सनातन संस्थेच्या वतीने गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

फोंडा – सनातन संस्थेच्या वतीने गोव्यात काणका बांध, म्हापसा येथील श्री सिद्धपुरुष नारायण देव देवस्थान; पुंडलिक नगर, पर्वरी येथील संत गाडगे बाबा सभागृह; नवेवाडे, वास्को येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर सभागृह; दवर्ली, मडगाव येथील बाबू नायक सभागृह; होंडा येथील सुंदरम् सभागृह आणि फोंडा येथे राजीव गांधी कला मंदिर अशा एकूण ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

महोत्सवात सकाळच्या सत्रात सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांच्या ‘हिंदूसंघटनाचे महत्त्व आणि आवश्यकता’ या विषयावरील मार्गदर्शन, तसेच सच्चिदानंद प्ररब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारी चलचित्रे दाखवण्यात आली. या वेळी गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

फोंडा येथील महोत्सवात श्री. संतोष आणि सौ. तन्वी महाजन यांनी गुरुपूजन, तर पौरोहित्य वेदमूर्ती श्री. दामोदर वझे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रचीती गावणेकर आणि कु. युक्ता नाईक गुरव यांनी केले. पर्वरी येथील महोत्सवात श्री. केशव आणि सौ. कांचन चोडणकर यांनी गुरुपूजन केले, तर श्री. प्रदीप जोशी यांनी पौरोहित्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कामत यांनी केले. वास्को येथील कार्यक्रमात गुरुपूजन श्री. अरविंद आणि सौ. प्रमिला आडारकर यांनी केले, तर पौरोहित्य श्री. महेश मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. यतिन बोरकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. आनंद साखळकर यांनी केले. म्हापसा येथील कार्यक्रमात गुरुपूजन अधिवक्ता श्री. सुशांत आणि अधिवक्ता (सौ.) सुलक्षा देऊसकर यांनी केले, तर पौरोहित्य श्री. राजू केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सकाळच्या सत्रातील सूत्रसंचालन कु. चैत्रवी परब आणि कु. अखिला पेडणेकर यांनी, तर सायंकाळच्या सत्रात सूत्रसंचालन कु. चैत्रवी परब, कु. भार्गवी म्हांबरे आणि कु. दिया शेटगावकर यांनी केले. मडगाव येथे गुरुपूजन श्री. गणेश आणि सौ. मनीषा जामदार यांनी केले, तर पौरोहित्य श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले.

मडगाव येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सत्कार सनातनचे साधक श्री. दिगंबर जामदार यांनी, तर नावेलीचे भाजपचे आमदार श्री. उल्हास तुयेंकर यांचा सत्कार सनातनचे साधक  श्री. सुधाकर आगलावे यांनी केला. फोंडा येथील कार्यक्रमात भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचे मार्गदर्शन झाले.

गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा सत्कार

फोंडा येथील कार्यक्रमात १० वी इयत्तेत ९०.३३ टक्के गुण मिळवलेली कु. पूर्ती लोटलीकर, ८४.३३ टक्के गुण मिळवलेलीकु. ईश्वरी हजारे आणि ८०.८३ टक्के गुण मिळवलेला कु. हरीश नाईक गुरव यांचा सनातनच्या संत पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चोडण येथील रघुवीर आणि प्रेमावती उच्च माध्यमिक विद्यालयातील कला शाखेत  १२ वीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवल्याबद्दल कु. श्रेयस संदीप साळगावकर याचा सौ. किशोरी भले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १० वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवलेली कु. गौरवी श्यामसुंदर गडेकर हिचा सौ. प्रतिमा बेसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मडगाव येथील कार्यक्रमात १० वी इयत्तेत ८४ टक्के गुण मिळलेला कु. अथर्व भोई आणि १२ वी इयत्तेत ७१ टक्के गुण मिळवलेला कु. आर्यन गावकर यांचा श्री. सतीश गोलम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग – सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी जिल्ह्यात ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवास मोठ्या संख्येने जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ, साधक आणि राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांची उपस्थिती लाभली होती. कुडाळ येथील कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ श्री. विवेक पंडित यांच्या हस्ते ‘आदर्श शिष्य कसे बनावे !’, या ‘ई बूक’चे प्रकाशन करण्यात आले.

६ ठिकाणी झाला गुरुपौर्णिमा महोत्सव

श्री शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी, तालुका कुडाळ; मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली शहर; श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे-देवगड; मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण; साळगावकर मंगल कार्यालय, आरवली, तालुका वेंगुर्ला आणि वैश्यभवन, गवळी तिठा, सावंतवाडी या ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. कुडाळ येथे मुळदे येथील प.पू. घडशी महाराज आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या वेळी संतांचा सन्मान करण्यात आला.

सहकार्य करणार्‍यांचे आभार !

‘हे गुरुकार्य स्वत:चेच आहे’, या भावाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या महोत्सवांच्या यशस्वीतेसाठी विनामूल्य सभागृह देणे, विनामूल्य अल्पाहार देणे, ध्वनीक्षेपक यंत्रणेची व्यवस्था करणे, अशा सेवांच्या माध्यमांतून अनेकांनी सहकार्य केले. या सर्वांचे या वेळी आभार मानण्यात आले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक, गुणवंत विद्यार्थी आणि हिंदुत्वनिष्ठांचा  सत्कार

या कार्यक्रमात गेली अनेक वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा  करणारे वितरक, तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले साधक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला. मालवण येथे धर्मप्रेमी अधिवक्ता पालाश लीलाधर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

कुडाळ येथील कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.

उपस्थिती

गुरुपौर्णिमा महोत्सवात देवगड येथे – ४००, कणकवली – ५००, मालवण – २७५, कुडाळ – ५००, सावंतवाडी – ६०० आणि आरवली येथे ३५० जिज्ञासू आणि साधक यांची उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गव्हाणकर, प्रा. अक्षय परूळेकर, श्री. विवेक पंडित आणि श्री. स्वागत नाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आढावा बैठका १२ जुलै या दिवशी

१. साळगावकर मंगल कार्यालयात, आरवली, दुपारी ४ वाजता

२. संस्कार हॉल, धुरीवाडा-मालवण, सायंकाळी ४ वाजता

३. श्री. सुहास बागवे (सातरल, कणकवली), सायंकाळी ७ वाजता

१३ जुलै या दिवशी

१. विष्णु स्वामी मठ, आरोंदा, संध्याकाळी ५ वाजता

सावंतवाडी येथे गोरक्षकांचा सत्कार

सावंतवाडी येथे गेल्या ५ वर्षांपासून गोरक्षक सहकार्‍यांसह गोरक्षणाचे पवित्र कार्य अनेक संकटांना सामोरे जात, तसेच प्रसंगी जिवावर उदार होऊन करणारे कोलगाव येथील श्री. कृष्णा वीरबस्तप्पा धुळपणावर यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक गोवंशियांचे प्राण वाचवले आहेत. या कार्यासाठी श्री. धुळपणावर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बजरंग दलाचे प्रथमेश गावडे, अथर्व केसरकर, शुभम हिर्लेकर, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा समन्वयक दिनेश गावडे, साईराज नार्वेकर, जितेंद्र राईका, रोहन धुरी आदी उपस्थित होते.

श्री. दिनेश गावडे – ‘आम्ही गोरक्षणाचे कार्य करत आहोत. आम्हाला सनातनच्या  माध्यमातून चांगले मार्गदर्शन मिळाले.’

सनातन संस्थेने केलेल्या सत्कारामुळे कार्य करण्यास स्फूर्ती मिळाली !

श्री. विरबस्तपा धुळपणावर – ‘गोरक्षणाचे कार्य करतांना काही लोक आम्हाला गुंड म्हणायचे; परंतु आज सनातन संस्थेने आमचा जाहीर सत्कार केला. त्यामुळे वाटते ईश्वर आपल्या सोबत आहे. त्यामुळे हे कार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळाली.

सिंधुदुर्ग – सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी जिल्ह्यात ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवात हिंदुत्वनिष्ठ, गोरक्षक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तसेच  दैनिक ‘सनातन प्रभात’चे अनेक वर्षे वितरण करणारे वितरक आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यातील काही निवडक भाग प्रसिद्ध करत आहोत. कुडाळ येथे मुळदे येथील प.पू. घडशी महाराज यांची वंदनीय उपस्थिती

प.पू. घडशी महाराज यांचा सन्मान करतांना भोयाचे केरवडे येथील श्री. मोहन सावंत

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरकांचा सत्कार

या कार्यक्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा गेली अनेक वर्षे करणारे वितरक, तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले साधक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला.

सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक अनुक्रमे सीताराम म्हापणकर (वय ७० वर्षे) आणि सुनील नांगरे (वय ५५ वर्षे), वैभववाडी येथील वितरक साधिका सौ. रोहिणी रमेश पोरे (वय ७० वर्षे), कुडाळ येथे वितरक श्री. बाबू दत्तराम ठुंबरे (वय ४९ वर्षे), मालवण येथे वितरक श्री. शिरिष नाईक (वय ६३ वर्षे) आणि श्री. लक्ष्मण कुर्ले (वय ५४ वर्षे), आरवली येथे श्री. आनंद बाबा धानजी (वय ४१ वर्षे) आणि श्री. दशरथ विठोबा परब (वय ६४ वर्षे) यांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची ग्रंथप्रदर्शनाला भेट मालवण येथील ग्रंथप्रदर्शन पहातांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि कार्यकर्ते कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सहकारी कर्मचार्‍यांसह कार्यक्रमाला भेट दिली, तसेच त्यांनी काही ग्रंथ खरेदी केले. कुडाळ येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते

सर्वांगीण विकासाचा विचार धर्मात केला आहे ! – प्रा. अक्षय परुळेकर

प्रा. अक्षय परुळेकर

कणकवली येथील कार्यक्रमात ओरोस येथील ‘मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट (एम्.आय.टी.एम्.)’ या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (इंजिनीयरिंग कॉलेजचे) प्राध्यापक आणि कीर्तनकार प्रा. अक्षय परुळेकर म्हणाले, ‘‘समाजव्यवस्था उत्तम चालण्यासाठी चातुर्वर्णांच्या माध्यमातून सुयोग्य व्यवस्था सांगितली गेली. विश्‍वाशी असलेल्या संबंधांची, पर्यावरणाची, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य यांची जपणूक हिंदु धर्मात केली जाते. धर्मातील अशा व्यवस्थेमुळे देशातील गावे स्वयंपूर्ण होती आणि भारतातून सोन्याचा धूर निघत होता; मात्र हिंदुद्रोही राज्यकर्त्यांकडून याविषयी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जातात. सर्वांगीण विकासाचा विचार धर्मात केला आहे. हिंदु धर्मात सखोल ज्ञान आहे. मनुष्यजन्मातच धर्मपालन करू शकतो अन्यथा आहार, निद्रा, भय, मैथुन पशूंमध्येही होते. धर्माचरणाविना आपले जीवन पशूसारखे आहे.’’

प.पू. जयंत आठवले यांनी पुढील १ सहस्र वर्षांसाठीचे कार्यकरून ठेवले आहे ! – श्री. विवेक पंडित

श्री. विवेक पंडित

कुडाळ येथील कार्यक्रमात बोलतांना हिंदुत्वनिष्ठ श्री.  विवेक पंडित यांनी सांगितले की, मानसिक आणि शारीरिक बळ वाढवून पूर्ण शक्तीनिशी धर्माच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. असे केले, तरच भारताला पुनर्वैभव प्राप्त होऊन भारत पुन्हा विश्‍वगुरु होऊ शकतो. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. जयंत आठवले यांनी पुढील १ सहस्र वर्षांसाठीचे कार्य करून ठेवले आहे. त्यांनी धर्माची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी केली आहे. हे कार्य फार मोठे आहे. यातून संपूर्ण भारताला पुन्हा पुनर्स्थान प्राप्त होणार आहे. गुरु हे एक व्यक्ती नसून ते तत्त्व आहे. श्रीकृष्ण भारतभूमीचे परमगुरु आहेत. ज्याला ईश्‍वरप्राप्ती झाली, तो गुरु असतो. विश्‍वाला तारण्याची शक्ती केवळ गुरूंकडे आहे.

केवळ व्यष्टी साधना नाही, तर समाज आणि राष्ट्र यांचे हित बघा ! – अधिवक्ता समीर गव्हाणकर, मालवण

अधिवक्ता समीर गव्हाणकर, मालवण

मालवण येथील कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता समीर गव्हाणकर म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या साधकांमुळे आज मला गुरुपूजनाची संधी मिळाली. ‘विश्‍वातील कठीण गोष्ट मोक्षप्राप्ती करणे ही असून हा यमघाट पुष्कळ कठीण आहे. यासाठी सक्षम गुरूंची आवश्यकता असते. केवळ व्यष्टी साधना करून चालणार नाही, तर समाज आणि राष्ट्र यांचे हित बघा. आपले राष्ट्र हे हिंदु राष्ट्र राहिले, तरच आपण आपला वारसा पुढे पोचवू शकतो. आपत्काळ चालू  झाला असल्याने सजग रहा ! सावध रहा ! आपण एक आहोत आणि आपण हिंदु राष्ट्रात आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.’’

गोरक्षणाच्या कार्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मार्गदर्शन मिळते ! – श्री. स्वागत नाटेकर, गोरक्षक

श्री. स्वागत नाटेकर, गोरक्षक

सावंतवाडी येथील कार्यक्रमात बोलतांना श्री. स्वागत नाटेकर म्हणाले, ‘‘ज्याला रंग, रूप नाही, अशा विदेशी जनावराला आपण ‘गाय’ म्हणून लागलो आणि गावागावांमध्ये विदेशी गायी पाळल्या जाऊ लागल्या. याउलट देशी गोवंश हत्येसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे देशी गोवंशियांची संख्या अल्प होऊ लागली. आता कोकणातूनही देशी गोवंशियांना हत्येसाठी नेले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे; म्हणून आम्ही गोरक्षणाचे कार्य चालू केले आणि सगळे संघटित होऊन आतापर्यंत ४०० हून अधिक देशी गोवंश वाचवण्याचे कार्य सावंतवाडी गोरक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही केले आहे.

या संपूर्ण कार्यात आम्हाला मालवण येथील अधिवक्ता पलाश चव्हाण यांनी साहाय्य केले. यामुळे गोवंशियांच्या अवैध वाहतुकीच्या काही खटल्यांत न्यायालयाने संबंधितांना दंड आकारला, तसेच गोशाळेत पाठवलेल्या गायींच्या देखभालीचा खर्च देण्याचा आदेश दिला. या कार्यासाठी आम्हाला सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांचे मार्गदशन मिळते.

Leave a Comment