मुलांना घडवण्यासाठी पालकत्व आदर्श असणे आवश्यक ! – सौ. सुलभा तांबडे, सनातन संस्था

पालक मेळाव्यात मार्गदर्शन  करताना  सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे

सांगली, २७ जुलै (वार्ता.) – मुलांवर आदर्श संस्कार घडवण्यासाठी पालकांचे वर्तन नेहमीच आदर्श असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील पसायदान विद्यामंदिरामधील पालक मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे यांनी केले. ‘पसायदान शिक्षण संस्थे’च्या पसायदान विद्यामंदिर आणि पसायदान माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत २५ जुलै या दिवशी श्रावण मासारंभ मुहूर्तावर ‘शिक्षक पालक सहविचार सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे आणि सौ. सरिता चौगुले यांनी पालकांना शिक्षणाच्या सोबत संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालक आणि शिक्षक यांच्या वर्तनातून ती सतत शिकत असतात.

पालकांचे वर्तन आदर्श असल्यास पुढील पिढी आदर्श घडेल. शाळेत आणि घरात सकारात्मक अन् संस्कारक्षम वातावरण निर्माण झाल्यास हे सहज शक्य होईल. भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी यांचा अनावश्यक वापर टाळून अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यासाठी मुलांनी पहाटे लवकर उठून अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे, असे मार्गदर्शन उपस्थित पालकांना केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी पाटील यांच्यासह अन्य शिक्षक आणि पालक असे पुष्कळ जण उपस्थित होते.

Leave a Comment