‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा सर्व कार्यक्रमांपेक्षा अद्भुत !

मी मागील २० वर्षांपासून सनातन धर्माविषयीच्या ज्या कार्यक्रमांना गेलो आहे, त्यापेक्षा गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा कार्यक्रम अद्भुत आणि पूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांहून वेगळा आहे. हिंदु राष्ट्र हे केवळ त्याविषयी बोलण्यापेक्षा आणि घोषणा देण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये अन् आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये पालट घडवून आणला, तरच साध्य होणार आहे. आपला समाज अनेक जातींमध्ये विभागला गेलेला आहे. अशा सर्व समाजाला आणि सर्व वर्गांना एकत्र घेऊन सनातन राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल. गोव्याच्या पावन धरतीवर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केल्याविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आभार व्यक्त करतो. वास्को-द-गामा, तसेच पोर्तुगीज गोव्यातून निघून गेलेले असतांनाही भारतीय लोक गोव्यात आल्यावर त्यांचे अंधानुकरण करतात आणि त्यांचा हेतू केवळ समुद्रकिनार्‍यांवर मौजमजा करणे, हा असतो. त्यांनी गोव्यातील आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. देशात सनातन धर्मासाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रांतांत विखुरलेल्या आहेत. त्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास सनातन राष्ट्र तात्काळ साकार होऊ शकते !

– पंडित अरुणजी मिश्रा, राष्ट्रीय अध्यक्ष, पुरोहित महासभा, छत्तीसगड.

१. श्री. विपुल ठक्कर (उद्योजक), ठाणे

अ. ‘कार्यक्रमाला आरंभ झाल्यापासून माझा भाव जागृत होत होता.

आ. मी प्रत्येक वक्त्याचे भाषण मनापासून ऐकले आणि त्यातून मला ‘हिंदु राष्ट्राचे महत्त्व किती आहे ?’, हे लक्षात आले.

इ. माझे खरोखर पुष्कळ मोठे भाग्य आहे आणि माझ्यावर देवाची कृपा आहे; म्हणूनच मी या कार्यक्रमाला येऊ शकलो.

ई. माझ्या व्यवसायाच्या व्यापातून महिन्यातून ३ दिवस वेळ काढून मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये सेवेला येईन.’

२. श्री. उदय तिमसे (धर्मप्रेमी), टिळक नगर, मुंबई.

अ. ‘मला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये उपस्थित राहून पुष्कळ आनंद झाला आणि सनातन संस्थेच्या अविरत प्रयत्नांनी ‘हे राष्ट्र ‘सनातन हिंदु राष्ट्र’ म्हणून नक्कीच उदयास येईल’, असा विश्वास निर्माण झाला.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतः आधुनिक वैद्य (डॉक्टर) असूनही त्यांनी अध्यात्म क्षेत्रामध्ये एवढे भव्य कार्य करून एवढे साधक निर्माण केले आहेत, हे पाहून त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

इ. महोत्सवातील संत आणि इतर मान्यवर वक्ते यांचे विचार पुष्कळ स्फूर्तीदायक होते. श्री. चेतन राजहंस यांनी ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना आपण कशी करावी ?’, हे सांगितले. ते पुष्कळ उपयुक्त वाटले.

ई. या महोत्सवामुळे हिंदु समाजात नक्कीच जागृती होईल.

उ. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी केलेला महाधन्वन्तरि याग पुष्कळ छान, स्फूर्ती आणि आत्मविश्वास देणारा वाटला.

ऊ. सर्व व्यवस्था उत्तम होती. सर्व साधक एकमेकांना साहाय्य करत होते. हे सर्व पाहून मन भारावून गेले.’

३. सौ. महालक्ष्मी बालाजी (चार्टर्ड अकाउंटंट), मुंबई

अ. ‘कार्यक्रमात काही त्रुटी रहाणे, म्हणजे आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहात, हे मला समजत आहे. २५ सहस्रांहून अधिक लोकांचा महोत्सव उभारणे, ही सोपी गोष्ट नाही. मला या महोत्सवामध्ये पुष्कळ आनंद मिळाला.

आ. या आनंदामुळे घरी परतल्यानंतरही मला रात्री झोप लागली नाही. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याबद्दल मनात सारखी कृतज्ञता वाटत होती. मला प्रत्यक्ष त्यांना इतक्या वर्षांनी सलग पहायला आणि ऐकायला मिळाले. या आनंदापुढे ज्या गोष्टी उणे पडल्या, त्यांचा हिशोब नगण्य वाटतो.

इ. या महोत्सवात मला वर्षानुवर्षे ओळख असलेले; पण भेटू न शकलेले साधक भेटले, याबद्दल फारच कृतज्ञता वाटली.

ई. या व्यतिरिक्त नव्याने संस्थेशी जोडले गेलेले साधक आणि हितचिंतकही भेटले. आम्हाला एकमेकांविषयी पुष्कळ आपुलकी वाटली.

उ. महोत्सवाचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे.

गुरुदेवांनी ही अनुभूती दिल्याबद्दल त्यांच्या चरणी मनःपूर्वक कृतज्ञता !’

४. श्री. रणजित सावरकर (अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक), दादर, मुंबई.

श्री. रणजित सावरकर
(श्री. रणजित सावरकर, हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू असून प्रखर राष्ट्रप्रेमी आहेत.)

अ. ‘कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. माझी एवढी चांगली निवासव्यवस्था कशाला केली ? त्याची काहीही आवश्यकता नव्हती. तुम्ही २५ सहस्र लोकांचे नियोजन पहात होतात. त्यामुळे इतकी व्यवस्था करणे अपेक्षित नाही. तुमचे नियोजन पुष्कळ छान होते.

आ. सध्या आपल्याला ज्या अडचणी येत आहेत, त्या नकारात्मक शक्तीच्या आहेत.

इ. गुरुदेवांची भेट झाली आणि मला त्यांच्याशी संवाद करायला मिळाला. त्यामुळे मला पुष्कळ छान वाटले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २२.५.२०२५)

५ . श्री. अमरसिंह परमार, पेण, जिल्हा रायगड.

अ. ‘एखाद्या कार्यक्रमाचे असे भव्य आयोजन पहिल्यांदाच पाहिले. अद्भुत नियोजन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे नियोजन करणे, सहज कुणालाही शक्य नाही.

आ. सनातन संस्थेने केलेले या कार्यक्रमाचे आयोजन पाहून ‘हिंदु राष्ट्र लवकर साकारेल’, याची निश्चिती वाटते.

इ. प्रत्येक व्यवस्था अत्यंत उत्तम होती.

ई. कार्यक्रमाची भव्यता शब्दांत वर्णन करता येणार नाही. कार्यक्रम एवढा सुंदर होता की, मी ३ दिवसांसाठी आलो होतो; परंतु येथील कार्यक्रम पाहून आणखी पुढे ३ दिवस असणार्‍या शतचंडी यज्ञाला उपस्थित रहाण्याचा विचार केला.’

पू. प्रमोद केणे कळंबोली, नवी मुंबई.

पू. प्रमोद केणे

अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव पुष्कळ छान होता.

आ. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अनेक संत गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त एकत्र आले. तिथे ऊर्जेचा स्रोत पुष्कळ होता.

इ. एवढ्या मोठ्या प्रमाणात महोत्सवाची सिद्धता करणे सोपे नाही. भव्य दिव्य ‘सेट’ उभारणे कठीण आहे. सर्वांची रहाण्याची, जेवण्याची, तसेच चहा, अल्पाहार यांची व्यवस्था उत्तम होती.

ई. नकारात्मक शक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या.

उ. सर्व साधकांची सेवा पुष्कळ आधीपासून चालू झाली होती, तरीसुद्धा सर्व जण आनंदी वाटत होते.

ऊ. महोत्सवाच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांची भेट झाली. त्यांना भेटून मला पुष्कळ आनंद झाला.’

६. सौ. रेखा दिलीप परुळेकर, कामोठे, नवी मुंबई.

अ. ‘सर्वांची व्यवस्था अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केली होती. ती आमच्या मनाला अत्यंत भावली.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आणि अन्य सर्व संतांचे दर्शन मिळाल्याने आमच्या मनाला पुष्कळ चांगले वाटले.

इ. ‘ज्या संतांना आम्ही दूरचित्रवाणी आणि ‘यू ट्यूब’वर पहात होतो, त्या संतांचे आम्हाला प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ आनंद होत होता आणि मला सकारात्मक लहरी जाणवत होत्या.

ई. सर्वांत अधिक आनंद मला सोमनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतांना झाला. शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर ‘आज मी जीवनातील सर्वकाही मिळवले आहे’, असे वाटले. काही कारणास्तव मला आणि माझ्या मैत्रिणीला परत यावे लागले; परंतु तेथील व्यवस्था आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला मिळाली. ती आम्ही कधीही विसरू शकत नाही.’

७. श्री. दीपक रतन होले, हडपसर, पुणे.

अ. ‘सनातन हिंदु धर्माचा आणखी प्रसार होण्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरात शाळा चालू झाल्या पाहिजेत. या शाळांतील शिक्षणात शस्त्रशिक्षण, धर्मशिक्षण आणि आधुनिक शिक्षण यांची सांगड घातली पाहिजे.

आ. मला या कार्यात सहभागी व्हायचे आहे. आपले साहाय्य मिळाले, तर पुष्कळ बरे होईल.’

८. सौ. इंदु वासुदेव बनसोडे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

अ. ‘कार्यक्रम भावस्पर्शी आणि ‘न भूतो न भविष्यति ।’, असा होता.

आ. विशेष म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अगदी जवळून दर्शन झाले. आणखी भाग्य ते कोणते ?

इ. दैदीप्यमान सोहळा झाला. ‘३ दिवस कसे गेले ?’, ते कळलेसुद्धा नाही. या कार्यक्रमाच्या सिद्धतेचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.

ई. मला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेगुरुजी यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जीवनचरित्रावरील कीर्तन पुष्कळ भावले. ‘जेवण सोडून कीर्तन ऐकत रहावे’, असे मला वाटले.

उ. महोत्सवाच्या ठिकाणाहून माझा पायच निघत नव्हता; परंतु परतीची वाट तर धरावीच लागणार होती. मला ‘जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ।।’, या ओळी आठवल्या आणि ‘इतकी वर्षे केलेल्या साधनेचे फळ मिळाले’, असे वाटले.(सर्व सूत्रांचा दिनांक २३.५.२०२५)

 

Leave a Comment