सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची पत्रकार परिषद

(डावीकडून) श्री. चेतन राजहंस, श्री. अभय वर्तक, बोलतांना श्री. उदय माहुरकर, सद्गुरु चारुदत्त पिंगळे आणि अधिवक्त्या अमिता सचदेवा

नवी देहली : छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या लढ्यामुळेच मोगल साम्राज्याचा अंत झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यामागील पराक्रम देशात सांगितला गेला नाही. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात छत्रपती शिवरायांचे शौर्य मोठ्या प्रमाणात प्रस्तुत केले जाणार आहे. उत्तर भारतात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रसार करणारा हा सर्वांत मोठा महोत्सव आहे, असे विधान ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी केले. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्’मध्ये ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. चेतन राजहंस आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा उपस्थित होत्या.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

या वेळी श्री. उदय माहुरकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशावर डाव्या विचारसरणीचा पगडा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, महाराणा प्रताप, चक्रधरस्वामी आदी संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याचा प्रसार करण्यात आला नाही. राष्ट्रपुरुषांच्या पराक्रमाच्या इतिहासातून देशात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास साहाय्य झाले असते. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे संपूर्ण देशात राष्ट्रीत्वाची भावना निर्माण होईल. प्रत्येक भारतियाने या महोत्सवातील प्रदर्शन पहावी.’’

भावी पिढीपुढे सनातन राष्ट्राचा आदर्श निर्माण करणारा महोत्सव ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. अभय विजय वर्तक

सनातन राष्ट्र हा भारताचा आत्मा आहे. भारतातील संतांनी विश्वातील प्रत्येक देशात सनातन धर्माचा विचार पोचवला आहे. संपूर्ण विश्व सनातन धर्माकडे आकृष्ट होत आहे. विश्वाचा ‘आध्यात्मिक गुरु’ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. अशा वेळी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे भावी पिढीपुढे सनातन संस्कृतीचा आदर्श निर्माण होईल. युवा पिढीमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी २५० हून अधिक प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन महोत्सवात असणार आहे. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. भावी पिढीमध्ये संस्कृती रक्षणासाठी शौर्य निर्माण करतील, अशी प्राचीन शस्त्रांची प्रात्यक्षिकेही महोत्सवात सादर केली जाणार आहेत.

विविध देशांतून ८०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

८०० हून अधिक संघटना आणि विविध देशांतील प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी हाेणार आहेत. महोत्सवात ‘राष्ट्ररक्षण’, ‘शहरी नक्षलवाद’ आदी विषयांवर विचारमंथन होणार आहे. महोत्सवाची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच त्यात सहभागी होण्यासाठी ‘SanatanRashtraShankhnad.in’ या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, तसेच कार्यक्रमस्थळी येतांना समवेत शासकीय ओळखपत्र आणावे.

सनातन परंपरेचे रक्षण आणि प्रचार यांसाठी महोत्सवाचे आयोजन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहास हा देशाचा आत्मा आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपण पाश्चात्त्य गुलामगिरीच्या मानसिकतेकडे झुकलो. गुलामगिरीची मानसिकता सोडून आपण सनातन संस्कृतीचा अंगीकार करायला हवा. यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपण जपला पाहिजे. हा वारसा पुन्हा जागृत करण्यासाठीच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आहे. सनातन राष्ट्राच्या कार्यात योगदान देणारे महोत्सवात एकत्रित येणार आहेत. विश्वाचे कल्याण केवळ सनातन परंपराच करू शकते. विनाशकाळात विश्वाला वाचवण्यास समर्थ असलेल्या सनातन परंपरेचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठीच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिवक्ते आणि निवृत्त न्यायाधीश महोत्सवात सहभागी होणार ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्त्या (श्रीमती) अमिता सचदेवा, देहली

विविध राज्यांतील ‘बार असोसिएशन’शी संपर्क करून त्यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक वरिष्ठ अधिवक्ते आणि निवृत्त न्यायाधीश महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत. न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून रहावा, या दृष्टीनेही महोत्सवामध्ये चर्चा होणार आहे.

