गोव्यातील गुरुपौर्णिमा महोत्सव

महोत्सवाला उपस्थित अन्य मान्यवर
पर्वरी येथील महोत्सवाला ‘करणी सेने’चे गोवा राज्यप्रमुख श्री. संतोष सिंह राजपूत, ‘अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान’चे श्री. आनंद वाचासुंदर, काराभाट येथील श्री कात्यायनी देवस्थानचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप पेडणेकर यांची उपस्थिती होती. म्हापसा येथील महोत्सवाला म्हापसा पालिकेच्या नगरसेविका (डॉ.) नूतन बिचोलकर, श्री. सुधीर कांदोळकर, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित आणि नास्नोडा पंचायतीचे पंचसदस्य श्री. गोविंद गोवेकर यांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. महोत्सवात सकाळच्या सत्रात डिचोली येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वी इयत्तेच्या विज्ञान शाखेत ७४ टक्के गुण मिळवल्याबद्दल सनातनच्या साधिका कु. दूर्वा दत्ता नाईक हिचा सनातनचे ज्येष्ठ साधक श्री. पांडुरंग बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले वेदमूर्ती श्री. शिवानंद भट खेडेकर यांचा सनातनचे ज्येेष्ठ साधक श्री. अरुण हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
२. मडगाव येथील महोत्सवात सकाळच्या सत्रात कु. अभिषेक परब हा मतीमंद मुलगा पूजाविधी आणि आरती होईपर्यंत एकाग्रतेने सहभागी झाला.
गुलामीची मानसिकता सोडून देणे आवश्यक ! अधिवक्ता राजीव ढवळीकर

वास्को – भगवद्गीता ही केवळ अध्यात्मप्रवण व्हायला सांगत नाही, तर युद्धासाठी निश्चयाने लढायलाही शिकवते. अध्यात्म हे केवळ नामस्मरण सांगत नाही, तर कृती करायला तत्परता दाखवण्यासाठी प्रेरितही करते. पोर्तुगीज, इंग्रज, मोगल आदींनी आमच्यावर केलेल्या अत्याचाराचे कारण म्हणजे आमचा असंघटितपणा होय ! आर्य चाणक्य यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवले, त्याप्रमाणे आपण शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम होऊन, संघटित होऊन पराक्रमाची गौरवशाली परंपरा जपणे आवश्यक आहे. आपण केवळ गुलामीची मानसिकता सोडून देणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिवक्ता श्री. राजीव ढवळीकर यांनी केले. नवे वाडे, वास्को येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण गुरु शोधायला पाहिजे ! – अरुण देसाई, माजी सनदी अधिकारी

मडगाव – जीवनामध्ये गुरु अनेक रुपांत भेटत असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण गुरु शोधायला हवा. गुरु हे परमोच्च स्थान आहे. आई, शिक्षक, समाज हे सर्वच आपले गुरु होत. गुरूंची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा होय. कलियुगामध्ये अनिष्ट काळाला सामोरे जाण्यासाठी गुरूंविना अन्य साधन नाही, असे मार्गदर्शन केरी, फोंडा येथील विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष, तसेच ‘जाणता राजा’ आणि ‘संभवामी युगे युगे’ या महानाट्यांचे निर्माते आणि निवृत्त सनदी अधिकारी श्री. अरुण देसाई यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने दवर्ली, मडगाव येथील बाबू नायक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री. अरुण देसाई प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.
हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध होऊया ! – सौ. सिद्धि प्रभू पोरोब, नगराध्यक्षा, सांखळी नगरपालिका

सांखळी – जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. यानुसार सर्व महिलांनी आपल्या पाल्यांमध्ये देव, देश आणि धर्म यांप्रती प्रेम आणि अभिमान जागवणे, ही आज काळाची आवश्यकता आहे आणि तरच भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून उदयास येईल. आपला जन्म सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी झालेला नाही, तर हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी आपणाला कार्य करायचे आहे. हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध होऊया. समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, धौम्य ऋषि आणि शिष्य आरुणी, अशी आपली गुरु-शिष्य परंपरा आहे. याचा आदर्श आजच्या युवकांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असे आवाहन सांखळी पालिकेच्या नगराध्यक्ष सौ. सिद्धि प्रभू पोरोब यांनी केले. होंडा येथील सुंदरम् सभागृहात आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या.
सर्व व्यवस्था सनातन परंपरेला अनुकूल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – अभिजीत साधले, प्राचीन भारतीय स्थापत्यकला तज्ञ

पर्वरी ‘सनातन’ हा शब्द भूत, वर्तमान आणि भविष्य या काळांमध्ये व्यापून गेला आहे. जगातील अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या; परंतु अतिशय प्राचीन अशी भारतीय संस्कृती चैतन्यमय असल्याने आजही जिवंत आहे. अनेक पंथ अस्तित्वात आले आणि ते एकाच पुस्तकात सीमित आहेत; मात्र भारतीय संस्कृती ही कुठल्याही घटनेनंतर किंवा कुठल्याही एका पुस्तकात सीमित नाही, तर ती कालसुसंगत अशी संस्कृती आहे. सनातन धर्मातील तत्त्वांचे आपण अनुकरण केले पाहिजे. सर्व व्यवस्था भारतीय सनातन परंपरेला अनुकूल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या प्रत्येक कृतीत भारतीयत्व अंगीकारले पाहिजे, असे आवाहन प्राचीन भारतीय स्थापत्यकलेतील तज्ञ श्री. अभिजीत साधले यांनी केले. सनातन संस्थेने पुंडलिकनगर, पर्वरी येथील संत गाडगेबाबा सभागृहात आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
साधनेमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक ! – प्राध्यापक आत्माराम गावकर

