सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मार्गदर्शक संदेश !

हिंदु धर्मबंधूंनो आणि भगिनींनो,आज आपण सर्वजण येथे (सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव) एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलो आहोत. हा केवळ एक सोहळा नाही, तर हा सनातन राष्ट्राचा ‘शंखनाद’ आहे. शंखनाद युद्धापूर्वी केला जातो किंवा शुभकार्याच्या आरंभी. आजचा हा शंखनाद एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे.
१. हिंदूंची लज्जास्पद सद्य:स्थिती बदलायची आहे !
आज देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तरीही आपल्याला आपल्याच देशात, आपल्याच धर्माचे पालन करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या भूमीवर प्रभु श्रीरामाने आदर्श राज्य केले, तिथे आज ‘रामराज्य’ सोडाच; पण भारताच्या काश्मीर, केरळ, बंगाल आदी अनेक राज्यांत हिंदूंना साधे सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगणेही कठीण होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. हे चित्र आता आपल्याला बदलायचे आहे.
२. रामराज्य हेच आपले ध्येय
आपले ध्येय काय आहे? केवळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हे आपले अंतिम ध्येय नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हे एक शरीर असेल, तर ‘रामराज्य’ हा त्याचा आत्मा आहे. आपल्याला भारताला पुन्हा एकदा ‘रामराज्य’ स्थापन करायचे आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श !
आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि मोगलांचे साम्राज्य असतांनाही महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ते केवळ राज्य नव्हते, तर ते प्रजेच्या कल्याणार्थ ‘रामराज्य’ होते. जर महाराजांनी ते त्या काळात करून दाखवले, तर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने असूनही ते का करू शकत नाही? आपणही निश्चितच करू शकतो ! श्रीराम आणि संत यांच्या कृपाशीर्वादाने आपण त्या दिशेने वाटचाल नक्कीच करू शकतो.
४. कृतीची दिशा
रामराज्याची स्थापना केवळ भाषणांनी होणार नाही. त्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर कृती करावी लागेल.
४ अ. शारीरिक स्तर
जेथे धर्मावर आघात होईल, तेथे कायदेशीर मार्गाने आणि संघटित होऊन विरोध करणे
४ आ. मानसिक-वैचारिक स्तर
सनातन धर्म आणि राष्ट्र यांवरील संकटांविषयी सतत जागृती करणे
४ इ. आध्यात्मिक स्तर
हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कोणत्याही संघर्षात जिंकण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान लागते.
५. रामराज्याची संकल्पना आणि प्रशासकीय सुधारणा
रामराज्यासाठी आदर्श प्रशासन (Good Governance) निर्माण करावे लागेल. त्यासाठी आपल्याला वर्तमान व्यवस्थेत सुधारणा करावी लागेल. आज आपण पाहतो की, सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य माणसाला अनेकदा वाईट वागणूक मिळते, कामे वेळेवर होत नाहीत. भ्रष्टाचार आणि अनागोंदी रामराज्यात चालणार नाही.
म्हणूनच येथे जमलेल्या प्रत्येकाला माझे आवाहन आहे, आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून या भ्रष्टाचाराचा सामना करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा कर्मचार्याकडून अयोग्य वागणूक मिळाली, लाच मागितली गेली किंवा काम अडवून ठेवले, तर घाबरू नका. त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. तुमचे हे अनुभव लिहून आम्हाला पाठवा. आम्ही ते वृत्तपत्रांतून आणि ‘सनातन प्रभात’मधून प्रकाशित करू. प्रशासनातील दोषांविषयी आपण भाषणांतून आणि माध्यमातून जनजागृती करू. अशा प्रकारची जागृती करणे, हे एक राज्यघटनात्मक कर्तव्य आहे आणि रामराज्य स्थापनेच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल असेल.
६. रामराज्य आणण्यासाठी साधना करा !
केवळ प्रशासनात सुधारणा करून भागणार नाही. ‘यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हटले जाते; पण लोकशाहीत ‘यथा प्रजा, तथा राजा’ असते. रामराज्यात प्रत्येक नागरिक हा सात्त्विक होता, धर्माचरण करणारा होता, म्हणूनच तिथे रामराज्य होते.
आतापर्यंत अनेक राजवटी आल्या; पण कोणीही आपल्याला ‘रामराज्य’ देऊ शकले नाही; कारण समाज आणि राज्यकर्ते साधना करणारे नव्हते. रामराज्य हवे असेल, तर आधी आपल्याला ‘रामभक्त’ बनावे लागेल.
सध्याच्या काळात रामराज्याच्या कार्यात ईश्वरी बळ मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप कमीतकमी अर्धा तास तरी करावा. त्यातून आपण आध्यात्मिक बळ वाढवू शकतो. जेवढी आपली साधना वाढेल, तेवढी आपल्यातील सात्त्विकता वाढेल. रामराज्य म्हणजे सात्त्विक लोकांचेच राष्ट्र असते; म्हणून प्रत्येकाने सात्त्विक बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
७. रामराज्यासाठी योगदान द्या !
‘सनातन राष्ट्र’, म्हणजेच रामराज्याचे हे कार्य ईश्वराचे आहे आणि ते होणारच आहे. प्रश्न एवढाच आहे की, यात आपला सहभाग काय ? ज्याला जसे जमेल, तसे या कार्यात सहभागी व्हा. कोणाला लिखाणातून जमेल, कोणाला कायदेशीर लढ्यातून, कोणाला अर्पण देऊन, तर कोणाला प्रत्यक्ष कार्य करून जमेल. रामराज्यासाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
आजपासूनच आपण स्वतःमध्ये आणि समाजात बदल घडवण्याचा संकल्प करूया. श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया की, ‘आम्हाला हे रामराज्याच्या स्थापनेचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य दे !’
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ! जय श्रीराम !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : राष्ट्र, संस्कृती व मंदिर रक्षण सत्र