‘वन्दे मातरम्’ने संपूर्ण भारताला राष्ट्रभावनेच्या सूत्रात बांधले. स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठीचे समर्पण आणि असंख्य क्रांतीकारकांच्या हृदयातील ऊर्जा या गीताने जिवंत केल्या आहेत. ही प्रेरणा आजच्या यु‍वापिढीपर्यंत पोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे’, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले.

या विशेष कार्यक्रमातील आकर्षणे

  • १ सहस्र जणांचे समूहगायन : ‍‘वन्दे मातरम्’ राष्ट्रभावनेचे महाअभियान
  • इतिहासाचे चलचित्र-प्रक्षेपण : ‘वन्दे मातरम्’चा उगम, संघर्षगाथा आणि राष्ट्र उभारणीतील भूमिका
  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे मार्गदर्शन : ‘वन्दे मातरम्’च्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वावर भाष्य

Leave a Comment