अमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट !

रामनाथी, १० ऑक्टोबर (वार्ता.) – अमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ. श्रीकांत पाटील यांनी सनातन आश्रमाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सनातन आश्रमातील साधकांना आध्यात्मिक ऊर्जेसंदर्भात भारत, अमेरिका आणि कॅनडा येथील विद्यापिठे अन् संशोधन केंद्रे यांमध्ये केलेल्या प्रयोगांविषयी अवगत केले. या प्रयोगांमध्ये विविध द्रव्ये (मटेरिअल्स), जिवाणू, वनस्पती, प्राणी आणि मानवी पेशी या सर्वांवरच प.पू. महेंद्र त्रिवेदी गुरुजींनी संचलीत केलल्या आध्यात्मिक ऊर्जेचा कसा परिणाम होतो, यासंदर्भात केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांविषयी माहिती दिली.

या प्रयोगांत मिळालेले निष्कर्ष आधुनिक वैज्ञानिकांसाठी अभूतपूर्व होते. याविषयी बोलतांना डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, ‘‘रात्री झोप चांगली येणे, सकाळी पोट साफ होणे आणि स्वतःच्या आरोग्यात सुधारणा करणे आदी गोष्टीही मानव स्वतः ठरवूनही प्रत्येक वेळी करू शकत नाही. सर्वोच्च शक्तीच (‘सुप्रिम पावर’) सर्व काही नियंत्रित करत असते. या शक्तीसंदर्भातील अनेक वैज्ञानिक प्रयोग आम्ही भारत, अमेरिका आणि कॅनडा येथे केले आहेत. या प्रयोगांत मिळालेले निष्कर्ष आधुनिक वैज्ञानिकांसाठीही अभूतपूर्व आहेत. आम्ही केलेले सर्व वैज्ञानिक प्रयोग आधुनिक, मान्यताप्राप्त आणि सुप्रतिष्ठित प्रयोगशाळा, संशोधन केंद्र अन् विद्यापिठे यातील तज्ञ संशोधकांनी केलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शंकेला (‘प्लासिबो रिस्पॉन्स (Placebo Response)’लाही) जागाच उरत नाही. या सर्व प्रयोगांविषयी माहिती www.trivediscience.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.’’

सनातन आश्रमात येण्याची प्रेरणा का झाली, याविषयी सांगतांना डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, ‘‘श्री. अभय वर्तक आणि प्रा. श्याम मानव यांची दूरचित्रवाणीवरील चर्चा मी पाहिली. त्या चर्चेत प्रा. श्याम मानव आध्यात्मिक गुरूंविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य करत होतेे. ते ऐकून मला पुष्कळ राग आला. ‘आध्यात्मिक ऊर्जा काय असते’, याविषयी आम्ही जगातील सर्वांत प्रतिष्ठित प्रयोगशाळांमध्ये संशोधन केले आणि त्यात आध्यात्मिक ऊर्जेची परिणामकारकता दिसून आली आहे. ते संशोधन श्याम मानवसारख्या विचारसरणीच्या लोकांना कळले, तर कोणत्याही आध्यात्मिक गुरूंविषयी बोलण्यापूर्वी ते सहस्र वेळा विचार करतील, असे मला वाटले. ती चर्चा पाहिल्यावर मी इंटरनेटवर संस्थेविषयी माहिती शोधली. ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संकेतस्थळावरील लेख अभ्यासले. ‘दैवी कणां’विषयीचे त्यांच्या संशोधनातील वैज्ञानिक दृष्टीकोन मला भावला. सनातन संस्था शास्त्रशुद्धपणे आध्यात्मिक कार्य करत असल्याची निश्‍चिती झाल्यावर मी आमच्या संशोधनाची माहिती श्री. अभय वर्तक यांना कळवली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर मी सनातन आश्रमात येण्याचे निमंत्रण स्वीकारले.’’

आश्रमातील वास्तव्यादरम्यान डॉ. श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या संशोधनकार्याविषयी सनातनच्या साधकांना सखोल माहिती दिली. सनातन आश्रम पाहिल्यावर आणि येथील कार्य जाणून घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘मी सनातन आश्रमात प्रथमच येत आहे. हा आश्रम पुष्कळ छान वाटला. येथील स्वच्छता, व्यवस्था, साधकांचा समर्पणभाव हे अप्रतिम आहे. अन्य कोणत्याही व्यवसायात (करीअर) मध्ये मिळू शकत नाही, असे समाधान आध्यात्मिक कार्य करतांना मिळते, हे तुम्ही (साधक) अनुभवत आहातच.’’