‘उदय इंडिया’ यू ट्यूब वाहिनीवर विशेष मुलाखत

डावीकडून बोलतांना श्री. रमेश शिंदे आणि श्री. अंशुमान आनंद

नवी देहली – ‘धर्माे रक्षति रक्षितः’ (धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो) या उक्तीनुसार राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहलीतील प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्’ येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राष्ट्रद्वेषी शक्तींच्या विरोधातील एक प्रखर ‘शंखनाद’ ठरेल, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘उदय इंडिया’ या यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. वाहिनीचे श्री. अंशुमान आनंद यांनी ही मुलाखत घेतली.

‘राजधानीतील असुरक्षिततेच्या वातावरणात राष्ट्ररक्षणाचा जागर’ या महोत्सवाच्या उद्देशाविषयी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आज देहलीसारख्या राजधानीत दंगली घडवल्या जातात, बाँबस्फोट करणारे देशद्रोही सापडतात. लाल किल्ल्याजवळ नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटामध्ये ‘अल् फलाह’ विद्यापिठामधून शिकलेले मुसलमान आधुनिक वैद्य सहभागी होते. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात केवळ चर्चा न करता कृतीशील उपाययोजना मांडण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. इंग्रजांनी वर्ष १८८५ मध्ये ‘शस्त्रास्त्र कायदा’ (वेपन्स ॲक्ट) आणून हिंदूंना नि:शस्त्र केले, ती मानसिकता आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून हा महोत्सव पार पडणार आहे. १३ डिसेंबरचा दिवस ‘संस्कृती रक्षण’ आणि १४ डिसेंबरचा दिवस ‘राष्ट्र सुरक्षा’ या विषयांवर अनेक मंत्री, सैन्यातील माजी अधिकारी, विचारवंत आणि मान्यवर मार्गदर्शन करतील.

शिवकालीन मूळ शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन !

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत मंडपम्’च्या सभागृह क्र. १२ मध्ये होणारे शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ! यात केवळ मावळ्यांचीच नव्हे, तर त्या काळातील राजस्त्रिया आणि बालयोद्धे यांचीही शस्त्रे पहाता येणार आहेत. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेली अनेक मूळ शस्त्रे देहलीकरांना पहाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. स्वराज्यात महिला आणि बालकेही स्वसंरक्षणासाठी किती सजग होती, हे या प्रदर्शनातून स्पष्ट होईल.

‘सव्यसाची गुरुकुलम्’च्या युवतींची शौर्यगाथा !

आजच्या काळात मुले परीक्षेच्या तणावाखाली असतात; मात्र शिवकाळात बालवयातच शस्त्रविद्येत पारंगत कसे होता येत होते ? हे दाखवण्यासाठी कोल्हापूर येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’चे विद्यार्थी उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे यात अनेक युवती आणि रणरागिणी पारंपरिक शस्त्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.

प्रारब्ध’ या ‘यू ट्यूब’वाहिनीचे संपादक श्री. अवनीश शर्मा यांनी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची देहली येथील भारत मंडपम् येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली. या मुलाखतीत श्री. चेतन राजहंस यांनी या महोत्सवाची विस्ताराने माहिती दिली. या मुलाखतीचा सारंश येथे वाचकांसाठी देत आहोत.

१. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यामागील संकल्पना ! : सनातन संस्थेची स्थापना वर्ष १९९९ मध्ये झाली. संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन होत आहे. संस्थेची स्थापना आध्यात्मिक स्तरावर झाली असतांना काहींना ‘सनातन राष्ट्र’ ही संकल्पना एकप्रकारे सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि राजकीय वाटते; पण संस्था मूळ ध्येयानुसार मार्गक्रमण करत आहे. वर्ष १९८७ मध्ये संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनात संत भक्तराज महाराज ‘गुरु’ म्हणून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक साधना केली. वर्ष १९९५ मध्ये गुरूंनी त्यांच्या अंतिम क्षणी शिष्य डॉ. जयंत आठवले यांना सांगितले, ‘‘वर्ष २०१२ नंतर तामसिक राजकीय शक्ती परास्त होऊ लागतील. वर्ष २०२० मध्ये महामारी येईल आणि वर्ष २०२५ नंतर भारतात हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल काळ येईल. तुम्ही ज्या सनातन धर्माचे अध्ययन केले आहे, त्या अध्यात्मावर आधारित आपल्याला राष्ट्ररचनेचा सिद्धांत स्थापित करावा लागेल. आपली सनातन परंपरा, सनातन संस्कृती आणि सांस्कृतिक राष्ट्र्वाद आपल्याला पुनर्जीवित करावा लागेल. त्यासाठी तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करा.’’

वर्ष १९९५ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ नावाचा ग्रंथ लिहिला, त्यात याचा उल्लेख आहे. याच आधारावर वर्ष २०२५ मध्ये गोव्यात प्रथम ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. त्याला ३० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती होती. त्यानंतर आता देहलीत दुसरा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होत आहे. सनातन परंपरा, सभ्यता आणि संस्कृती पुनर्जीवित करणे अन् सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रूपात या गोष्टी स्थापित करणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

२. शंखनाद महोत्सवातील विविध चर्चासत्रे आणि संबोधन

अ. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे मुळात सनातन राष्ट्र आणि आदर्श राज्य होते, हे लक्षात घेऊन शंखनाद महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १३ डिसेंबर या दिवशी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्कृतीरक्षण’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. सुव्यवस्था, संस्कृती, मंदिर आणि न्यायव्यवस्था यांच्या दृष्टीकोनातून ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्यपद्धत आणि आजचा वर्तमान भारत’ या विषयावर ‘सनातन संवाद’ आयोजित केला आहे. यात भारताचे माजी मुख्य न्यायाधीश उदय ललित, मंदिरमुक्ती संग्रामाशी संबंधित अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तसेच लेखिका शेफाली वैद्य सहभागी होतील. या दिवशी ‘संस्कृती संवाद’ही आयोजित करण्यात आला आहे. त्यात भारतीय संस्कृतीचा र्‍हास करणार्‍या पैलूंवर प्रकाश टाकला जाईल, तसेच ‘सांस्कृतिक जागृती’ या विषयावर चर्चा होईल. यासमवेतच ‘मंदिर संवाद’ही असेल. त्यात हिंदु मंदिरांशी संबंधित झालेल्या आणि उर्वरित कार्याविषयी मान्यवर मार्गदर्शन करतील.

आ. १४ डिसेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर चर्चा असणार आहे. त्याची ‘सनातन धर्माच्या सुरक्षेत भारताची सुरक्षा’ ही संकल्पना आहे. सनातन राष्ट्राचा मूळ संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा आहे. अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा यांविषयी ‘रणसंवाद’ होईल. यात भूदल, वायूदल आणि नौदल यांचे निवृत्त अधिकारी, ‘संरक्षण संशोधन अन् विकास संस्थे’चे (डी.आर्.डी.ओ.चे) निवृत्त शास्त्रज्ञ सहभागी होतील. नक्षलवाद, तसेच शहरी नक्षलवाद या सूत्रांवर चर्चा होईल. यासमवेतच ‘भारताच्या प्रगतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक संस्था, तसेच व्यक्ती यांचे काय योगदान असायला हवे ?’, यावर जागृती करण्यात येईल. शेवटी ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्राची दिशा काय असायला हवी ?’ याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरी मार्गदर्शन करतील.

३. ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ प्रदर्शन ! : १३, १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शस्त्रांचे हे दुर्लभ प्रदर्शन असेल. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रांचा समावेश आहे. त्यांनी हाताळलेल्या ८ शस्त्रांसह त्यांच्या भवानी तलवारीचेही प्रत्यक्ष दर्शन घेता येईल. यासमवेतच मराठा साम्राज्यातील अन्य सेनापतींनी चालवलेली शस्त्रे असणार आहेत. त्यात सरदार हंबीरराव मोहिते यांचा भाला, अशी विविध शस्त्रे असतील. महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह विजयनगर साम्राज्यातील काही शस्त्रांचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.

४. १ सहस्र वर्षांनी प्रथमच मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन : १२ ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्रात आहे. सोम, म्हणजे भगवान चंद्रमा ! भगवान चंद्रमाचे नाव ‘सोमनाथ’ आहे. हे ज्योतिर्लिंग हवेत तरंगत होते. त्याच्या खालून वारा जात होता. एवढे लोह चुंबकीय तत्त्व त्यात होते. ते पृथ्वीच्या घटकांपासून बनले नव्हते, तर चंद्रमाच्या घटकांपासून बनले होते. त्यावर हिंदूंची श्रद्धा होती. त्यामुळे १ सहस्र वर्षांपूर्वी गझनीच्या महंमदाने ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर तेथील पुजारी कुटुंबाने त्या शिवलिंगाचे सर्व अवशेष एकत्र करून ते तमिळनाडू येथे नेले. त्यांच्या घराण्याने ते १ सहस्र वर्षे सुरक्षित ठेवले. ‘हे दिव्य शिवलिंग कांचीचे शंकराचार्य सुरक्षित ठेवू शकतील’, असे त्यांना वाटले. त्यामुळे ते वर्ष १९२४ मध्ये स्वामी शंकराचार्यांकडे गेले. स्वामीजी त्यांना म्हणाले, ‘‘हे अवशेष अजून १०० वर्षे तुम्ही सांभाळा; कारण १०० वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर होईल, तसेच वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ होईल. त्या कुंभामध्ये या अवशेषांना स्नान घाला. त्यानंतर हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल काळ होईल, तेव्हा त्याचे दर्शन सर्वत्र उपलब्ध करून द्या.’’ या शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम भारत मंडपम्मध्ये या दिव्य ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दर्शन सर्वांना घेता येणार आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथील पत्रकार परिषद

डावीकडून दिगंबर रैना, रमेश शिंदे, चेतन राजहंस आणि जगदीश चौधरी

फरीदाबाद – ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी मोहिमांपासून ते चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईपर्यंतचा प्रवास भारताने केला आहे; मात्र देशाला अद्यापही आतंकवादाचा धोका आहे. देशविरोधी विदेशी शक्तीही डीप स्टेट, नक्षलवाद, विघटनवादी, घुसखोरी, नॅरेटिव्ह (खोटे कथानक) युद्ध, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी माध्यमांतून भारताला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताला दिखाऊ धर्मनिरपेक्षतेची नव्हे, तर प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्षात्रतेजाची नितांत आवश्यकता आहे.

सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचे जागरण होण्यासाठी भारताने विश्वकल्याणकारी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उभे रहाणे अत्यावश्यक आहे. हा संदेश देशभर पोचवण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्’मध्ये होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

९ डिसेंबर या दिवशी अरावली गोल्फ क्लबमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर एज्युकेशन अँड रिसर्च बालाजी ग्रुप ऑफ कॉलेज’चे अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी आणि ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे प्रमुख कार्यवाह श्री. दिगंबर रैना उपस्थित होते.

सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस म्हणाले,

श्री. चेतन राजहंस

‘‘सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष, तसेच रामराज्यासम ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेसाठी कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गोव्यात पहिला ‘शंखनाद महोत्सव’ झाला. त्याला २३ देशांतील ३० सहस्रांहून अधिक भाविकांची अभूतपूर्व उपस्थिती, अनेक साधू-संत, गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती लाभली. महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. त्यानंतर आता देहली होणारा हा महोत्सव राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणाचा शंखनाद करणारा असेल.’’

नवी देहली – येथील ‘भारत मंडपम्’ या भव्य वास्तूच्या सभागृहात साजरा होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ यांद्वारे प्रसार करण्यात येत आहे. ‘सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे देहलीत सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचा महासंगम असून होत असून यामध्ये शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन भरणार आहे. हे देहलीत पहिल्यांदाच होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहा’, असे आवाहन रेडिओवरून (नभोवाणीवरून) करण्यात येत आहे.

७ ते १४ डिसेंबर या कालावधीत हा प्रसार दोन्ही रेडिओंवर चालू असून सकाळी ७ ते ११, दुपारी २ ते सायंकाळी ५ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत एकूण २० वेळा १५ सेकंदांचे विज्ञापन प्रसारित करण्यात येत आहे. ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ हे भारतातील प्रसिद्ध ‘रेडिओ स्टेशन्स’ (नभोवाणी केंद्र) आहेत. नवी देहलीमध्ये ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ची  ऐकणार्‍यांची संख्या मोठी असल्यामुळे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा विषय देहलीतील लाखो लोकांपर्यंत पोचणार आहे.

Leave a Comment