म्हापसा – साधनेमध्ये सातत्य ठेवल्यास देव आणि गुरु यांची कृपा आपल्यावर सातत्याने रहाते. या कृपेमुळे आपल्या प्रापंचिक अथवा आध्यात्मिक अशा सर्व अडचणी दूर होऊन आपली अध्यात्मात प्रगती होते, असे मार्गदर्शन प्राध्यापक श्री. आत्माराम गावकर यांनी केले. सनातन संस्थेने काणका-बांध म्हापसा येथे आयोजित केलेल्या गुरुपौणिमा महोत्सवात मुख्य अतिथी या नात्याने ते बोलत होते.
सनातन संस्थेच्या वतीने आभार !
१. साळगावचे भाजपचे आमदार श्री. केदार नाईक, कुंभारजुवा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. राजेश फळदेसाई, सांत आंद्रे मतदारसंघाचे रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार श्री. वीरेश बोरकर, मये मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. विठ्ठल चोपडेकर, पोंबुर्फा पंचायतीचे पंचसदस्य श्री. सूर्या हडफडकर आणि सुकूर पंचायतीचे पंच यांनी गुरुपौर्णिमेला येणार्या भाविकांसाठी बसचे नियोजन केले.
२. ‘राधिका डेकोरेटर्स’चे मालक श्री. अशोक पाटील, कुडका-पाळे येथील श्री. अनंत शिरोडकर आणि संत गाडगेबाबा सभागृह समिती यांनी गुरुपौर्णिमा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे सनातन संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कराड

कराड, १५ जुलै (वार्ता.) – भारतीय गुरुकुल शिक्षणव्यवस्थेमध्ये वयाच्या सहाव्या वर्षापासून पुढील १५ वर्षे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येऊन स्वतः गुरु प्रत्येकास त्याच्या गुण-कर्मानुसार पुढील मार्गदर्शन करीत. इस्लामिक राजवटीत अल्लाउद्दीन खिलजीने तक्षशिला, नालंदा सारखी गुरुकुल जाळून नष्ट केली, तसेच इंग्रज म्हणजेच ख्रिश्चनांनी गुरुकुल शिक्षणपद्धतीवर आघात करीत त्यांच्या मशिनरी शाळा उभारून गुरु-शिष्य परंपरा मोडीत काढली. आपणास शिक्षण मिळाले; पण संस्कार नाही. पिढी संस्कारहीन होण्याचे प्रमुख कारण भारतीय गुरु-शिष्य परंपरा नष्ट होणे हे आहे. असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गुरुदास रसाळ यांनी केले. येथील अक्षता मंगल कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये ते बोलत होते.

या वेळी अधिवक्ता रसाळ यांनी हिंदूंना धर्माचे महत्त्व सांगावे लागते ही शोकांतिका असून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंनी ईश्वराचा जागर करून धर्माचरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील राष्ट्रीय कर्तव्य !’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. शिवानी देसाई यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.

क्षणचित्रे
१. सोहळ्यासाठी ‘भाजप किसान मोर्चा’चे प्रदेश सरचिटणीस श्री. रामकृष्ण वेताळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हा कार्यवाहक श्री. सागर आमले, ‘श्रीकृष्ण गोपालन संस्थे’चे अध्यक्ष श्री. ऋषिकेश गुरव यांची उपस्थिती होती.
२. गेल्या १९ वर्षांपासून विविध माध्यमातून हिंदू संघटन आणि धर्मकार्य करणारे धारकरी श्री. प्रदीप साळवे यांचा अधिवक्ता गुरुराज रसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात २ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा !

चंद्रपूर, १४ जुलै (वार्ता.) – हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक कार्य करतांना अध्यात्माची जोड दिली, तर कार्याला ईश्वराचे पाठबळ मिळते, असे प्रतिपादन चंद्रपूर भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवाला विश्व हिंदु परिषदचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. रोडमलजी गहलोत, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य पू. मनीषजी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामिनी हरिप्रियानंद सरस्वती, ‘एम्आयडीसी’ औद्योगिक असोसिएशनचे श्री. मधुसूदनजी रुंगठा, वेद माता गायत्री परिवार ट्रस्टचे अध्यक्ष तथा चंद्रपूर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

मूल (जिल्हा चंद्रपूर) – समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या भरकटत चाललेल्या पिढीला धर्माचरण आणि धर्मपालन यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर वारंवार आघात होत आहेत. त्यामुळे स्वसंरक्षण आणि धर्मरक्षण यांमुळेच आपले रक्षण होणार आहे, असे मार्गदर्शन येथील माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर सनातन संस्थेचे श्री. दीपक जमनारे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्वश्री भाजपचे मूल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, भाजपचे कार्यकर्ते युवराज चावरे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !