सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – तृतीय दिवस

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थिती ! 

काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक ! – अधिवक्ता विष्णु जैन

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – एकीकडे बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सुविधा मिळतात. उत्तर प्रदेश येथील अल्पसंख्याकांच्या एक वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी हिंदू धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. ‘वक्फ बोर्डा’त केवळ २ अहिंदू सदस्य घेतले, तर लगेच ‘सरकार असे करू शकत नाही’, असा न्यायालय निर्णय देते. अहिंदूंचे एकही प्रार्थस्थळ, श्रद्धास्थान सरकारच्या नियंत्रणात नाही, तर प्रत्येक राज्यातील विविध कायद्यांद्वारे हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. काशी-मुथरा येथील मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा आम्ही देत आहोत. केवळ हे पुरेसे नसून देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करण्याच्या लढ्यात हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे आवाहन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

 

शत्रूचा कणा मोडल्यानंतरच देशात शांती नांदेल ! – मेजर गौरव आर्य (निवृत्त), मुख्य संपादक, चाणक्य फोरम्, देहली

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १९ मे (वार्ता.) – राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. पाकिस्तानला भारताने वारंवार क्षमा केली आहे. युद्धात ३ वेळा पराभव केल्यानंतरही पाकिस्तानने भारतावर पलटवार केला. ‘शत्रूला वारंवार क्षमा करू नये’, ही सनातन धर्माची शिकवण आहे. पाकिस्तानलाही वारंवार क्षमा न करता ठोकून काढले पाहिजे. हीच युद्धनीती आहे. शत्रूचा कणा मोडल्यानंतरच देशात शांती नांदेल, असे वक्तव्य देहली येथील ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक मेजर गौरव आर्य (निवृत्त) यांनी केले. १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ या सत्रात मान्यवरांनी विविध विचार मांडले. यामध्ये मेजर गौरव आर्य (निवृत्त) यांनी ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर विचार मांडले. या वेळी व्यासपिठावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, ‘पंजाब गोरक्षक दला’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश प्रधान, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या आध्यात्मिक शोध विभागाचे प्रमुख सदस्य श्री. शॉन क्लार्क, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु सिरियाक वाले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्याचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
या वेळी मेजर गौरव आर्य म्हणाले, ‘‘साधूसंतांच्या रक्षणासाठी प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. मोगलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग यांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभु श्रीराम पुन्हा अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार होत आहे

हिंदु जनजागृती समितीचे कार्य समाजाला दिशादर्शक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती


मुसलमानांना मदरशांमध्ये, तर इसायांना चर्चमध्ये धर्मशिक्षण मिळते; मात्र हिंदूंना धर्मशिक्षणाची व्यवस्था नाही. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग चालू केले. सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. म.फी. हुसेन याने भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्ने चित्र काढल्याच्या विरोधात समितीने देशव्यापी आंदोलन छेडले. त्यामुळे हुसेन यांच्या विरोधात देशभरात १ सहस्र २०० तक्रारी नोंदवल्या जाऊन त्यांना देश सोडून जावे लागले. हिदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाद्वारे देशभरातील १ सहस्रहून अधिक संघटना धर्मकार्याशी जोडल्या आहेत. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून या संघटनांचे एकत्रित कार्य चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य राष्ट्राला दिशा देणारे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक


‘हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक आहे. हिंदू बलशाली व्हायला हवेत. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले. त्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या संघटनाला प्रारंभ केला. सनातनच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची प्रचिती आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असे एकमात्र व्यक्ती आहेत, जे राष्ट्राला दिशा देण्यासाठी कार्य करत आहेत. हिंदूंना बळशाली करण्यासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत.

सनातन धर्माचा विदेशात प्रसार करण्याच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सिरियाक वालिये, एस्.एस्.आर्.एफ्.

सध्या जागतिक स्तरावर अस्थिर वातावरण आणि नकारात्मकता वाढली आहे, प्रत्येकाला भविष्यकाळ कसा असेल ? याविषयी चिंता आहे. यावर सनातन धर्म हेच उत्तर आहे. ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) कार्य जगाच्या ५ खंडांमधील ७० हून अधिक देशांमध्ये चालू असून, अध्यात्म विषयावर ५ सहस्र प्रवचने आणि अभ्यासवर्ग झाले आहेत. १ लाखाहून अधिक लोकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या ५० साप्ताहिक ऑनलाईन सत्संग ९ भाषांमध्ये चालू आहेत. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने चालू आहे.

सनातन धर्माचे प्रत्येक अंग सात्त्विकतेने भरलेले ! –  शॉन क्लार्क, आध्यात्मिक शोध विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

श्रीराममंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीराममंदिर परिसरातील सात्त्विकतेत वाढ होत आहे, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे करण्यात आलेल्या विविध प्रयोगांमधून लक्षात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पहाणार्‍या दर्शकांमधील नकारात्मकता ६० टक्क्यांनी अल्प झाली, तर सकारात्मकता १४५ टक्क्याने वाढल्याचे संशोधनातून लक्षात आले. महाकुंभपर्वात ५ मिनिटांच्या अमृत स्नानाने स्नान करणार्‍यांचे सकारात्मक वलय ६० टक्के ते १३३ टक्के एवढ्या प्रमाणात वाढले. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार, शास्त्रीय गायन यांमुळे सात्त्विकता, भक्ती वाढते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे अशा प्रकारे ६०० हून अधिक प्रयोग करण्यात आले आहेत. या संशोधन कार्यात हिंदूंनी सहभागी व्हावे.

गोवा सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा ! – सतीश प्रधान, संस्थापक, पंजाब गौरक्षा दल  
‘गोमाता तथा सनातन राष्ट्र’ या विषयावर बोलतांना श्री. सतीश प्रधान म्हणाले,
‘‘काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने पाकच्या विरोधात ऑपरेशन ‘सिंदूर’ राबवले. भारतीय सैनिकांनी मोठा पराक्रम केला आहे. गोव्याची ही परशुरामाची भूमी आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी गोमाता स्थापित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा. श्रीरामाने वानरांना, तर श्रीकृष्णाने गोपींना संघटित करून धर्मकार्य केले, त्याप्रमाणे देशातील हिंदूंनी संघटित होऊन धर्मकार्य करायला हवे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारातून धर्मसंस्थापनेचे भव्य कार्य ! – सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारातून धर्मसंस्थापनेचे भव्य कार्य सनातन संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी  साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्मप्रसार केला आहे. मनुष्याला जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे. हा जलद आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग असून कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख संगम आहे. गुरुकृपायोगानुसार साधना हा सांप्रदायिक साधनामार्ग नाही. नृत्य, गायन, संगीत याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन त्यांनी केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर आध्यात्मिक ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय विश्वविद्यालयाची स्थापना केली असून त्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे संत होऊनच बाहेर पडतील.

सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ते बोलत होते. या प्रसंगी ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे श्री. उदय माहुरकर, चंडीगढ येथील लेखक आणि विचारवंत श्री. नीरज अत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या ‘ई’ बुकचे प्रकाशन करण्यात आले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी उपस्थित मान्यवर आणि भाविक

माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर म्हणाले की, सध्या सोशल मीडिया, ‘ओटीटी’, चित्रपट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आक्रमण होत आहे. पॉर्नोग्राफीमुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. हा राक्षस मोबाईलच्या माध्यमातून आता घराघरांत पोहोचला आहे. सनातन संस्कृती, पुढील पिढी वाचण्यासाठी हे सांस्कृतिक आक्रमण रोखणे आवश्यक आहे. तर चंडीगढ येथील लेखक आणि विचारवंत श्री. नीरज अत्री म्हणाले की, सध्या समाजात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंच्या डोक्यावर बसलेले पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाचे भूत उतरवणे आवश्यक आहे.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे म्हणाले की, बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. नुकत्याच पहलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केल्या जात आहे. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. समर्थ रामदासस्वामींनी यांच्याप्रमाणे आज आपले संत जागृती करत असल्याने आपल्यालाही या सनातन राष्ट्र शंखनादाच्या माध्यमातून सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल.

 

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ भावपूर्ण वातावरणात संपन्न!

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – ‘सांप्रत काळ समस्त जगासाठी अतिशय वाईट काळ म्हणजेच आपत्काळ आहे. युद्धाचे सावट डोक्यावर येऊन ठेपले आहे. या घनघोर आपत्काळात शत्रू केवळ शस्रास्रांनीच नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोगजंतूंच्या माध्यमातूनही आपल्यावर आक्रमण करू शकतो. या न पाहिलेल्या नवीन आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्वांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ चांगले असणे आवश्यक आहे. ‘सर्वांचे कल्याण व्हावे’, या उद्देशाने या ‘श्री महाधन्वन्तरि यागा’चे प्रयोजन आहे. ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ।’ म्हणजे ‘सर्व लोक सुखी होवोत’, याउद्देशाने सनातन संस्था आयोजित ऐतिहासिक आरि भव्य अशा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ठिकाणी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ करण्यात आला. या वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

या महायागासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, गोव्याचे आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमदार सौ. दिव्या विश्वजित राणे यांच्या अनेक संत-महंत, प्रतिष्ठित यांची विशेष उपस्थिती होती. पुरोहितांनी म्हटलेल्या मंत्रघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि चैतन्यमय झाले होते.

श्री महाधन्वन्तरि यागासाठी’ उपस्थित हजारो साधक आणि धर्मप्रेमी

या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि गुरुमूर्ती शिवाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या यागात ६१ दांपत्य यजमान म्हणून सहभागी झाली होती. जेव्हा भगवंताचे हजारो भक्त आणि वेदब्राह्मण एकत्रित येऊन यज्ञ करतात, तेव्हा तो यज्ञ ‘महायज्ञ’ बनतो. त्यामुळे या महोत्सवात हजारो भक्त, भाविक एकत्रित येऊन झालेला हा ‘धन्वन्तरि याग’ ‘श्री महाधन्वन्तरि याग’ बनला आहे. या यज्ञाचा संकल्प केवळ व्यष्टी किंवा कौटुंबिक या स्तरांवर मर्यादित नसून तो विश्वव्यापक संकल्प आहे.’’

या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व थेट प्रक्षेपणासाठी भेट द्या – SanatanRashtraShankhnad.in

 

Leave a Comment